लोकसत्ता/ १२ सप्टेंबर २०२६
------
गणपती येतहत वाजत-गाजत
- डॉ. महेश केळुसकर
---------------------------------------------------------
ढामच्याक ढामच्याक
झिनच्याक झिनच्याक
पावसाचा व्हाजाप
लागला वाजाक
हसत नाचत नि
भिजत भिजत
गणपती येतहत वाजत-गाजत....
वेताळ बांबर्डे आलं की एसटीतून उतरून रांगणा तुळसुलीपर्यंत आम्ही गणपतीला चालत जायचो. चौथी-पाचवीत होतो. चालून चालून पायांचे तुकडे पडायला यायचे. पण गणपतीची ओढ असायची. शेतवाडीतून वाट काढत डुंगलीवर पोचलो की कुकारे सुरू व्हायचे. मग दादा आजोबा खळ्यात येऊन उभे राहायचे. आम्ही दिसलो की त्यांच्या चेहऱ्यावर कष्टाळू आनंद पसरायचा. चतुर्थीच्या आधल्या दिवशी गावाकडच्या त्या गावठी घरात लगबग चाललेली असायची. व्हानशेत( माजघरात )उंच माच्यावर गणपतीचा मोकळा चौरंग ठेवलेला असायचा. वर माटवी. तिला लगडलेले आंब्याचे टाळ, कवंडाळं, रानफळं, रानफुलं आणि हरणा हवीतच. खडूच्या चुन्यानं रंगवलेल्या गणपतीमागच्या भिंतीवर रंगवलेली कमळं शोभून दिसायची.उद्या येऊन गणपती पाटावर म्हणजे चौरंगावर बसणार. तब्बल पाच दिवस. तोपर्यंत 'आवारणा' चालू. आणि आवारण्याच्या दिवशी मासे हवेतच. व्हानशेमागच्या पडवीत तीन दगडांच्या चुलीतल्या दगडावरच्या टोपात बांगडे नाहीतर सौंदाळे रटरटत असायचे. आता पाच दिवस मासे खायला मिळणार नाहीत... केवढी तपश्चर्या सारस्वतांची ! अरेरे ! हाहाहा ऽ
अंघोळी झाल्या की आम्ही गणपतीच्या शाळेकडे कूच करायचो.ओल्या गवतावर ठेवलेले काही गरंडेल (ॲटम बॉम्ब )फुस्स फूस्स करत विझून जायचे. एखादा विझता विझताच अचानक कुल्ल्यावरच फुटायचा.
गणपतीच्या शाळेत हारीनं गणपती मांडून ठेवलेले असायचे. आमचा गणपती आम्ही दुरूनच ओळखायचो. आमचा मूर्तिकार एवढा कसबी होता की गणपती आपल्याकडेच बघतोय असं प्रत्येकालाच वाटत राहायचं..पाटापुढे नारळ ठेवायचा. अगरबत्तीच्या काड्या पेटवून ठेवायच्या. जाळीचा रुमाल मूर्तीच्या मस्तकावर. मूर्तिकाराला आमचे काका विचारायचे, " काय रे किती देवचे तुका?" त्याचं दरवर्षीचं ठरावीक उत्तर- " दाजींनु , देवाचा काय कोण मोल करता ? काय ते समजान देवा ..रंगबिंग म्हाग झाले वो--" मग काका मागल्या वर्षापेक्षा दहा-वीस रुपये अधिक करून मूर्तिकाराच्या हातात पैसे ठेवायचे.' मोरयाऽ मोरयाऽ ' चा उंच आवाजातला गजर करत गणपतीचा पाट आमच्या न्हानु गड्याच्या डोकीवर चढायचा आणि घराकडे तोंड करून गणपती चालू लागायचा, आमची पोरांची दंगामस्ती बघत..
वाटेने सारखं 'मोरया मोरया' चालू . ओसरीवर पाट ठेवला की आमची आई आणि काकी बाहेर येऊन गणपतीची दृष्ट ओवाळून टाकायच्या. मग गणपती थेट चौरंगावर थोडा तिरपा करून ठेवला जायचा.प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत आमचा दम निघायचा नाही. मोदकांचा उकडीचा हळदी दरवळ घरभर पसरलेला. आम्ही सारखे स्वयंपाक घरात चकरा मारणार. पण नैवेद्य झाल्याशिवाय कुणाची हिंमत नाही व्हायची मोदक पळवण्याची. दिवस चढतोय --दुपार झाली-- अजून भटजींचा पत्ता नाही. पोटात कावळे कोकलतायत. आमचे वडील सोवळ्याचा मुगटा नेसून तयार आहेत. आला आला ..भट आला.. "चला चला चला.."
