Tuesday, August 25, 2026

लेख २

नवकथेच्या अध्वर्यूंशी ओळख
आजच्या तरुणांना मराठी साहित्य आणि भाषेची गोडी वाटावी यासाठी रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये गेली तीन वर्षे कोमसाप युवाशक्ती कॉलेजकट्टा घेण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रमात तरुणांना सामील करून घेतले जात आहे.
Updated: 17 Aug 2017, 4:12 am IST|Maharashtra Times

कट्टा ३३ वा. कधी ः आज गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० स्थळ : सेमिनार हॉल, रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर.

तरुणांना मराठी साहित्य आणि भाषेची गोडी वाटावी यासाठी रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये गेली तीन वर्षे कोमसाप युवाशक्ती कॉलेजकट्टा घेण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रमात तरुणांना सामील करून घेतले जात आहे.

व्हॅलेंटाइन डे विथ बुक्स, बातमीतील दुनियागिरी, आनंद यादव यांच्या साहित्यावर आधारित ‘आनंदावली’, जागर युवामनाचा, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू महाभारत.कॉम तसेच तरुणाईचे असंमेलन हे पथनाट्य, आवाजाचे तंत्र मंत्र कार्यशाळा, वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक परीक्षण, नाटकातून व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यान, कथाकथन एक तंत्र आणि मंत्र, कट्ट्यावरचा पाऊस, दिवाळी अंकातील कथांचे अभिवाचन, विधानसभा - मौज प्रकाशन भेट, मधू मंगेश कर्णिक यांच्या लेखांचे अभिवाचन अशा अनेकविध उपक्रमांमधून विविध कॉलेजांमधील विद्यार्थी या कट्ट्यात सहभागी होत आहेत. हा कट्टा दीपा ठाणेकर, निखिल मोंडकर, विवेक पिंपुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जातो. या कट्ट्याला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन आणि कॉलेज यांचे उत्तम सहकार्य लाभले आहे.

२५ ऑगस्ट हा गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिवस. साहित्यक्षेत्रात सुप्रसिद्ध लेखक गंगाधर गाडगीळ यांच्याकडे नवकथाकार म्हणून आदराने पाहिले जाते. त्याच बरोबर अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. कथा, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा , कादंबरी या साहित्य क्षेत्रात त्यांनी लीलया वावर केला. गाडगीळ यांच्या लेखनाचा आजच्या पिढीला परिचय व्हावा, यासाठी १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमधील सेमिनार हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांची आहे.

आजच्या पिढीने गाडगीळांनी केलेले विविधांगी लेखन वाचावे, यासाठी गाडगीळांच्या साहित्यकृती, आत्मचरित्र , कथा, नाटिका यांचे वाचन आणि अभिवाचन या कार्यक्रमात होणार आहे.

आजची पिढी वाचनसंस्कृती पासून दूर जात आहे, असा अनुभव ठायीठायी येत आहे. त्याची कारणे आपण सर्वांनी तपासली पाहिजेत. त्यासाठी तरुणांना जबाबदार न धरता त्यांना साहित्यात रूची निर्माण होईल, यासाठी अभिवाचन, नाट्यसादरीकरण अशा प्रभावी माध्यमांचा वापर कट्ट्याद्वारे केला जात आहे.

या कार्यक्रमाला जोड दिली आहे ती विजय मोंडकर यांच्या मुलाखतीची. विजय मोंडकर यांनी गंगाधर गाडगीळ यांच्या कथांचे ‘कथा गंगेच्या धारा’ या दूरदर्शन मालिकेत रूपांतर केले. कथांचे मालिकेत रूपांतर करताना गाडगीळांच्या साहित्याचे त्यांना जाणवलेले विविध पैलू ते या कार्यक्रमात उलगडतील. कथेचे मालिकेत रूपांतर होतानाचा प्रवास या मुलाखतीतून जाणून घेता येईल.

#संग्रहित


लेख

आज २५ ऑगस्ट. नवकथेचे प्रणेते ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिवस. काही वर्षांपूर्वी लोकमत मध्ये लिहिलेल्या त्या लेखाचे आज स्मरण. संपूर्ण लेख खाली दिला आहेच. 

"सूर्य मावळल्यावर आकाश रिकाम्या शिंपल्यासारखं दिसू लागलं, की कसं रिकामंरिकामं वाटायचं. सगळं काही हरवल्यासारखं वाटायचं. 
माड डुलले की आपली मनंही डुलायची. एखादा मेघ एकाकीपणे आकाशातून तरंगत गेला, की आपणही दूर कुठेतरी निघून जायचो. 
वाळूत उमटलेली पावलं आणि त्यात उमळलेला ओलावा ह्यांना केवढा गूढ अर्थ प्राप्त झाला होता तेव्हा ! तू वाळूत रेघोट्या ओढत असताना,
मी टक लावून त्यात कुठचा अर्थ शोधत होतो बरं ? आणि तेव्हा तू मला इतकी विलोभनीय वाटायचीस की, तुला स्पर्श करायची मला 
भीती वाटायची.!"  

१९५४ साली प्रकाशित झालेल्या "तलावातलं चांदणं" ह्या गाजलेल्या कथासंग्रहातील हा अंश. साठवर्षांपुर्वीचे हे लिखाण आपल्याला 
आजही किती विलोभनीय, प्रसन्न आणि वेगळ्या अनुभूतीचे भासत आहे. मराठी नवकथेच्या क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव 
श्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ. प्रयोगशीलतेला एक वेगळं, समर्थ अवकाश देणारं एक प्रसन्न व्यक्तिमत्व. मराठी साहित्य विश्वात
 'नवकथेचे एक प्रणेते' म्हणून गाडगीळांचे स्थान महत्वाचे आहे. महानगरातील कल्लोळाचे यथार्थ दर्शन, यंत्रयुगीन वास्तवाची प्रखर जाण, 
त्याचबरोबर मानवी मनोव्यापाराचे सूक्ष्म दर्शन आपल्या अनेक कथांमधून वाचकांना घडवणाऱ्या गाडगीळांनी मराठी वाचकाला समृद्ध केले,
एक वेगळी दिशा दिली, नवी दृष्टी दिली. कथालेखनाव्यतिरिक्त गाडगीळांनी प्रवासवर्णने, समीक्षालेखन.,ललितलेखन, एकांकिका, किशोरकथा 
असे चौफेर लेखन केले आहे. काही पुस्तकांचा अनुवाद हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये झाला आहे. 

गाडगीळांनी आपली कथा 'प्रिया आणि मांजर' ही १९४१ मध्ये लिहिली व वाङ्मयशोभा मध्ये प्रकाशित झाली. १९४६  साली प्रकाशित झालेला  'मानसचित्रे'  हा त्यांचा पहिला कथासंग्रह.बा. सी. मर्ढेकर यांच्यासारख्या प्रतिभाशाली कवीने १९४७ सालीच आपल्या रसपूर्ण समीक्षेद्वारे गाडगीळांच्या कथालेखनाला प्रोत्साहन दिले. पुढे प्रख्यात समीक्षक वा. ल. कुलकर्णी, रा. भि. जोशी. पु. भा. भावे यांनी गाडगीळांच्या साहित्याची यथोचित दखल घेतली. नव्या वळणाची, नव्या विचारांची,वेगळेपणाचं मर्म उलगडून सांगणारी कथा तसेच कथेच्या क्षेत्रात नव्या पायवाट ढुंढाळणारे एक प्रयोगशील लेखक म्हणून गाडगीळ लोकप्रिय झाले. 
मुंबईमधील शहरी जीवनसंस्कृतीचं चित्रण गाडगीळांनी आपल्या अनेक कथांमध्ये केले. मुंबईला त्यांनी आपलेसे केले, मुंबईपण त्यांच्या सर्वांगामध्ये 
जणू भिनलं. गाडगीळ हे खऱ्याअर्थाने मुंबईकर लेखक आहेत. सामाजिक परिस्थितीचे टोकदार भान, मध्यमवर्गीय माणसाची मनोवृत्ती, त्याच्या 
वास्तव जीवनाचे अनेक कंगोरे, त्याच्या इच्छाआकांक्षाचं , मानवी जीवनातील विसंगती, सुखदुःखाची चित्रं, गाडगीळांनी आपल्या कथेत रेखाटली आहेत. 
त्याचप्रमाणे पुरुषकेंद्री व्यवस्थेमुळे कौटुंबिक, सामाजिक जीवनात जे  वादळ निर्माण होते आणि त्याचबरोबर स्त्रीचे शोषण देखील होते त्या शोषणाचं 
चित्रण गाडगीळांनी मार्मिकपणे आपल्या कथांमध्ये केले आहे. गाडगीळांनी लेखनाला जेव्हा सुरवात केली तेव्हा प्रेमकथांचं अधिराज्य होते, 
मात्र गाडगीळांनी जाणीवपूर्वक प्रेमकथा खूप कमी लिहिल्या. एकीकडे गंभीर कथालेखनाबरोबरच त्यांनी विनोदी कथाही लिहिल्या. मध्यमवर्गीय 
माणूस हा त्यांच्या विनोदी कथांचा गाभा होता. गाडगीळांच्या कथेचा ओढा व्यक्तींच्या स्वभावधर्मापेक्षा त्यांच्या मनाच्या घडणीवर होता. लहान मुलं 
ते जक्खड म्हतारा माणूस यांच्या अनोख्या मनोव्यापाराचे चित्रण गाडगीळांनी ताकदीने रेखाटले. अगदी थोड्यात सांगायचे म्हणजे गाडगीळांची 
कथा आपल्या घराघरांमधून, मनामनामधून घडणारी आहे. कथांमधून संवादांचा अतिशय संयत, असा समतोल त्यांनी सांभाळला. प्रख्यात समीक्षक
श्रीमती सुधा जोशी म्हणतात, " गाडगीळांच्या कथेचे महत्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच 
मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे." 

२५ ऑगस्ट १९२३. जन्म मुंबईतला. प्रारंभीचे शालेय शिक्षण गिरगावातून होऊन १९३८ ला मॅट्रिक झाल्यावर १९४४ मध्ये चर्नीरोड येथील 
विल्सन कॉलेजमधून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयामधून त्यांनी एम. ए केले. पुढे प्राध्यापकीचा श्रीगणेशा सुरतच्या 
महाविद्यालयात सुरू करून नंतर मुंबईतील नावाजलेल्या पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल प्राध्यापक म्हणून काम पाहिले. एकीकडे सकस 
कथालेखन करता करता दुसरीकडे 'अर्थतज्ज्ञ' म्हणून गाडगीळ नावाजत होते. किती विरुद्ध टोकाच्या दोन गोष्टी? एकूण आठ वर्षे मुंबईच्या नरसी 
मोनजी कॉलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्राचार्य म्हणून होते.! १९७१ ते १९७६ कालावधीत आपटे समूहाचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 
१९८८ ते १९९३ या कालावधीत गाडगीळ साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष होते . एकीकडे प्राध्यापकी करीत असताना त्यांची अनेक पुस्तके ठराविक अंतराने प्रकाशित होऊ लागली. जवळजवळ ८५ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.त्यापैकी उध्वस्त विश्व, कबुतरे, तलावातले चांदणं, उन्हं, नव्या वाटा, कडू आणि गोड, खरं सांगायचं म्हणजे, वेगळं जग,रत्ने, ही पुस्तके उल्लेखनीय. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर अतिशय ताकदीने लिहिलेली 'दुर्दम्य' ही कादंबरी प्रचंड गाजली. 'आठवणींच्या गंधरेखा हे आत्मकथन.  'एका मुंगीचे महाभारत' या आत्मचरित्र पुस्तकाला १९९६ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अनेक 
पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. १९८० मध्ये न.चि. केळकर आणि १९८२ मध्ये रा. श्री. जोग या पुरस्कारांनी सन्मानित. कुसुमाग्रज 
प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार. अमेरिकेची प्रतिष्ठित अशी रॉकफेलर फौंडेशनची फेलोशिप त्यांना लाभली. १९८१ मध्ये रायपूर येथे संपन्न झालेल्या 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गाडगीळांच्या काही निवडक कथांवर आधारित 'कथागंगेच्या धारा' ही दूरदर्शन मालिका 
प्रसारित झालेली रसिकांना स्मरत असेलच.  

