Showing posts with label बालकवी. Show all posts
Showing posts with label बालकवी. Show all posts

Saturday, April 8, 2017

ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

औदुंबर - बालकवी
ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

Sunday, June 5, 2011

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे




श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे..
- बालकवी
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो उघडे;
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे!

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा!
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते!

फडफडा करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती;
सुंदरा हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती!

खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे!

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला
पारीजातही बघता भामारोष भामारोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदरबाला या फुलमाला रम्य फुले, पत्री खुडती!

देवदर्शना निघती ललजा, हर्ष माझ्या ह्रदयात!
वदनी त्याच्या वाचुन घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!