कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे नवीन पुस्तक ‘मराठीतील काव्यरंग - -एक समीक्षात्मक अध्ययन’
लेखक- श्रीनिवास हवालदार
********************************************************************
- ओळख-
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
- सुधीर मोघे
मराठी साहित्यातील गूढरम्य कवी ग्रेसच्या १७० कविता दोन पुस्तकांच्या माध्यमाने ‘धुक्यातून प्रकाशाकडे’ आणल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की ग्रेसच्या कविता सखोल विश्लेषण करून रसिकांसमोर आणण्याचे साहस तर अन्य समीक्षकांनी केले नाहीच परंतु बा.सी.मर्ढेकर, आरती प्रभू, बालकवी, ‘बी’ इत्यादी कवींच्या कवितांचे काही समीक्षकांनी केलेले विश्लेषणही कवींच्या अभिप्रेत भावांशी जुळणारे नाही.काही प्रथितयश समीक्षक त्यांच्या कवितांच्या भोवती घिरट्या घालत बसले आणि काहींने तर अर्थ निर्णयात विक्षिप्ततेची सीमा गाठली.कविततेचे संदर्भ आणि अभिप्रेत प्रतिमांची उकल ना झाल्यामुळे असे प्रसंग उद्भवणे अपरिहार्य होते.
माझ्या मते कवितेतील गूढता चांगल्या कवितेचे एक वैशिष्ट्य असते.आनंदवर्धन या भारतीय साहित्यशास्त्रज्ञाने इ.स.च्या ११व्या शतकात ' ध्वनिआत्मा काव्यस्य' म्हणजे ध्वनि हाच काव्याचा आत्मा आहे हा सिद्धांत मांडला.वाच्यार्थाच्या पलीकडील व्यंग्यार्थ हाच ध्वनि असून त्याने ध्वनि हाच श्रेष्ठ काव्याचा निकष मानला आहे.त्याची ध्वनि ही काव्यातील अर्थाचा अर्थ अशा व्यंग्यार्थ संकल्पनेशी संबंधित आहे.याचे स्पष्टीकरण करताना आनंदवर्धनाने उदाहरण दिले आहे की ज्या प्रमाणे स्त्रीच्या ठिकाणी तिच्या शरीराहून वेगळे असे लावण्य दिसून येते त्या प्रमाणेच महाकवींच्या काव्यात वाच्यार्थाहून वेगळा असा अर्थ प्रतीयमान किंवा व्यंग्यार्थ असतो.आनंदवर्धंनाच्या मते या ध्वनीचा प्रत्यय येण्यासाठी रसिकाजवळ विशिष्ट प्रकारची योग्यता लागते.केवळ शब्दार्थ ज्ञानाने तो कळत नाही.त्यासाठी वाचक काव्यार्थ तत्वज्ञ हवा.कवीला महाकवित्व मिळते ते या ध्वनीच्या उचित वापरामुळेच.
कवी ग्रेस हेच तथ्य काही निराळ्या शब्दात असे मांडतात "जीवन,निसर्ग आणि अध्यात्मसत्ता यातील कोणत्याही अनुभवाच्या चक्रव्यूहात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेशकर्त्याजवळ त्या अनुभवात प्रवेश करण्याची एक प्रकारची किमान इयत्ता लागत असते आणि यालाच मी प्रवेशपत्रिका म्हणतो. केवळ इच्छा, लहर म्हणून अशी प्रवेशपत्रिका कुठल्याही अनुभवधारकाला स्वतःजवळ बाळगता येत नाही.एखाद्या कैफात, एखाद्या पोटतिडिकीच्या आविर्भावात अशी पत्रिका अळेबळे घेऊन जर अनुभवधारक त्या अनुभवात शिरला तर त्याच्यावर तो ओढवलेला, त्याने ओढवून घेतलेला दुरापास्त प्रसंगच म्हटला पाहिजे.”
या बाबतीत मर्ढेकरांसंबंधी ही आठवण प्रसिद्ध आहे.श्री.पु.भागवतांनी एकदा गप्पा मारताना मर्ढेकरांना विचारले तुमची ‘झोपलीं ग खुळीं बाळें ' ही कविता मला नीटशी कळली नाही.ती कशाबद्दल आहे? त्यावेळी मर्ढेकर नुसतेच ’ हूं' करून थांबले नाहीत.त्यांनी एका संपूर्ण वाक्यात उत्तर दिले! म्हणाले, “Then the poem does not exist for you at all !”
साहित्य समीक्षा सामान्यतः प्रात्यक्षिक समीक्षा अथवा सूक्ष्म विश्लेषण, सैद्धांतिक समीक्षा आणि वाङ्मयीन ऐतिहासिक समीक्षा या तीन वर्गात विभक्त केली जाते.दुर्बोध, गूढ अथवा गूढतेच्या सीमारेषे वर असणाऱ्या कविता सामान्य रसिकांस सुबोध करण्यासाठी मला प्रात्यक्षिक समीक्षा अथवा सूक्ष्म विश्लेषण करणे हाच एक योग्य मार्ग वाटतो.सैद्धांतिक समीक्षा आणि वाङ्मयीन ऐतिहासिक समीक्षा हे प्रकार शैक्षणिक[ Academic] असल्यामुळे सर्वसामान्य रसिक वर्गासाठी उपयुक्त नाहीत आणि कविता समजल्याशिवाय अनुभवण्याचा आव आणणे ही तर निव्वळ पळवाट आहे कारण निर्मिति करणारा कलाकार केवळ अनुभवण्यासाठी निर्मिति करत नसतो.त्याला आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात.
गूढ किंवा गूढतेच्या सीमारेखेवर असलेल्या कविता सामान्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम चोखंदळ समीक्षकांचे आहे.या बाबतीत त्यांची भूमिका कवी आणि रसिक यांच्यातील सेतुबंधाची आहे.एका लेखकाने साहित्य समीक्षकांसाठी प्रस्तावित केलेली खालील आचार संहिता मला उपयुक्त वाटते परंतु दुर्दैवाने ह्याचे पालन फार कमी समीक्षकांनी केले आहे आणि त्यामुळे काही मूळ निर्मितीकारांचे साहित्य विकृत अवस्थेत सामान्य वाचकांपर्यंत पोहोचून ते अधिकच दुर्बोध झाले आहे:
“A critic must have a sound commonsense and clear thinking in order to judge or evaluate the works of literature in an efficient way. He is well-read person to exercise judgment on literary works in a way as it should be. He must know the fact that to understand the works of literature; he needs to put himself in the place of a writer so to that he can appraise the work from the viewpoint of a writer as well. In order that the excellence or shortcomings may be examined properly, he does not preform opinion, but interprets literary values on the basis of his knowledge and experience without an aggressive and unreasonable belief or without any prejudice.”
या पुस्तकात गूढ अथवा गूढतेच्या सीमा रेषेवर असणाऱ्या ज्या रम्य कवितांचे विश्लेषण केले आहे त्यांची पृष्ठभूमि प्रस्तुत करणे उपयुक्त होईल.
केशवसुतांनंतरचे मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी म्हणून बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर१, १९०९-मार्च२०, १९५६) यांचा उल्लेख केला जातो.त्यांनी कवितेची पूर्वपरंपरा मोडून तिला नवीन दिशा देण्याचे काम केले.कविते प्रमाणेच समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही त्यांनी महत्वाचे योगदान केले. मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जाते.त्यांनी परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला हे त्यांच्या काव्यातील आशय आणि दुरूह असल्याचे कारणही आहे परंतु त्यांची नवकविता पूर्व परंपरेशी दुभंगून न राहाता अनेक ठिकाणी अभंग आणि ओवी ह्या प्राचीन मराठी रचनाप्रकारात आपल्या समोर येते. संतकवितेतील सांसारिक वैफल्य आणि अर्थशून्यता आधुनिक यंत्रयुगात आणि जगातील विज्ञान प्रगतीच्या संदर्भातही किती खोलवर रुजली आहे याची प्रचीती त्यांच्या नवकवितेत प्रकर्षाने येते.
