Monday, April 11, 2011

महाराष्ट्रा मधील मराठी भाषेची शोकांतिका ...

महाराष्ट्रा मधील  मराठी भाषेची शोकांतिका !

चेनईहून पाँडिचेरीसाठी निघालो आणि तमिळनाडूमध्ये तमिळ भाषेचे महत्त्व का टिकून आहे, याचा साक्षात्कार मला प्रवासादरम्यान झाला. तमिळनाडूमध्ये कोठेही काम करा; तमीळ आल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा जादा पैसेही मिळत नाही. तेव्हा जास्त पैसे मिळवायचे असतील तर तमीळ शिकण्यावाचून तुम्हाला गत्यंतरच नाही, ही गोष्ट उत्तर प्रदेशहून आलेल्या एका भैय्या मुलाकडून मला समजली. तेव्हा मला धक्का वगैरे काही बसला नाही. पण जे काही ऐकले होते ते प्रत्यक्ष अनुभवल्याचा साक्षात्कार झाला.

सोनू असं त्या मुलाचं नाव. वय साधारण पंचवीस-सव्वीस असेल. सोनू हा मूळचा उत्तर प्रदेशचा. रामपूर किंवा तत्सम कुठल्या तरी खेड्यातला. दोन वर्षांपूवीर् तो मुंबईमध्ये फनिर्चर बनविण्याच्या धंद्यात कारागीर म्हणून लागला होता. तिथं त्याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीचे दोनशे रुपये मिळायचे. पण चेन्नईमध्ये तितक्याच कामाचे त्याला साडेतीनशे रुपये मिळतात. त्यामुळे त्यानं मुंबई सोडून चेन्नईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये भैय्या लोकांची खूप गदीर् असल्यामुळे तिथं जास्त पैसे मिळत नाहीत. पण चेन्नईमध्ये कारागीर लोकांची कमतरता असल्याने इथं आम्हाला जास्त भाव मिळतो, असं सोनू सांगतो.

चेन्नईतही कारागिरांचे दोन प्रकार आहेत. ज्यांना तमीळ येते, अशा कारागिरांनाच तमीळ ठेकेदार कामावर ठेवतात. तमीळ ठेकेदारांकडे काम केले तर आम्हाला दिवसाला साडेतीनशे रुपये मिळतात. गैरतमीळ (म्हणजे हिंदीभाषक) ठेकेदाराकडे काम केले, तर मुंबईप्रमाणेच दोनशे रुपये रोजाने काम मिळते. त्यामुळे आम्हाला जास्त पैसे मिळवायचे असतील, तर तमीळ भाषा शिकावीच लागते. तमिळनाडूत येऊन जर मुंबईचाच भाव मिळणार असेल तर इथे येण्याचा काय उपयोग, असा सवाल सोनू उपस्थित करतो.

तमिळनाडूमध्ये आल्यावर तमिळ शिकला. मग मुंबईमध्ये असताना मराठी शिकला होता का, हा माझा प्रश्न ऐकून तो चक्रावूनच गेला. मी मूर्ख म्हणून असा प्रश्न विचारतो आहे, की काय असाच त्याचा चेहरा झाला होता. सोनू म्हणाला, साहेब, मुंबईमध्ये मराठी लोकच हिंदीमध्ये बोलतात. त्यामुळे आम्हाला तिथे भाषेचा प्रॉब्लेम कधीच आला नाही. आम्ही आमच्याच प्रांतामध्ये आहोत, असे आम्हाला वाटायचे. त्यामुळे महाराष्ट्रात असताना किंवा मुंबईमध्ये असताना मराठी शिकण्याचा प्रश्नच आला नाही. तिथे मराठी न शिकताही आम्हाला नोकरी आणि पैसे मिळत होते. मात्र, इथे तसे नाही. त्यामुळे तमीळ आम्हाला शिकावीच लागली.

काही महिन्यांपूवीर् तमिळनाडूमध्ये राजस्थानी लोकांचे एक संमेलन झाले होते. त्या वेळी त्यांनी राजस्थानी भाषेतील गाणी आणि संगीत जोरजोरात लावले होते. त्या वेळी काही जणांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली आणि हा मुद्दा करुणानिधी यांच्यापर्यंत गेला. त्या वेळी करुणानिधी यांनी त्यांना सज्जड भाषेत इशारा दिला होता, 'तुम्हाला गाणी ऐकायची ऐका, काम करायचे आहे करा. तुम्हाला कोणी अडविणार नाही. पण जेव्हा भाषेचा मुद्दा येईल, तेव्हा तुम्हाला तमीळ आलीच पाहिजे. बोलायचे मात्र तमीळमध्येच.' बऱ्याच दिवसांपूवीर् वाचलेला हा किस्सा नुसता डोक्यात होता. सोनूच्या निमित्ताने त्याचा थेट अनुभव आला.

सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स, दिनांक ६ एप्रिल २०११

0 comments: