Showing posts with label संग्रहीत. Show all posts
Showing posts with label संग्रहीत. Show all posts

Friday, March 12, 2021

जगातील सर्वश्रेष्ठ आई'_ चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष

*_'जगातील सर्वश्रेष्ठ आई'_ चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष......!!*

      मागील संपूर्ण आठवडा विविध माध्यमातून महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत काल ८ मार्च रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी "जागतिक महिला दिन " म्हणून साजरा केला गेला. 'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने वर्तमानपत्र, सोशल मिडियांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरलेले होते. देशभरात त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यात महिलांना शुभेच्छा देत अनेक पुरस्कार दिले व घेतले गेले. यासर्व पुरस्कार समारोहात वेगळा आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घ्यावी असा समारोह म्हणजे बेंगळुरू येथे संपन्न झालेला 'वेमपावर'. या समारोहात "बेस्ट माॅम आॅफ द वर्ल्ड " हा खिताब जाहीर करण्यात आला तो एका पुरुषाला. बेस्ट माॅम म्हटले की, ह्या पुरस्काराची मानकरी महिलाचं असेल असे वाटत असतांनाच तो एका पुरुषाला म्हणजेच पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना जाहीर झाला.
       आदित्य तिवारी हे सिंगल पॅरेंट असून २०१६ मध्ये २२ महिन्याच्या अवनिशला त्यानी दत्तक घेतले. मुल दत्तक घेतांना कोणताही पालक सुदृढ बाळाची निवड करेल, पण आदित्य यांनी  चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार असतो. हा आजार असलेल्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं. अशा मुलाला एक सिंगल पॅरेंट म्हणून मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा आदित्यला द्यावा लागला व शेवटी त्याची ममता जिंकली. साधारण दीड वर्षाच्या संघर्षानंतर १ जाने. २०१६ रोजी आईने अनाथालयात सोडलेल्या अवनिशला आदित्यला घरी आणता आले. दत्तक कायदा व समाजाप्रमाणे त्याला घरातूनही विरोध झालाच. परंतू अवनिशला आईची कमतरता न भासू देणा-या आदित्यमधील ममता यासर्व विरोधांना बाळगणारी नव्हती.
        आदित्य तिवारी एका सुप्रसिद्ध आयटी कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. परंतू अवनिशचे पालकत्व स्विकारल्यानंतर त्याच्या काळजीपोटी त्याने नोकरीवर पाणी सोडत 'स्पेशल' मुलांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन व त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. हे करत असतांना त्याला लक्षात आलं की, भारतात बौद्धिक अपंगत्वासाठी वेगळा विभागाचं नाही. सरकार अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रही देत नाही. करीता आदित्याने आॅनलाइन याचिका दाखल केली. परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला असून अशा मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात यायला लागली आहेत.
      'सिंगल पॅरेटिंग' हे काही लिंग आधारित काम नाहीच असे म्हणणारा आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल, " ईश्वराने दिलेल्या भेटीमध्ये तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भेट आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो." असा सहज साक्षात्कारात बोलून जातो. आदित्याने स्वत:ला कधीच कोणत्याही भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला नाही...ना आई, ना बाबा... तो नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करीत होता. एक चांगला पालक कसे बनायचं हे अवनिशने 'एक पालक' म्हणून आदित्याचा स्वीकार करीत शिकवलं.
        आजपर्यंत आदित्य आणि अवनिश यांनी मिळून २२ राज्यांची सफर केली असून जवळजवळ ४०० ठिकाणी कार्यक्रम व कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातील दहा हजारांहून अधिक पालकांशी जोडले गेले आहेत. मानसिकरीत्या असमर्थ असणा-या मुलांचा सांभाळ करण्याच्या पध्दतीबद्दल बोलण्यासाठी आदित्यला संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात विशेष आमंत्रित करण्यात आले होते. केवळ एक महिलाच बाळाचा सांभाळ करु शकते अशी आपल्याकडे मान्यता असतांना आपल्या 'स्पेशल' मुलाचा आदित्याने, एका सिंगल पॅरेंटने काळजी घेतली आणि म्हणूनच आदित्य तिवारींच्या या कर्तुत्वाची दखल घेत नुकत्याच पार पडलेल्या बेंगळुरु येथील वेमपावर या 'जागतिक महिला दिना'च्या समारोहात "जगातील सर्वश्रेष्ठ आई " या खिताबानं एका पुरुषाला गौरविले.

✒ नरेंद्र गायकवाड.

Sunday, April 14, 2019

पूर्वी बाई ठेवणे

पूर्वी बाई ठेवणे हा प्रकार चालायचा. म्हणजे तिला सोप्या भाषेत “रखेल” म्हंटले जाई. यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत न्हवते. आणि त्यातच  या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई. आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून रहात.

मग रंगेल असणारी लोकं आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली भली मोठी जाजमं, गादी, गालिचे आणे तक्के असत. काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकिणी रातभर नाचवायचे.

जणू “अत्तराचा फाया मला आणा राया” असेच स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे. डोक्यावर दिवस रात्र पदर घेवून राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसत. केला तरी तो कोणाच्या पचनी पडत नसे. कारण घरात पुरुषाचा धाक असे.

बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होवू दिली जात नसत. कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे. आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीच. तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येई. व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली जात असे. असले अघोरी उपचार करूनसुद्धा एखांदी बाई गरोदर राहिलीच. तर तिच्या मुलाच्या जन्मांतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला परूसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात. पण वाड्याबाहेरच्य माणसाला याची काहीच खबरबात मिळत नसे. कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे. काहीजण तर तिला माडीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेलं वाड्याच्या बाहेर आणून स्वत: ओतायचे. म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे. ते तिचं मेल्यानंतर मढेच बाहेर काढायचे.

वाड्यातला वारा आणि अंधार पिवून सारा जन्म चिरेबंद भिंतीच्या आत घालविलेली बाई धान्य साठवायच्या कणगीसारखी फुगलेली असायची. तिला उचलायला तितकीच धिप्पाड देहाची माणसं लागायची. इतके करूनही तिच्या पोटी आलेलं एखांदे मुल जगलच तर त्याला मोठे झाल्यावर “कडू बियाणे” म्हणून संबोधले जाई. मग अशा मुलाला एखादा जमिनीचा तुकडा कसायला दिला जाई.

माझ्या ऒळखीतली आज्जी एका रखेल बाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचे नाव घेवून सांगायची की, “तो जन्मला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं. मग बापानं क्षणभर विचार केला अन दया येऊन खड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला.” पुढे मोठे झाल्यावर त्याला “कडू बियाणे” म्हणून साऱ्या पंचक्रोषित ओळख मिळाली.

त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई. सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुगडं, चोळी चढायची. त्यावरच ती समाधान मानायची. आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची.

बाकी, 'बाई वाड्यावर या' म्हणून आज नाचणाऱ्या आताच्या मूर्ख पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधीच नाही   समजणार 
                                                       -ज्ञानेश्वर पोळ

Thursday, January 10, 2019

मराठी साहित्याची उलटी गंगा

मराठी साहित्याची उलटी गंगा :श्रीधर तिळवे नाईक

कुठलेही युग अद्ययावयता जोपासण्यासाठी अद्ययावत माध्यमे वापरत पुढे जात असते किंबहुना जितके माध्यम अद्ययावत तितके ते युग अद्ययावत ! प्रत्येक युगात अद्ययावत माध्यमे वापरणाऱ्यांना सहजासहजी जागा मिळत नाही त्यामुळे अद्ययावत लोकांना बंड करावे लागते आणि आपल्या युगाची नवता तिच्यातील अद्ययावतता विश्लेषण करून मांडावी लागते

चौथ्या नवतेला हा संघर्ष हा अटळ होता आणि तिने तो केलाही ! कुठल्याही नवतेतील दुसरी व तिसरी पिढी ही पहिल्या पिढीपेक्षा आपली नवता अधिक चांगल्या रित्या पेलते हा इतिहास असल्यानेच मी चौथ्या नवतेची मांडणी करतांना आमच्या ऎशोत्तर पिढीपेक्षा नव्वदोत्तर पिढी आणि नव्वदोत्तर पिढीपेक्षा दोन हजारोत्तर पिढी आमच्यापेक्षा ताकदीने लिखाण करेल अशी मांडणी केली होती प्रत्यक्षातही आमच्यापेक्षा नव्वदोत्तरीत सलील वाघांच्या पासून नितीन वाघ संतोष पवारपर्यंत आणि आत्ता ओंकार कुलकर्णी प्रणव सुखदेव पासून स्वप्नील शेळकेपर्यंत अनेकजण अतिशय अव्वल लिखाण करतांना दिसतायत पण एक गोष्ट जी बदलेल असं वाटलं होतं ती मात्र बदललेली दिसत नाही ती म्हणजे माध्यम !

