Monday, February 27, 2017

मन

मन ताजं व्हावं, म्हणून घरासमोरच्या आवारात फेरफटका मारायला आले . माझे घरही एका सुंदर डोंगराच्या पायथ्याशीच आहे. हिरव्यागार गवतावर  चालताना आजूबाजूचा जुनाच निसर्ग नव्याने पाहण्याचा प्रयत्न सुरू होता. संध्याकाळी घरट्याकडे परतलेल्या आणि परतणाऱ्या पक्षांची टेहळणी चालू होती.
निसर्गामधील माझ्या कुतूहलाचा विषय ठरलेला हमिंगबर्ड सतत लक्ष वेधून घेत होता. एकाच फुलावर पुढे जाऊन क्षणात मागे परतण्याच्या त्याच्या हालचालींनी तो नेहमीसारखाच कुतूहल निर्माण करत होता.
मला तो नेहमी विसरभोळा वाटतो. जणू त्याला फुलाच्या कानात काहीतरी सांगायचे असते आणि थोडं सांगून झाल्यावर पुढे जातो अन उरलेलं सांगायला पुन्हा मागे येतो. इवलासा रंगीत पक्षी; पण त्याचा वेग आणि चंचलता भुरळ पाडणारी, वेड लावणारीच.
काही महिन्यांपूर्वी, त्याला कॅमेराबंद करताना त्याने माझी अगदी दमछाक केली होती. त्यावेळी तीन-साडेतीन तासांचा आटापिटा करून त्याने मनाजोगता ‘शॉट‘ दिला होता. हे सर्व चालू असतानाच संध्याकाळचा थंड वारा मनाला सुरेल गाण्यांच्या आठवणींचे हिंदोळे देत होता.

या सगळ्या आठवणींमध्ये रमताना आणि निसर्ग न्याहाळताना पाच-दहा मिनिटं अगदी छान गेली आणि चालता-चालता अलगद एक थेंब अंगावर पडला, तो पुढे येणाऱ्या आनंदाची चाहूल घेऊनच! अलबत, तो पावसाचाच थेंब होता. क्षणातच थेंबांच्या सरी झाल्या आणि सरींचा पाऊस झाला.

पाऊस, पावसाची सर आणि एक सुखद अनुभव. प्रत्येकाचा पावसातला, पावसाबद्दलचा काही ना काही अनुभव असतोच; तसाच हा माझा अनुभव..

ढगांना आलेली करडी काळीभोर छटा,
त्यातून डोकावणारी विजांची चमकदार, क्षणभंगुर; पण विस्मयकारक अशी नक्षी,
अंगावर अलवार विसावणारे टपोरे थेंब, तो त्यांचा शहारे आणणारा स्पर्श..
सो सो करणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याला साथ देणारा ढगांचा गडगडाट
आणि या आविष्काराला कोणतीही उणीव भासू अन्ये, म्हणून मृदूपणे दरवळणारा मातीचा सुगंध... हे सारं जणू पंचमहाभूतांच्या प्रीतीभेटीची एक अनोखी निसर्गभेटच!

पायवाटेवरून वाहणारं, पायात रुंजी घालणारं पाणी,
त्यातच, स्वत:ची जाणीव करून देणारा खळखळणारा निर्झर,
क्षणात कायापालट झालेला डोंगरावरचा हिरवा शालू,
अन तिच्यात जरी भरल्यासारखं उठावदार अस्तित्व दाखवणारा धबधबा..
पाना-पानांना आलेला चंदेरी रंग आणि त्यावरून ओघळणारे थेंब, जणू कारंजेच..
पावसाच्या पाण्याने न्हाऊन निघालेली झाडं, जणू नुकतीच न्हालेली सुंदर तरुणी..
जिचं सौंदर्य उजळलं असावं आणि तिच्या केसांतून अजूनही मोत्यांचे थेंब ओघळत असावेत, तसं पानांवरून ओघळणारं पाणी
अन सुष्टीचीही मोहून टाकणारी जादू पाहून तजेलदार झालेलं मन..!

