Friday, October 11, 2024

रतन टाटा .. हृयशल्य

हृदयशल्य!
तो केवळ दहा वर्षांचा असताना त्याला प्रेमाचा नव्याने शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं! वडील नवल आणि आई सुनी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटा उरला. डोक्यावर केवळ छप्पर असून चालत नाही....मायेची सावली लागते माणसाला.
आई-बाप हयात असतानाही त्याच्या वाट्याला हा असा पोरकेपणा आलेला होता. सोबत एक धाकटा भाऊ होता पण धाकटा. मग तो स्वत:च स्वत:चा वाटाड्या झाला. निवृती,ज्ञानदेव,सोपान यांना आईची जागा घेणारी मुक्ताई होती..याला मात्र आपल्या मनालाच मुक्ता बनवून ‘साही अपराध जनाचा’ असं स्वत:ला म्हणावं लागलं.
आईने आपला स्वतंत्र संसार नव्याने मांडला. तिच्या आईच्या आईने मग या दोघा भावांना आपल्या पदराखाली घेतलं. दत्तक घेतले गेले त्याला.
नियतीने त्यांच्या आयुष्याची तुटलेली दोरी एक गाठ मारून पुन्हा सांधण्याचा हा प्रयत्न होता.
पैशांची कमतरता म्हणजे काय हे ठाऊक नसलेल्या घरांत बालपण गेल्याने सुदैवाने या माणसाला जगण्यासाठी संघर्ष नाही करावा लागला. पण त्याच्या भावनिक आयुष्यात फक्त एकच स्त्री होती ती म्हणजे त्याची आजी. तिच्या सावलीतून जरासे बाहेर निघून तो परदेशी गेला..स्वत:च्या पायांवर उभं राहायला. देखणा,राजबिंडा तरुण. सालस,सभ्य आणि आपल्या आजोबांकडून नर्मविनोदी स्वभावाची देणगी लाभलेला. त्याच्या प्रेमात कुणी न पडेल तेच नवल. परदेशात शिकत असताना एक अमेरिकन तरुणी त्याच्या आयुष्यात आली. प्रेमाचे रंग दाही दिशांना पसरले. भारतीय प्रेम आणि पाश्चिमात्य प्रेम यात फरक असतो हे त्याच्या तोवर ध्यानी आलं नव्हतं. पश्चिमेकडे व्यवहार सर्वाधिक वरची जागा पटकावून असतो त्यांच्या जगात. हा मात्र अस्सल भारतीय माणूस. ज्याला आपलं मानलं त्यासाठी आपलं सर्वस्व अगदी हक्कसोड पत्र करून देऊन मोकळा होणारा. त्याला परदेशी जाऊन सहा-सात वर्षे झाली होती. आणि याच दरम्यान त्याच्या मायेचा पदर इथं विरत चालला होता. आज्जी खूप आजारी पडू लागली. तिने सांगावा धाडला. आणि त्याच दरम्यान भारतावर युद्धाच्या ढगांनी गर्दी केली. त्याने प्रेयसीला लग्नाचे वाचन दिले होतेच. आणि ती सुद्धा तयार होती. पण परिस्थिती बदलली आणि तिचे व्यावहारिक संस्कार तिला बदलायला पाडू लागले. भारतात कायमचे राहायला जायचे,शिवाय तिथे तर युद्धाची स्थिती आहे. जीवनाचा भरवसा नाही,सुखाची शाश्वती नाही. तिच्या पालकांनी तिला पायाजवळ पहायाला उद्युक्त केलं आणि तिने मग दूरवर पाहण्याचं बंद केलं......त्याची प्रेमकहाणी विवाहात परावर्तीत होण्याआधी समाप्त झाली. तिच्यासाठी हा निर्णय अगदी नैसर्गिक होता. पण याने मात्र आपल्या काळजातील एक मोठा कप्पा कायमचा दुखावून घेतला होता.
तो आला तसा इथलाच झाला. आजी,धाकटा भाऊ यांच्या सहवासात त्याने आपले एकाकीपण कमी केले..पण ही त्याची त्याने काढलेली समजूत होती.
कौटुंबिक व्यवसायात त्याने स्वत:ला इतके बुडवून घेतले की काळजाला वैय्यक्तिक आयुष्याचा विचार करण्याची सवडच गावेना. स्वत:चं घर वसवण्याचं जणू तो विसरत चालला होता. उद्यमशील स्वभाव शांत बसू देईना.....लक्ष्मी प्रसन्न होतीच आता ती त्याच्याकडेच कायम वस्तीला आली होती.