वास्तविक चौथ्या नवतेत घडलेला सर्वात मोठा बदल हा इंटरनेट आणि डिजिटल क्रांती होता जिने ऍनालॉगस रिप्लेस करत हळू हळू डिजिटल माध्यम स्थिर केले त्यामुळे साहित्यातही हळूहळू का होईना डिजिटल क्रांती होऊन डिजिटल माध्यमे सेटल व्हायला हवी होती ते काळाला धरून होते पण प्रत्यक्षात मात्र सगळं जग डिजिटल होत चालले असूनही मराठीत विशेषतः साहित्यात मात्र अजूनही छापीलतेचा दबदबा संपतच नाहीये आजही एखाद्या कवीचा वा लेखकाचा विचार करतांना तो छापील माध्यमात काय उपलब्ध आहे त्यावरूनच त्याची लायकी ठरतीये आणि जे त्याचे छापील लेखन आहे आहे तेच आजही प्रमाण मानले जाते हरिश्चन्द्र थोरातांसारखा मागासलेला समीक्षक असे करत असेल तर ते समजून घेता येईल पण जेव्हा नितीन वाघांसारखा अद्ययावत माणूसही असे म्हणतो तेव्हा काय करायचे हा खरोखरच प्रश्न पडतो

ह्याही पुढचा एक प्रश्न येतो तो म्हणजे छापीलला केंद्रस्थानी का ठेवले जात आहे कि ही छापीलला अधिकृत आणि डिजिटलला मार्जिनलाईज्ड करण्याची साजिश आहे ? असे असेल तर मराठीची गंगा केवळ उलटीच वाहतिये असं नाही तर ती हिमालयाच्या छापील जटेत बांधण्याची ही कॉन्स्पिरसी आहे असंच म्हणावे लागेल

ह्यातून असा प्रश्न निर्माण होतो कि ह्या कारस्थानाचे उद्देश काय आहेत ?

एक गोष्ट साफच दिसते ती म्हणजे अनेक छापील पुस्तके छापणाऱ्या प्रकाशकांना छापीलता प्रमोट करणे भागच आहे कारण त्यांचा धंदा छापीलतेवर अवलंबून आहे असे त्यांना वाटते पण ज्यांचा धंदा नाही त्या कविंनाही छापीलता भयानक महत्वाची का वाटावी ? कि बक्षिसे आणि पारितोषिके फक्त छापीलतेला मिळतात म्हणून हे घडते ? वास्तविक आज ना उद्या सर्वच प्रकाशकांना ऑनलाईन पब्लिकेशन स्वीकारावे लागणे अटळ आहे आणि ज्यांना धंद्यात टिकायचे आहे त्यांनी त्याची तयारी करावी हे उत्तम

एक गोष्ट स्पष्टच दिसते ती म्हणजे डिजिटलला संपादकाची फारशी निकड भासत नाही ज्याच्या त्याचा ब्लॉग आणि जो तो आपल्या ब्लॉगचा संपादक अशी डिजिटलची अवस्था आहे आणि यदाकदाचित डिजिटल नियतकालिक (मासिक पाक्षिक वैग्रे ) अनियत्कालिक असेल तर त्याला ती सत्ता प्राप्त होत नाही जी छापील माध्यमातील संपादकाला प्राप्त होते छापीलमध्ये संपादकाची सत्ता टिकते म्हणून तर मराठीत छापीलतेचा गवगवा नाही ना ?