त्यांच्या' शिशिरागम' या कवितासंग्रहातल्या कविता सुबोध आहेत परंतु नंतरच्या लेखनकालातील ' काही कविता' आणि' 'आणखी काही कविता‘तील अनेक कविता अत्यधिक गूढ असून त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही घटनांशी, व्दितीय महायुद्धाशी, मानवनाशास कारणीभूत विज्ञानाच्या दुरुपयोगाशी, माणसाच्या अज्ञानमूलक धारणांशी आणि काही अध्यात्म विषयक संकल्पनांशी संबंधित आहेत.या पुस्तकात त्यांच्या १८ कविता सम्मिलित करून त्या सर्व कवितांवर नवीन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.विशेष म्हणजे मराठी साहित्यक्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या ‘पिपात मेले ओल्या उंदिर ' या कवितेचे विस्तृत आणि सखोल विश्लेषण नवीन संदर्भात केले आहे. प्रसिद्ध अष्टपैलू साहित्यक प्रल्हाद केशव अत्रे यांनी या कविते बद्दल म्हटले होते "मर्ढेकरांची पिपांत मेले ओल्या उंदीर' ह्या कवितेचा प्रत्यक्ष परमेश्वराला तरी अर्थ लावता येईल का? उंदीर ते काय,ते बिळात कां जगले, पिपात कशाला न्हाले अन उचकी देऊन कां मेले? आणि मेले तर मेले!त्यांची दुर्गंधी इतक्या रसिकतेने हुंगीत बसण्याचे कवीला काय कारण? ह्याच ह्या पिपात मेलेल्या उंदरांच्या पाठीवर बसून नवकाव्याचा प्लेग आपल्या महाराष्ट्रात आला"
.“जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे” अशी श्रद्धा व धारणा ठेवणारे पुरुषोत्तम शिवराम रेगे [२ ऑगस्ट, १९१०- १७ फेब्रुवारी,१९७८] हे मराठी लेखक, कवी व नाटककार होते.पु.शि.रेगे यांनी स्वतः म्हटलंय की ‘जीवनात विविध रूपांनी वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषत: तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप त्यांच्या कविमनाला मोहवीत आले आहे.‘त्रिधा राधा’ ही रेग्यांची प्रसिद्ध कविता या पुस्तकात सम्मिलित केली आहे.
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स.१९३०-एप्रिल २६, इ.स.१९७६) एक अग्रगण्य कवी आणि लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार यांना आर्ततेच्या शोधातला एक शब्दयात्री म्हणतात. ही आर्तता त्यांच्याच शब्दात अशी व्यक्त झाली आहे:
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
त्यांनी ‘जोगवा’, ‘ दिवेलागण’,‘ नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातल्या कवितेतून अनेक उत्कृष्ट कविता लिहिल्या.त्यांच्या ‘गेले द्यायचे राहून, ‘ती येते आणिक जाते, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ‘तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी’ या संगीतबद्ध झालेल्या आणि रसिकांत प्रिय असणाऱ्या कविता गूढतेच्या आवरणात असून समजण्यास थोड्या कठिण असल्यामुळे मी या पुस्तकात सम्मिलित केल्या आहेत.
