Thursday, March 13, 2025

जोशी कुटुंब

जुनी पोस्ट 

हे व्हायरल झालेले पिशव्यावाले जोशी काका आणि काकू. मी अनेक दिवस त्यांच्याकडून जेवणाचा डबा घेतो. दोघं अफाट आहेत. काका ८७ वर्षाचे आणी काकू ८२. काका सुंदर शिवणकाम करतात आणी काकू अत्यंत रूचकर जेवण बनवतात. आज डब्यात पालकाच्या पुर्या होत्या. परिस्थिती मध्यमवर्गीय पण पुरेशी. एक मुलगा व एक मुलगी येऊन जाऊन असतात, त्यांची काळजी घेतात. दोघांची लग्न झालेली, सुस्थितीत. पण ही दोघं एकमेकांना धरून आहेत. 'स्वयंपुर्ण' आणी 'स्वाभिमानी'. काकू डबे देतात, काका हात पाय चालू रहावेत यासाठी कापडाच्या पिशव्या शिवतात आणी आठवड्यात दोन वारी ठराविक जागी जाऊन विकतात. 
सिन काय झाला कि काही दिवसांपूर्वी कोणीतरी पिशव्या विकत घेताना त्यांचा फोटो काढला आणी सोशल साईट्सवर टाकला. काकांना पत्ताच नाही. लिहिणार्या माणसाने लोकांनी काकांपासून श्रम प्रतिष्ठा व जगण्याची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने पोस्ट टाकली पण लोकांनी त्याचा आपापल्या पद्धतीने अर्थ काढला. फोटोत गोड हसणारे काका व्हायरल झाले. आता काकांच्या घरी लोकांची रीघ लागलेय, फोन खणाणतायत. कोणी त्यांच्या पोरांना नावं ठेवतायत, कोणी २०० पिशव्यांच्या ऑर्डर्स देतायत, परदेशातून फोन येतायत, मदतीची तयारी दाखवतायत. काका सांगत होते सगळ्यात भारी म्हणजे दुबई च्या एका ग्रुहस्थांनी त्यांना व्रृध्दाश्रमात ठेवण्याची तयारी सुरू केली. सिरीयल मधले दोन तीन नट येऊन गेले, पेपर वाले आले, न्यूज वाले आले. सगळी गंमत चाल्लेय. 

आता यात त्यांना आणि त्याच्या मुलांना मनस्ताप होतोय खरा, पण मला आपला समाज अजूनही किती संवेदनशील आणी जिवंत आहे हे बघून भरुन आलयं. एक कुटुंब म्हणून आपण अजुनही किती बांधलेले आहोत. कोण कुठल्या जोशी काकांसाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोकांनी धाव घ्यावी हि कसली भारी गोष्ट आहे. 
आता या ठिकाणी जरी आमचे काका काकू स्वयंपूर्ण असले तरी दुसरे कुणीतरी काका खरच गरजवंत असतील.. त्यांना मदत व्हायलाच हवी. त्यामुळे यावेळेस जसं आपण मदतीचा हात पुढे केला तसाच प्रत्येक वेळी करायला हवा.
We rise by lifting each other.

**बाकी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उभयतानी कुंठल्याही पध्दतीची पैशाची मदत किंवा निधी संकलन अपेक्षिली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने किंवा नावावर कोणीही पैसै गोळा करत असल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोब काकांच्या खालील नंबरवर संपर्क साधावा.**

- #बोलेगोड

सिध्देश्वर जोशी 8291036120

18 march 2020

Sunday, February 16, 2025

छावा चित्रपट

छावा 


एक उत्कृष्ट कलाकृती, 

सगळंच उत्तम जमून आलेय... 

अभिनय, कॅमेरा वर्क, दिग्दर्शन, संवाद, संगीत, सेट्स म्हणजे सगळंच... 👌👌


दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे विशेष कौतुक की, त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता 20% का होईना छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील ते शेवटचे दिवस, वेदना, यातना, संभाजी महाराजांची मृत्युला सामोरे जाण्याची खुमखूमी, त्यांच्यावर केलेले ते अत्याचार दाखवले... 

थंड रक्ताचा पण तेवढाच कपटी, क्रूर आणि खुनशी औरंग्या तर बाप रंगवलाय... 

विकी कौशल अक्षरशः ती भूमिका जगलाय... फायटिंग सिनच्या वेळी त्याच्या त्या गर्जना हृदयाची धडधड वाढवीत होत्या. एका युवराजांची आणि राजाची मानसिकता, देहबोली हुबेहूब वठवलीये... 

काही सिन टाकता आले असते. पण एकाच चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची ती तेजस्वी आणि वादळी कारकीर्द दाखवूच शकत  नाही... 

पण छत्रपती संभाजी महाराजांवर एवढ्या मोठ्या स्केलवर फिल्म बनली. पूर्ण जगासमोर आणली... यासाठी विशेष अभिनंदन...

दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टीचाही मर्यादित वापर केला आहे. 

फक्त ज्या काही लढाया दाखवल्या त्यांचा स्क्रिनवर फक्त नामोल्लेख केला असता तरी चालला असता... 


छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा शेवटचा सिन तर केवळ अप्रतिम...👌👌


किती ओपनिंग मिळाली, किती कोटी कमावले हे दुय्यम...

फिल्म संपल्यावरही लोकं बसूनच होती... हेच या चित्रपटाचं यश... 


बाकी व्यक्तिगत मत विचाराल तर "केवळ निःशब्द"


यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग ।

लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।।

ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग ।

त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।


-: मनु :- 


@highlight #chhava #vickykaushal #sambhajimaharaj #viralchallenge #films


Eaksharman

आपलं माणूस

आपलं माणूस

चंद्रशेखर गोखले यांची खास व्हॅलेन्टाईन दिनानिमित्ताने ही कथा आणि काही चारोळ्या

‘‘आजही तो केवळ आपल्यासाठी हे दिव्य करत घरात शिरला. असा वेडेपणा प्रेमात ओथंबलेला जीवच करू शकतो. त्याचा उतावळेपणा तिच्यासाठी नवा नव्हता, पण त्याचा आजचा आविष्कार तिच्यासाठी नवा होता. मला उशीर होतोय म्हणून माझ्यावर चिडायच्या ऐवजी माझं स्वागत करायला तो आतुर झाला.. आपलं माणूस कोणाच्याही सक्तीशिवाय किंवा मजबुरीशिवाय अधिक आवडणं यासारखं भाग्य नाही..’’ तिला वाटून गेलं. सुप्रसिद्ध कवी चंद्रशेखर गोखले यांची खास व्हॅलेन्टाईन दिनानिमित्ताने ही कथा आणि काही चारोळ्या..

 

तो आज घराची किल्ली न्यायची विसरला. आणि नेमका तिला आज यायला उशीर होणार होता.
बंद दाराशी जरा वैतागून बसल्यावर जरा वेळाने त्याला मनापासून आपलं घर पाठीशी उभं असल्यासारखं वाटायला लागलं. तिची वाट बघता बघता तिचा राग यायच्या ऐवजी त्याला त्या दोघांचं सवयीचं झालेलं नातं नव्यानं उमगलं..
तिचं आयुष्य पूर्णपणे त्याच्या भोवतीच फिरत होतं, आतासुद्धा ती फक्त आपलाच विचार करीत असेल, या विचारानं तो सुखावला आणि खंतावलाही, कधी कधी एकांतात आपल्याला स्वत:जवळ कबुली देणं सोपं जातं तसं त्याचं झालं. आपण तिला फार गृहीत धरतो याची त्याला नव्यानं जाणीव झाली आणि उगीचच बोच लागून राहिली..
‘लवकर ये भूक लागली आहे.’, ‘लवकर ये मला चीक चीक होतंय. घरात जाता येत नाहीए.’ असे एक-दोन मेसेज पाठवून झाले होते. आता त्यानं मेसेज केला.. ‘सावकाश ये. उगीच जिवाची तगमग करून येऊ नकोस. आठच वाजतायत..’ नेमका तो मेसेज तिला जात नव्हता.
त्याला उगाचच उत्साह आल्यासारखं झालं. इतक्या दिवसांत कधी घराभोवतीच्या बागेत तो फिरला नव्हता. साधं लक्षही द्यायला त्याला जमलं नव्हतं. ‘हौस त्याची आणि मेहनत तिची’ या तत्त्वावर ती घराभोवतीची बाग फुलली होती. अनंत, मोगरा, दहा जातीचे गुलाब आणि त्याने गावाहून आणलेला कृष्णकमळाचा वेल हे तिच्या मेहनतीनं बहरून आलेलं वैभव बघायचं तर दिवे लावणं गरजेचं होतं..
बागेत तसे दोन दिवे होते, पण ते लावायचे तर घरात जायला हवं होतं. या विचाराने तो अधिकच घरी जायला आतुर झाला.
ही आज सकाळी आपल्या आधी गेली, नाही तर ती घरी असताना किल्लीशिवाय आपण बाहेर पडलोच नसतो.. आता आल्या आल्या ती ओटय़ाशी उभी राहील, चहा करते म्हणेल. आपण घरी असतो तर चहा केला असता, निदान तिच्या वॉशसाठी गिझर तरी ऑन केला असता.. चार वर्षांत काय केलंय आपण यातलं?
‘आता शक्य नाही म्हणून पुळका आलाय..’ त्यानं परखडपणे स्वत:वरच केलेल्या आरोपानं तोच पेटून उठला. काही करून ती घरात शिरायच्या आत घरात शिरायचंच.
कसं शक्य होतं ते..
त्यानं घराला दोन प्रदक्षिणा घातल्या. आणि देवघराच्या खिडकीची व्हेंटिलेटर्स त्याला उघडी दिसली. त्या खिडकीला ग्रील नाहीये. हे लक्षात आल्यावर तो अंधारातच वर चढला. अंग तिरपं करून, हात वाकडा करून त्याने दाराचा एक बोल्ड उघडला, मग खिडकी उघडली, मग बुटांसह देवघरात प्रवेश केला म्हणून देवाची क्षमा मागितली आणि आधी जाऊन त्यानं बूट काढले. परत देवासमोर उभा राहिला. त्याला हात जोडले. ‘सॉरी’ म्हटलं. देवाचे आभार मानले. या घरानं, या देवानं आपल्याला खूप सुखात ठेवलंय या जाणिवेनं त्याला उभारी आली. त्यानं गॅस पेटवला. तोही सिलेंडर खालून बंद असताना खटपट करून डोकं चालवून तो गॅस पेटवण्यात यशस्वी झाला. त्याने दोघांचा तीन कप चहा ठेवला, कारण चहाबरोबर मस्का खारी असली की चहा जास्त लागतो इतकं त्याला माहीत झालं होतं आणि कालच ती मस्का खारी घेऊन आली होती.
इथे हा रंगात असताना ती घरापाशी पोहोचली. गल्लीच्या तोंडाशी आल्या आल्या तिला तिचं टुमदार घर दिसायचं. रिक्षातूनच तिनं नोटीस केलं. किचनचा दिवा लागलाय म्हणजे आज आपण दिवा विसरलो? कसं शक्य आहे? का हा जाऊन ताईकडून किल्ली घेऊन आला. इतक्यात तिला त्याचा मेसेज मिळाला, ‘सावकाश ये. जिवाची तगमग करत येऊ नकोस..’ क्षणभर त्या मेसेजेची दखल घेण्यात गेला.. मेसेज वाचताना तो तिला चक्क डोळ्यांसमोर बोलताना दिसला. ‘सावकाश ये’ म्हणताना त्याचा स्वर, त्याचा आविर्भाव तिला प्रत्यक्ष जाणवून गेला. त्याच्या मिठीतून सुटताना जशी तिची तारांबळ उडायची तसंच काहीसं आता झालं..
ती दाराशी आली तर मेन डोअर, सेफ्टी डोअर, दोन्ही बंद. कुलूप जसंच्या तसं. आणि घरात तर खुडबुड सुरू.. ही प्रचंड घाबरली. भोवतीचा नीरव परिसर तिच्या अंगावर आल्यासारखं तिला झालं.. हाक मारायची तरी कुणाला..आणि कोण येईल धावून? तिनं त्याला फोन केला तर लागेचना. तिनं धीर करून पोलिसांत फोन लावला. त्यांना सांगितलं, मी एकटी बाहेर उभी आहे आणि घरात कोणी तरी शिरलंय. मी सेफ आहे पण घरात कोण शिरलंय याची कल्पना नाही. तत्परतेने पोलीस आले.
..आणि पोलीस म्हणजे कोण?
जो पोलिसात आहे म्हणून तिने ज्याला नकार दिला होता, तो सावळा, दणकट अभिजित नानल.. त्याचा फोटो बघताच तिला तो आवडला होता. सावळा, भरगच्च मिश्या असलेल्या त्याच्या भुवयाही नाकाशी जुळत होत्या. हसताना त्याचा तुटका दात उघडय़ावर पडल्यासारखा दिसायचा. एका क्षणात तिने त्याला या सर्व तपशिलासह न्याहाळलं, याला नाकारलं आपण? तिने स्वत:लाच प्रश्न केला. त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. तोही तिला तसाच न्याहाळत राहिला, ती समोर असून तिला शोधत राहिला.. तिचा नकार मिळाल्यावर त्याने एकदा भेटायची इच्छाच व्यक्त केली होती, पण ती त्यालाही नाहीच म्हणाली होती. त्याही परिस्थितीत तो हलकंसं हसत म्हणाला, ‘शेवटी असे भेटणार होतो आपण.’ त्याने बरोबरच्या हवालदारांना सूचना केल्या. त्यांना पोझिशन घ्यायला सांगितलं.
..आणि तिला धीर देत म्हणाला, ‘‘तुम्ही अगदी सेफ आहात. आता दरवाजा उघडा. ज्या अर्थी आत वावरल्याचा आवाज येतोय त्या अर्थी तो बेसावध आहे. आवाजावरून तरी एकच व्यक्ती असावी, असं वाटतंय.. तुमचे मिस्टरच नसतील ना?’’ त्याने शंका व्यक्त केली.
तिने लगेच त्याचे आलेले मेसेज दाखवले. ‘ओ. के.’ म्हणत तो कारवाईला सज्ज झाला. तिने दार उघडलं. दाराचा आवाज आल्याबरोब्बर तो तसाच टॉवेलवर उघडाबंब बाहेर आला. तो ‘ढाण टॅडाण’ करायच्या बेतात असताना तिच्याबरोबर पोलीस बघून त्याचंच ‘ढाण टॅडाण’ व्हायची वेळ आली. तो गोंधळला.. पोलीस?
तीही गोंधळली, ‘‘तू तू तू घरात कसा शिरलास?’’ अभिजितही लक्ष देऊन ऐकत होता. मग त्यानेसुद्धा थॉट प्रोसेससह सगळा घटनाक्रम सांगितला. हा वेडू आहे याचा अंदाज तिला होताच, आज खात्री पटली. थोडं हसून बोलून झालं आणि तिनेही आपण अभिजितला आधीपासून ओळखत असल्याचं सांगितलं. अभिजितने हवालदारांना परत जायला सांगितलं आणि तो त्याच्या आग्रहाखातर चहासाठी थांबला.
त्याने तिला अभिजितशी बोलत बसायला सांगितलं आणि अनायसे केलेला तिसरा कप तो बाहेर घेऊन निघाला. तो जेव्हा या दोघांसमोर आला तेव्हा त्याच्या कानावर पडलं, ती अवघडून विचारत होती, ‘‘तुम्ही लग्न केलंत की नाही?’’
अभिजित हसून म्हणत होता, ‘‘आमच्याशी कोण करणार लग्न? आम्ही पडलो पोलिसातले. मुलींना वाटतं आम्ही काही कामाचे नाहीत..’’ ती उगीचच खजील झाल्यासारखी झाली.
तो चहा घेऊन आल्यावर ती काहीच व्यक्त झाली नाही. पण दोघे समोर बसल्यावर तुलना होणारच आणि तुलनेत आता तोही पूर्ण मार्काने पास झाला होता. ताई तेव्हा सांगत होती, केवळ पोलिसात आहे म्हणून नाही म्हणायचं याला काही अर्थ नाही. तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तू स्वत: विचार कर. तिने स्वत: विचार केला आणि तिला सेफ लाइफ योग्य वाटली होती. सेफ लाइफची व्याख्या तेव्हा कुठे माहीत होती. मग तिचं गप्पांतलं लक्षच उडालं. पद्धतीचे चार शब्द बोलून तो गेला आणि तिच्या जवळ बसत यानं विचारलं, ‘‘तू त्याला लग्नासंबंधी का विचारत होतीस?’’ ती चपापली, ते त्याच्या लक्षातही आलं नाही. आपल्या दोघांमध्ये कोणी येऊ शकतं याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. तो अगदी सहज होता आणि ती? ती सहज नव्हती. मुंग्यांची एका लयीत जाणारी रांग विस्कटली की पुन्हा सलग व्हायला जसा वेळ लागतो, तसं तिचं झालं. ती त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतानाच त्यानं तिच्यासमोर चहा धरला.. ‘‘काय झालं?’’ असं खुणेनच विचारलं.
ती काही बोलत नाही म्हटल्यावर तोच म्हणाला, ‘‘आपल्या उजूसाठी विचार करतेस का त्याचा?’’ उजू म्हणजे त्याची धाकटी बहीण. ‘‘पण बघ बुवा पोलिसातला आहे. उजूला चालेल का?’’
ती फणकाऱ्यात म्हणाली, ‘‘नं चालायला काय झालं, पोलिसात असला म्हणून काय झालं?’’ पुढेही ती दोन-तीन वाक्यं सलग बोलली पण मनातून याविरुद्धच बोलत होती.
कोणत्याही संदर्भाने तो आता नकोच आपल्या आयुष्यात, असं ती मनाशी घोकत राहिली. भोवती जे आहे ते आपलं आहे आणि ते किती छान आहे. ते छान तिला नेहमीपेक्षा अधिकच छान वाटायला लागलं, मग तोही अधिकच छान. नुसता छान नाही खूप जवळचा हक्काचा वाटायला लागला. हा किती विसंबून आहे माझ्यावर, याला बोलून दाखवता येत नाही, पण याचं आयुष्य पूर्ण आपल्या भोवतीच फिरत असतं.
आजही तो केवळ आपल्यासाठी हे दिव्य करत घरात शिरला. असा वेडेपणा प्रेमात ओथंबलेला जीवच करू शकतो. त्याचा उतावळेपणा तिच्यासाठी नवा नव्हता पण त्याचा आजचा आविष्कार तिच्यासाठी नवा होता. मला उशीर होतोय म्हणून माझ्यावर चिडायच्या ऐवजी माझं स्वागत करायला तो आतुर झाला. तुलना करणं स्वाभाविक आहे पण त्यानंतर आपलं माणूस आपल्याला कोणाच्याही सक्तीशिवाय किंवा मजबुरीशिवाय अधिक आवडणं यासारखं भाग्य नाही.
अतीव सुखाच्या जाणिवेने तिला हुंदकाच फुटला. त्याच्या गळ्यात पडून ती मुसमुसायला लागली आणि तो त्याच्या परीनं, त्याच्या पद्धतीनं तिची समजूत काढण्यात रमला. त्यात..बागेतले दिवे लावायचे राहून गेले..

