Thursday, March 13, 2025

जोशी कुटुंब

जुनी पोस्ट 

हे व्हायरल झालेले पिशव्यावाले जोशी काका आणि काकू. मी अनेक दिवस त्यांच्याकडून जेवणाचा डबा घेतो. दोघं अफाट आहेत. काका ८७ वर्षाचे आणी काकू ८२. काका सुंदर शिवणकाम करतात आणी काकू अत्यंत रूचकर जेवण बनवतात. आज डब्यात पालकाच्या पुर्या होत्या. परिस्थिती मध्यमवर्गीय पण पुरेशी. एक मुलगा व एक मुलगी येऊन जाऊन असतात, त्यांची काळजी घेतात. दोघांची लग्न झालेली, सुस्थितीत. पण ही दोघं एकमेकांना धरून आहेत. 'स्वयंपुर्ण' आणी 'स्वाभिमानी'. काकू डबे देतात, काका हात पाय चालू रहावेत यासाठी कापडाच्या पिशव्या शिवतात आणी आठवड्यात दोन वारी ठराविक जागी जाऊन विकतात. 
सिन काय झाला कि काही दिवसांपूर्वी कोणीतरी पिशव्या विकत घेताना त्यांचा फोटो काढला आणी सोशल साईट्सवर टाकला. काकांना पत्ताच नाही. लिहिणार्या माणसाने लोकांनी काकांपासून श्रम प्रतिष्ठा व जगण्याची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने पोस्ट टाकली पण लोकांनी त्याचा आपापल्या पद्धतीने अर्थ काढला. फोटोत गोड हसणारे काका व्हायरल झाले. आता काकांच्या घरी लोकांची रीघ लागलेय, फोन खणाणतायत. कोणी त्यांच्या पोरांना नावं ठेवतायत, कोणी २०० पिशव्यांच्या ऑर्डर्स देतायत, परदेशातून फोन येतायत, मदतीची तयारी दाखवतायत. काका सांगत होते सगळ्यात भारी म्हणजे दुबई च्या एका ग्रुहस्थांनी त्यांना व्रृध्दाश्रमात ठेवण्याची तयारी सुरू केली. सिरीयल मधले दोन तीन नट येऊन गेले, पेपर वाले आले, न्यूज वाले आले. सगळी गंमत चाल्लेय. 

आता यात त्यांना आणि त्याच्या मुलांना मनस्ताप होतोय खरा, पण मला आपला समाज अजूनही किती संवेदनशील आणी जिवंत आहे हे बघून भरुन आलयं. एक कुटुंब म्हणून आपण अजुनही किती बांधलेले आहोत. कोण कुठल्या जोशी काकांसाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोकांनी धाव घ्यावी हि कसली भारी गोष्ट आहे. 
आता या ठिकाणी जरी आमचे काका काकू स्वयंपूर्ण असले तरी दुसरे कुणीतरी काका खरच गरजवंत असतील.. त्यांना मदत व्हायलाच हवी. त्यामुळे यावेळेस जसं आपण मदतीचा हात पुढे केला तसाच प्रत्येक वेळी करायला हवा.
We rise by lifting each other.

**बाकी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उभयतानी कुंठल्याही पध्दतीची पैशाची मदत किंवा निधी संकलन अपेक्षिली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने किंवा नावावर कोणीही पैसै गोळा करत असल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोब काकांच्या खालील नंबरवर संपर्क साधावा.**

- #बोलेगोड

सिध्देश्वर जोशी 8291036120

18 march 2020