अचानक जाग येते मनाला काही होते
लाजेला घेऊन ओठी मनाला घाई होते
क्षण जिव्हाळ्याचे बांधून घेते पैंजणातं
मग हळूच धावत येते मन अंगणातं
निजलेले गाव तरीही धुके जरासे जागे
चाहुल मिळे वाटेला जीवाला ओढ लागे
पसरून देता देता हाकेला वाटेवरती
घाट उतरता थोडा नजर यमुनेवरती
यमुनेच्या त्या काठाला नसे तसे कोणीही
माझ्याच इतके कासावीस असे पाणीही
त्यात साद नुसती येते दूर तरी कुठुन
ओंजळीत घेते सारे तेव्हा प्राण भरून
पण पसरत नाही हात कुणी समोर
पिसारा फुलवत नाही आधारचा मोर
मग पदर नुसता डोळ्यांना समजून घेतो
तो आहे येथे तरीही ना समोर कधीही येतो
परतून घरी जाताना उरते मागे काही
जे उरले असेल तेही माझे म्हणवत नाही
- विजय बेंद्रे (एक वादळी पाऊस)
https://www.facebook.com/
0 comments:
Post a Comment