फार थोडं अंतर असतं
तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी
पण मधे बराच वेळ जातो
येण्याचं कारण सुचण्यासाठी
लांबलचक रात्रीनंतर
येणारा दिवस चिमटीत मावणारा
त्यात माझा तोळाभर जीव
तुला पाहण्यासाठी धावणारा
तू भोवती वावरल्याचा भास
दर दोन क्षणांमागे होतो
कितीही सावध राहिलं तरी
तो क्षण दोन क्षणांमागून येतो
बघावं तेंव्हा ती..
फुलं वेचत असते
सर्वामते बघावं तेंव्हा
मला कविता सुचत असते
तुझं बघणं पुरेसं असतं
जगण्यासाठी
आणि जगणं जरुरी होऊन बसतं
केवळ तुझ्या बघण्यासाठी.
chandrashekhargokhale18@gmail.com

Friday, February 14, 2025

प्रेम

प्रेम हा विषय खरंतर ऊहापोह करण्याचा नव्हेच. शब्दांची, चर्चांची गरजच नसते या भावनेला. ‘शब्दांवाचून कळले सारे’ अशीच ही अनुभूती.  प्रेमाकडं वेगळ्या नजरेनं पाहणारा हा विशेष लेख खास आजच्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त...

सुरवातीपासून आपल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीचा पगडा आहे. अगदी ‘पडोसन’ चित्रपट गाजला आणि त्यात सायरा बानू मैत्रिणींचा मेळा सोबत घेऊन ‘मै चली मै चली’ करत सायकलवरून हुंदडली. लगेच मुलींचे गट तेव्हा ठिकठिकाणी सायकलवरून हुंदडताना दिसायला लागले होते. ‘बंदीश’मध्ये हेमा मालिनीनं पायातलं पैंजण हातात अडकवलं होतं, त्याचंही अनुकरण काही दिवस चाललं.

‘व्हॅलेंटाइन्स डे’चंही असंच. हा ‘प्रेमदिवस’ साधारणतः १९९३-९४ च्या काळात आपल्याकडं साजरा केला जाऊ लागला. मला वाटतं ‘कुछ कुछ होता है’नं हे फॅड आणलं आणि तरुणाईपेक्षा व्यापारीवर्गानं आणि मीडियानं ते टिकवलं. आपल्यावर तर काय चित्रपटांचा पगडा सुरवातीपासून होताच. ‘दिल चाहता है’मध्ये नायिका नायकाला सारखी मारत असते. त्याचंही अनुकरण बरेच दिवस इथं-तिथं भर रस्त्यात पाहायला मिळत होतं; मग व्हॅलेंटाइन्स डे हा तर खास प्रेमीजनांनी, प्रेमीजनांना वाहिलेला... मग त्याचं गारुड दिवसेंदिवस वाढेल नाहीतर काय? त्यात संस्कृती, परंपरा यांचा विचार येतच नाही. विचार करायचाच तर त्या आदिम, अलौकिक भावनेचा करू या.. जिला चित्रपटसृष्टीमुळेच काहीसं सवंग रूप आलं आहे. ही भावना म्हणजे अर्थातच प्रेम!
तुझ्यासाठी श्वास घेऊ शकत नाही
हीसुद्धा माझ्यासाठी उणीव आहे
तुझ्यावरचं प्रेम हीच फक्त
माझ्या जगण्याची जाणीव आहे...
तुला वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही
तुझ्याशिवाय आयुष्य
मी आयुष्यच धरत नाही.. 

