पुढे जायचे असेल तर...
१. शांत राहा.
तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृती अधिक बोलल्या पाहिजेत.
प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नसते. काही उत्तरं काळच देत असतो.
२. ज्यांच्यामुळे तुमची मनःशांती भंगते, त्यांच्यापासून दूर राहा.
प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज नसते.
काही माणसांपासून दूर जाणे म्हणजे त्यांचा पराभव नव्हे; तो आपल्या शांततेचा विजय असतो.
३. तत्त्वहीन, सवंग आणि विषाक्त लोकांशी संघर्ष करण्यात शक्ती वाया घालवू नका.
त्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी चार हात करा.
कारण परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते आणि तुम्ही ज्या ताकदीने तिच्याशी लढता, त्यानुसार तुमच्या पदरात ती यशाचे दान टाकत असते.
४. स्वतःला घडवत राहा.
तुम्ही स्वतःला घडवता, हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं.
तुमची गुणवत्ता, तुमचे कर्तृत्व आणि तुमचे चारित्र्य यांच्यापुढे स्पष्टीकरणांची गरज पडत नसते.
५. तुमच्या यशाची कहाणी स्वतः सांगत बसू नका.
ते परस्पर लोकांच्या लक्षात येऊ द्या.
नाही कळलं तरी खेद मानू नका.
कारण प्रत्येक गोष्टीचा निकाल लागण्यासाठी वेळ लागत असतो आणि काळ हा प्रत्येक कर्तृत्वाचा साक्षीदार असतो.
६. स्वतःशी प्रामाणिक राहा.
काळाच्या ओघात माणूस आपल्या बोलण्याने नव्हे, तर आपल्या कृतीतून उघड होत असतो.
म्हणून लोकांना काय वाटेल यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणाला काय उत्तर द्यायचे आहे, याचा विचार करा.
७. इतरांची प्रतिमा मलीन करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.
असे प्रयत्न अनेकदा बूमरँगसारखे परत येतात.
दुसऱ्याला खाली खेचण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला इतके उंच उभे करा की, इतरांसाठी ती दिशा ठरेल.
८. यशस्वी माणूस केवळ पदावरून ठरत नसतो.
प्रामाणिकपणे आणि नेटकेपणाने आपली सेवा बजावणारा, प्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून आपल्या अपत्यांना उच्च पदावर पोचवणारा एखाद्या कार्यालयातील एखादा शिपाई, माथाडी कामगार किंवा शेतमजूर देखील तितकाच यशस्वी माणूस असतो.
एकूण रागाला मौन द्या, हाती आलेत्या कामाला कर्म समजा, चारित्र्याला बळ द्या आणि स्वतःचं आयुष्य घडवा.
बाकीची कहाणी काळ सांगेल.
Ashok Mankar

0 comments:
Post a Comment