गाडगीळांचे कथाकथनाचे कार्यक्रम मी पाहिले नाहीत,  स्मरतंही नाहीत. मात्र अर्थसंकल्पावर, अर्थशास्त्रावर आधारित असे दोन जाहीर 
कार्यक्रम पाहिल्याचे मला स्मरते. तेदेखील ठाण्यात.! गाडगीळ वृत्तपत्रांमधून जागतिक घडामोडींवर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनेकवेळा लिहीत असत. 
१९९५ च्या सुमारास कुठल्याशा वृत्तपत्रात " मराठी माणसाने आता बदलले पाहिजे" हा अभ्यासपूर्ण लेख वाचनात आला. तेव्हा नोकरीबरोबरच 
एखादा छोटासा जोडउद्योग सुरू करावा असा मनात होते. त्याचवेळी नेमका तो लेख समोर.! अगदी सहजपणे त्यांना पत्र पाठवले. ११ डिसेंबर १९९५. 
इतका मोठा अर्थतज्ज्ञ, लेखक, समीक्षक. एखाद्या मित्राला सल्ला देतात तसे प्रांजळपणे, स्पष्टपणे त्यांनी पत्रामधून मला उत्तर पाठवले. ते असे. 
"तुम्ही अगत्यपूर्वक पत्र पाठवून 'मराठी माणसाने आता बदलले पाहिजे' हा माझा लेख आवडल्याचे कळविलत, त्याबद्दल मी मन:पूर्वक आभारी आहे. 
उद्योजक होण्याच्या मार्गात किती अडचणी असतात त्याची तुम्ही दिलेली माहिती अगदी खरी आहे. परंतु त्यातूनच मार्ग काढून उद्योजक 
म्हणून अनेकांनी यश मिळवले आहे. तुम्हीही याबाबतीत घाईगर्दी न करता व अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन विचारपूर्वक पावले टाकाल 
व यश मिळवलं अशी मला अशा आहे. शुभेच्छा." मी उद्द्योजक न होता नोकरदारच राहिलो हा गमतीचा भाग सोडा. 
गाडगीळांचे ते  पत्र अजूनही पाहिल्यावर मनाला उभारी येते. प्रत्येक धडपड्या मराठी तरुणाने ह्या पत्राचा गंभीरपणे विचार करावा आणि 
यशस्वी उद्योजक बनावे. 

१५ सप्टेंबर २००८. एकाचवेळी साहित्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांवर प्रचंड हुकूमत असणारे नवकथेचे हे प्रणेते, प्रसन्न व्यक्तिमत्वाचे
अभिजात चांदणे कुठल्याशा तलावामधील कंपित लाटांमध्ये विखरून गेले, कायमचे.!! 

(रामदास खरे, ठाणे)

Wednesday, August 12, 2026

ज्ञान भारतम website

ज्ञानाचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी 'ज्ञानभारतम्' अभियान! 

भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे 'ज्ञानभारतम्' राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान देशभर सुरू करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत देशभरातील हस्तलिखितांचा शोध, नोंदणी, दस्तऐवजीकरण आणि डिजिटल स्वरूपात संवर्धन करण्यात येणार आहे. अध्यात्म, धर्म, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित, ज्योतिष, नाट्यशास्त्र, रसायनशास्त्र आदी विविध विषयांवरील कागद, ताडपत्र, भूर्जपत्र, कापड किंवा इतर माध्यमांवरील हस्तलिखितांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हस्तलिखितांची मालकी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडेच कायम राहणार असून शासनाकडून त्यांचे जतन व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

आपल्या घरात, मठ, मंदिरे, आश्रम, ग्रंथालये, संशोधन संस्था किंवा खाजगी संग्रहात प्राचीन हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्यांची माहिती 'Gyan Bharatam' मोबाईल ॲपवर नोंदवून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हा.