छापीलतेत ग्रुप स्थापून गोतावळा जमवून साहित्यात स्वतःच्या गोतावळ्याची मक्तेदारी निर्माण करता येते कदाचित त्यामुळे तर सारे गोतावळाकर छापीलतेच्या नादी लागलेले नाहीत ना ? वास्तविक डिजिटलमध्ये गोतावळा अधीक प्रभावीपणे काम करतो हे अलीकडच्या टोल आणि प्रतिटोल अश्या दोन्ही प्रकारच्या टोलभैरवांनी उत्तम सिद्ध केले आहे कि पूर्वी जशा काही गूढवाद्यांच्या सीक्रेट टोळ्या वा गोतावळे असायचे तसा हा प्रकार आहे आणि छापीलता ही ह्या लोकांच्या सिक्रेसीची कोडीफिकेशन आहे ?

की अकादमीक प्राध्यापकांना छापीलतेचे व्यसन लागलं आहे म्हणून ही अफूची शेती केली जातीये ? छापीलतेत अकादमीक बागुलबुवा अकॅडमिशयनना विशेषतः प्राध्यापकांना वाढवता येतो त्यांच्या चैनीसाठी आणि बागुलबुवा टिकवण्याच्या हव्यासासाठी तर ही छापीलतेची शेती केली जात नाहीये ना ? कि हे बंद पडलेले डिपार्टमेंटल कारखाने जिवंत आहेत म्हणून छापील तोफांची सातत्याने सलामी दिली जातीये ?

कि डिजिटल म्हणजे एलिट आणि छापील म्हणजे परिवर्तनवादी असा आभास निर्माण करून परिवर्तनवादी चळवळीचे आम्हीच साहित्यातले कंत्राटदार वा कर्ते असा आभास निर्माण करता येतो म्हणून छापीलता परिवर्तनवादी चळवळीचे हत्यार म्हणून जिवंत ठेवली जातीये आणि तिला केंद्रस्थानी आणून डिजिटल जाणीवपूर्वक मार्जिनलाईज केली जातीये ?

गरीब माणसेही व्हॉट्सप ग्रुप काढत असतांना साहित्यिकांना असले मागासपणाचे धंदे सुचावे हे दुर्देव
उच्च जातींनी मुद्दाम स्वतःला मागासलेले म्हणवून घेण्यासाठी मेळावे घ्यावेत तसा हा मागासलेपणा केन्द्रीयस्थानी आणून मान्यतेची सवलत लाटण्याचा प्रयत्न आहे

माझा छापीलतेला विरोध नाही छापीलता ज्यांना जिवंत ठेवायची आहे त्यांनी खुशाल ठेवावी पण ती जिवंत ठेवण्यासाठी डिजिटलता मार्जिनलाईज करण्याला माझा ठाम विरोध आहे येणारे युग हे पोस्टडीजिटलतेचे आहे त्याला जर सामोरे जायचे असेल तर मराठी साहित्यात आता डिजिटलता केंद्रीय बनणे आवश्यक आहे नाहीतर झोपी गेलेला जागा झाला हा फार्स पुन्हा एकदा साहित्याचे थिमसॉन्ग म्हणून सादर करण्याची वेळ येईल आणि आणखी एक कापले गेलेले नाक मराठी नौवारीच्या पदरात पडेल .

श्रीधर तिळवे नाईक

Sunday, January 6, 2019

Friday, December 28, 2018

दादा आता आई बाबा माझ्याकडे राहतील

गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावेत मी ही त्यांचा मुलगा आहे.माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली 25 वर्ष सेवा करत आहे.आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या कुटूंबियांना ही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे. व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे.माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने अत्यंत चांगला सांभाळ केला आहे.

पण आता तोच थकला आहे मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई- वडिलांना सांभाळन्यासाठी दोनों भाऊ कोर्टात भांडत आहेत। हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न साभांळना-या नालायक अवलादीच्या गालफडात लावलेली जबरदस्त चपरा आहे. जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्ध आश्रमात ठेवनारा जमाना आला आहे. तेथे हे श्रावणबाळ कसे जन्माला आले. जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले आपली काय ईच्छा आहे.तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते.

तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले.तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावनार याचे खुप दु:ख झाले. धन्य ते आई वडिल ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले.या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणा-या व आईची मान कापना-या परशुरामांची अवलादी जन्माला आल्या आहेत. आईवडिलांना वृदाश्रमात ठेवनारे आयआयटी पास नालायक आहेत. सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्च भ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवन्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करना-यां न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.

या देशात शिकून परदेशात नोकरी करनारे महाभाग आहेत. ज्यांनी देशसेवा करायची सोडून परकियांची नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अवस्था निपुत्रिका सारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतील पण आईवडिलांना सांभाळतील. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत. वरिल कथा आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतिय संस्कृती ची सर्वात मोठी अधोगती आहे.


एका माझ्या मित्राच्या मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी पुण्यात गेलो असता मुलगी स्पष्ट म्हणाली लग्नानंतर मुलाचे आईवडिलांना आमच्या सोबत राहता येणार नाही ही माझी पहीली अट आहे


धन्य आहे पुणेकरांची हिंदु संस्कृतीचे माहेरघर पुणे असलेल्या परिसरात सर्वात जास्त वृध्दाश्रम आहेत. अशी भावंडं हवीत. सलाम त्यांना. तुम्ही पण तुमच्या आई-बाबा वर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा. धन्यवाद..!

http://meemarathi.in


Tuesday, December 18, 2018

सौंदर्य साधने आणि स्त्रिया


Destroy The Makeup आणि आपण भारतीय स्त्रिया

By: कविता ननवरे, लेखिका 

समाजाच्या मुख्य प्रवाहाने ठरवून दिलेल्या कोणत्याही मापदंडांमध्ये सामील होण्यासाठी प्रवाहाबाहेरील वर्गाला जेवढी ऊर्जा खर्च करावी लागते तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ऊर्जा त्या मापदंडांविरोधात बंड उभं करण्यासाठी लागते. आणि निर्भिडपणे या बंडाचा झेंडा हाती घेणे स्त्रियांसाठी तर कधीच सोपे नसते. जगव्यापी मीटू चळवळीच्या यशस्वीतेनंतर दक्षिण कोरीयात एक नवी चळवळ बाळसे धरत आहे ती म्हणजे Escape The Corset. मेन स्ट्रीममधील बाह्य सौंदर्यविषक संकल्पनांच्या बळी ठरत असलेल्या कोरीयातील महिला खोट्या सौंदर्यविषयक संकल्पनांना फाट्यावर मारण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.

जून २०१८ मध्ये लीना बेई नावाच्या कोरीयन ब्यूटी ब्लॉगरने यू ट्यूब या सोशल नेटवर्कींग साईटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला. काही तासातच या व्हिडीओला लाखो हिट्स आणि व्ह्यूज मिळाले. काय वेगळं होतं या व्हिडीओत? 'प्रत्येक स्त्रीने मेकअप केलाच पाहिजे. तिने प्रेझेंटेबल दिसलेच पाहिजे' अशी रिस्ट्रीक्शन असणाऱ्या देशात लीना बेईने चेहऱ्यावर लावलेले मेकअपचे थर पूसून टाकत "मी जशी आहे तशीच बरी आहे." म्हणण्याचं धाडस दाखवलं होतं. काही दशकांपूर्वी परंपरावादी भारत देशातील स्त्रीने मंगळसूत्र घालायला, कुंकू लावयला दिलेला नकार इथल्या समाजासाठी जितका धक्कादायक होता तितकचं कोरीयन लोकांसाठी धक्कादायक होतं लिना बेईचं चेहऱ्याला करण्यात येणाऱ्या रंगरंगोटीला नकार देणं. तिच्या अशा स्टेटमेंटनं नाइलाज म्हणून आपला अमूल्य वेळ आणि पैसा मेकअपवर खर्च करणाऱ्या कोरियातील अनेक स्त्रिया प्रभावीत झाल्या. त्यांनी EscapeThe Corset हा हॅशटॅग वापरून मेकअपविरूद्ध बंड पुकारलं. आपापल्या मेकअपच्या किट्स डिस्ट्रॉय करतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले. सोळाव्या शतकात साऊथ कोरियामध्ये शरीर व्यवस्थित शेपमध्ये बसविण्यासाठी स्त्रियांकरता कोरसेट नावाच्या कंपनीने काही पट्टे बाजारात आणले होते. कोरीयन स्त्रियांचं सौंदर्याच्या चुकीच्या मापदंडांना बळी पडणं तिथूनच सुरू झालं म्हणून या चळवळीला हे नाव दिलं गेलं. महिलांनी डायरेक्ट कॉस्मेटीक वापरायलाच नकार दिल्यानं जगातील आठव्या नंबरची कॉस्मेटीकची मोठी इंडस्ट्री असणाऱ्या साऊथ कोरीयातील व्यापारी वर्गाचं धाबं दणाणलं नसेल तर नवलंच.

