Friday, September 18, 2026
हनुमान चालीसा
श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।
चौपाई :
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।
कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा।।
****
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
कांधे मूंज जनेऊ साजै।
संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन।।
विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।
******
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा।।
भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।
लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।
*****
सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा।।
जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सके कहां ते।।
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।
******
तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना।।
जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।
दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।
*****
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।
आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।
भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।
****
नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।
सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै।।
*****
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।
साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता।।
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।
***
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।
अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि-भक्त कहाई।।
और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई।।
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।
*****
जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई।।
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा।।
...
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
Monday, September 14, 2026
१०० वे साहित्य संमेलन■ उत्सवप्रियतेकडून वैचारिक मंथनाकडे.■
१०० वे साहित्य संमेलन
■ उत्सवप्रियतेकडून वैचारिक मंथनाकडे.■
************************************
दिलीप देशपांडे.
जामनेर. जि.जळगांव.
८९९९५६६९१७
dilipdeshpande24@gmail.com
************************************
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऐतिहासिक प्रांगणात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बिगुल वाजला आहे. त्यासोबतच 'साहित्याचे व्यासपीठ नेमके कोणाचे आणि कशासाठी?' हा मराठी जगतातील सर्वात जुना यक्षप्रश्न पुन्हा एकदा नव्या उग्रतेने आणि अधिक तीव्रतेने समोर येतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांनी १४८ वर्षांपूर्वी १८७८ मध्ये ज्या ज्ञानसत्राचे पहिले बीज रोवले, त्या परंपरेचे आज शंभरावे पाऊल पडत आहे. हा केवळ एका आकड्याचा खेळ नाही, तर मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या आणि विचारविश्वाच्या प्रवासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. परंतु, आज या शतक महोत्सवी सोहळ्याकडे पाहताना आनंदापेक्षा चिंता आणि अभिमानापेक्षा आत्मपरीक्षणाची गरज अधिक भासत आहे. राज्य सरकारने या ऐतिहासिक संमेलनासाठी पाच कोटी रुपयांचा अभूतपूर्व निधी मंजूर केला असून, संमेलनापूर्वी ९९ पूर्वतयारी उपक्रम, यासाठी दहा ते बारा कोटींचा निधी उपलब्ध करून दिले असल्याचे समजते.
( छोटेखानी संमेलने.) आणि १३ विद्यार्थी संमेलनांचे जंगी नियोजन सुरू आहे. काही ठिकाणी नांदी संमेलनास सुरुवात झाली आहे. पण, कोट्यवधी सुजाण मराठी वाचकांच्या मनात एकच धास्ती आहे—हा सोहळा केवळ चार दिवसांचा 'सरकारी आणि राजकीय भपका' ठरणार की मराठी भाषेला पुढील शंभर वर्षांची दिशा देणारे 'वैचारिक विचारपीठ' बनणार?
आज मराठी साहित्याच्या दारात राजकारणी, व्ही.आय.पी. पाहुणे आणि सत्कारमूर्तींची अवाढव्य गर्दी उभी राहिलेली दिसते! व्यासपीठावर नेत्यांची गर्दी, मंत्र्यांच्या स्वागतासाठी धावणारी आयोजकांची यंत्रणा, मिनिटा-मिनिटाला शाल-श्रीफळांचा होणारा पाऊस, तासनतास चालणारे कंटाळवाणे सत्कार सोहळे आणि या सगळ्या गदारोळात व्यासपीठाच्या एका कोपऱ्यात बिचारे मान खाली घालून बसलेले खरे साहित्यिक... हे चित्र आजवर आपण प्रत्येक साहित्य संमेलनात पाहिले आहे. मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळालेल्या या सुवर्णकाळात जर साहित्याच्या पवित्र मंदिराला राजकारणाच्या आणि उथळ सत्कार संस्कृतीच्या विळख्यातून मुक्त करता आले नाही, तर हा सोहळा म्हणजे केवळ कोरडी उत्सवप्रियता ठरेल. आज वेळ आली आहे ती एका मोठ्या बदलाची—व्यासपीठावरून राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे हद्दपार करण्याची, निरर्थक सत्कार सोहळ्यांना पूर्णविराम देण्याची आणि थेट मूळ साहित्य विषयावर सडेतोड चर्चा घडवून आणण्याची. या पार्श्वभूमीवर, शंभराव्या संमेलनाचा एकसंध आकृतिबंध कसा असावा आणि महाराष्ट्राच्या सुजाण वाचकांच्या आयोजकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, याचा वेध घेणे अत्यंत गरजेचे आहे.
राजकीय हस्तक्षेपाची सावली विरुद्ध स्वायत्त साहित्य विश्वाचा हुंकार अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दशतकांत मराठी साहित्य संमेलनांना लागलेले सर्वात मोठे गालबोट म्हणजे राजकीय नेत्यांचा वाढता हस्तक्षेप आणि व्यासपीठांवरील त्यांचे वर्चस्व. उद्घाटनापासून ते समारोपा पर्यंत राजकीय नेत्यांची उठबस, त्यांच्या अवतीभोवती फिरणारी सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या स्वागतासाठी होणारी चढाओढ यात मूळ साहित्य आणि साहित्यिक बाजूला फेकले जातात.
वर्ध्याच्या साहित्य संमेलनात तर संमेलनाच्या अध्यक्षांना व्यासपीठापर्यंत जाण्याला अडवले गेले होते.अशी परिस्थिती का निर्माण व्हावी.?
लोकशाहीत राजकारण अपरिहार्य असले, तरी साहित्याच्या स्वायत्त व्यासपीठावर राजकारण्यांनी केवळ 'अतिथी' म्हणून यावे, 'यजमान' म्हणून नव्हे. जेव्हा एखादे साहित्य संमेलन राजकीय नेत्यांच्या अजेंड्यानुसार चालते, तेव्हा साहित्यातील मुक्त अभिव्यक्तीला आपोआपच मर्यादा येतात. लेखकाने समाजातील विसंगतींवर, सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर आणि सामाजिक अन्यायावर बोट ठेवणे अपेक्षित असते. परंतु, जर संमेलनाची दोरीच राजकीय नेत्यांच्या हाती असेल, तर तिथून सडेतोड वैचारिक मंथन कसे होणार? शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने ही राजकारणाची सावली साहित्यावरून दूर व्हायला हवी. नेत्यांना व्यासपीठावर स्थान देण्याऐवजी त्यांना समोरील प्रेक्षकगृहात मानाचे स्थान द्यावे, आणि राजकीय नेत्यांनी रसिक म्हणून साहित्य संमेलनात कार्यक्रमाचा मोकळेपणाने आस्वाद घ्यावा. व्यासपीठ केवळ आणि केवळ सरस्वतीच्या उपासकांसाठी राखीव ठेवण्याचे धाडस पुण्यात आयोजकांनी दाखवले पाहिजे. तरच या शतक महोत्सवाचे नाविन्य दिसून येईल.
सत्कार सोहळ्यांचा अतिरेक त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. साहित्य संमेलनांचे आणखी एक विदारक रूप म्हणजे मिनिटा-मिनिटाला होणारे सत्कार आणि शाल-श्रीफळांचा सुळसुळाट. प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला स्वागत, परिचय, सत्कार आणि आभार प्रदर्शनातच अर्ध्याहून अधिक वेळ निघून जातो. ज्या मुख्य विषयावर चर्चा होणे अपेक्षित असते, त्यासाठी वक्त्यांना शेवटी केवळ पाच ते सात मिनिटे दिली जातात. 'वेळेअभावी घाई करावी लागत आहे' हे वाक्य प्रत्येक साहित्य संमेलनात पालुपदासारखे ऐकायला मिळते.हे साहित्य संमेलन आहे का सत्कार संमेलन ? हा प्रश्न पडावा. शंभराव्या संमेलनात ही 'सत्कार संस्कृती' पूर्णपणे मोडीत काढण्याची गरज आहे. व्यासपीठावर या औपचारिकतेचा अतिरेक टाळून तो मौल्यवान वेळ लेखकांच्या वाचनासाठी, कवींच्या कवितांसाठी आणि वक्त्यांच्या विचार मांडण्यासाठी वापरला गेला पाहिजे. वाचकांना नेत्यांचे किंवा आयोजकांचे चेहरे पाहण्यात रस नसतो, त्यांना लेखकांचे विचार ऐकायचे असतात, हे भान आता तरी ठेवले पाहिजे.
संमेलनात विद्यार्थी अन् युवकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. १०० व्या संमेलनाचे सर्वात मोठे बलस्थान ठरले पाहिजे ते म्हणजे तरुण पिढी. आजवरची संमेलने ही ज्येष्ठ नागरिकांचे किंवा निवृत्तांचे मेळावे वाटत आली आहेत. हे चित्र बदलण्याची सुवर्णसंधी पुण्यात उपलब्ध आहे, कारण पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि लाखो तरुणांचे आश्रयस्थान आहे. संमेलनाचे केवळ १३ औपचारिक विद्यार्थी सोहळे करून भागणार नाही, तर मुख्य संमेलनात तरुणांना निर्णायक वाटा द्यावा लागेल. आजचा युवक हा तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तो सोशल मीडिया, पॉडकास्ट, ब्लॉग आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून स्वतःचे साहित्यविश्व उभे करत आहे. या लिहित्या हातांना मुख्य व्यासपीठावर जागा मिळाली पाहिजे. जोपर्यंत कॉलेजचे कट्टे, विद्यापीठांचे कव्हरेज आणि तरुणांची ऊर्जा या संमेलनाला जोडली जात नाही, तोपर्यंत साहित्याचा प्रवाह जिवंत राहू शकत नाही.
मराठी केवळ संवादाची नव्हे, 'ज्ञानभाषा' होणे ही काळाची गरज आहे.मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळाला, हे अत्यंत भूषणावह आहे. परंतु, केवळ अभिजाततेचा टेंभा मिरवून भाषा टिकत नसते. मराठी ही आता 'ज्ञानभाषा' झाली पाहिजे, हा या १०० व्या संमेलनाचा मुख्य अजेंडा असायला हवा. ज्ञानभाषा म्हणजे काय? तर विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा आणि अर्थशास्त्र यांसारख्या आधुनिक क्षेत्रातील उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध झाले पाहिजे. आज मराठी माणूस घरात मराठी बोलतो, पण व्यवहारात आणि नोकरीत त्याला इंग्रजीचाच आश्रय घ्यावा लागतो. जोपर्यंत जागतिक स्तरावरील उच्च ज्ञान मराठीत अनुवादित होत नाही आणि मराठी ही रोजगाराची, अर्थार्जनाची भाषा बनत नाही, तोपर्यंत भाषा समृद्ध होणार नाही. संमेलनात या विषयावर केवळ भावनिक भाषणे न होता, विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची आणि तज्ज्ञांची एक विशेष कार्यशाळा घेऊन 'मराठी ज्ञानभाषा' करण्याचा ठोस कृती आराखडा जाहीर केला पाहिजे.प्रकाशकांना दालनासाठी कमी दर आकारणी करायला हवी. वाचनसंस्कृती कोणत्याही साहित्य संमेलनाचा खरा आत्मा आहे. तिथले 'ग्रंथ प्रदर्शन' किंवा पुस्तकांची दालने यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने, गेल्या काही वर्षांत ग्रंथदालनांचे भाडे इतके गगनाला भिडले आहे की, छोट्या आणि प्रामाणिक प्रकाशकांना संमेलनात स्टॉल लावणे अशक्य झाले आहे. अशा वेळी केवळ व्यावसायिक आणि बडे प्रकाशकच तिथे तग धरू शकतात. शंभराव्या संमेलनात ही चूक सुधारली पाहिजे. राज्य सरकारने दिलेल्या ५ कोटींच्या निधीचा वापर करून, प्रकाशकांना अत्यंत नाममात्र किंवा कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून दिले पाहिजेत. प्रकाशकांवरील आर्थिक बोजा कमी झाला, तरच ते वाचकांना मोठ्या सवलतीत पुस्तके देऊ शकतील. पुस्तके स्वस्त मिळाली, तरच सामान्य वाचक, गरीब विद्यार्थी ती खरेदी करतील. संमेलनाचा मंडप किती चकचकीत आहे यापेक्षा, ग्रंथदालनात पुस्तकांचा किती सुकाळ आहे आणि तिथे किती पुस्तकांची विक्री झाली, यावर संमेलनाचे यश मोजले गेले पाहिजे.
एकाच वेळी अनेक कार्यक्रमा मुळे रसिकांची कोंडी आणि नियोजनाचा बोजवारा साहित्य संमेलनांमधील नियोजनाचा आणखी एक मोठा त्रुटीयुक्त पैलू म्हणजे 'समांतर सत्रे' किंवा एकाच वेळी अनेक कार्यक्रम असणे. मुख्य व्यासपीठावर परिसंवाद सुरू असतो, त्याच वेळी दुसऱ्या हॉलमध्ये कथाकथन चालू असते आणि तिसऱ्या बाजूला कविकट्टा सुरू असतो. यामुळे संमेलनाला येणाऱ्या रसिकांची मोठी कोंडी होते. एखाद्या वाचकाला समकालीन कादंबरीवरची चर्चाही ऐकायची असते आणि कवींच्या कविताही ऐकायच्या असतात. मात्र, एकाच वेळी अनेक कार्यक्रम असल्यामुळे त्याला एकाच गोष्टीची निवड करावी लागते. परिणामी, रसिकांची विभागणी होते आणि गर्दी विखुरली जाते. शंभराव्या संमेलनात अशा समांतर सत्रांची संख्या मर्यादित ठेवून, प्रमुख कार्यक्रमांचे वेळापत्रक एकसंध आणि रसिकस्नेही पद्धतीने आखले पाहिजे.प्रतिसाद नसलेल्या कार्यक्रमांचा विचार व्हायला हवा.( 'काव्य कट्ट्या'चे उदाहरण ) नियोजनाचा थेट परिणाम काही विशिष्ट कार्यक्रमांवर होतो. उदाहरणार्थ, संमेलनातील 'काव्य कट्टा' किंवा काही दुय्यम परिसंवाद अशा ठिकाणी रसिकांचा प्रतिसाद अत्यंत नगण्य असतो किंवा अनेकदा तिथे शुकशुकाट पाहायला मिळतो. मुख्य व्यासपीठावरील व्ही.आय.पी. गर्दी किंवा समांतर सुरू असलेल्या प्रसिद्ध कार्यक्रमांमुळे या कट्ट्यांकडे रसिक फिरकतच नाहीत. केवळ कार्यक्रम पत्रिकेत नाव हवे किंवा काही कवींची सोय लावायची आहे, म्हणून असे कार्यक्रम रेटणे बंद केले पाहिजे. ज्या कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद नाही, त्याविषयी आयोजकांनी गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. अशा सत्रांचे स्वरूप बदलावे, त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडावे किंवा त्यांचे वेळेचे नियोजन बदलावे. दर्जा नसलेल्या आणि श्रोते नसलेल्या कार्यक्रमांवर वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा, कार्यक्रमांची संख्या कमी करून त्यांची गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला पाहिजे. काही साहित्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संमेलनाचे अध्यक्षांना संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवितांना विचारात घेतले जायला हवे. कारण माजी संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, पत्रिका समोर आल्यानंतरच मला काय कार्यक्रम आहे हे समजले. पत्रिका तयार करताना माझे मत विचारात घेतले नव्हते.
चार दिवसांचा हा ऐतिहासिक सोहळा संपल्यानंतर जेव्हा संमेलनाची सांगता होईल, तेव्हा मराठी माणसाच्या हातात काय उरले असेल? केवळ काही गाजलेल्या भाषणांच्या क्लिप्स, मंत्र्यांचे फोटो, जेवणाची स्तुती आणि व्ही.आय.पी. पाहुण्यांचे व्हीडिओ? का मराठी भाषेच्या समृद्धीचा, तिला ज्ञानभाषा करण्याचा आणि तिच्या डिजिटलायझेशनचा एक ठोस कृती आराखडा? १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा केवळ एक उत्सव नाही, तर ती एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. हे संमेलन राजकीय कुरघोडीचे मैदान बनू नये, तर वैचारिक देवाणघेवाणीचे पवित्र मंदिर बनावे. मोठ्या प्रमाणावर होणारे सत्कार टाळून, राजकीय नेत्यांचा वाढता हस्तक्षेप नाकारून, तरुणांना सोबत घेऊन आणि प्रकाशकांना बळ देऊन जेव्हा केवळ साहित्यावर, पुस्तकांवर आणि भाषेवर सखोल चर्चा होईल, तेव्हाच या शंभराव्या संमेलनाचे सार्थक होईल. पुण्याला होणारे शतक महोत्सवी साहित्य संमेलनाकडून कडून वाचकांच्या रसिकांच्या अनेक अपेक्षा आहे. त्या पूर्ण होतील अशी आशा बाळगू या.
पुण्याच्या विद्यापीठातील हे शतक महोत्सवी साहित्य संमेलन मराठी भाषेला पुढील शंभर वर्षांची ऊर्जा देणारे ठरो, हीच संपूर्ण मराठी जगताची आणि सुजाण वाचकांची आग्रही अपेक्षा आहे!
■■
Saturday, September 12, 2026
गणपती येतहत वाजत गाजत
लोकसत्ता/ १२ सप्टेंबर २०२६
------
गणपती येतहत वाजत-गाजत
- डॉ. महेश केळुसकर
---------------------------------------------------------
ढामच्याक ढामच्याक
झिनच्याक झिनच्याक
पावसाचा व्हाजाप
लागला वाजाक
हसत नाचत नि
भिजत भिजत
गणपती येतहत वाजत-गाजत....
वेताळ बांबर्डे आलं की एसटीतून उतरून रांगणा तुळसुलीपर्यंत आम्ही गणपतीला चालत जायचो. चौथी-पाचवीत होतो. चालून चालून पायांचे तुकडे पडायला यायचे. पण गणपतीची ओढ असायची. शेतवाडीतून वाट काढत डुंगलीवर पोचलो की कुकारे सुरू व्हायचे. मग दादा आजोबा खळ्यात येऊन उभे राहायचे. आम्ही दिसलो की त्यांच्या चेहऱ्यावर कष्टाळू आनंद पसरायचा. चतुर्थीच्या आधल्या दिवशी गावाकडच्या त्या गावठी घरात लगबग चाललेली असायची. व्हानशेत( माजघरात )उंच माच्यावर गणपतीचा मोकळा चौरंग ठेवलेला असायचा. वर माटवी. तिला लगडलेले आंब्याचे टाळ, कवंडाळं, रानफळं, रानफुलं आणि हरणा हवीतच. खडूच्या चुन्यानं रंगवलेल्या गणपतीमागच्या भिंतीवर रंगवलेली कमळं शोभून दिसायची.उद्या येऊन गणपती पाटावर म्हणजे चौरंगावर बसणार. तब्बल पाच दिवस. तोपर्यंत 'आवारणा' चालू. आणि आवारण्याच्या दिवशी मासे हवेतच. व्हानशेमागच्या पडवीत तीन दगडांच्या चुलीतल्या दगडावरच्या टोपात बांगडे नाहीतर सौंदाळे रटरटत असायचे. आता पाच दिवस मासे खायला मिळणार नाहीत... केवढी तपश्चर्या सारस्वतांची ! अरेरे ! हाहाहा ऽ
अंघोळी झाल्या की आम्ही गणपतीच्या शाळेकडे कूच करायचो.ओल्या गवतावर ठेवलेले काही गरंडेल (ॲटम बॉम्ब )फुस्स फूस्स करत विझून जायचे. एखादा विझता विझताच अचानक कुल्ल्यावरच फुटायचा.
गणपतीच्या शाळेत हारीनं गणपती मांडून ठेवलेले असायचे. आमचा गणपती आम्ही दुरूनच ओळखायचो. आमचा मूर्तिकार एवढा कसबी होता की गणपती आपल्याकडेच बघतोय असं प्रत्येकालाच वाटत राहायचं..पाटापुढे नारळ ठेवायचा. अगरबत्तीच्या काड्या पेटवून ठेवायच्या. जाळीचा रुमाल मूर्तीच्या मस्तकावर. मूर्तिकाराला आमचे काका विचारायचे, " काय रे किती देवचे तुका?" त्याचं दरवर्षीचं ठरावीक उत्तर- " दाजींनु , देवाचा काय कोण मोल करता ? काय ते समजान देवा ..रंगबिंग म्हाग झाले वो--" मग काका मागल्या वर्षापेक्षा दहा-वीस रुपये अधिक करून मूर्तिकाराच्या हातात पैसे ठेवायचे.' मोरयाऽ मोरयाऽ ' चा उंच आवाजातला गजर करत गणपतीचा पाट आमच्या न्हानु गड्याच्या डोकीवर चढायचा आणि घराकडे तोंड करून गणपती चालू लागायचा, आमची पोरांची दंगामस्ती बघत..
वाटेने सारखं 'मोरया मोरया' चालू . ओसरीवर पाट ठेवला की आमची आई आणि काकी बाहेर येऊन गणपतीची दृष्ट ओवाळून टाकायच्या. मग गणपती थेट चौरंगावर थोडा तिरपा करून ठेवला जायचा.प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत आमचा दम निघायचा नाही. मोदकांचा उकडीचा हळदी दरवळ घरभर पसरलेला. आम्ही सारखे स्वयंपाक घरात चकरा मारणार. पण नैवेद्य झाल्याशिवाय कुणाची हिंमत नाही व्हायची मोदक पळवण्याची. दिवस चढतोय --दुपार झाली-- अजून भटजींचा पत्ता नाही. पोटात कावळे कोकलतायत. आमचे वडील सोवळ्याचा मुगटा नेसून तयार आहेत. आला आला ..भट आला.. "चला चला चला.."
जणु काही आम्हीच उशीर लावलाय अशी भटाची घाई .मग 'केशवाय नमः माधवाय नमः 'अशा आचमनांची लगबग. अर्ध्या तासात भट पूजा आटोपायचा. तोवर दुपारचे दोन - अडीच वाजलेले असायचे. पूजेनंतर आरती. काका हार्मोनियम काढायला बघायचे. पण आम्ही त्याआधीच जोरजोरांनं टाळ बडवत ' सुखकर्ता.. दु:खहर्ता' सुरू करायचो. आरती चालू असतानाच केळीची पानं मांडली जायची. प्राणप्रतिष्ठा झालेल्या गणपतीसमोर २१ मोदकांचं केळीचं पान. 'सुखकर्ता' झालं की डायरेक्ट 'घालीन लोटांगण..'
मस्त जेवण झाल्यावर मंडळी घोंगड्या, चटया पसरून ताणून देणार आणि संध्याकाळी भजनकऱ्यांचे कुकारे ऐकू येईपर्यंत घोरत राहणार. पिकलेल्या भातरोपांचा पिवळा धमक सुगंध वाऱ्यावर येत राहायचा आणि त्या गुंगीत मी झोपेतल्या झोपेत गणपतीशी काय काय बोलत रहायचो...
अंधार पडायला लागायचा. पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांचा उजेड रानझाडांच्या फटींमधून सांडत आमच्या घराच्या दिशेनं जवळ येताना दिसायचा आणि भजनकऱ्यांच्या खांद्यावर एकमेकांना आदळणाऱ्या टाळांचे आवाज... आमचे काका भजनमंडळीचे बुवा. कारण हार्मोनियम त्यांच्या मालकीची आणि त्यांच्याशिवाय सात सुरांवरून सरसर फिरणारी दहा बोटं आणि गोड गळा उभ्या गावात कुणापाशी नव्हता. पहिलं भजन आमच्या घरी. काका पेटीवर आणि न्हानू देवळी मृदंगावर. गण, गवळण, गजर आणि भैरवी. झालं भजन ! मग कुंबयाच्या पानांच्या खोल्यांमधून (द्रोणांमधून) काळ्या वाटाण्यांची तिखट मसालेदार गरम गरम उसळ, नाहीतर गोड न्हेवऱ्या अर्थात करंज्या. हे भजन झालं की मंडळी गावातली भजनं करायला सुटायची. मी काकांच्या मागून लोंबकळत निघायचो.पहाटे चार-पाच वाजेपर्यंत भजनं घूमत राहायची. सूर्याची कोवळी किरणं अंगावर घेत घरी परतताना मध्येच पादण्याचे फटाके फुटत राहायचे. हा काळ्या वाटाण्यांच्या उसळीचा प्रताप असायचा.
दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी. माझी डोळ्यात फूल पडलेली (मोतीबिंदू झालेली) म्हातारी बाईआजी अळूची पानं पुढ्यात घेऊन गाठी वळायची. मी तिच्या पुढ्यात. आजीनं दरवर्षी मला गाठी वळण्याचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण मला ते शेवटपर्यंत जमलं नाही. अळूवड्या वेगळ्या आणि गाठी वळणं वेगळं . म्हटलं तर सोपं , पण म्हटलं तर फार अवघड काम असतं ते. आणि ऋषिपंचमीला गाठी घालून केलेली कंदमूळं खातांना चारही वेद आपणच पहिल्यांदा सांगितलेत, असा भास व्हायचा.
हुंदरबी दिवशी 'नव्याची'खीर व्हायची. पिकलेल्या भातामधून नवी केसरं ( लोंब्या )आणून नवा तांदूळ काढायचा. घिरटीवर भरडायचा आणि मग त्यावर्षीच्या नव्या तांदळाची गूळ घालून खीर करायची. शेतातल्या उंदरांना नेऊन ठेवायची. उंदरांनी पिकाचं नुकसान करू नये म्हणून प्रार्थना करायची. गणपतीची शपथ घालायची. श्रद्धा होती तशी दादा आजोबांसारख्या सगळ्या शेतकऱ्यांची. गणपतीचं वाहन उंदीर. तो प्रसन्न झाला तर गणपतीही प्रसन्न होणार. घरादाराचं भलं करणार .
गणपतीच्या दिवसात काकांनी कुडाळहून आणलेले फटाके शेळे ( कंडम)होऊ नयेत म्हणून चुलीच्या पेढ्यावर ठेवले जायचे आणि चुकून एखादं किटाळ फटाक्यांवर पडलं की स्वयंपाक घरात फटाक्यांच्या माळा उडत राहायच्या. म्हणून आजी, आई , काक्या आम्हा पोरांवर ओरडत राहायच्या. खूप काम करायच्या बायका चतुर्थीच्या दिवसात. सारखी सारवणं आणि रांगोळ्या.चुलीवर चहाचं पातेलं तिन्ही त्रिकाळ. काही ना काही स्वयंपाक चालूच असलेला. पूजेचं साहित्य त्यांनी जमवायचं आणि अगदी गंध पण त्यांनीच उगाळून ठेवायचं. इतकं सगळं करून रोज रात्री बायका गणपतीसमोर फुगड्या कशा घालायच्या याचं मला नवल वाटत आलं. तीन तीन तास फेर धरून त्या फुगड्या घालायच्या आणि
'यादवराया राणी रुसून कैसी गेली...' अशी गाणी म्हणत राहायच्या...
रोज संध्याकाळी आम्ही सगळी पोरं आणि कधी घरातल्या बायका वाडीतले गणपती बघायला बाहेर पडायचो. त्यावेळी टीव्ही बिव्ही काही नव्हता. एखाद्याकडे ट्रांजिस्टर लागला तर दैवी चमत्कार वाटायचा. त्याची खोप केंबळ्याची. पण मुलगा मुंबईला हॉटेलमधे वेटर , नाही तर गिरणी कामगार. त्याचं पण मुंबईत खुटुखुटु चाललेलं. पण एखादा चाकरमानी मुंबईहून चतुर्थीला गावी येताना ट्रांझिस्टर आणायचा. त्या ट्रांझिस्टरला पट्टा असायचा. तो खांद्याला अडकवून चाकरमानी गावभर फिरायचा. सगळे आश्चर्यानं चाकरमान्याचा रुबाब बघत राहायचे... बढाया ऐकत राहायचे.
पाच दिवस कधी संपायचे, कळायचं नाही. रांगणातुळसुलीहून आम्ही फोंडाघाटला आणि धाकट्या काकांची मुलं कराडला परतायची वेळ यायची. मधले काका दाजी आणि त्यांचं कुटुंब गावीच होतं. गणपती विसर्जनाचा दिवस उजाडायचा. दुपारी म्हामदा म्हणजे मावंदं ! वडे आणि वाटाण्याचा सांबारा, पाच भाज्या, रायतं, कोशिंबीर,वरण-भात- तूप.. गणपतीला पंचपक्वानांनी तृप्त करून निरोप. म्हणता- म्हणता संध्याकाळ व्हायची. सकाळपासूनच पोरं कावरी-बावरी झालेली असायची. घरातल्या बायका स्वतःचीच समजूत घालत राहायच्या. कासावीशी प्राण मन तळमळी....
उत्तरपूजा झाली की बाप्पा आसनावरून खाली उतरायचे. " मोरयाऽ मोरयाऽ मोरयाऽ.." डोळे झरू लागायचे...घरातल्या सवाष्णी गणपतीच्या हातावर दही घालायच्या. ओटीवर पाट ठेवला की पुन्हा दणक्यात आरती व्हायची. मग घराच्या दिशेनं गणपतीचं मुख ठेवून पुन्हा लवकर येण्याचं आश्वासन देत गणपती वहाळाच्या दिशेनं निघायचे. आमच्या घराशेजारीच थोडा दूर शंखनिखळ पाण्याचा वहाळ (ओहळ) होता. नितळ पाणी वाहत असलेलं. आणि तो वहाळ खोल पण होता. वाडीतले पाच दिवसांचे दहा-बारा गणपती वहाळावर एकदम यायचे. प्रत्येक पाटासमोर श्रीफळ.पाटावर निरंजन. ओल्या मातीत खोचलेल्या पेटत्या अगरबत्त्या. देवांनी जास्तीत जास्त वेळ आपल्यात रहावं म्हणून आरत्यांमागून आरत्या. पोरं माडाच्या झाडावर फुलबाजे फेकायची. फुलबाजे वरच्यावर अडकून, संध्याकाळच्या किरमिजी अंधारात झावळ्यांमधून पांढरीशुभ्र फुलं उडवत राहायचे. फार मजा यायची. फटाके वाजत राहायचे. आणि मंत्रपुष्पांजली झाली की सर्वांच्या कल्याणाचं एक लांबलचक गाऱ्हाणं कोणीतरी बुजुर्ग माणूस पहाडी आवाजात घालायचा. 'व्हय म्हाराजा' झालं की मग गणपतीच्या मूर्तींना वहाळात खोल पाण्यात नेऊन पाटांवरून अलगद सोडणारे तरणेबांड गडी, हळूहळू एक एक पाट उचलायचे. " मोरया..मोरया.." चा कल्लोळ उठायचा . सर्वांचेच डोळे भिजलेले असायचे ..त्या डोळ्यांमधल्या पाण्यात पार्थिव मूर्ती विरघळत राहायच्या......
*****************************************
Tuesday, September 8, 2026
Thursday, September 3, 2026
साहित्य - संस्कृती डॉ.महेश केळुसकर
पुढारी/ रविवार विशेष / ३० ऑगस्ट २०२६
--
साहित्य - संस्कृती/ डॉ.महेश केळुसकर
------------------
कोकण साहित्यरत्न प्र.श्री.
****************************
पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानातील आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या नेरूर या गावी १४ फेब्रुवारी १९२२ रोजी प्रभाकर श्रीधर नेरुरकर उर्फ 'प्रश्री' यांचा जन्म झाला आणि २८ जून १९९८ रोजी ते परलोकवासी झाले. ७६ वर्षांच्या आपल्या आयुष्य प्रवासामध्ये प्रश्रींचा प्रत्येक श्वास आणि ध्यास फक्त कोकण आणि कोकणच होता. सिंधुदुर्गात,'रत्नागिरीत आणि मुंबईत त्यांच्या-माझ्या अनेक गाठीभेटी झाल्या, साहित्य चर्चा झाल्या, त्यातून मला हे कळलं की प्रश्री हे कोकणच्या साहित्य आणि संस्कृतीशी कायमची नाळ जोडून असलेले आणि नवीन लेखक- कवींना सतत उमेद आणि प्रोत्साहन देणारे मोठे साहित्यिक आहेत.
' मुलांचे मासिक', 'बालसन्मित्र', ' सुमनोद्यान', आदी नियतकालिकांमधून शालेय जीवनापासून प्रश्रींचं लेखन प्रसिद्ध होऊ लागलं. पुढे ते कथा लिहू लागले आणि त्या 'धनुर्धारी', ' हंस ', 'वसंत' मधून प्रसिद्ध होऊ लागल्या. मराठी आणि इंग्रजी भाषांमधून त्यांनी मुक्त पत्रकारिता केली. सु. पाच दशकं सातत्यानं मराठी आणि इंग्रजी नियतलकालिकांमधून त्यांचं समीक्षा लेखन गाजत राहिलं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि गोमंतक मुक्ती लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. साहित्यिकांच्या आणि विचारवंतांच्या अर्थपूर्ण मुलाखती घेण्याचा आगळावेगळा प्रयोग त्यांनी अनेक वर्षे केला. आपलं सुरुवातीचं ललित लेखन 'मौज' सारख्या प्रतिष्ठित साप्ताहिककातून येण्यावर त्यांनी कटाक्ष ठेवला. आचार्य अत्रे संपादित 'दैनिक मराठा'चे गोवा सरहद्दीवरील अधिकृत वार्ताहर म्हणून त्यांनी गोमंतक मुक्ती संग्राम काळात काम केलं. नवी दिल्ली येथील 'सेंचुरी' या इंग्रजी साप्ताहिकात प्रश्रीनी मराठी साहित्य व साहित्य प्रकारांवर दहा वर्ष इंग्रजीतून लेखन केलं. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा 'सेंचुरी','लोटस' , 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि अन्य परदेशी नियतकालिकांमधून इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. प्रगत व दलित साहित्य चळवळीमध्ये मराठी साहित्य क्षेत्रातील १९६०ते १९८० पर्यंतच्या वाटचालीत त्यांचा प्रमुख सहभाग होता.
विविध विषयांमध्ये रुची असलेल्या प्रश्रींनी १९६७ साली, महाराष्ट्राचे सर्कस महर्षी नारायणराव वालावलकर यांच्या 'दि ग्रेट रॉयल सर्कस' बरोबर पूर्व आफ्रिका आणि मॉरिशस बेटावर मुक्काम केला होता. मॉरिशस बेटावरील भारतीय जीवनावर आणि विशेषतः तिथे दीडशे वर्ष स्थायिक झालेल्या मराठी समाजाचा आणि तिथल्या प्रचलित 'मोरस' मराठी भाषेचा संशोधन पूर्व समग्र शोध घेणारं लेखन प्रश्रींनी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी आणि कुडाळी लोकबोलीतील लोकसाहित्यावर संशोधन आणि कोकणी लोकगीतांचं सभाष्य संकलन करण्यामध्ये प्रश्रींनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचा 'कोकणी लोकगीते' हा ग्रंथ प्रकाशित केला. प्रश्रींची आणखी एक महत्त्वाची सांस्कृतिक कामगिरी म्हणजे अमेरिकेतील व आफ्रिकेतील ब्लॅक कवी आणि लेखकांच्या वाङ्मयाचा व्यापक अभ्यास तसंच 'Black Verse ' (काळी कविता) चा मराठीत विपुल अनुवाद. व्हिएतनामचे अध्यक्ष हो ची मिन्ह यांच्या इंग्रजी कवितांचा तसंच पाब्लो नेरूदाच्या कवितांचा त्यांनी केलेला मराठी अनुवादही गाजला.
डायरी लेखन हे सुद्धा कोणत्याही भाषेतील साहित्याचं महत्त्वाचं आणि ऐतिहासिक अंग असतं, असं प्रश्री यांचं म्हणणं होतं. ते स्वतः एक सर्जनशील 'डायरी लेखक' होते. आपल्या स्वतःच्या डायरी लेखनाबद्दल प्रश्री म्हणतात की "मला असं जाणवत आलं आहे की आपल्या जीवनातील जागृतीच्या काळात , जगत आणि धडपडत असताना आपली रिकाम्या पोत्यासारखी अवस्था झालेली असते. कधी ते पोतं भरतं ,'कधी भरतच नाही. त्याला छिद्रं आणि भोकं पडलेली असतात. ते टोकाटोकांनी उसवलेलं सुद्धा असतं आणि जेवढी काही अल्प स्वल्प त्या दिवसाची कमाई त्या पोत्यात भरायला जातो, तिच्यातील बराचसा भाग गळून गेलेला असतो. अशावेळी आंतरव्यापी जाणवणारी पोकळी डायरी भरून काढू शकते की काय हे पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी मी डायरी लिहितो.खरं म्हणजे माझं डायरी लेखन हा मी केलेला एक प्रकारे आत्मगत लेखन प्रयोगच असतो. हे लेखन आत्मचिंतन, आत्म प्रकटन, आत्मशोध, आत्मपलायन आणि आत्मसंवाद असू शकतो."
कथा, कादंबरी, लघु निबंध, प्रवास वर्णन इत्यादी स्वरूपाचं विपुल लेखन केलं .आणि साहित्य हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला तरी त्यांचा खरा पिंड शिक्षकाचा होता. मुंबईत आल्यावर प्रारंभी ते छबीलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले आणि पुढे वरळीच्या जनता हायस्कूलमध्ये आले आणि तिथेच १९८० मध्ये मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. १९७८ साली शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार लाभला .
लेखक म्हणून स्वतःची जडणघडण करत असताना आणि पुढे येत असताना, प्रश्री नेरूरकर यांनी अनेक नवोदित लेखकांनाही घडवलं. दलित साहित्यातील आघाडीचे लेखक बाबुराव बागुल, दया पवार, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे आणि नव्या उमेदीनं लेखन करणारे सुरेश कदम, पांडुरंग कदम, प्रकाश आणि शंकर खरात, उर्मिला पवार इत्यादींना नेरुरकरांचं मार्गदर्शन ऋण विसरता येण्यासारखं नाही.
दुसरी नेरूळकर तेही आपले गुरुवर्य रामभाऊ बर्वे यांचं रूम विसरले नाही रामभाऊंनी आपल्यावर साहित्याचे संस्कार केले आणि पुढे लेखक म्हणून आपल्याला दिशा मिळाली अशी नोंद त्यांनी करून ठेवली आहे रामभाऊ बर्वे आपल्या विद्यार्थ्यांना विशेषतः प्रश्रींना मराठी साहित्याची नवनवी पुस्तक आणून देत असत तसंच त्यांचे शिक्षक सिताराम प्रभू वालावल गावातील नारायणाच्या देवळाजवळ टोपीवाला वाचनालयाचे ग्रंथपाल ही होते ते आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तक आणून वाचायला देत प्रतिभा साजण हे पुस्तक इंग्रजी तिसरीत असताना प्रश्न यांनी वाचलं विद्यार्थी तसेच असतानाच कश्रींनी वीस खांडेकर लक्ष्मणराव सरदेसाई विभाग कृष्ण कोल्हटकर वामन मल्हार जोशी अनंत काणेकर या आघाडीच्या लेखकांची पुस्तकं वाचली रवींद्रनाथ टागोरांची हरिभाऊ आपटे यांनी मराठीत अनुवाद दिलेली गीतांजली ही याच काळात त्यांनी वाचली हरिभाऊंच्या पण लक्षात कोण घेतो गड आला पण सिंह गेला उषःकाल या कादंबऱ्या वाचून ते झपाटून गेले आणि त्यांनी ठरवलं की आपण एक दिवस लेखक व्हायचं आणि तसे ते झाले.
*********
Wednesday, September 2, 2026
बातमी
** काव्यार्थ : एक प्रवास **
ई अक्षरमन, ठाणे तर्फे माझे ईबुक आता प्रकाशनाच्या वाटेवर. यामध्ये सामावले आहेत माझे चार कविता संग्रह. स्पंदन, जीर्ण देव्हारा, सी टी स्कॅन आणि आता अटळ आहे. या संग्रहांवर आजवर ज्या मान्यवरांनी, समीक्षकांनी, वाचक रसिकांनी लिहिले त्या एकत्रित रसास्वादाचे हे ईबुक. कवितेचा प्रवास आपणास नक्कीच आवडेल असा विश्वास आहे. तेव्हा...येत्या सहा सप्टेंबर रोजी नक्की भेटूया. तपशील लवकरच. धन्यवाद.
प्रकाशनाच्या वाटेवर
** प्रकाशनाच्या वाटेवर **
सुप्रभात मित्रांनो. कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की " काव्यार्थ: एक प्रवास " हे माझे ईबुक लवकरच प्रकाशित होणार आहे. ते आपणा पर्यंत कसे पोचेल त्याचा तपशील कळवेनच. हे माझे विसावे पुस्तक. १९९४ मध्ये प्रकाशित झालेला स्पंदन हा कविता संग्रह ते २०२१ मध्ये प्रकाशित झालेला आता अटळ आहे या कविता संग्रहापर्यंतचा प्रवास या ईबुक मध्ये सामाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये मान्यवरांचे अभिप्राय, प्रतिक्रिया, विविध वृत्तपत्रात, मासिकात प्रसिद्ध झालेली परीक्षणे, या ईबुक मध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. ही माहिती अनेक ठिकाणी विखुरलेली होती ती नीट एकत्र गुंफून त्याचा दस्तावेज बनवणे हे मेहनतीचे काम ई अक्षरमन यांनी निगुतीने केले, त्यांच्या टीमचे मनापासून आभार. लवकरच भेटू. धन्यवाद.
