Showing posts with label तुला पाहिले मी नदीच्या किनारी. Show all posts
Showing posts with label तुला पाहिले मी नदीच्या किनारी. Show all posts

Monday, February 13, 2017

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद तार्‍याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
गीतकार : ग्रेस , गायक : सुरेश वाडकर , संगीतकार : श्रीधर फडके , गीतसंग्रह : ऋतू हिरवा