सतत सुंदर दिसण्यासाठी कोणतीही किंमत चुकवणाऱ्या स्त्रियांनी या चळवळीला का पाठिंबा दिला असावा? या प्रश्नाच्या मुळाशी जाताना काही मूलभूत गोष्टी समोर येतात ज्यांचा अतिरेक या चळवळीला कारणीभूत ठरला असं खात्रीने म्हणता येऊ शकतं. आपल्या न्याय-हक्कांसाठी जागृत झालेल्या स्त्रीचा अजूनही एक उपभोग्य वस्तू म्हणूनच वापर होतोय हे नुकत्याच येवून गेलेल्या metoo चळवळीच्या वादळावरून कळलेच आहे. ही चळवळच Escape The Corset ची प्रेरणा आहे. प्रसारमाध्यमांमधून स्त्रीचा जो काही वापर केला जातोय त्याचा अर्थही 'Woman is only An OBJECT' असाच होतो. पुरूषांची मक्तेदारी असलेली प्रसारमाध्यमं स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या ठरवून देतात आणि त्या व्याख्येत स्वतःला फिट बसवण्यासाठी स्त्री स्वतःची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शक्ती खर्च करते. स्त्रीचं खरं सौंदर्य हे 'सौंदर्य प्रसाधनांच्या वापरानेच सिद्ध होतं' असा बुद्धीभेद प्रसाधन उत्पादकांनी सुरू केला. आणि स्त्री त्याला बळी पडली. या कंपन्यांनी आधी समाजातील वरच्या वर्गातील महिलांना टार्गेट केलं. तुम्हांला सुंदर दिसायचं असेल तर सौंदर्य प्रसाधनं वापरायलाच हवीत असा अपप्रचार करत त्यांना आपला कायमचा ग्राहक बनवलं. वरच्या वर्गातील स्त्रीयांप्रमाणे सुंदर दिसण्याचा हट्ट खालच्या वर्गातील स्त्रिया धरू लागल्या व त्या प्रसाधनांच्या वापरांकडे वळल्या. त्यावर वाट्टेल तितका पैसा उधळू लागल्या. आपण जशा आहोत त्यापेक्षा पुरूषांना आपण कशा दिसायला हव्या आहोत याचा विचार स्त्रिया अधिक करतात हे म्हणणं धाडसाचं असलं तरी खरं आहे.

'सुंदर दिसणाऱ्या, सुंदर नसल्या तरी मेकअपचे थरावर थर लावून सुंदर दिसू पाहणाऱ्या, सतत अप टू डेट राहणाऱ्या स्त्रीलाच समाजात मान प्रतिष्ठा आहे. तुम्ही तशा नसाल तर तुमच्यातल्या टॅलेंटला कुणी विचारत नाही. 'हे आजचं जगभरातलं वास्तव चित्र आहे. हे चित्र निर्माण व्हायला जेवढी पुरूषप्रधान संस्कृती जबाबदार आहे तेवढंच जबाबदार आहे स्त्रीवर्गाचं आंधळेपणानं भांडवलशाहीने तयार केलेले कोणतेही चुकीचे ट्रेंड फॉलो करणं. सौंदर्याचा वापर करून हवं ते काबीज करता येतं, जिंकता येतं हे स्त्रियांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे.

स्वतःतला सिद्ध करण्यासाठी आपलं सौंदर्य विकणाऱ्या स्त्रिया आहेत. ते विकत घेणारी बाजारपेठही आहे कारण कोणतीही वस्तू विकायची असेल तर बाजारपेठ चलनी नाणं म्हणून स्त्रीचा वापर करते मग ती वस्तू पुरूषाने वापरायचीही असू देत अथवा स्त्रीने. पण हा ट्रेंडकाही स्त्रियांनी सेट केला नाही तर प्रसारमाध्यमांचे दोर हाती असणाऱ्या पुरूषवर्गानं केला.