या अनुभव-साक्षात्कारात रमून झाल्यावर मी भानावर आले.  मनाचा थकवा दूर पळून गेला होता आणि नवा उत्साह निर्माण झाला होता. आता आवारातून घराकडे जायला पाऊल पुढे टाकलं.......रानु

Friday, February 24, 2017

ओळखी केल्याने सौख्याइतकाच

ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रासपण होतो.
एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या
ओळखीचाच विचार करत बसते ,
शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते
की त्या ओळखीचेच बंधन होते आणि
कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात
काही फ़रक झाला की आपण
त्याचीच काळजी करत बसतो की
" आता हा असा का वागला ?"
- व.पु

Thursday, February 23, 2017

सोनियाच्या उंबऱ्यात

#गीत
 
सोनियाच्या उंबर्‍यात प्रकाशाची उधळण
तुम्हासाठी घेऊन आलो काळजाचं निरूपण
सूर्यदेव आभाळात पाखरांची किलबील
पाणवठे जागे झाले कांकणांची किणकिण
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग
ऐका कथा सांगतो पुण्यवान ओसरीची
समाधानी वेळू मध्ये वाजलेल्या बासरीची
नात्यासंगे हलणार्‍या हिरव्याकंच तोरणाची
तापलेल्या अंगणात पोळलेल्या पावलांची
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग
गीत - दासू
संगीत - अशोक पत्की
स्वर - स्वप्‍नील बांदोडकर , माधुरी करमरकर
गीत प्रकार - मालिका गीते
शीर्षक गीत, मालिका- सोनियाचा उंबरा, वाहिनी- ई टीव्ही
https://www.youtube.com/watch?v=A5I3JprY9PY

Tuesday, February 14, 2017

तुझी भेट होता चित्रकविता

तुझी भेट होता





** तुझी भेट होता **
कविता - मंजिरी जोशी
fb@ https://www.facebook.com/manjiri.joshi.969
संगीत - मिलिंद गुणे
गायिका - विभावरी आपटे जोशी
छायाचित्रण - निशांत कुलकर्णी
संकलन - मुक्तल मवाळ

Monday, February 13, 2017

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद तार्‍याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
गीतकार : ग्रेस , गायक : सुरेश वाडकर , संगीतकार : श्रीधर फडके , गीतसंग्रह : ऋतू हिरवा

Sunday, February 12, 2017

वाढत्या वयाबरोबर पुढं पाहण्याऐवजी मन

वाढत्या वयाबरोबर पुढं पाहण्याऐवजी मन मागंच पाहण्यात रमतं. आयुष्याच्या ह्या प्रवासांत कितीतरी माणसं भेटली. नात्याची, बिननात्याची, कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली, कुणी मैफिलीत भेटली. कुणाकुणाच्या बैठकीत सामील होण्याचे योग आले, कुणी प्रवासात भेटले, कुणी शेजारी म्हणून भेटले, कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचं आकर्षण वाढलं, काहींचं अचानक कमीही झालं... माणसं पुनर्भेटीत निराळीच वाटली... काहींच्या wave lengths पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणाऱ्या ऋणाचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असं कधी जवळीक, तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारं गणगोत लाभतंच असतं... माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसं असूही नये....!
-- पु.ल.

Saturday, February 11, 2017

रेशमी घरटे : एका उबदार घराची गोष्ट



रेशमी घरटे : एका उबदार घराची गोष्ट दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे दोन हजारांहून जास्त पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे! अंजली कुलकर्णी-शेवडे