अशी उत्कटता  ही ज्या भावनेचं सामर्थ्य आहे... ज्या भावनेत फक्त समर्पण आहे, तिला प्रदर्शनाची गरज पडावीच का? आमचे एक सर होते. आंबेकर सर. ही गोष्ट आहे साधारणतः ३५-४० पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीची. त्या काळी व्हॅलेंटाइनचं नावही फारसं कुणाला माहीत नव्हतं. त्या काळात आमचे हे सर असाच एक दिवस साजरा करायचे... ज्या दिवशी त्यांनी मुलगी बघण्याचा कार्यक्रम केला, ज्या दिवशी त्यांनी त्यांच्या ‘सौ’ला पहिल्यांदा बघितलं, तो दिवस त्यांच्यासाठी उत्सवाचा दिवस असे आणि त्या दोघांनी तो जन्मभर साजरा केला. दोघं खूप आनंदात असायचे. नवे कपडे, नवे दागिने, जे आहे त्यात ते दोघं तो दिवस आनंदात घालवायचे. सर खाऊन-पिऊन सुखी होते आणि आपल्या मनाजोगत्या जोडीदाराबरोबर आनंदीही होते...
प्रेम साजरं करता येत नाही, आनंद साजरा करता येतो आणि आनंद साजरा करायला ठराविक दिवसाचं बंधन कशाला?
तू फक्त समोर यायचा अवकाश
की माझ्यापुरता काळ सरतो
संथ, मुलायम आणि सावकाश...
असा हा क्षणाक्षणानं फुलणारा आनंद आहे. त्याचा नेमका दिवस ठरवून त्या आनंदालाही नियम घालून टाकण्यात आले आहेत! नियमानं परंपरा तयार होतात आणि पुन्हा परंपरा नियमानुसार पाळल्या जातात...परंपरा पाळल्या जातात...पद्धती पाळल्या जातात. पण खरंच, प्रेमाची अलौकिक जादू या सोपस्कारात जाणवत नाही.
तुझी सावलीसुद्धा ओळखेन
कधी तू हरवलास तर
अरे, पण मी मागे राहीनच कशी
तू माझ्यापास्नं दुरावलास तर? 
असे निरुत्तर करणारे प्रश्‍न फक्त या भावनेपोटीच पडू शकतात.
हात धरून रस्ता अडवत नाहीस
पण नजरेचा गुंताही सोडवत नाहीस
तुझं प्रत्येक स्वप्न साकार होताना पाहायचंय
अन्‌ तुझं साकार झालेलं स्वप्न बनून
कायम तुझ्या सोबत राहायचंय... 

अशी पूर्णतेकडे नेणारी भावना म्हणजे प्रेम आहे. ज्याला ही भावना उमगली, तो खरा रंगला!
आणि खरी रंगलेले गडीच मग वेडेपणा करतात.. प्रेमाचे दोन प्रकार आहेत ः वेड्यासारखं प्रेम करणं आणि प्रेमात वेडं होणं...! आणि व्हॅलेंटाइन्स डेला हे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात!

संजय दत्तनं ‘व्हॅलेंटाइन्स डे’चाच मुहूर्त साधून रिया पिल्लईशी लग्न केलं होतं. घरातून निघताना त्याला कल्पनाही नव्हती की आपण आज चतुर्भुज होऊ.. त्यानंतर तो वेगळ्या प्रकारे अनेकदा अनेक कारणांसाठी ‘चतुर्भुज’ झाला; पण त्याचं ते व्हॅलेंटाइन्स डेला चतुर्भुजं होणं हे अनोखं होतं! त्याच्याबाबतीत बहुतांश प्रतिक्रिया अशा होत्या की ‘काय हा मूर्खपणा आहे?’  

पण मी म्हणतो, ते म्हणतात ना ‘बुरा ना मानो होली है...’ तसंच या प्रेमाचंही असतं! त्या प्रेमात रंगलेले जे असतात, ते तो क्षण फार उत्कटतेनं जगत असतात. संजय-रियाचं लग्न टिकलं नाही हा भाग वेगळा; पण त्या क्षणाला त्यांनी ‘न्याय’ दिला होता! पण अशा क्षणांची अखंड मालिका म्हणजेच आयुष्य आहे...आणि ते भिरकावून देता येत नाही.. झुगारून चालत नाही. ते निभावावं लागतं आणि प्रेम बरेचदा तेच बळ देतं...

१९८० च्या दशकातली बी ग्रेडच्या चित्रपटांमधली एक नायिका होती; म्हणजे ती अजूनही आहे; पण आता ती वृद्धा आहे. तेव्हा ती नायिका होती. तिचा अशाच एका स्ट्रगल करणाऱ्या दिग्दर्शकावर जीव जडला, तेव्हा तो तिच्याकडं सोय म्हणून बघत होता आणि ती मात्र पुरती गुंतली होती. व्हायचं तेच झालं. ती गरोदर राहिली आणि हा दिग्दर्शक बिथरला.. एक से एक लव्हस्टोरी त्याच्या डोक्‍यात घोळत असताना त्याला त्याची स्वतःची लव्हस्टोरी लक्षातच येत नव्हती...!
मी तुझं व्हायचं तर
तुलाही माझं व्हायला हवं
हेही खरं की कुणाचं होऊन जाणं
मनापासून यायला हवं.. 