त्वचेला व एकूणच शरीराला हानीकारक असणाऱ्या प्रसाधनांचा मारा करून आपल्याला केवळ एक वस्तू म्हणून मार्केटमध्ये उभं केलं जातय. ही भांडवलशाहीची गल्लेभरू चाल स्त्रियांच्या लक्षात येत नाही का? तर येते. काही स्त्रियांना या सौंदर्याच्या बाजारात आपली शोभेचे बाहुली होऊच द्यायची असते, आत्मसन्मान गहाण टाकून आर्थिक कमाई करायची असते तर काहींना सेट असलेल्या ट्रेंडचा मनस्वी तिटकाराही असतो. पण मुख्य प्रवाहात राहायचं असेल तर त्या प्रवाहाचा ट्रेंड फॉलो करणं त्यांना भाग असतं. काही ज्या बोटावर मोजण्याइतक्या स्त्रिया असतात त्या हे कायदे-कानून, नियम धुडकावून लावतात. इतर स्त्रियांनाही हे करायला भाग पाडतात. मुख्य प्रवाहाचे सगळे नियम धाब्यावर बसवून आपला आत्मसन्मान जपू पाहणारी ती कधी अलिसा मिलानो (मीटू चळवळीची उद्गाती) असते तर कधी लीना बेई असते. पुरूषांना सेवा देणारी आपण केवळ एक उपभोग्य वस्तू होतोय हे त्यांच्या ध्यानात आलेलं असतं. आपल्या शरीराचा उपभोग घेतला जातोय , घातक उत्पादनांचे आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होऊ शकतात याबद्दल त्या अवेअर झालेल्या असतात. शिवाय आपण जशा आहोत तसं स्वीकारण्यासाठी त्यांचं शरीर आणि मनही आनंदानं तयार झालेलं असतं.

आपल्या भारतीय स्त्रियांनीही स्वतःच्या न्यायहक्कांसाठी मोठी चळवळी उभी केली. कधी ती सनातन संस्कृतीविरूद्ध होती, कधी तथाकथित पुरूषी वर्चस्वाविरूद्ध , कधी स्त्री-पुरूष असमानतेविरूद्ध तर कधी आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाविरूद्ध होती. आज सर्व क्षेत्रांत स्त्रीचा जो मुक्तसंचार आहे तो त्यांनी केलेल्या या चळवळींमुळेच आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. मीटू चळवळतही भारतीय स्त्रियांनी हिरीरीने भाग घेतला. आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात इथल्या बड्या बड्या धेंडांना सळो की पळो करून सोडलं. उशीरा का होईना हे धाडस दाखवणारी भारतीय स्त्री कौतुकाचा विषय ठरली. सध्यातरी दक्षिण कोरीयातलं 'Escape The Corset' चं वारं आपल्याकडे येणार नाही हे नक्की. पण कधीच येणार नाही का? कॉस्मेटीक साधनांची आयात करणाऱ्या देशांत भारत देशही काही मागे नाही. मागच्या काही वर्षात भारतातील स्त्रियांकडून सौंदर्य प्रसाधनांचा वापर प्रचंड वाढला आहे हे विविध सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे. स्त्री नोकरी करणारी असो अथवा गृहिणी असो किंवा शाळकरी मुलगी असो त्यांचे ड्रेसिंग टेबल कॉस्मेटीकच्या साहित्यांनी खचाखच भरलेले असतात. त्यातल्या किती वस्तू खरंच गरजेच्या असतात?

साऊथ कोरीयात जे सौंदर्याचे मापदंड आहेत तितके काटेकोर मापदंड भलेही सध्या भारतात नसतील पण भारतीय स्त्रीचं वरचेवर होणारं वस्तूकरण बघता येणाऱ्या दिवसात भारताचं साऊथ कोरीया होणार नाही कशावरून? बाह्यसौंदर्यातला तकलादूपणा, पुरूषी वर्चस्ववाद्यांकडून ऐनकेनप्रकारे घेतला जाणारा उपभोग, आपलं वरचेवर होणारं वस्तुकरण तासाभराच्या एखाद्या इव्हेंटसाठी हजारो-लाखो रूपये मेकअपवर खर्च करणाऱ्या स्त्रियांच्या जोवर नीटपणे लक्षात येत नाही तोवर त्यांचे टेबल्स, त्यांच्या पर्स आरोग्याला हानी पोहचवणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांनी ओसंडून वाहणार आहेत.आणि ' Woman is only An OBJECT' यावर वारंवार शिक्कामोर्तब होणार आहे.

