Sunday, June 12, 2022

post 2

शिवकल्याण राजा !! 🚩🚩

जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. महाराजांनी सर्व श्रेष्ठ पुरुषांचे पूजन करून दक्षिणा व वस्त्रे अर्पण केली, आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, आज त्यांच्या शिवबाचा राज्याभिषेक होता, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्या माउलीला कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. सुवर्ण चौरंगावर महाराज व सोयराबाईसाहेब बसले, सप्तनद्यांच्या जलाने त्यांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजांनी राजपोषाख चढविला, अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णुंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबियांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे साडेचार वाजले होते, सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायऱ्या चढतांना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, “क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय” अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहू लागल्या. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते, ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला “औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.” पन्नास वर्षांपासून जिजाऊ पाहत असलेले स्वप्न शिवबाने आज पूर्ण केले होते, मातेच्या ममतेचे पांग फेडून राजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले होते. राजे सिंहासनावर आरूढ झाले व एकेकाने त्यांना शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला. कविराज भूषण यांनी आपल्या खास शैलीत दरबारात आनंदकाव्य सादर केले. आता तेच काव्य स्वरसरस्वती लता मंगेशकर यांच्या आवाजातून ऐकतानाही अंगावर शहारे येतात. 

“इंद्र जिमी जंभ पर, वाडव सुअंभ पर  । 
रावण सदंभ पर, रघुकुल राज है ।। १ ।। 
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ।। २ ।।
द्रावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है ।। ३ ।।
तेजतम अंस पर, कान्ह जिमी कंस पर ।
त्यों म्लेंच्छ बंसपर, शेर सिवराज है  ।। ४ ।।

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला. आज हीच विजयश्री आपण पुढच्या पिढीला देताना स्वतःला भाग्यवान असंच समजायला हवं. 

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।

- सर्वेश 
छायाचित्र साहाय्य - पराग घळसासी


Related Posts:

  • post 2 Read More
  • post 2शिवकल्याण राजा !! 🚩🚩जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व म… Read More

0 comments: