मन ताजं व्हावं, म्हणून घरासमोरच्या आवारात फेरफटका मारायला आले . माझे घरही एका सुंदर डोंगराच्या पायथ्याशीच आहे. हिरव्यागार गवतावर चालताना आजूबाजूचा जुनाच निसर्ग नव्याने पाहण्याचा प्रयत्न सुरू होता. संध्याकाळी घरट्याकडे परतलेल्या आणि परतणाऱ्या पक्षांची टेहळणी चालू होती.
निसर्गामधील माझ्या कुतूहलाचा विषय ठरलेला हमिंगबर्ड सतत लक्ष वेधून घेत होता. एकाच फुलावर पुढे जाऊन क्षणात मागे परतण्याच्या त्याच्या हालचालींनी तो नेहमीसारखाच कुतूहल निर्माण करत होता.
मला तो नेहमी विसरभोळा वाटतो. जणू त्याला फुलाच्या कानात काहीतरी सांगायचे असते आणि थोडं सांगून झाल्यावर पुढे जातो अन उरलेलं सांगायला पुन्हा मागे येतो. इवलासा रंगीत पक्षी; पण त्याचा वेग आणि चंचलता भुरळ पाडणारी, वेड लावणारीच.
काही महिन्यांपूर्वी, त्याला कॅमेराबंद करताना त्याने माझी अगदी दमछाक केली होती. त्यावेळी तीन-साडेतीन तासांचा आटापिटा करून त्याने मनाजोगता ‘शॉट‘ दिला होता. हे सर्व चालू असतानाच संध्याकाळचा थंड वारा मनाला सुरेल गाण्यांच्या आठवणींचे हिंदोळे देत होता.
या सगळ्या आठवणींमध्ये रमताना आणि निसर्ग न्याहाळताना पाच-दहा मिनिटं अगदी छान गेली आणि चालता-चालता अलगद एक थेंब अंगावर पडला, तो पुढे येणाऱ्या आनंदाची चाहूल घेऊनच! अलबत, तो पावसाचाच थेंब होता. क्षणातच थेंबांच्या सरी झाल्या आणि सरींचा पाऊस झाला.
पाऊस, पावसाची सर आणि एक सुखद अनुभव. प्रत्येकाचा पावसातला, पावसाबद्दलचा काही ना काही अनुभव असतोच; तसाच हा माझा अनुभव..
ढगांना आलेली करडी काळीभोर छटा,
त्यातून डोकावणारी विजांची चमकदार, क्षणभंगुर; पण विस्मयकारक अशी नक्षी,
अंगावर अलवार विसावणारे टपोरे थेंब, तो त्यांचा शहारे आणणारा स्पर्श..
सो सो करणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याला साथ देणारा ढगांचा गडगडाट
आणि या आविष्काराला कोणतीही उणीव भासू अन्ये, म्हणून मृदूपणे दरवळणारा मातीचा सुगंध... हे सारं जणू पंचमहाभूतांच्या प्रीतीभेटीची एक अनोखी निसर्गभेटच!
पायवाटेवरून वाहणारं, पायात रुंजी घालणारं पाणी,
त्यातच, स्वत:ची जाणीव करून देणारा खळखळणारा निर्झर,
क्षणात कायापालट झालेला डोंगरावरचा हिरवा शालू,
अन तिच्यात जरी भरल्यासारखं उठावदार अस्तित्व दाखवणारा धबधबा..
पाना-पानांना आलेला चंदेरी रंग आणि त्यावरून ओघळणारे थेंब, जणू कारंजेच..
पावसाच्या पाण्याने न्हाऊन निघालेली झाडं, जणू नुकतीच न्हालेली सुंदर तरुणी..
जिचं सौंदर्य उजळलं असावं आणि तिच्या केसांतून अजूनही मोत्यांचे थेंब ओघळत असावेत, तसं पानांवरून ओघळणारं पाणी
अन सुष्टीचीही मोहून टाकणारी जादू पाहून तजेलदार झालेलं मन..!
या अनुभव-साक्षात्कारात रमून झाल्यावर मी भानावर आले. मनाचा थकवा दूर पळून गेला होता आणि नवा उत्साह निर्माण झाला होता. आता आवारातून घराकडे जायला पाऊल पुढे टाकलं.......रानु
0 comments:
Post a Comment