चंद्रशेखर गोखलेंचं ‘मी माझा’ हे पुस्तक हा मला वाटतंय माझ्या पिढीच्या कॉलेज जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. चार ओळीत संपूनही चार ओळींच्या पलीकडचं बरंच काही मनात रेंगाळत ठेवणाऱ्या त्यांच्या ‘चारोळ्या’ आणि ‘मी माझा’च्या मुखपृष्ठावरचा त्यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो हे कॉम्बिनेशनच तेव्हा अनेक जणांना (खरं म्हणजे ‘जणीं’ना) खूप आवडलं होतं! कॉलेजमध्ये असताना ज्यांच्या कविता आवडीने वाचल्या, त्या कवीला नंतरच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईल असं कधी वाटलं नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी एका रेकॉर्डिंगच्या निमित्ताने आमची प्रत्यक्ष भेट झाली. अनेक विषयांवर गप्पाही झाल्या. त्यात ते ‘घर’ या विषयावरही मनापासून बोलले होते. ‘वास्तुरंग’मध्ये घराविषयी लिहायचंय म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि घराविषयी बोलण्यासाठी चंद्रशेखर गोखलेंना गाठलं.
मी आणि जग यामध्ये
माझ्या घराचा उंबरठा आहे
आणि छतापेक्षा मला
त्याचाच आधार मोठा आहे
असं म्हणणारे कवी-लेखक चंद्रशेखर गोखले आणि त्यांची पत्नी गायिका-अभिनेत्री उमा गोखले गेली १२ वर्षे कांदिवली-चारकोपला राहतायत. तळमजल्यावरच त्यांचं 2BHKचं छानसं घर आहे. मुख्य रस्त्यापासून आत गल्लीत असल्यामुळे खूप रहदारी नाही आणि अगदी एकांतही नाही, अशी हवीहवीशी वाटेल इतपत गजबज तिथे असते. गोखलेकाका आणि उमाताई हे दोघेही पक्के मासेखाऊ, त्यामुळे घराच्या जवळच असलेले तीन-चार ‘बाजार’ हे त्यांच्यासाठी घराचा ‘प्लस पॉइंट’ आहेत! त्यांच्या घराची मांडणी सुटसुटीत आहे. स्वामी समर्थाची तसबीर आणि मूर्ती त्यांच्याकडे आहे. ती बघायला लोक आवर्जून त्यांच्या घरी येतात. त्यांच्याकडचा देवासमोरचा दिवा अखंड तेवत असतो. बाकी घरात वस्तूंची फार गर्दी नाहीये.
दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे दोन हजारांहून जास्त पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे! त्यांचा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप एकमेकांना भेटीदाखल पुस्तकंच देतो. उमाताई सध्या शूटिंग्जमध्ये खूप व्यस्त आहेत. पण तरीही रात्री झोपण्यापूर्वी अर्धा-पाऊण तास त्या रोजचं वर्तमानपत्र आणि एखादं पुस्तक वाचतातच. त्यांना पुस्तक मोठय़ाने वाचून दाखवायला आवडतं. त्यामुळे मध्यंतरी काही बायकांना जमवून पुस्तक वाचनाचा उपक्रमही उमाताईंनी राबवला होता. वाचनाबरोबरच दोघांना संगीताचीही आवड आहे. त्यांच्याकडे ग्रामोफोन आणि जुन्या रेकॉर्डस्सुद्धा आहेत. वाचन आणि गाण्यामुळे कठीण काळही सुस झाला असं गोखले काकांनी आवर्जून सांगितलं.
आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे एक मडकं त्यांच्या घरात आणि मनात गेली २२ वर्षे घर करून आहे! या मडक्यात ते आणि उमाताई सुरुवातीपासून पैसे जमवतात. असे हजारो रुपये त्यात जमले. कुणाला मदतीची गरज असेल तर त्या मडक्याने खूप आधार दिला. जितकी घरं बदलली त्या प्रत्येक घरात ते मडकं अगदी जपून आणलं गेलं.
या घरात येईपर्यंत त्यांनी पुष्कळ घरं बदलली आहेत! अगदी सुरुवातीला म्हणजे लग्न झाल्यावर लगेचच त्यांना काही कारणाने गोखल्यांचं घर सोडावं लागलं. महिनाभर ते बेघर होते, म्हणजे उमाताईंच्या माहेरी आसरा होता, पण स्वत:चं म्हणावं असं घर नव्हतं. मग गोकुळधामची कामगार वस्तीतली छोटीशी जागा मिळाली. त्या घराला एकच छोटीशी पायरी होती. त्या काळात त्या दोघांकडेही फारसं काम नव्हतं, त्यामुळे त्या पायरीवर बसून चहा पीत गप्पा मारत त्यांनी अनेक तास घालवले होते! ती कामगार वस्ती असल्यामुळे तिथे गोखले कुटुंब वेगळंच वाटायचं. संसार नवीन असल्यामुळे ते दोघेही तसे बावरलेले असत. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांशी काहीच संवाद नव्हता. एकदा रात्री लाईट गेले. काळोखात बाहेर त्या पायरीवर बसल्याबसल्या उमाताई गायला लागल्या. चाफा बोलेना गायलं, मीराबाईचं एक भजन गायलं. तेवढय़ात लाईट आले. बघितलं तर उमाताईंचं गाणं ऐकत आजूबाजूला
३०-३५ लोक उभे होते! तेव्हापासून ते दोघेही त्या सगळ्यांशी जोडले गेले. आताही उमाताई रोज पहाटे उठून रियाज करतात, तेव्हा कुणी ना कुणीतरी बाहेर उभं राहून ऐकत असतं! एखाददिवस त्यांनी रियाज केला नाही तर ‘आज रियाज का केला नाही’ असं शेजारीपाजारी आवर्जून विचारतात. साधारणत: शेजाऱ्याची बायको गाणारी असेल तर आजूबाजूला एकंदरच दहशत असते, पण उमाताईंचं गाणं सुरेल असल्यामुळे इथे परिस्थिती वेगळी आहे!
गोकुळधामच्या घरानंतर इतरही तीन-चार घरं बदलल्यावर त्यांना हिरानंदानीमध्ये सरकारी कोटय़ातून घर मिळालं. कला क्षेत्रातल्या मित्रमैत्रिणी आणि राजकीय हितचिंतकांमुळे त्यांना तीन महिन्यांत ते घर मिळालं. या सगळ्यांची मदत आयुष्यभर लक्षात राहण्यासारखीच आहे. लक्षात राहण्यासारख्या कविताही त्यांनी हिरानंदानीतल्या घरात असताना लिहिल्या. ते घर तेराव्या मजल्यावर होतं. त्यामुळे खिडकीशी उभं राहिलं की लांबवरचा मोकळा परिसर दिसायचा. एकदा संध्याकाळी गोखलेकाका खिडकीशी उभे होते. अंधार व्हायला लागला तसे आजूबाजूचे एकेक दिवे लागायला लागले. उमाताई तेव्हा गाण्याचे क्लासेस घेऊन घरी परत आल्या. दार उघडताना गोखलेकाकांनी घरातलं दिव्याचं बटण लावलं आणि त्यांना कविता सुचली,
दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्र उजळतं
तू दाराशी आल्यावर..
डोक्यावर आपलं हक्काचं छत असणं म्हणजे काय हे पुरेपूर अनुभवल्यामुळे घराचा विचार त्यांच्या कवितेतही डोकावतो. गोखले काका आणि उमाताईंच्या घरात आजवर अनेक जण गरज म्हणून राहून गेले. त्यांच्याकडून कसलाही मोबदला त्यांनी घेतला नाही. या बाबतीत-
खरं सांगतो बेघर माणसाला
दिवेलागण झेपत नाही
त्याच्या डोळ्यातला पोरकेपणा
त्या अंधुक प्रकाशात लपत नाही
ही त्यांची कविता फारच बोलकी आहे. मध्यमवर्गीय पालकांनी आपल्या मुलांना कधीही ‘हे आमचं घर आहे’ असं म्हणू नये, ‘ हे आपलं घर आहे’ म्हणावं असं सांगतानाच प्रत्येकाला आपला हक्काचा आसरा मिळावा, कुणावरही बेघर होण्याची वेळ येऊ  नये असं वाटत असल्याचंही काकांनी आवर्जून सांगितलं. या आश्वासक शुभेच्छेनेच आमच्या घराविषयीच्या गप्पांचा समारोप झाला!
अंजली कुलकर्णी-शेवडे – anjalicoolkarni@gmail.com  

बीज अंकुरे

बीज अंकुरे, अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात ?

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरू
फुला-फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू
क्षणभरी विसावेल वाटसरू सावलीत
~ मधुकर आरकडे
#बालभारती #मराठी #कविता

Friday, February 10, 2017

तू जिथे मी तिथे

तू जिथे मी तिथे


तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे .... आता
स्पर्श ओल्या ... वाटा
मी न माझी राहिले आता


सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन् त्या ढगांवर चालणे
शोधते स्वतःला भेटूनी तुला
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला


तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन् त्या ढगांवर चालणे


गुणगुणावे मी तुला मग तू मला ही सुचावे
बोलुनी झाले तरिही खूप काही उरावे
बोलणे नको हे सांगणे आता
पण मग आपुल्या मौनास काही अर्थ ये नवा


अंतरे संपून जावी विरघळावे दुरावे
कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे
सांगणे सुखाचे ऐकवू जगा
पण मग आपुल्या नात्यास काही अर्थ ये नवा


Lyrics: Ashwini Shende
Tu Jithe Mi Tithe Song - Photocopy | 
New Marathi Romantic Songs 2016 | 
Parna Pethe, Chetan Chitnis

Tuesday, February 7, 2017

लोकशाही’ साहित्याच्या दिशेने...

