मिसाईलमॅन भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा आज स्मृतीदिन!!!
विनम्र अभिवादन!!
🙏🙏🙏💐💐💐
आदरणीय अब्दुल कलामांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख मुलांना गोष्टीरुपाने करुन देणारे चार भाग व्यास क्रिएशन्स ने प्रकाशित केलेले आहेत.
डॉ. अब्दुल कलाम यांची संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
तामिळनाडूतील 'रामेश्वरम ' सारख्या छोट्याशा गावामधे एका नावाड्याच्या पोटी जन्म घेतलेल्या एका महान वैज्ञानिकांचा थक्क करणारा प्रवास.
एका विशिष्ट ध्येयाला केंद्रस्थानी ठेवून, अतिशय प्रतिकूल परिस्थतीत काळाच्या कसोटीवर स्वतःला तपासत, आजमावत शांतपणे यशाची एकेक उत्तुंग शिखरं जिंकणारा जणू योद्धाच !. एक विद्यार्थी, एक प्राध्यापक, संशोधक, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, लेखक, मार्गदर्शक आणि त्यानंतर थेट राष्ट्रपती, भारतरत्न या सर्वोच्च स्थानापर्यंतचा विशाल कॅनव्हास आणि त्या कॅनव्हासवर अभिमानाने चितारलेले एक महान व्यक्तिमत्व, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. आपल्या हिंदुस्तानातीलच नव्हे तर इतर देशातील समस्त विद्यार्थ्यांनी त्यांचा अदभूत जीवन प्रवास अभ्यासण्यासारखा आहे. हेच महत्व, हाच विचार मनाशी घेऊन ठाण्यातील व्यास क्रिएशन्स यांनी 'मिसाईल मॅन' हे डॉ. कलाम यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावरची एकूण चार पुस्तके ( भाग १ ते ४ ) नुकतीच प्रकाशित केली आहेत.खास विद्यार्थी वर्ग नजरेसमोर ठेवून अतिशय सोप्या, सुटसुटीत, प्रवाही, ओघवत्या शैलीत ही चारही पुस्तके कलात्मकरित्या कुमार वाचकांसमोर आली आहेत. हे सुंदर आणि नेमके लेखन आजचे आघाडीचे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. खरंतर, डॉ कलाम हा विषय इतका मोठा आहे, त्यांचे कार्य इतके थोर आहे की हे सारे संचित चार पुस्तकांत कसे साकारायचे. मात्र हे आव्हान आव्हाड यांनी छानपणे लीलया पेलले आहे.
१५ ऑक्टोबर म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आणि हा दिवस आपण वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा देखील करतो.
हेच निमित्त साधून व्यास क्रिएशन्स यांनी त्या दिवशी मुंबईतल्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या, शिक्षकवर्गांच्या उपस्थितीमध्ये या
चार भागातील पुस्तकांचे प्रकाशन केले हे महत्वाचे आहे. यामुळे समस्त विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व देखील अधोरेखित झाले.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आयुष्यभर जपणारे, आपण राष्ट्रपती आहोत असा कुठलाही आव न आणता अनेक विद्यार्थ्यांशी त्यांनी
केलेला सुंदर सुसंवाद, सर्वानाच वंदनीय, प्रेरणादायी असणारे डॉ. कलाम म्हणजे सर्वांच्याच आपुलकीचा विषय. ही चारही पुस्तके वाचताना आपणाशी जणू
डॉ कलाम हे संवाद साधत आहेत, गप्पा मारीत आहेत असे वाटते. विदयार्थ्यांना जणू ते आशेचे किरण देत आहेत असा भास होतो.आव्हाडांच्या लेखनाचा हा विशेष गुण पुस्तक वाचताना आवर्जून जाणवतो. कलामांनी व्यक्त केलेले विचार हे किती काळाच्या पुढे आहेत याचा प्रत्यय प्रत्येकाला येईल. असे उद्बोधक विचार पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. त्यातील काही.....
" काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत असतो. "
" तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलवतील ! "
" झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून, स्वप्ने ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला झोपू देत नाही."
"आकाशाकडे बघा आपण एकटे अजिबात नाही, सर्व ब्रह्माण्ड तुमचे मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देते, जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो."
.....कलामांचे हे विचार आजच्या पिढीतल्या विदार्थ्यांसाठी ही जणू आधुनिक सुभाषिते आहेत. या चारही पुस्तकांमध्ये डॉ. कलाम यांच्या जीवन प्रवासातले विविध टप्पे गोष्टीरूपाने सुंदरपणे रेखाटले आहेत. त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. लहानपणाचा काळ, विदयार्थीदशेतील काळ, शिक्षणाचे महत्त्व, त्यासाठी खाल्लेल्या खस्ता, गुरुजनांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, विविध संस्थांमध्ये केलेली कामे, आलेले अनुभव, शास्त्रज्ञ होण्याचा प्रवास, केलेला संघर्ष, स्वतःचा लेखन प्रवास, ग्रंथांचे महत्त्व, राष्ट्रपती पदावर काम करताना आलेला अनुभव, भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मिळाल्यावर
त्यांनी व्यक्त केलेले मनोगत हे सारं सारं या चार पुस्तकांमध्ये व्यापलेले आहे. मिसाईल मॅन असे या पुस्तकांचे नाव आहे. डॉ कलाम यांनी आपल्या
हिंदुस्तानाच्या संरक्षणासाठी जी क्षेपणास्त्रे बनवली त्यांची नावेही त्यांनीच दिलीत. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग, ही त्यांनी दिलेली नावे किती अद्भूत, सुंदर आहेत याची आपणाला प्रचिती येते. वैज्ञानिक प्रगती करुन हिंदुस्थानने स्वयंपूर्ण व्हावे हेच त्यांचे अंतिम ध्येय होते.
आव्हाडांनी कुमारांसाठी लिहिलेली ही चारही पुस्तके मुलांना वाचनाचा आनंद तर देतीलच त्याबरोबर कळत नकळतपणे मुलांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवतील असा विश्वास आहे. डॉ कलाम यांची ही नुसतीच आत्मचरित्रे नसून चांगला माणूस बनण्यासाठी केलेल्या एका जीवन संघर्षाची, प्रयत्नांची ती जणू वैज्ञानिक कहाणी 'आहे.
मिसाईल मॅन..भाग १ ते ४ . ( डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.)
लेखक: एकनाथ आव्हाड
प्रकाशक: व्यास क्रिएशन्स, ठाणे.
मूल्य : रु. २५०/- ( चारही पुस्तकांचा रंगीत सचित्र संच )
लेखक- रामदास खरे.