लाखो लोकांच्या संसाराशी आता तो नकळत बांधला गेला. मालक कामगारांचा पगार कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. हा मात्र पगार किमान चांगला असलाच पाहिजे या भूमिकेत असताना प्रत्यक्ष आपल्याच व्यावसायिक सहका-यांशी वाद घालणारा निघाला आणि आपले म्हणणे पटवू शकणाराही निघाला.
काळीज करपलेलं असलं की ते आपल्या मनाविरुद्धही कुठेतरी ओलावा शोधत असतं. त्याच्याही मनाच्या कोरड्या रानात काही श्रावणसरी बरसल्या...पण नशिबाचं ऊन नेमकं त्याच वेळी ऐन भरात होतं. संसार उभारायच्या अगदी जवळ असताना नियतीने त्याचा पाय अनेकदा मागे खेचला....त्याला प्रचंड मोठ्या संसाराला हातभार लावायचा होता बहुदा. आणि वैय्यक्तिक एकल संसारासाठी त्याला वेळ द्यावा लागला असता...ते नियतीने टाळले. मोठ्या हितासाठी नशीब छोट्या स्वप्नांचा असा बळी घेते!
अगदी तसंच झालं.....देश-विदेशात त्याने व्यवसायाचं जाळं उभारलं.
नवं जंगल उगवू लागलं की हळू हळू रोपे मोठी होतात,त्यांची झाडं होतात,त्यांना बहर येतो,कळ्या उमलू लागतात आणि मग फुलपाखरे आली की जंगल संपूर्ण होतं.....अनेकांचं आश्रयस्थान बनतं.
हा आता स्वतःच एक मोठा वृक्ष बनला होता. त्याला स्वत: आणखी उंच व्हावं लागलं. पण म्हणून सूर्य सर्वाधिक झेलला तो यानेच. त्याच्या छायेखाली मात्र गडद थंड सावली होती. आणि या सावलीत जो आला तो कधीच माघारी फिरला नाही. आज असे लाखो संसार त्याच्या आधारावर उभे आहेत. लाखो रुग्ण त्याच्या देणग्यांच्या आधारे जगले. अर्थाअर्थी थेट संबंध नसतानाही त्याने अगणित माणसांना जगवले आणि त्यांच्यात आपले प्रेम शोधले...नव्हे प्राप्त केले. माणसासोबत त्याने प्राणीमात्रही मित्र मानले.  
आपल्या मनातील प्रेमाच्या,त्यागाच्या,समर्पणाच्या भावनेला त्याने एक अलौकिक आभाळ दिलं....त्यात त्याने जमिनीवर राहून मनानेच विहार केला. आपल्या शब्दांतून एकाकीपणा सहसा जाणवू दिला नाही. तो प्रत्येकाला आपला वाटला आणि तरीही त्याचं स्वत:चं रक्ताचं होण्याचं भाग्य कुणाला लाभलं नाही....! हे प्राक्तन! पण यामुळे त्याचा अंश आता मागे उरला नाही.
तो जणू कर्ण कलियुगातला. त्याने श्रीमंतीची कवच कुंडले कुणी न मागताही समाजाला दिली...एका हाताचं दान दुस-या हातालाही समजू नये याची नेहमी काळजी घेतली. स्वत:चं म्हणावं असं कुणीही मागे न ठेवता या जगाचा निरोप घेणारा मात्र सा-या देशाला स्वत:चं करून गेला....हा त्याला नियतीने दिलेला न्याय म्हणावा लागेल.
रतनजी टाटा....नावाला साजेसं कर्तृत्व करून दाखवण्याचे भाग्य तुम्ही मिळवलेत....विश्व जाले वन्ही....संते आपण व्हावे पाणी....हे मुक्ताईचे शब्द त्यांनी जगून दाखवले....भारतमातेच्या कंठातील एक अनमोल रत्न निमाले!
(संभाजी बबन गायके. 9881298260.)
माहिती समाज माध्यमांतून साभार.
या लेखाचे भाववाचन सौ.सुवर्णा बोडस (आकाशवाणी निवेदिका) यांनी खूप छान केले आहे. त्याची link हवी असल्यास पाठवेन.





https://www.facebook.com/100044740260050/posts/pfbid033jaKxCe2fRnVM4VANtHXyxvxiAZiyDsmk1EqQVXcKivD3bkWbgxDgWJJCr5PMRdZl/

0 comments: