मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐
Tuesday, February 27, 2024
मराठी भाषा दिन ९
आज काल मराठी पालक इंग्रजी संस्कार करतात म्हणून मुलं ही इंग्रजी मध्ये कविते मध्ये आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात! भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम शहरांपेक्षा जास्त ग्रामीण भाग करत आला आहे आणि पूढे ही करेल ! मराठी भाषा चिरायू होवो ! गुजरात मध्ये संमेलन होतं नाहीत तरी तिथली लोकं गुजराती मध्ये संवाद करतात हे इतर भाषिकां कडून शिकायला हवं! इंग्रजी भाषा आहे आणि भाषेचे वर्ग असतात त्यासाठी इंग्रजी ची माध्यम कशाला हवीत हा मूळ प्रश्न आहे?? इतर परकीय भाषा शिकतोच की त्यांची माध्यम कुठे असतात ! मराठी शाळेचा प्रश्न लवकर सुटो एवढीच अपेक्षा आहे!
विद्या
#vidyamslife
मराठी भाषा दिन ८
#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली.
मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”
तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली.
त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना आज महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला जाणार आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो - “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून आणि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत - “अफ़वाहों की बाढ़ आती है” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे.
आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं.
मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्हा बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो.
वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!
मराठी भाषा दिन ७
मराठी भाषा दिन
व्याकरण ?
भाषा संवाद ?
शुद्धलेखन?
अभिमान ?
मराठी संस्कृती??
मराठी व्यवहारात वापर?
आज काल मराठी चित्रपटांची नाव इंग्रजी मध्ये असतात !
आज काल मराठी वाहिनी वरील कार्यक्रमात हिंदी, इंग्रजी शब्द आणि हिंदी गाणी असतात!
प्रमाण भाषेचं अस्तित्व तिचा वापर किती करतो यावर अवलंबून असतं!
मराठीत बोली भाषा ही आहेत ज्यांच व्याकरण ही लिहिलं नसेल पण त्याचं अस्तित्व टिकून राहिलं आहे आणि राहणार ते आवडी मुळे उदाहरण मालवणी कोकणातली बोली भाषा !
भाषा संवाद, कलाकृती ,नाटक ,चित्रपट ,साहित्य आणि संस्कृती च दर्शन करते आणि तेव्हाच तिचा प्रसार होतो !
🚩🚩 मराठी भाषा चिरायू होवो ! 🙏🚩🚩
विद्या
#Vidyamslife
२७ फेब्रुवारी २०२०
मराठी भाषा दिन ५
*मातृभाषेला आपण कुठवर गृहीत धरणार..*
आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी हा संवाद होतोय. माऊली ज्ञानेश्वरांपासूनची साहित्य परंपरा असलेल्या आपल्या मायमराठीच्या आपण कायमच ऋणात आहोत. तिचं उतराई होण्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करत राहुया. तुमच्यासोबतचा हा संवाद तुमच्या माध्यमातून अनेकांसोबत होणारा संवाद आहे. आजचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय, पाहताय.. ह्या पोर्टलवर तुम्ही आहात. ह्याचाच अर्थ तुम्हाला आपल्या भाषेविषयी, आजच्या दिवसाविषयी प्रेम आणि आदराची भावना आहे. म्हणूनच तुमच्याशी हा संवाद, जो तुम्हीही, इतरांसोबत करायचा आहे.
२७ फेब्रुवारी हा खरंच मराठी राजभाषा दिवस आहे की, केवळ एक सरकारी सोपस्कार?.. हो, सोपस्कारच.. कारण ज्या पद्धतीने प्रतिवर्षी तो राबवला जातो. त्याला अभियान वगैरे तर अजिबातच म्हणवत नाही. मग त्यातला मराठी 'अभिमान' वगैरे फार दूरची गोष्ट. १ जुलैला दरवर्षी त्याच त्या खड्ड्यात नवीन रोप लावण्याच्या प्रघाताप्रमाणेच २७ फेब्रुवारी ह्या राजभाषा दिवसाची अवस्था झालेली आहे.
