#fbshare !
......
आता वर्क फ्रॉम होममुळे घरूनच काम असतं पण एका वेळेला तसं नव्हतं. सलग दोन, तीन, चार महिने पुण्यातच जायचे आणि मग घरची गावची आठवण यायला लागायची. कधीतरी MH०७ पासिंगची गाडी पुण्यात दिसली की एकदम बरं वाटायचं, कुठला का माणूस असेना, तो देवगडचा असेना कि बांद्याचा. आपण एकाच जिल्ह्यातले, आपल्या आवडीनिवडी एकच, त्यालाही चायघावणे, आंबोळीचटणी आवडतच असणार, तोही माझ्यासारखाच काजीआंब्याला पिसाच असणार, देवळाचं पालखीचं जत्रेचं दशावताराचं त्यालाही माझ्यासारखंच अप्रूप असणार. "खयले तुम्ही" अशी हाक घातल्यावर तोही खुश होऊन उत्तर देणारच असं वाटत राहायचं. साधारण २०१४ मध्ये टिळक रोडच्या इथे गाडी थांबवून चहा पित असताना दोन मुलांनी बाईकची नंबरप्लेट बघून हाक मारली, "काय ओ, खयचे तुम्ही". "मी कणकवलीचो, तुम्ही खयचे?", ह्यावर त्यांचं "आम्ही फोंड्याचे" असं उत्तर आलं, फक्त १४ किलोमीटर अंतर आमच्या गावात. म्हणजे आपलीच माणसं ती. एकदम हायसं वाटलं.
एकदा विकेंडला संध्याकाळी झोपेतून उठलो तेव्हा रूमवर कोणीच नव्हतं, उठून बाहेर येऊन बसलं तरी काही हुरूप वाटत नव्हता. अरविंद गोखले कथा लिहायचे त्यातल्या काहूर मन:स्थितीसारखं वाटायला लागलं. जरा चालून येऊ म्हणून बाहेर पडलो तर वाटेत एक माणूस भेटला, बोलता बोलता समजलं कि ते सावंतवाडीचे गावडे आहेत. गाडी रुळावरून घसरावी तसं आम्ही पुढच्या क्षणाला मराठीवरून मालवणीवर घसरलो आणि मीही तिकडलाच म्हटल्यावर तेही उत्साहाने बोलू लागले. गप्पा होत गेल्या, पुढे चालता चालता वळणावर दत्त आश्रम आला तिथे ते या म्हणाले. तिथे गेलो तर लक्षात आलं कि इथे सिंधुदुर्गातले बरेच जण होते, त्यांच्या इकडच्या तिकडच्या गजाली ऐकता ऐकता मन गावातल्या तिठ्यावरून, सडयावरून, गोरवांच्या पाठीवरून, व्हाळातून धावायला लागलं आणि बघता बघता उगाचच काळवंडलेलं मन लख्ख दिव्यासारखं झालं.
एसटी रात्रीच्याच असायच्या, एसटीत बसलं कि ती ह्या स्टॅन्डमधून त्या स्टॅन्डवर जात राहायची, फक्त पणजी गाडी असल्यामुळे गाडीत मालवणी, कोकणी ऐकू यायला लागायचं. मागे वळून बघितलं तर नऊवारीतल्या म्हाताऱ्या बायका दिसायच्या, टिपिकल ढगळ शर्टपॅन्ट घातलेले बाप्ये दिसायचे. वाटायचं कि आपली ओळख नसली तरी आपली भाषा सारखी आहे, भुकेला हात पसरला तरी कोणी नाही म्हणायचं नाही, "मका पण देवा जरा वायच " एवढं म्हटलं कि डबा सरकवला जाईल याची खात्री वाटायची. गाडी कात्रज, सातारा, कराड, कोल्हापूरमधून जाताना अध्येमध्ये झोप येत राहायची, मधेच जाग यायची पण एकदा का एसटी गगनबावडा घाट उतरली कि मग ओळखीच्या खुणा दिसायला लागायच्या, लाल माती दिसायला लागायची, डांबरी काळे रस्ते, त्याच्या बाजूला मळे, मळ्यातली तरव्यांची खुट, अध्येमध्ये लागणाऱ्या वाड्यांचे बोर्ड, डोक्यावर कौलं घेतलेली घरं, देवळं दिसायला लागली कि आपण आपल्या जागेत आलो याची खात्री पटायची, वाटायचं - एसटी थांबवून इथेच कुणाकडे उतरलं तरी आपल्या घरात आणि इथे काही जास्त फरक वाटणार नाही, आपण सगळे एकाच जमिनीवरचे आहोत. तेव्हा माझ्या लक्षात आलं कि अगदी काटा खोलवर रुतावा तसं कोकण माझ्यात रुतलेलं आहे.
© रोहित भिडे
0 comments:
Post a Comment