‘लोकशाही’ साहित्याच्या दिशेने... वैशाली रोडे

डोंबिवलीत येत्या शुक्रवारपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते आहे. ज्या पु.भा. भावे यांनी सारस्वतात नवकथेचा नवा प्रवाह आणला, त्यांच्या नावे ही नगरी सजली आहे. ज्या शं.ना. यांनी आपल्या लालित्यपूर्ण, पण संवादी शैलीतून लेखनाचा नवा ठसा उमटवला, त्यांचे हे शहर. नवतेच्या अनेक प्रवाहांना सामावून घेणारे, नवे उपक्रम सुरू करणारे. मराठी साहित्य आता अशाच आधुनिक तंत्राच्या प्रवाहावर स्वार होते आहे. त्याचे अधिकाधिक लोकशाहीकरण होते आहे. साहित्यातील या नवेपणाच्या प्रवाहांचा, त्यातील बदलांचा वेध...

साहित्य... किती पूर्वीपर्यंत ताणता येतं आपल्याला? आणि काय येतं डोळ्यांसमोर...? पूर्वीची भूर्जपत्रं आणि त्यावर लिहिलेल्या ओळी? दगडांत कोरलेले शब्द आणि त्यातून गवसणारे अर्थ? की मौखिक परंपरेने चालत आलेली कवनं...? ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग की...

इतक्या पूर्वीपर्यंत खरंतर नकोच आहे जायला. काही... म्हणजे अगदी काहीच वर्षांपूर्वीपर्यंत साहित्य म्हटलं की, पुस्तकं यायची डोळ्यांसमोर. कसली पुस्तकं होती ही? ऐतिहासिक, पौराणिक कथांपासून राजेरजवाड्यांचे आयुष्य मांडणाऱ्या पटापर्यंत आणि तुमचंआमचं आयुष्य मांडणाऱ्या कथांपासून आपल्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींच्या चरित्रांपर्यंत! अर्थात, हा फारच मोठा पट झाला काळाचा. त्यातही काळाप्रमाणे फरक होत गेला होताच. मराठी वाचकाला ‘आपलं’ वाटणारं साहित्य लिहिलं जायला १९४० चं दशक उजाडावं लागलं. याच काळात गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु.भा. भावे, ग.दि. माडगूळकर जोमाने लिहिते झाले आणि शहरी मध्यमवर्गाचं जीवन आणि जाणिवा त्यांचीच भाषा घेऊन साहित्यात आल्या. याच प्रवाहात पुढे अनेक लेखक सामील झाले आणि त्यांनी आपापला ठसा साहित्य क्षेत्रावर उमटवला. मानवी संबंध, या संबंधांतली आणि अंतर्मनातली गुंतागुंत यांचा ताकदीने वेध घेणारे पु.भा. भावे आणि रोजच्या जगण्यातल्या छोट्याछोट्या गोष्टींतून संपूर्ण मानवी मनाचा शोध घेऊ पाहाणारे शं.ना. नवरे, ही यातली आघाडीची नावं होती... आहेत. दोघंही डोंबिवलीकर, हा योगायोग नसावा. डोंबिवली ही त्या वेळी मराठी मध्यमवर्गाची राजधानी होती आणि मध्यमवर्गीयांच्या लेखकांनी तिथे राहणं अगदीच स्वाभाविक होतं.

मधल्या काळात मराठी माणूस बदलला, मराठी मध्यमवर्ग बदलला, मराठी साहित्यही बदललं. वेगवेगळे वर्ग लिहिते झाले. त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्याच भाषेत साहित्यात उमटत गेलं. पंचवीसेक वर्षांपूर्वी देशात वेगवेगळ्या पातळ्यांवर झपाट्याने बदल झाले... राजकारण, समाजकारण, अर्थकारण ते तंत्रज्ञान. या बदलांचा झपाटा आणि आवाका याने सगळी संस्कृतीच घुसळवून टाकली. माणूस बदलला, त्याचे विचार बदलले, माणसांतले संबंध बदलले, एकमेकांशी आणि स्वत:शीही बोलण्याची भाषा बदलली आणि स्वाभाविकपणे, हे सारं व्यक्त करणारं साहित्यही बदललं. माहिती तंत्रज्ञान आणि त्याने केलेली क्र ांती या साऱ्याचं माध्यम बदलून गेलं. बदलाचा हा झंझावात आला आणि सगळं उन्मळून गेला, असं झालं नाही, तो इथे पाय रोवून राहिला. पण, तो इथे स्थिर झाला, असंही झालं नाही. त्यात काही ना काही बदल होत राहिले... अजूनही होत आहेत आणि ते काळाशी सुसंगतच आहे.