हे अस्सल प्रेमातलं गमक त्या दिग्दर्शकाच्या लक्षातच आलं नाही. यथावकाश त्या नायिकेनं-प्रेमिकेनं एका मुलीला जन्म दिला आणि अभिनय सोडून ती डबिंग करायला लागली. त्यात तिनं खूप नाव-पैसा कमावला. मुलीला तिनं छान सांभाळलं. दिग्दर्शकही जरा नावारूपाला आला; मग दोघं परत आमनेसामने आले. तो इतकी वर्षे बघत होता... तिनं कधीही त्याच्याबद्दल अपशब्द उच्चारला नव्हता की त्याला शिव्या-शाप दिले नव्हते. मग आपल्या लहानग्या मुलीला बघून त्यालाही पाझर फुटला असेल. त्यानं लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्या नायिकेसमोर. वाटलं की ती आता लगेच होकार देईल; पण तसं झालं नाही. तिनं जगावेगळी मागणी केली. ती म्हणाली ः ‘‘आता अजून एक बाळ दे; मग लग्न करू. नाहीतर मोठीला उगाच कॉम्प्लेक्‍स येईल!’’ तेव्हासुद्धा अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या होत्या, ‘काय मूर्ख बाई आहे!’ ही मागणी ऐकून तो दिग्दर्शकही हैराण झाला होता... मात्र, प्रेमाची हीदेखील एक छटा आहे. असते. जोडीदाराच्या भरवशावर बेफिकीर होऊन जायचं. व्हॅलेंटाइन्स डेसारखा दिवस या अशा वेड्यांनाच शोभून दिसतो! त्या दिग्दर्शकानं त्या नायिकेची-प्रेमिकेची ती अट मान्य केली. मधल्या काळात त्याचं एक ठरलेलं लग्न मोडलं होतं... तो पुन्हा मनापासून या नायिकेत-प्रेमिकेत रमायचा प्रामाणिक प्रयत्न करायला लागला आणि त्याला जाणावलं, की तसा प्रयत्न करायची गरजच नाही. आपण मनपासून हिच्यातच रमलो होतो म्हणूनच आपले सूर दुसरीकडं कुठं जुळलेच नाहीत. मग त्यांना दुसरी मुलगी झाली. मग त्यांनी लग्न केलं. आता त्या दोघांची मोठी लेक जाहिरातींमध्ये आणि मालिकांमध्ये धमाल करतेय...
सगळं तुला देऊन पुन्हा
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तू तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली.. 
अशी कृतार्थ भावना त्या दोघांना नक्कीच जाणवत असेल.

प्रेमाची सार्थकता असं कृतार्थ वाटण्यातच आहे आणि कृतार्थ असं उगीचच वाटत नाही. त्यासाठी अथांग होण्याची क्षमता असावी लागते.. माफ करा; पण हल्ली बरेचदा अशी क्षमता युगुलांमध्ये दिसून येत नाही...त्यांचे व्हॅलेंटाइन्स डेचे बेत ऐकतानासुद्धा हेच जाणवतं. जी गोष्ट निर्मळपणे व्यक्त करण्याची आहे ती गोष्ट, ती भावना ते सिद्ध करायचा अट्टहास करत असतात! पण सरसकट असं विधान करून मी मोकळा होत नाहीये..नाहीतर माझीच कविता मलाच लागू पडायची. मी एका कवितेत म्हटलंय ः
आपण नदीकाठी बसायचो
तिथे अजूनही तो खडक आहे
पण हल्ली बसणाऱ्यांचं
वागणंच जरा भडक आहे...
मित्रांनो, हा ऊहापोह न संपणारा आहे.
मुळात प्रेम हा विषय ऊहापोह करायचा विषयच नाही; पण व्हॅलेंटाइन्स डेची जादूच अशी आहे, की न चाहते हुए भी सब उस की लपेट मे आ जाते है ।
पण तरी खऱ्या प्रेमाचं खरं गमक सांगू?
आधी कळायला वेळ लागतो
मग मान्य करायला वेळ लागतो
तुला माहीत आहे? 
इथे जिंकण्यापेक्षा हरायला वेळ लागतो...

चंद्रशेखर गोखले 

Tuesday, January 21, 2025

भक्ति

तुम्ही अशा एखाद्या चमत्कारी व्यक्तीला ओळखता का.? कि.. कॅमेरा मध्ये त्यांचा फोटो टिपला असता, ते फोटोमध्ये दिसतच नसत. विशेष म्हणजे.. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या व्यक्ती, फोटोमध्ये अगदी स्पष्ट दिसत असत. आज आपण अशाच एका संत महात्म्याची ओळख करून घेणार आहोत. 

इसवीसन अठराशे साठ ते सत्तरचं दशक.. पब्लिक वर्क डिपार्टमेंट इंजीनियरिंग ऑफिस ठिकाण दानापूर.
ऑफिस मधील एक क्लार्क बाबु..  इंग्रज ऑफिसरच्या ऑफिस बाहेर थांबून विचारतात, सर मी आतमध्ये येऊ का.? आतमधुन कसलाच आवाज न आल्याने क्लार्कने त्या सगळ्या फाईली आतमध्ये जाऊन टेबलावर ठेवल्या, आणि तो गुपचूप बाहेर निघून आला. 
थोड्या वेळाने क्लार्कने साहेबांना आवाज दिला, त्यावर साहेब म्हणाले.. आज माझं कामात मन लागत नाहीये तुम्ही जाऊ शकता. क्लार्कने साहेबांना पुन्हा विचारलं तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे.? मला झेपेल असं काही काम असेल तर सांगा.

साहेब म्हणाले.. इंग्लंड वरून पत्र आलं आहे, माझी बायको भयंकर आजारी आहे. समजत नाहीये मी काय करू.? तिकडे असतो, तर किमान तिची देखभाल तरी केली असती.

क्लार्क म्हणाला.. तरीच मी विचार करत होतो, की साहेब फाईलला हात का लावत नसतील.? असू देत मी थोड्या वेळाने परत येतो.
क्लार्कशी बोलून झाल्यावर इंग्रज साहेब थोडे ताजेतावणे झाले. ऑफिसमधील सगळे बाबू या क्लार्क बाबुला.. 