आपल्या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी या राष्ट्रीय अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करते.

अधिक माहितीसाठी : gyanbharatam.com ला भेट द्या.

Fb post @ Sunetra Ajit Pawar

Sunday, August 2, 2026

पुस्तक परिचय




आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या साईड इफेक्ट्स ( डिंपल पब्लिकेशन )  या गूढकथा संग्रहाचे पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. कवयित्री, अनुवादक प्रा सुजाता राऊत आणि म.टाइम्सचे संपादक यांचे मनापासून आभार. संपूर्ण परीक्षण text स्वरूपात खाली दिले आहे. 

** मनाच्या डोहातील गूढ तरंग **
मानवी मनाचे पदर अनाकलनीय अतर्क्य व अथांग आहेत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईड Mystery म्हणजे गूढ याविषयी बोलताना म्हणतो खरं गूढ हे बाह्य गोष्टीत नसून मनाच्या आतच दडलेलं आहे व हा मनाचा प्रवास थक्क करणारा आहे.
      लेखक, चित्रकार, कवी रामदास खरे यांच्या साईड इफेक्ट्स या गूढ कथासंग्रहाचे वाचन करताना आपल्याला याचा प्रत्यय येतो. मराठीत रहस्यकथा,भयकथा, गूढकथा यांना सहसा एकच मापदंड लावला जातो. पण या तीनही कथाप्रकारांची स्वतःची अशी शक्तीस्थळं आहेत. त्यातही गूढकथेचा आवाका मोठा आहे. फक्त रहस्य उलगडणे किंवा वाचकाच्या मनात थरार निर्माण करणे यापुरतीच गूढकथा सीमित नाही. 
        उत्कृष्ट साहित्यरचनेसाठी आवश्यक असणारे काही घटक असतात ज्यामध्ये पात्रनिर्मिती,वातावरण भवतालाचे तपशील व मुख्य म्हणजे मनाचा प्रवास असतो. प्रस्तुत गूढकथासंग्रहात हे सर्व घटक संतुलित पद्धतीने आले आहेत.म्हणूनच या कथा परिणामकारक ठरतात. या सर्व कथांमध्ये प्रथमपुरुषी किंवा तृतीयपुरुषी निवेदन आहे. त्यातून कथा उलगडत जातात. गूढकथा आहेत म्हणजे सतत भीतीची काळीशार सावली जाणवत राहील असा लेखकाचा कुठेही प्रयत्न नाही. उलट अगदी सहज नेहमीच्या संवादातून या कथा उलगडतात.
      सरप्राईज ही कथा मैथिली व मिलिंद या दांपत्याची आहे. भर पावसाळ्यातल्या दिवशी मैथिलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद सरप्राईज देणार असतो. पण प्रत्यक्षात काय घडतं? कोणतं सरप्राईज मिळतं हे उत्तम रीतीने लेखकाने हाताळलेलं आहे. ड्रीमलँड या कथेतला नायक व त्याचा मित्र जगू या दोघांच्या संवादातून उलगडत जाते. जगूला पडणाऱ्या स्वप्नांनी नायकाबरोबरच आपणही अस्वस्थ होतो. पण शेवटी जगूच्या आयुष्यात काय घडतं? हे मुळातून वाचलं पाहिजे.
       मानवी आयुष्याचा प्रवास हा सरळ रेषेसारखा नाही. नियतीचं अतर्क्य असं गूढ त्यामध्ये दडलेलं आहे. मुख्य म्हणजे मनाच्या या डोहामागे काय अद्भुत गहन तरंग लपलेले आहेत याचा अंदाज आपण लावू शकत नाही. रामदास खरे यांच्या सर्वच कथांमध्ये हे समान सूत्र दिसतं.