जणु काही आम्हीच उशीर लावलाय अशी भटाची घाई .मग 'केशवाय नमः माधवाय नमः 'अशा आचमनांची लगबग. अर्ध्या तासात भट पूजा आटोपायचा. तोवर दुपारचे दोन - अडीच वाजलेले असायचे. पूजेनंतर आरती. काका हार्मोनियम काढायला बघायचे. पण आम्ही त्याआधीच जोरजोरांनं टाळ बडवत ' सुखकर्ता.. दु:खहर्ता' सुरू करायचो. आरती चालू असतानाच केळीची पानं मांडली जायची. प्राणप्रतिष्ठा झालेल्या गणपतीसमोर २१ मोदकांचं केळीचं पान. 'सुखकर्ता' झालं की डायरेक्ट 'घालीन लोटांगण..'
मस्त जेवण झाल्यावर मंडळी घोंगड्या, चटया पसरून ताणून देणार आणि संध्याकाळी भजनकऱ्यांचे कुकारे ऐकू येईपर्यंत घोरत राहणार. पिकलेल्या भातरोपांचा पिवळा धमक सुगंध वाऱ्यावर येत राहायचा आणि त्या गुंगीत मी झोपेतल्या झोपेत गणपतीशी काय काय बोलत रहायचो...
अंधार पडायला लागायचा. पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांचा उजेड रानझाडांच्या फटींमधून सांडत आमच्या घराच्या दिशेनं जवळ येताना दिसायचा आणि भजनकऱ्यांच्या खांद्यावर एकमेकांना आदळणाऱ्या टाळांचे आवाज... आमचे काका भजनमंडळीचे बुवा. कारण हार्मोनियम त्यांच्या मालकीची आणि त्यांच्याशिवाय सात सुरांवरून सरसर फिरणारी दहा बोटं आणि गोड गळा उभ्या गावात कुणापाशी नव्हता. पहिलं भजन आमच्या घरी. काका पेटीवर आणि न्हानू देवळी मृदंगावर. गण, गवळण, गजर आणि भैरवी. झालं भजन ! मग कुंबयाच्या पानांच्या खोल्यांमधून (द्रोणांमधून) काळ्या वाटाण्यांची तिखट मसालेदार गरम गरम उसळ, नाहीतर गोड न्हेवऱ्या अर्थात करंज्या. हे भजन झालं की मंडळी गावातली भजनं करायला सुटायची. मी काकांच्या मागून लोंबकळत निघायचो.पहाटे चार-पाच वाजेपर्यंत भजनं घूमत राहायची. सूर्याची कोवळी किरणं अंगावर घेत घरी परतताना मध्येच पादण्याचे फटाके फुटत राहायचे. हा काळ्या वाटाण्यांच्या उसळीचा प्रताप असायचा.
दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी. माझी डोळ्यात फूल पडलेली (मोतीबिंदू झालेली) म्हातारी बाईआजी अळूची पानं पुढ्यात घेऊन गाठी वळायची. मी तिच्या पुढ्यात. आजीनं दरवर्षी मला गाठी वळण्याचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण मला ते शेवटपर्यंत जमलं नाही. अळूवड्या वेगळ्या आणि गाठी वळणं वेगळं . म्हटलं तर सोपं , पण म्हटलं तर फार अवघड काम असतं ते. आणि ऋषिपंचमीला गाठी घालून केलेली कंदमूळं खातांना चारही वेद आपणच पहिल्यांदा सांगितलेत, असा भास व्हायचा.
हुंदरबी दिवशी 'नव्याची'खीर व्हायची. पिकलेल्या भातामधून नवी केसरं ( लोंब्या )आणून नवा तांदूळ काढायचा. घिरटीवर भरडायचा आणि मग त्यावर्षीच्या नव्या तांदळाची गूळ घालून खीर करायची. शेतातल्या उंदरांना नेऊन ठेवायची. उंदरांनी पिकाचं नुकसान करू नये म्हणून प्रार्थना करायची. गणपतीची शपथ घालायची. श्रद्धा होती तशी दादा आजोबांसारख्या सगळ्या शेतकऱ्यांची. गणपतीचं वाहन उंदीर. तो प्रसन्न झाला तर गणपतीही प्रसन्न होणार. घरादाराचं भलं करणार .
गणपतीच्या दिवसात काकांनी कुडाळहून आणलेले फटाके शेळे ( कंडम)होऊ नयेत म्हणून चुलीच्या पेढ्यावर ठेवले जायचे आणि चुकून एखादं किटाळ फटाक्यांवर पडलं की स्वयंपाक घरात फटाक्यांच्या माळा उडत राहायच्या. म्हणून आजी, आई , काक्या आम्हा पोरांवर ओरडत राहायच्या. खूप काम करायच्या बायका चतुर्थीच्या दिवसात. सारखी सारवणं आणि रांगोळ्या.चुलीवर चहाचं पातेलं तिन्ही त्रिकाळ. काही ना काही स्वयंपाक चालूच असलेला. पूजेचं साहित्य त्यांनी जमवायचं आणि अगदी गंध पण त्यांनीच उगाळून ठेवायचं. इतकं सगळं करून रोज रात्री बायका गणपतीसमोर फुगड्या कशा घालायच्या याचं मला नवल वाटत आलं. तीन तीन तास फेर धरून त्या फुगड्या घालायच्या आणि
'यादवराया राणी रुसून कैसी गेली...' अशी गाणी म्हणत राहायच्या...
रोज संध्याकाळी आम्ही सगळी पोरं आणि कधी घरातल्या बायका वाडीतले गणपती बघायला बाहेर पडायचो. त्यावेळी टीव्ही बिव्ही काही नव्हता. एखाद्याकडे ट्रांजिस्टर लागला तर दैवी चमत्कार वाटायचा. त्याची खोप केंबळ्याची. पण मुलगा मुंबईला हॉटेलमधे वेटर , नाही तर गिरणी कामगार. त्याचं पण मुंबईत खुटुखुटु चाललेलं. पण एखादा चाकरमानी मुंबईहून चतुर्थीला गावी येताना ट्रांझिस्टर आणायचा. त्या ट्रांझिस्टरला पट्टा असायचा. तो खांद्याला अडकवून चाकरमानी गावभर फिरायचा. सगळे आश्चर्यानं चाकरमान्याचा रुबाब बघत राहायचे... बढाया ऐकत राहायचे.
पाच दिवस कधी संपायचे, कळायचं नाही. रांगणातुळसुलीहून आम्ही फोंडाघाटला आणि धाकट्या काकांची मुलं कराडला परतायची वेळ यायची. मधले काका दाजी आणि त्यांचं कुटुंब गावीच होतं. गणपती विसर्जनाचा दिवस उजाडायचा. दुपारी म्हामदा म्हणजे मावंदं ! वडे आणि वाटाण्याचा सांबारा, पाच भाज्या, रायतं, कोशिंबीर,वरण-भात- तूप.. गणपतीला पंचपक्वानांनी तृप्त करून निरोप. म्हणता- म्हणता संध्याकाळ व्हायची. सकाळपासूनच पोरं कावरी-बावरी झालेली असायची. घरातल्या बायका स्वतःचीच समजूत घालत राहायच्या. कासावीशी प्राण मन तळमळी....
उत्तरपूजा झाली की बाप्पा आसनावरून खाली उतरायचे. " मोरयाऽ मोरयाऽ मोरयाऽ.." डोळे झरू लागायचे...घरातल्या सवाष्णी गणपतीच्या हातावर दही घालायच्या. ओटीवर पाट ठेवला की पुन्हा दणक्यात आरती व्हायची. मग घराच्या दिशेनं गणपतीचं मुख ठेवून पुन्हा लवकर येण्याचं आश्वासन देत गणपती वहाळाच्या दिशेनं निघायचे. आमच्या घराशेजारीच थोडा दूर शंखनिखळ पाण्याचा वहाळ (ओहळ) होता. नितळ पाणी वाहत असलेलं. आणि तो वहाळ खोल पण होता. वाडीतले पाच दिवसांचे दहा-बारा गणपती वहाळावर एकदम यायचे. प्रत्येक पाटासमोर श्रीफळ.पाटावर निरंजन. ओल्या मातीत खोचलेल्या पेटत्या अगरबत्त्या. देवांनी जास्तीत जास्त वेळ आपल्यात रहावं म्हणून आरत्यांमागून आरत्या. पोरं माडाच्या झाडावर फुलबाजे फेकायची. फुलबाजे वरच्यावर अडकून, संध्याकाळच्या किरमिजी अंधारात झावळ्यांमधून पांढरीशुभ्र फुलं उडवत राहायचे. फार मजा यायची. फटाके वाजत राहायचे. आणि मंत्रपुष्पांजली झाली की सर्वांच्या कल्याणाचं एक लांबलचक गाऱ्हाणं कोणीतरी बुजुर्ग माणूस पहाडी आवाजात घालायचा. 'व्हय म्हाराजा' झालं की मग गणपतीच्या मूर्तींना वहाळात खोल पाण्यात नेऊन पाटांवरून अलगद सोडणारे तरणेबांड गडी, हळूहळू एक एक पाट उचलायचे. " मोरया..मोरया.." चा कल्लोळ उठायचा . सर्वांचेच डोळे भिजलेले असायचे ..त्या डोळ्यांमधल्या पाण्यात पार्थिव मूर्ती विरघळत राहायच्या......
*****************************************

0 comments:
Post a Comment