साहित्यातलं नवं तंत्रज्ञान, नवी माध्यमं यांची चर्चा आजवर भरपूर झाली आहे. ई-बुक्स तर आपण पाहतो आहोत, वाचतोही आहोत. रोजचं वर्तमानपत्रही आपण ई-पेपरच्या स्वरूपात वाचतो, तर पुस्तकांचं काय? कोणत्याही क्षणी त्याची उपलब्धता, येता जाता कुठेही, कसंही वाचण्याची सोय, कागदाची बचत, पर्यायाने पर्यावरणाचं संरक्षण, हे त्याचे फायदे आहेत. कोणाला झाला आहे याचा फायदा? तो परदेशात राहणाऱ्या मराठी जनांना आपल्या मातीशी आणि साहित्याशी जोडलं जाण्यासाठी झाला आहे, तसाच ग्रामीण भागातल्या नवसाक्षर वर्गालाही झाला आहे. आठ वर्षांपूर्वी मराठी ई-बुक्स सुरू केलेल्या ई-साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत सांगतात, ‘वर्षाला साधारण ४० लाख वाचक मिळवणाऱ्या आमच्या साइटवरच्या पुस्तकांचा ३० टक्के वाचक परदेशी मराठी वाचक आहे, तर ३० टक्के वाचक तालुक्याचं गावही दूर असणारा ग्रामीण. अगदी मेंढपाळही आहेत यात... त्यांच्या प्रतिक्रि या येत असतात.’ लेखकांना लेखनावर जगता आलं पाहिजे, नुसतं जगता नाही, चांगलं, एक्झिक्युटिव्ह लाइफ जगता आलं पाहिजे, हे ध्येय मनाशी ठेवून काही लेखक-कवींनीच सुरू केलेल्या ई-साहित्यचं आता लक्ष्य आहे एक कोटी वाचकसंख्या गाठण्याचं. एकतर ई-बुक प्रसिद्ध करण्यासाठी खूपच थोडा खर्च येतो. कारण कागद, छपाई हे महत्त्वाचे खर्च नसतात. त्यामुळे पुस्तकाची किंमत आवाक्यात राहू शकते. लेखकाला मानधन आणि प्रत्येक डाउनलोडमागे रॉयल्टी मिळू शकते. काही अपवाद वगळता लेखकाने स्वत:च पैसे देऊन प्रकाशकांकडून पुस्तक छापून घेण्याच्या आणि पुस्तक खपेल की नाही, या भीतीने प्रकाशकाने ते बऱ्यापैकी मोठ्या किमतीला विकण्याच्या आजच्या जमान्यात हा किंमत जास्त म्हणून वाचक कमी आणि वाचक कमी म्हणून किंमत जास्त, या दुष्टचक्र ातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. ई-साहित्य आणि गेल्या सातआठ वर्षांत सुरू झालेल्या ई-बुक्स देणाऱ्या आणखी काही वेबसाइट्स आता त्या दिशेने वाटचाल करत आहेत. फक्त वेबसाइटच नाही, मोबाइल अ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमातूनही आता त्या ई-बुक्स देत आहेत. (  ई-साहित्य प्रतिष्ठानने परवा २६ जानेवारीपासून ७७१०९८०८४१ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर ‘श्यामची आई’ हे पुस्तक उपलब्ध केलं आहे. या नंबरवर मागणी नोंदवली की, वाचकांना त्यांच्या नंबरवर त्याची पीडीएफ मिळू शकणार आहे. यापुढे ई-साहित्य महिन्याला एक पुस्तक व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करणार आहे.)

खरं आहे, साहित्याचं बाह्य रूप आता बदललं आहे. ते कालसुसंगत, तंत्रज्ञान सुसंगत झालं आहे. पण त्याच्या आंतरिक स्वरूपाचं काय?