      कोंड ही यातील एक उत्कृष्ट कथा आहे. गावच्या जमिनीचा व्यवहार बघायला आलेला मध्यमवयीन नायक,तिथे भेटलेली नाजूक पावलांची राधा, तिच्या आयुष्यातला पेच हे साकारत जातं. या कथेचा शेवट अगदी वेगळा व कथेला उंचीवर नेणारा आहे. लेखकाचे संवाद नेमके व सहज आहेत आणि भाषा चित्र समोर उभी करणारी आहे. शब्दांचा वापर अचूक आहे. उदाहरणार्थ “आठवणींचा आग्यामोहोळ फुटलेला. माझ्या कृश गात्रांच्या फांद्यावर हट्टाने चिकटून बसलेला आठवणींचा सनातन थर. घाटांची आवर्तन सुरू झालीयेत” अशा पद्धतीचे वर्णन व निवेदन अनेक कथांमध्ये आढळते. अबाधित या कथेतील देवचाराचे वर्णन खिळवून टाकेल असे आहे. या कथेत व इतरही काही कथांमध्ये कोकणचे, तिथल्या भवतालाचे संदर्भ व वर्णन येते. गूढ फक्त घटनांमध्ये नसते, ते भवतालात, चराचरात, आसमंतात भरलेले असते. मनाच्या आतल्या प्रदेशात तर असतेच असते. कोकणची ही पार्श्वभूमी काही कथांमध्ये एखादे मुख्य पात्र असल्यासारखी समोर येते. “निळभोर आभाळ ,विस्तीर्ण नदीकाठ, हिरव्या गर्द डोंगरांची पार्श्वभूमी लाभलेली. झाडांच्या उलट्या सावल्या पाण्यात विरघळत चालल्यात शांतपणे. कसलीही घाई नाहीये .सगळं कसं निस्तब्ध निवांत. पेंटिंग साठी पोषक वातावरण” हे कोंड या कथेतील वर्णन.
     काळीशार गर्द सावली, जाळं, नेक्स्ट अशा अनेक कथांमध्ये पात्रांचा भवताल व घटना त्यातील नाट्य फुलवलेले आहे. अनेक कथांचा शेवट हा सूचक आहे. त्यातील गूढ वाचकांना खुणावत राहतं. काही कथांमध्ये बरेच तपशील येतात. उदाहरणार्थ नेक्स्ट ही कथा. पण कथेची घडण होण्यासाठी ते आवश्यक वाटतात. या कथा फक्त घटना समोर ठेवत नाहीत तर त्यामध्ये गुंतलेल्या माणसांचे मनोव्यापारही समोर येतात. या सर्व कथांची गुंफण सहज आहे. रहस्य समोर ठेवायचं, वाचकाला भयाने गारद करावं किंवा उगाच संमोहाच्या आवर्तात ठेवावं अशी कुठलीही भूमिका नाही. उलट प्रवाही निवेदनात कथा समोर येतात. काही कथांचा पैस मोठा आहे. उदाहरणार्थ डायरी, मुक्ती या कथा. त्यासाठी अधिक विस्तृत स्वरूपात खोल आशय या कथा नक्कीच व्यक्त करू शकतात.यापुढे लेखकाने अशा पद्धतीच्या दीर्घकथा लेखनाकडे वळावं असं वाटतं. 
     डिंपल प्रकाशनाने त्यांच्या परंपरेला साजेशी अशी पुस्तकाची निर्मिती केली आहे. आजचे महत्त्वाचे कथालेखक व चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी समर्पक शब्दात पुस्तकाची पाठराखण केली आहे. लेखकानेच या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले आहे. त्यातील गडद लाल,केशरी काळ्या रंगात या कथांचे साईड इफेक्ट चित्रित झालेले आहेत. मनाला संमोहित करणारे गूढ अनुभव देणारे हे पुस्तक वाचताना आपण मानवी मनाच्या गूढगर्द अरण्यात प्रवेश करतो व रमून जातो.
      – सुजाता राऊत, ठाणे. 

साईड इफेक्ट्स (गूढकथा )
रामदास खरे
डिंपल पब्लिकेशन,वसई. 
पृष्ठे :१२२, मूल्य रू.२००/