- कविता ननवरे.
https://abpmajha.abplive.in/blog/destroy-the-makeup-and-indian-womens-kavita-nanavares-blog/amp

विनम्र

विनम्र असणं तुमच्या आरोग्यासाठीही चांगलं, पण कसं?

असे म्हटले जाते की, लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना संवेदनशील करण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि परिवारातील सदस्य संवेदनशील असणं गरजेचं आहे.

By ऑनलाइन लोकमत 

असे म्हटले जाते की, लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना संवेदनशील करण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि परिवारातील सदस्य संवेदनशील असणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये थॅंक्स गिवींग डे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे संवेदशीलतेचं महत्त्व जाणून घेणे, दुसऱ्यांचे आभार मानने, मदत करे, विनम्र होणे आणि संवेदलशीलता शिकवतात. पण विनम्र असण्याची अनेक फायदे होताना बघायला मिळतात. विनम्र असणे तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ विनम्र असण्याचे फायदे.

१) तणावापासून बचाव
विनम्र किंवा संवेदनशील असण्याचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही स्वत:ला शांत ठेवू शकता आणि या कारणाने तुमचा ताणही वाढत नाही. क्लिनिकल सायकॉलॉजीकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात ही बाब स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या लोकांनी वागणूक विनम्र असते, त्यांचे खूपसारे मित्र असतात. सोबतच या लोकांना एकटेपणा आणि तणाव कमी जाणवतो. 
२) मूड राहतो चांगला
लोक म्हणतात की, कर्म करा फळाची चिंता करु नका. पण हेच कर्म तुमच्या कामी येतं. जेव्हा तुम्ही लोकांसोबत चांगलं वागता, त्या बदलत्यात समोरची लोकंही तुमच्याशी चांगलं वागतात. यातून तुम्हाला तुमचं महत्त्व आणि प्रेमाची जाणीव होते. जेव्हा आपण दुसऱ्यांप्रति दया दाखवतो तेव्हा आपला मेंदु एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज करण्याचा संकेत देतो. या हार्मोन्समुळे आनंदी आणि चांगलं जाणवतं. सोबतच सेरोटेनिन केमिकलचीही निर्मिती होते, जे तुम्हाला संतुष्ट झाल्याची जाणीव करुन देतं.  
३) ब्लड प्रेशरवर नियंत्रण
विनम्र असण्याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावरही दिसतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायकोफिजिओलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक इतरांना सामाजिक रुपाने सपोर्ट करतात, त्यांचं ब्लड प्रेशर इतर लोकांच्या तुलनेत कमी असतं. म्हणजे विनम्र असल्याने तुमचा तणाव वाढत नाही, त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. 
४) जास्त आयुष्य
विनम्र असण्याचा मोठा फायदा असाही आहे की, तुम्ही जास्त आयुष्य जगता. काही शोधांमधून हे सिद्ध झालं आहे की, जे लोक दुसऱ्यांप्रति संवेदनशील असतात ते जास्त आयुष्य जगतात. कारण विनम्र लोकांना आनंदी कसं रहावं याचीही कल्पना अधिक असते, ते फार जास्त तणाव घेत नाहीत. त्यामुळे अर्थातच त्याचं आयुष्य वाढतं. 
५) समाजात प्रतिष्ठा
विनम्र आणि संवेदनशील लोकांना समाजात नेहमीच चांगलं म्हटलं जातं. त्यांना लोकांकडून फार महत्त्व मिळतं. कोणत्याही मोठा निर्णय घेताना त्यांना सल्ला विचारला जातो. तसेच त्यांच्याकडे मदतीसाठी सर्वातआधी धाव घेतली जाते. त्यामुळे त्यांची समाजात एक वेगळीच प्रतिष्ठा तयार होते. 


http://m.lokmat.com/relationship/manners-being-polite-helpful-and-healthy/