हे समजून घेण्यासाठी थोडं खोलात शिरायला हवं. साहित्याचं वैशिष्ट्य समजून घ्यायला हवं. इंग्रजीत वेगवेगळ्या शब्दकोशांत ‘लिटरेचर’, अर्थात साहित्य म्हणवल्या जाणाऱ्या लेखनाची काही वैशिष्ट्यं सांगितली आहेत. कलात्मक गुणवत्ता. बौद्धिक गुणवत्ता. उत्कृष्ट आशय. उत्कृष्ट अभिव्यक्ती. उत्कृष्ट रचना. आशयाची शाश्वतता... आजच्या तरुणाईच्या जगण्यातले ताणेबाणे चितारणारी मनस्विनी लता रवींद्रची सिगारेट्स, अलविदा ही नाटकं ते ब्लॉगच्या आरशापल्याड हा कथासंग्रह; याच पिढीचं तंत्रज्ञान पकडणारी श्रुती आवटेची कादंबरी लॉग इन, ऐश्वर्य पाटेकरच्या जगण्याचं भान देणाऱ्या कविता, दिशा केने या तृतीयपंथीयाच्या बेधडक प्रश्न विचारणाऱ्या आणि तितक्याच ठामपणे त्यांची उत्तरंही मागणाऱ्या कविता... हे आणि असे अनेक लेखक, त्यांचं पुस्तक ते ब्लॉग आणि फेसबुक असं वेगवेगळ्या माध्यमांतलं लेखन ही सगळीच्या सगळी वैशिष्ट्यं लेवून येतं. मुळात साहित्य असो की आणखी कोणतीही कला, त्यात नवी पिढी कसा विचार करते आहे, कशी अभिव्यक्त होते आहे, यावर तिचं भवितव्य अवलंबून असतं. मराठी साहित्याच्या नावाने अनेकदा गळेही काढले जात असतात. बरे लेखनच येत नाही, वगैरे... पण मुळात आता पुस्तके म्हणजेच साहित्य, ही संकल्पनाच बदलते आहे. सोशल मीडिया, अर्थात समाजमाध्यमं इतकी सर्वदूर पोहोचत आहेत की, लेखक आणि वाचकसुद्धा आता कोणीही होऊ शकतो आहे आणि या माध्यमांनुसारच त्यातली अभिव्यक्तीही बदलत आहे. ब्लॉग लिहिणारे, फेसबुकवर नियमित पोस्ट टाकणारे, व्हॉट्सअ‍ॅपवर व्यक्त होणारे असंख्य क्षेत्रातले, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले, वेगवेगळ्या परिस्थितीत काम करणारे आणि जगणारे असंख्य लोक आहेत. त्यांच्यासाठी बहुधा प्रथमच लेखन इतकं सहज आणि सोपं झालं आहे. एकीकडे राजकीय आणि सामाजिक विश्लेषक आजच्या परिस्थितीचं विश्लेषण करत आहेत, दुसरीकडे शाळांमध्ये प्रयोग करत मुलांना त्यांच्याच पद्धतीने फुलू देणारे शिक्षक आपले अनुभव शेअर करत आहेत. एकीकडे लिंगभावावर आधारित भेदावर हिरिरीने चर्चा होत आहेत, तर दुसरीकडे पर्यावरणावर काम करणारे कार्यकर्ते जीव तोडून पर्यावरणाच्या समस्या आणि त्यावरची संभाव्य उत्तरं मांडत आहेत. जितक्या ताकदीने मालक व्यक्त होतो आहे, तितक्याच ताकदीने नोकरही आणि जितक्या कौशल्याने गुरू, तितक्याच मनस्वीपणे शिष्यही! इतका मोठा समाजगट व्यक्त होणं, ही अभिव्यक्तीची क्रांती आहे. लेखकांत जितकं वैविध्य, तितकंच वैविध्य त्यांच्या अनुभवांत, ते अभिव्यक्त करण्याच्या पद्धतीत, त्यांच्या भाषेत आणि निवडलेल्या आकृतीबंधातही. साहित्य म्हणजे यापेक्षा वेगळं काय आहे? जितके त्यात प्रयोग होत राहातील, तितकं ते समृद्ध होत जाईल.

अर्थात, हेही खरं आहे की, हे सगळं इंटरनेट आणि स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटर असलेल्यांनाच लागू होतंय!... इतरांचं काय?...

पण त्याचबरोबर हेही खरं आहे की, दादासाहेब फाळकेंनी पहिला ‘सिनेमा’ बनवला होता तो एका रोपट्याची वाढ चित्रित करणारा... आज जवळजवळ सव्वाशे वर्षं झाली असतील त्याला... आजचा सिनेमा कुठे गेलाय?

आजच्या जगाची आणि तंत्रज्ञानाची गती पाहता आधुनिक आशयाचं आणि आधुनिक आकृतीबंध घेऊन आलेलं हे समग्रजनांचं साहित्य खरंखुरं ‘लोकशाही’ व्हायला अजिबातच वेळ लागणार नाही.