माझा शिक्षकांवर रोष नाहीय. पण, कित्येक शिक्षकांनाच हा दिवस का, कुणामुळे आणि कशासाठी साजरा केला जातो, हेच माहीत नसते. पुढे मग कुसुमाग्रज कोण, त्यांचं नाव काय, त्यांचं साहित्य, एकूण योगदान ह्याबद्दल तर बोलायचंच नाही. मागच्याच वर्षी मी व्याख्यानाला गेलो होतो एका महाविद्यालयात. तिथे कुसुमाग्रज आणि वि. वा. शिरवाडकर यांची जयंती एकाच दिवशी असण्याचा आविष्कार तेथील प्राध्यापिकेने केला होता. प्राध्यापिका विज्ञानाची असली तरी असा शोध लावावा, हे नक्कीच अभिप्रेत नव्हते. माझ्या सवयीनुसार मी त्यांना थांबवले. चूक सांगितली. ती सांगताना वातावरण गंभीर न होऊ देता, ते हलकंफुलकं होईल, ह्याची काळजी घेतली. तरीही ते त्यांच्याच विद्यार्थ्यांसमोर त्यांना कमीपणा वगैरे आला. पण, माझे भाषाविषयक सूत्र काही मी सोडले नाही.
शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ सरकारी आदेशाचं पालन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. साजरा होण्यापेक्षा तो दिवस पाळला जातो, म्हटल्यास ते मुळीच वावगे ठरणार नाही. किंबहुना तेच अधिक सयुक्तिक ठरेल. इतपत वाईट अवस्था आहे. ह्याला काही मोजके अपवाद असू शकतील. पण, त्या अपवादांची संख्या फारशी समाधानकारक नक्कीच नाही. कार्यक्रम, कार्यशाळा, व्याख्याने ह्या निमित्ताने अनेकदा शाळा महाविद्यालयांना भेट देण्याचा संबंध येतो. दहा कॉलेजांमागे एखाद ठिकाणी अरविंद दोडे, प्रा. दीपक पवार, प्रा. नितीन आरेकरांसारखा मराठी भाषेविषयी आस्था असणारा कुणी अभ्यासू प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवून भाषेचा लळा लावणार्या प्रा. प्रज्ञा दया पवार, प्रा. वीणा सानेकर, प्रा. दीपा ठाणेकर, प्रा. वृषाली विनायक क्वचितच गवसतात. प्रा. दीपक पवार हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहे. त्यांची भाषेविषयीची रुची अभिमानास्पद आहे. अर्थात ही नावे प्रातिनिधिक असून ती केवळ उदाहरण म्हणून दिली आहेत.. प्रमाण सांगण्यासाठीच त्यांचे प्रयोजन आहे. महाराष्ट्रात अनेक सजग शिक्षक माझ्याही परिचयाचे आहेत. इथे सर्वांचीच नावे लिहिण्याला मर्यादा आहेत. मूळ मुद्दा हाच की, भाषेविषयी आस्था असणार्या शिक्षकांचे प्रमाणही यथातथाच आहे.
बरं, जे शिक्षक खरंच उत्सुक असतात, सक्षम असतात, त्यांना अनेकदा सरकारी उपक्रमांना (जनगणना, निवडणुका वगैरे) जुंपले जाते. त्याव्यतिरिक्त कार्यालयीन अथवा वैयक्तिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या बाबींकडेही गांभीर्याने पहायला हवे आहे. असे अपवाद बाजूला सारले तरी एरव्ही मात्र शाळामहाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाविषयीचा उत्साह आणि भाषेविषयीची उदासीनता असंच चित्र सर्रासपणे पहायला मिळतं. शिक्षकांमधली ही उदासीनता हीच आपल्या भाषेपुढील मुख्य अडचण आहे. उदाहरणासाठी पुन्हा पु.ल. आठवतीलच. पण, त्यांनी रेखाटलेले चितळे मास्तर मराठी भाषेला हवेच आहेत. स्वतःमध्ये भाषेविषयीची वत्सलता जपणारी शिक्षिका, भाषेकडे जबाबदारीने पाहणारा शिक्षकच पुढच्या पिढीकडे मराठीची पालखी नेऊ शकेल. असे शिक्षक, शिक्षिका महाराष्ट्रात आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकरवी भाषाविषयक उपक्रमांचे, कार्यशाळांचे आयोजन करवले पाहिजे.
वृक्षारोपण, भाषादिवस यांचे महत्त्व सणांपुरते मर्यादित रहायला नकोय. मी तुलना करणार नाहीय. पण, व्हेलेंटाईन ह्या एका दिवसासाठी सात दिवस आधीपासून वेध सुरू होऊन सात दिवस नंतरपर्यंत ते नेले जाऊन व्हेलेंटाईन पंधरवडा साजरा केला जाऊ शकतो. तर भाषा दिवसाचा पंधरवडा का होऊ शकत नाही? तरुणाईमध्ये ह्याविषयीची जागरुकता निर्माण करणे, ही खरी गरज आहे. भाषा टिकवण्यासाठी काय करावे, ह्या उपाययोजनांमध्ये तसे कुणाला फारसे स्वारस्य नसते. मात्र आहे ती भाषा, बोली लिहिण्याची तरी किमान काळजी आपण घेतो आहोत का?
आता आपण किमान काय करायला हवं, ह्या विषयी एक मुद्दा. २०२० सालात आज आपण आहोत. प्रगत तंत्रज्ञान, नवनवे शोध असं सगळं वातावरण आपल्या अवतीभवती आहे. वीसएक वर्षांपूर्वी मराठी लिहिण्यासाठी हस्तलिखिता व्यतिरिक्त टाईपरायटर, कॉम्प्युटर यावर मराठी लेखनासाठी आपल्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत असे. आता मात्र आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, मोबाईलमध्ये आपल्याला मराठी लेखन सहज उपलब्ध आहे. समाजमाध्यमे आज प्रत्येक भाषेची झाली आहेत, तशी ती मराठी देखील झाली आहेत. भाषेसाठीची लेखन साधने सुलभ सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. पण, ह्या सोपेपणात आपण भाषा जपण्यात यशस्वी होतो आहोत का?
ह्या प्रश्नाचं उत्तर खरंतर १००% होय, असंच यायला हवं. पण, ते तसं होत नाही. आपली भाषा, मातृभाषा म्हणून आपण तिला अगदी गृहीत धरतो. इतर कोणतीही भाषा लिहीत किंवा बोलत असताना त्या भाषेतील शब्दांची आपण किती काळजी घेत असतो? खरंतर ती काळजी आपल्याला कुणी चुकीचं म्हणू नये, ह्यासाठीची असते. पण, तीच काळजी आपण आपल्या मातृभाषेची घेत नाही. इतर कोणत्याही भाषेपेक्षा वेलांटी, उकार, काना, मात्रा यांचं सौंदर्य मराठी, हिंदी आणि संस्कृत ह्या भाषांना लाभलेलं आहे. केसांचा भांग कधी बिघडू नये, ह्याची काळजी घेणारे आपण, भाषेच्या सौंदर्याच्या बाबतीत खरंच दक्ष असतो का? आपण आपल्या दिसण्याची जितकी काळजी घेतो, तशीच आपल्या भाषेचीही काळजी घेतलीच पाहिजे. मग ती काळजी लिहिण्यातली असो की बोलण्यातली.. आपण दक्ष असलंच पाहिजे.
हिंदीपेक्षा तुलनेने आपल्या मराठी भाषेचे व्याकरण अधिक बारकावे असणारे आहे. एवढ्या कमी वेळात, कामी शब्दात फार उदाहरणे देता येणार नाहीत, तरीही हे एक उदाहरण.. 'पाणी' हा शब्द आपल्या नित्याच्या वापरातला आहे. आता त्यातही 'पानी' की 'पाणी' ह्यावरून होणारे उच्चारवाद बाजूला ठेवूया. कोणत्याही शुद्धतेला होणारा विरोध ही खरेतर शुद्धतेपासून काढलेली पळवाटच असते. केवळ शुद्धतेलाच नव्हे तर तो अभ्यासालाही केलेला विरोध असतो. हे माझे अगदी ठाम मत आहे. असो.. पण, ह्या 'पाणी' मधील 'णी' ची वेलांटी 'दीर्घ' म्हणजे दुसरी आहे. ती जर र्हस्व म्हणजेच पहिली दिली, तर शब्दाचा अर्थच बदलतो. 'पाणी' ऐवजी 'पाणि', असं लिहिलं तर त्या शब्दाचा अर्थ 'हात' असा होतो. आता लक्षात घ्या अशा किती शब्दांचे उकार, वेलांटी आपण चुकवत असतो. जे थोड्याशा प्रयत्नाने सुधारता येऊ शकतात.
ह्या लेखात अनेक मुद्दे राहून गेले आहेत, ह्याची मला नम्र जाणीव आहे. लेख संपवतानाही एक मुद्दा स्मरतो आहे. 'सुलेखनाचा' ह्या बाबतीत, अच्युत पालव, निलेश गायधनी, नंदू गवांदे, संजय शिंदे ह्या आणि अशा अनेक सुलेखनकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे. तितकेच जबाबदारीचे स्थान प्रकाशकांचे आहे. त्यांनीही साहित्य प्रकाशित करताना मर्यादा, दर्जा यांचा विचार करायला हवा आहे. वृत्तपत्र आणि इलेक्ट्रानिक मिडिया यांना तर मराठी भाषेची कोणतीही काळजी नसल्याचे चित्र पहायला मिळते आहे.