" पगला बाबू म्हणत असत "

हे बाबू नेहेमी आपल्याच धुणकीत असायचे, त्यांचा चेहरा देखील सतत हसतमुख असायचा. त्यामुळे काही लोकं यांना.. " आनंदमग्न बाबू " असं देखील म्हणत, कारण ते नेहेमी आनंदात बुडालेले असत. त्यांना कसल्याच गोष्टीची चिंता नसायची.
तितक्यात ते इंग्रज अधिकारी बाहेर आले आणि म्हणाले.. आज मी कसलंच काम करणार नाही, जे काही काम असेल ते आपण उद्या पाहुयात.
साहेबांचं बोलून झाल्यावर.. क्लार्क बाबू त्यांना म्हणाले,
साहेब आपण निश्चिंत राहा.. मेमसाब अगदी ठीक झाल्या आहेत. आजच्या तारखेला त्या तुम्हाला पत्र देखील लिहीत आहेत, काही दिवसातच तुम्हाला त्यांचं पत्र मिळेल. इतकच नाही, तर तिकीट मिळाल्यावर त्या इंग्लंडहुन पुढील जहाजाने भारताकडे रवाना देखील होणार आहेत.

इकडे क्लार्क बाबू बोलत होते, तर दुसरीकडे इंग्रज अधिकारी त्यांच्याकडे पाहून मंद स्मित करत होते. साहेब म्हणाले.. तुम्ही तर असं बोलताय, जसे की तुम्ही माझ्या बायकोला भेटून आले असावेत. 
ते काहीही असो, पण.. पगला बाबू तुमच्या या बोलण्याने माझ्या मनाला भरपूर आनंद दिला आहे. ईश्वर करो आणि तुमचे बोल खरे होवोत.

पगला बाबू म्हणजेच.. " श्यामाचरण लाहिरी महाशय "

साहेबांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास केला नाही. पण त्यांना तरी काय माहित, कि मधील काळात नेमकं काय घडलं आहे.? वेळ आल्यावर ते नक्कीच चकित होणार होते.

एका महिन्यानंतर एके दिवशी इंग्रज साहेबाचा शिपाई लाहिरी महाराजांपाशी आला आणि म्हणाला, साहेबांनी तुमची आठवण काढली आहे. लाहिरी महाशय साहेबांकडे गेले.. त्यावेळी साहेब त्यांना म्हणाले, पगला बाबू तुम्ही कमालीचे व्यक्ती आहात.. तुम्ही ज्योतिषी वगैरे आहात कि काय.? तुम्ही म्हणालात ते सगळं खरं झालं.. 
लाहिरी महाराजांनी मुद्दाम वेड्याचं सोंग घेतलं आणि म्हणाले.. तुम्ही कोणत्या विषयावर बोलत आहात.?
त्यावेळी साहेब म्हणाले.. माझी बायको आता बिलकुल ठीक आहे, आणि ती भारतात यायला रवाना देखील झाली आहे. आजच तिचं पत्र माझ्या हातात पडलं, मी खरोखर खूप आनंदी आहे, माझी बायको भारतात आल्यावर मी तुमची आणि तिची भेट घडवून आणेल.

विसेक दिवसांनी.. पगला बाबू यांना साहेबाच्या घरी बोलावणं आलं. घरी गेल्यावर पगला बांबूना साहेब म्हणाले.. आतमध्ये या, हे पहा इंग्लंड वरून माझी बायको आली आहे. आणि ते बायकोला त्यांची ओळख करून देणार.. तितक्यात, त्या मॅडम त्यांना पाहून आश्चर्यचकित झाल्या..एकदम खडबडून खुर्चीवरून उठल्या आणि म्हणाल्या.. 

माय गॉड..

साहेब देखील हैराण झाले आणि म्हणाले..का, काय झालं.?
त्यावर त्या मॅडम पगला बांबूना म्हणाल्या.. तुम्ही कधी आलात.?
साहेब त्यांच्या बायकोला म्हणाले.. तू हे काय बोलत आहेस, पगला बाबू कधी आले म्हणजे काय.? 
हे सगळं घडल्यावर..मंद स्मित करत पगला बाबू तेथून गुपचूप बाहेर पडले.

त्यानंतर साहेब त्यांच्या बायकोला म्हणाले.. हा नेमका काय प्रकार आहे.? त्यावेळी त्यांची बायको बोलती झाली.. मला असं वाटतंय मी काहीतरी चमत्कार पाहत आहे. 
ज्यावेळी मी इंग्लंडमध्ये होते त्यावेळी.. एकेदिवशी हेच महाशय, माझ्या बेडशेजारी उभं राहून, माझ्या मस्तकावरून हात फिरवत होते. मला आश्चर्याचा धक्का बसला.. कि हा अपरिचित व्यक्ती माझ्या घरात आलाच कसा.?
पण दुसऱ्याच क्षणी यांनी मला अंथरुणावरून उठवत बसतं केलं, त्यावेळी अचानकपणे माझ्या शरीरातील सगळे आजार आपोआप नाहीसे झाले. मला सगळं काही अगदी अजब वाटत होतं, आणि हे महाशय मला म्हणाले.. 
बेटी तू आता अगदी ठीक झाली आहेस. आता तुला कसलाच त्रास होणार नाही,  तिकडे तुझे मिस्टर फार चिंतेत आहेत. आजच त्यांना तू पत्र लिहायला घे.. आणि ताबडतोब जाऊन भारतात जाण्यासाठी जहाजाचं एक तिकीट बुक करून घे. लवकर जा. नाहीतर साहेब नोकरी सोडून इकडे निघून येतील. येवढं बोलून मी काही विचारायच्या आत, अचानक हा माणूस त्या ठिकाणाहून अदृश्य झाला.

