#मराठी
धरेने ओढुनी घ्यावी धुक्याची रेशमी चादर
तसे माझे तुझे नाते तसा माझा तुझा वावर...!
कुणाच्या सावलीला मी कधी बोलावले नाही
उन्हाचा पाहिजे तेथे करूनी घेतला वापर...!
तसा पाऊसही येतो ... तसे तर ऊनही येते
तरी काहीतरी होते...नभाला ओल आल्यावर...!
इथे माणूस जोडाया असा मी तोडगा केला
जगाची भोगुनी दु:खे...सुखाने जाहलो सादर...!
लफंग्याची कलाकारी...दुतोंड्याची अदाकारी
मलाही भेटला होता अशा गोषातला झोलर...!
निघाली रात्र माहेरी ... असे ना ऐकले केंव्हा
दिसाला गाठताना मी कधी ना पाहिले सासर...!
नवा आदेशही आला...नवी आश्वासने आली
जुन्या देशात अवतरला नव्याने एक सौदागर...!
खरे सांगा ... प्रतिष्ठेने कुणी का राहतो येथे
मनापासून कोणी का कुणाचा राखतो आदर...?
कधीचे संपले आहे ... जगायासारखे काही
मला तू सांगशी मृत्यू तुला आता म्हणे घाबर...?
-----प्रशांत
https://www.facebook.com/prashant.vaidya.503
0 comments:
Post a Comment