कवी बा.भ.बोरकर (३० नोव्हेंबर १९१०- ८ जुलै १९८४) यांना सर्व महाराष्ट्र 'आनंदयात्री कवी' म्हणून ओळखतो.त्यांच्या कवितात पसरलेल्या निसर्गाच्या देखण्या लावण्यात ठिकठिकाणी सृष्टीत भरलेल्या सौंदर्याची अनुभूती होते परंतु हा निसर्ग मानवासाठी लौकिक पातळीवर निर्हेतुक प्रेम आणि समर्पणाच्या भावनेचा संदेश घेऊन येतो.त्यांच्या काही आशयघन कवितांचे विश्लेषण आपणास आवडेल.
कवि ग्रेस [१० मे १९३७-२६ मार्च २०१२] यांच्या १७० गूढरम्य कवितांचे रसग्रहण २०१४ आणि २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे’ पुस्तकाच्या दोन खंडात मी केले होते.ग्रेसच्या काही प्रातिनिधिक नवीन कविताही या पुस्तकात आपणास सापडतील.
बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे [१३ ऑगस्ट १८९०- ५ मे १९१८]’ फुलराणी’, ‘निर्झरास, ‘आनंदी आनंद गडे, ‘श्रावणमास, ‘औदुंबर’ अशा अनेक कविता लिहून निसर्गाच्या सुंदर निराळ्या विश्वात वावरणारे आणि रसिकांना ही भूल पाडणारे बालकवी यांच्या ' औदुंबर' या कवितेवर अनेक समीक्षा झाल्या आहेत.या कवितेने अनेक वर्षानंतर ही आपले आकर्षण कायम ठेवले आहे.ही विख्यात कविता लोकप्रिय तर आहेच परंतु एक अतिशय समीक्षकप्रिय कविता आहे.प्रा.एस एस नाडकर्णी यांनी बालकवींच्या या कवितेवर अनेक समीक्षकांनी लिहिलेल्या ‘समीक्षांवर’ एक संपादित पुस्तकच लिहिले आहे.काही समीक्षकांनी पांढरी वाट म्हणजे गोरीपान स्त्री वा विधवा, औदुंबर म्हणजे सन्यस्त योगी,क्रीडामग्न बालक, प्रेयसीची प्रतीक्षा करणारा पुरुष आणि प्रियकराकडे संकेत स्थानी भेटायला निघाली विधवा स्त्री किंवा समाजाला झिडकारून बेभान करून डोहात विलीन होणाऱ्या प्रेमिकेची कहाणी वगैरे तर्कशून्य अर्थ कवितेतील प्रतिमांना बहाल केले आहेत.काही समीक्षक ही कविता अपूर्ण लिहिलेली मानतात परंतु अन्य समीक्षकांच्या या 'भटकेगिरीत' सामील ना होता मी या कवितेचे आणि अन्य कवितांचे मला भावलेले विश्लेषण केले आहे.
'सौंदर्यचि काव्य’ ही काव्याची व्याख्या करणारे कवी 'बी’ म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते [जून १, १८७२-ऑगस्ट३०,१९४७) म्हणतात,”अंतरंग ओथंबुन ओसंडे ती सुंदरता.” त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इत्यादि नानाविध विषयांवर कविता केल्या.त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. कवी ‘बी’ यांनी एकूण ४९ कविता लिहिल्या. 'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून ‘पिकले पान’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.त्यात ११कविता होत्या.त्यांची 'चाफा बोलेना, चाफा चालेना' ही अंतरंग ओथंबून ओसंडणारी सुंदर कविता अजूनही रसिकांना प्रिय आहे.
कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील एक बहुमुखी प्रतिमा-सम्पन्न कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते.त्यांनी कवितेत साकार केलेली पृथ्वी आणि सूर्याची पुरातन अजरामर रम्य प्रेमकथा ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
सुधीर मोघे [८ फेब्रुवारी, इ.स.१९३९-१५ मार्च, इ.स.२०१४] सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन करणारे आणि ६ कविता संग्रहाचे लेखन करणारे लोकप्रिय कवी यांची एक सुंदर कविता ‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा’ मधील चांदण्या गूढ असूनही रम्य आहेत.
आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३- डिसेंबर ७, १९४१) एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधील स्थान फार वरचे आहे.ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते.’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांच्या कविता सन १९३५ मध्ये प्रकाशित झाल्या आहेत.त्यात एकुण २२५ कविता आहेत.या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत.गान सम्राज्ञी लता मंगेशकर तांबे यांच्या कवितांबद्दल म्हणतात की ग्वाल्हेरचे राजकवी असलेले भास्कर रामचंद्र ऊर्फ भा. रा. तांबे, माझे अतिशय आवडते कवी.माझ्याकडे त्यांच्या कवितांचं पुस्तक होतं.त्यातल्या अनेक कविता मी लहानपणी गुणगुणत असे.त्यांच्या कवितेतला नाद, त्यातली लय आणि गेयता मला भुरळ घालत असे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कवितांमधला आशय मला सतत खुणावायचा.तांबे यांच्या कवितांतले शब्द तर सुंदर होतेच, मात्र त्या शब्दांना अनेक अर्थछटा होत्या.वरवर सरळ साध्या आणि सोप्या वाटणाऱ्या त्यांच्या कवितेच्या गर्भात काही गूढ दडल्यासारखं वाटायचं.मला वाटतं, तेच मला खुणावायचं. म्हणूनच मी त्यांच्या काही कविता गाणीरुपात गायचा निर्णय घेतला.
तांबे यांच्या गूढतेकडे कळलेल्या 'घन तमीं शुक्र बघ राज्य करी ' , रिकामे मधुघट' आणि 'कशी काळनागिणी' या कविता या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.
मराठी साहित्यात विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घालणाऱ्या गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' (२३ऑगस्ट १९१८-१४ मार्च २०१०) यांच्या गूढतेकडे वळणाऱ्या कविता एक नवा अनुभव रसिकांस देतील.
मराठी साहित्यास अनेक सुंदर भावकविता कविता लिहून समृद्ध करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवियित्री इंदिरा संत [४ जानेवारी१९१४-१३ जुलै २०००] यांनी पन्नास वर्षांच्या अवधीत नऊ स्वतंत्र कवितासंग्रह रसिकास दिले.त्या म्हणतात "माझ्या बहुसंख्य कवितांतून प्रीती आणि निसर्ग यांनाच अभिव्यक्ती मिळाली आहे.निसर्ग सुद्धा पुष्कळदा निसर्गासाठी आला नसून प्रीतीच्या अभिव्यक्तीसाठी आलेला आहे." त्यांच्या ४ प्रसिद्ध कविता ‘मृण्मयी’,‘कुब्जा’, ‘किती लुटावे डोळ्यांनी’ आणि ‘आषाढ’ यांचे रसग्रहण एका वेगळ्या स्वरुपात या पुस्तकात आपणास दिसेल.
शांता शेळके (ऑक्टोबर१२, १९२२-जून ६, २००२) या बहुमुखी प्रतिभा संपन्न लेखक आणि मराठी कवयित्री यांनी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले परंतु कविता हा त्यांच्या आवडीचा साहित्य प्रकार होता.या पुस्तकात सम्मिलित केलेल्या त्यांच्या वेगळ्या धर्तीच्या ३ कविता रसिकास त्यांच्या भावविश्वाचा निराळाच अनुभव देतील.
अरुण कोलटकर [१नोव्हेंबर१९३२-२५ सप्टेंबर २००४] हे कोल्हापुरात जन्मलेले एक सर्जनशील कवी आणि कलाकार होते.त्यांनी मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता केल्या. मर्ढेकरांप्रमाणे यांच्या कवितेनेही आधुनिक मराठी कवितेला एक नवे वळण मिळवून दिले. ‘भिजकी वही ' या काव्यसंग्रहाला त्यांना २००५ चा साहित्य अकादमी अवार्ड मिळाला होता. त्यांच्या कवितांचं एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या कविता सहज बोलल्यासारख्या साध्या असतात परंतु कोलटकरातला सुप्त कलाकार कवितेतच एक गूढ अर्थ दडलेले चित्र रेखाटून आपणास बुचकळ्यात टाकतो. त्यांच्या ' भिजकी वही', 'आरसे' आणि 'वामांगी' या ३ प्रातिनिधिक कविता पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत आहेत.
मराठी साहित्याच्या या नवीन कालखंडातील खालील प्रतिभावंत कवी आणि कवयित्रींच्या रचना आणि माझ्या पूर्वीच्या समीक्षेप्रमाणे वेगळेपण असणारे पृथगात्म रसग्रहण या पुस्तकातही आपणास सापडेल.
कवी- बा.सी.मर्ढेकर
१ पिपात मेले ओल्या उंदीर
२ पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी
३ अजून येतो वास फुलांना
४ नाही कोणी का कुणाचा
५ झोपलीं ग खुळीं बाळें
६ बन बांबूचे पिवळ्या गाते
७ बोंड कपाशीचे फुटे
८ आहे बुद्धीशी इमान
९ जगाचा लिप्ताळा
१० दवांत आलीस भल्या पहाटीं
११ जे अज्ञानांत जन्मले
१२ आग अंधाराची जीवा
१३ अंधाऱ्या जगाची
१४ फुटेल [होती वेडी आशा]
१५ ह्या गंगेमधि गगन वितळले
१६ शिवलिंग माझे लिंग
१७ पळापळातील जोर मनगटी
१८ वावडी वाह्यात माझी
कवी-पु.शि. रेगे
१९. त्रिधा राधा
कवी-आरती प्रभू
२० गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
२१ समईच्या शुभ्र कळ्या
२२ तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी
२३ ती येते आणिक जाते
कवी-बा. भ. बोरकर
२४ तव नयनांचे दल हलले ग !
२५ झिणि झिणी वाजे बीन
२६ नाही पुण्याची मोजणी
२७ झाड गूढ झाड गूढ
२८ लावण्य रेखा
२९ रस्त्यांत कोणसा आंधळा गातो
कवी-ग्रेस
३० केतकी दल
३१ नवी द्यूतकांता
३२ काळा घोडेस्वार
३३ सारंगा
३४ ज्ञानेश्वरीय वर्षा
३५ सूर्यास्ताचे पाणी- इथे गंगेपाशी
३६ अंधारांतून जात कुणीतरी गात पुढे क्षितिजाला
३७ पाण्याची भूल
३८ चाफा
बालकवी- त्र्यंबक बापुजी ठोंबरे
३९ औदुंबर
४० गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी
कवी 'बी' ऊर्फ नारायण मुरलीधर गुप्ते
४१ चाफा बोलेना, चाफा चालेना
कवी- कुसुमाग्रज
४२ पृथ्वीचे प्रेमगीत
कवी- सुधीर मोघे
४३ रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
कवी-विंदा करंदीकर
४४ ओशट रात्र, वषट प्राण
४५ भुते झाडांची
४६ डोळ्यातल्या डोहामध्ये
४७ वेडी
कवी- भास्कर रामचंद्र तांबे.
४८ घन तमीं शुक्र बघ राज्य करी
४९ रिकामे मधुघट
५० कशी काळनागिणी
कवयित्री-इंदिरा संत .
५१ मृण्मयी
५२. कुब्जा
५३. किती लुटावे डोळ्यांनी
५४. आषाढ
कवयित्री-शांता शेळके
५५ जाईन विचारित रानफुला
५६.हे रान चेहऱ्यांनचे माझ्या सभोवती
५७ घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे .
कवी- अरुण कोलटकर
५८ भिजकी वही
५९ आरसे
६० वामांगी
https://www.facebook.com/groups/1788863474722340/permalink/3251372801804726/
0 comments:
Post a Comment