लाहिरी महाशयांनी त्यांच्या जीवनात असे असंख्य चमत्कार दाखवले..
लाहिरी महाशय यांचा जन्म, ३० सप्टेंबर १८२८ मध्ये, बिहार मधील घुरणी गावातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. यांच्या वडिलांचं नाव, श्री. गौरमोहन लाहिरी, आणि आईचं नाव.. मुक्तकेशी देवी असं होतं. लाहिरी महाशय यांचे आईवडील अत्यंत धार्मिक होते. त्यांच्या वडिलांचा संपूर्ण दिवस.. धार्मिक चर्चेतच निघून जात असे, तर दुसरीकडे त्यांची आई देखील फार मोठी शिवभक्त होती. रोज सकाळी शिवलिंगावर अभिषेक केल्याशिवाय त्या पाणी देखील ग्रहण करत नसत. त्यांच्या आईवडिलांनी यांचं शामाचरण नाव ठेवण्यामागे हेच कारण होतं, कि मुलाचं नाव घेताना आपल्याला मुखातून परमेश्वराचं नाव यावं. श्री शामाचरण हे लहानपणापासूनच धार्मिक विचारांचे होते, त्यांची आई जेंव्हा पूजा अर्चना करायची, त्यावेळी ते अगदी शांतपणे सगळी पूजा मन लाऊन ऐकत असत.

काही वर्षानंतर.. त्यांच्या गावात नदीला फार मोठा पूर आला, आणि नेमकं नदीकिनारीच त्यांचं घर असल्याने, त्या पुरामध्ये त्यांचं राहतं घर आणि शेत देखील वाहून गेलं. या आघाता नंतर, त्यांच्या वडिलांनी आपलं गाव सोडलं आणि ते बनारसला निघून आले.
लाहिरी महाशय यांचे वडील शिक्षित असल्याने.. त्यांनी यांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिलं. त्यांनी आपल्या मुलाला, बनारस मधील सरकारी संस्कृत शाळेत घातलं.
शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी.. बंगाली, परशियन, उर्दू, फ्रेंच आणि इंग्लिश भाषांवर आपलं प्रभुत्व सिद्ध केलं. याचबरोबर त्यांनी.. संस्कृत मधील ग्रंथाचा देखील बराच अभ्यास केला.

कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असताना.. वयाच्या अठराव्या वर्षी, बनारस येथील.. पंडित देवनारायण सान्याल वाचस्पती यांची मुलगी काशीमणी हिच्यासोबत त्यांचा विवाह जुळून आला. काही वर्षात लाहिरी महाशय यांना.. दोन मुलं आणि तीन मुली झाल्या.
वयाच्या तिसाव्या वर्षी.. लाहिरी महाशय यांना, मिलिटरी इंजिनियरिंग विभागात क्लार्कची नोकरी मिळाली. ज्यामुळे त्यांची बदली भारतातील विविध भागात होऊ लागली. सुरवातीची काही वर्ष त्यांनी बनारस येथे काम केलं. पण त्यानंतर त्यांची बदली.. हिमालय पर्वत शृंखलेच्या जवळ असणाऱ्या राणीखेत या गावात झाली. याठिकाणी ते हेडक्लार्क म्हणून रुजू झाल्याने, त्यांच्या पगारात देखील बरीच वाढ झाली होती.

एके दिवशी ते राणीखेत येथील कार्यालयात निघाले असता.. त्यावेळी त्यांच्या नावाने आवाज देऊन त्यांना कोणीतरी बोलवत होतं. त्यांनी हिमालयाच्या पाहाडावर पाहिलं असता, एक संन्यासी त्यांना बोलवत असताना दिसले. ते संन्यासी अत्यंत वेगाने त्यांच्याकडे आले.. हे संन्यासी अगदी धष्टपुष्ट असे आजाणूबाहू व्यक्ती होते. त्यांच्या शांत दृष्टीमध्ये विचित्र असं आकर्षण होतं. त्यांच्या चेहेऱ्यावर एक मधुर हास्य होतं. ते संन्यासी त्यांना म्हणाले..घाबरू नकोस शामाचरण, मला माहित होतं, कि तू याच रस्त्याने जाशील, मी तुझी वाटच पाहात होतो. आणि ते संन्यासी महाराज त्यांना घेऊन आपल्या गुफेत गेले. लाहिरी महाशय यांना आपल्या गुरुदेवांची भेट झाली, या भेटीदरम्यान गुरुदेवांनी ( बाबाजी ) त्यांना आपल्या शक्तीने निर्माण केलेल्या हिमालयातील शांग्रीला महालात क्रिया योग शिकवला, त्या जादूई महालात बऱ्याच महान संत विभूतींचं त्यांना दर्शन मिळालं. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार.. त्यांनी समस्त जणांना क्रिया योग शिकवला, आजही समस्त भारत वर्षात.. क्रिया योग केला आणि शिकवला जातो. 

लाहिरी महाशयांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात असे अनेक चमत्कार दाखवले, २६ सप्टेंबर १८९५ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या नश्वर देहाचा त्याग करून इहलोकीची यात्रा संपवली, आणि ते अनंतात विलीन झाले. 
बनारस येथे दशाश्वमेध घाटाशेजारी त्यांच्या राहत्या घरात, त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. लाहिरी महाशय आजही आपल्या कित्येक भक्तांना याची देहा दर्शन देत असतात.!!

आज लाहिरी महाशय यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे त्यांचा स्मरणार्थ हा लेख लिहावयास घेतला. 
लाहिरी महाशय यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम.!!

( लाहिरी महाशय यांच्या आज्ञेनुसार काढण्यात आलेला हा एकमेव फोटो आहे. )

©️ #PΔΠDIT_PΩTTΣR