पु.भा., शं.ना. यांनी आपल्या आसपास वावरणारा सामान्य माणूस आपल्या साहित्यात आणला होता. आजही तेच होतं आहे. उलट, ‘लेखक’ अशी बिरुदावली न घेताही अनेक हात लिहिते झालेत आणि आपल्या आसपासचा माणूस चितारू लागलेत. या हातांना तर बळ मिळोच; पण असे असंख्य हात लिहिते होवोत आणि लेखक- वाचक या दोन्ही भूमिका सर्वांनाच करायला लागोत!
सौजन्य : http://www.lokmat.com/storypage.php?catid=299&newsid=18311875

#esahity

Monday, February 6, 2017

साहित्य रसिक म्हणून अनुभवलेलं ९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

                     साहित्य रसिक म्हणून अनुभवलेलं ९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
                                                                                     





मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवत ग्रंथ दिंडीला सुरवात झाली...
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जीवाशिवाचे मीलन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
ह्या वर्षी पहिल्यांदाच संमेलन गीत लिहिलं गेलं ते गीतकार आनंद पेंढारकर यांनी आणि पहिला गझल कट्टा सुरु झाला अखिल भारतीय संमेलनाच विशेष !
आनंदाची गोष्ट म्हणजे संमेलन महाराष्ट्रात होते
शिवाय ह्या वेळी अध्यक्षाची निवडही उत्तम होती . कारण संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे वादग्रस्त विधानापासून लांब होते .
भव्य दिव्य सोहळा तीन दिवस सुरु होता. संमेलनात रांगोळी ,मूर्तिकला ,साहित्य संस्कृतीचं छान दर्शन घडवलं.
एकाच वेळी कवी संमेलन तर कुठे गझल कट्टा तर काही ठिकाणी परिसंवाद ,बोलीभाषेचा जागर सुरु होता . जमेल तेवढा सहभाग घेण्याचा प्रयत्न केला . वेळापत्रक माहिती असणं जास्त जरूर आहे हे ह्या वेळी कळलं . सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण करण्याचा प्रस्ताव केला होता पण मागच्या दोन वर्षापासून काही मान्य केला नाही ना कोणी राजकारणी नेत्यांनी मध्यस्ती केली .

साहित्यिक वाचक प्रकाशकांचा दुवा असणारं मराठी भाषेचा प्रसार करणार ग्रंथ दालन एक आकर्षण . मराठी भाषा जास्त बोलली जावी वाचक संख्या वाढावी म्हणून प्रत्येक जण
आपल्या परीने झटत होते . पण खूप मोठं ग्रंथ दालन एक फेरफटका मारणे हि कठीण . कुठे कोणता stall आहे याची माहिती हि बाहेर कुठे लावली नव्हती .हे खटकलं . सामाजित माध्यमाचा पुरेपूर वापर करायला हवा असं अजूनही वाटतं . तंत्रज्ञान बदलतं आहे तसे बदलायला हवं . facebook आणि you tube वर live प्रक्षेपण व्हावं हि माफक अपेक्षा आहे बघू कधी पूर्ण होतेय . साहित्यिक उपक्रमा बद्दल सांगायचं झालं तर ग्रंथ तुमच्या दारी या कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या मोफत ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देते .
बदलत्या तंत्रज्ञानाचे स्वरूप ओळखून पुस्तक हि आता ebook स्वरुपात प्रकाशित करण्यात येतात . Esahity उपक्रमा बद्दल सांगायचं तर साहित्यिकांच्या मदतीने ई साहित्य प्रतिष्ठान मोफत ebook सेवा वाचकांना देते .आधी email , website वर मिळत होती आता whatsapp वर हि सुरु करण्यात आली आहे . या दोन्ही स्तुत्य उपक्रमामुळे देशा विदेशात वाचक वर्ग वाढला आहे आणि शिवाय नव्या साहित्यिकांच्या ओळखी हि वाचकांना होतात . मराठी पाऊल पढते पुढे बोलायला हरकत नाही . मराठी माणुस मराठी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देत नाही परिस्थिती बिकट आहे अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी उल्लेख केला शिवाय वेळे नुसार शाळेतलं शिक्षण हि बदलायला हवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा शिकवल्या जाव्यात ह्यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावलं उचलेलं हि आशा व्यक्त केली .
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जुने नवीन मित्रमंडळीशी भेटी गाठी झाल्या . हे खासच म्हणायचं .साहित्यिक कार्यक्रमाची रेलचेल आणि भोजनाची ही चांगली व्यवस्था होती. एकूण वाचक म्हणून अनुभव चांगला होता . दोन दिवस अनुभव घेतलेल्या संमेलनाची धुंदी अजून उतरली नाही . एवढचं सांगीन .

~ विद्या पालकर