भाषा सहज उपलब्ध आहे, पण तिच्यातली सुलभता आपण शोधून तिचं सौंदर्य जपलं पाहिजे. इंग्रजीतलं मराठी लिहिणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. केवळ एका क्लिकवर इंग्रजीसारखं टाईप करून मराठी अक्षरे उमटण्याची सुविधा उपलब्ध असताना आपल्याच तंत्रआलस्याने आपण एकप्रकारे भाषेची गळचेपीच तर करत असतो. विशेषतः लिहित्या हातांनी, म्हणजेच लेखक, कवींनी ह्या बाबत जागरूक राहून अत्यंत जबाबदारीने आपलं लेखन केलं पाहिजे. शुद्धलेखनापासून तर फारकत घेऊच नये. कळत नाही, वेळ नाही अशी क्षुल्लक कारणे देताना आपण स्वतःला मराठीचे लेखक म्हणवून घेत आहोत, ही बाब ध्यानात असू द्यावी.
राजभाषा दिनाच्या निमित्ताने किमान एवढी काळजी घेण्याचा संकल्प केला, तरी माय मराठीच्या आपल्यावरील ऋणांचे आपण थोडे तरी उतराई होऊ शकू..
*- जनार्दन केशव*
.
मराठी भाषा दिन ४
रोज सकाळ-संध्याकाळ Good Morning आणि Good Evening चे संदेश पाठविणारे, प्रत्येक वाक्यात wow, cool, great असे शब्द मिरवणारे जेव्हा २७ फेब्रुवारीला "गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा" किंवा "एवढ्या जगात माय मानतो मराठी" असे संदेश पाठवतात तेव्हा अगदी मनापासून मायबोलीत शिव्या हासडण्याचे मन करते.
पण ठीके... निदान आजच्या दिवशी तरी हे तथाकथित ( so called ) मराठीजन "माज" दाखवतात हे हि नसे थोडके...
आपल्या देशात इंग्रजी म्हणजे आई आणि मातृभाषा म्हणजे सावत्र आई असा समज रूढ आहे...
उगीच प्रत्येक वाक्यात wow, cool, great असे शब्द वापरून किंवा जड जड इंग्रजी शब्द वापरून आम्ही किती सुशिक्षित किंवा किती पुढारलो आहोत हे दाखविण्याचा मूर्खपणा जगाला दाखवू नका...
इंग्रजी हि एक भाषा आहे अन तिला त्याइतकेच महत्व द्या. अगदीच गरज असेल तिथेच तिचा "वापर" करा...
असो... असंही पु.ल. म्हणून गेलेत... "आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल."
राजभाषा - ज्ञानभाषा मराठीदिनाच्या खुप साऱ्या शुभेच्छा ..
कुसुमाग्रज यांना मानाचा मुजरा...!!!
थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे पुण्यस्मरण ...!!!
-: मनु :-
२७ फेब्रुवारी २०२०
मराठी भाषा दिन २
कवीचे जगणे आणि लिहिणे ही कधीही वेगळी व स्वतंत्र खाती नसतात. जगण्यातून कवितेला आणि कवितेतून जगण्याला वगळता येत नसते. जेव्हा जगणे आणि लिहिणे एकजीव होतात , तेव्हाच कबीर व तुकाराम जन्माला येतात.कवीच्या भाग्याचा अंतीम फैसला करणारे सर्वोच्च न्यायालय म्हणजे सामान्य जनताच असते. ही जनता कवीहून मोठी असते. कवीमुळे जनता नव्हे , तर जनतेमुळे कवी असतो. ही जनता ज्या कवीचा ह्रदयापासून स्विकार करते , तोच कवी अमर व महान होतो. म्हणून मराठी कविता ही मराठी माणसांची पवित्र ठेव आहे.
हे जग ह्रदय असलेल्या जिवंत माणसांनी येथे जगायच्या लायकीचे म्हणजे सुंदर व निकोप बनले पाहिजे. कविता जगाला सुंदर बनवते , निदान त्याची कुरुपता तरी कमी करते.
म्हणूनच कविता म्हणजे माणुसकीचे सौंदर्य सलामत ठेवण्यासाठी म्हणजेच माणुसकीच्या विजयासाठी सुरू असलेल्या सर्वव्यापी सनातन युद्धाचाच एक भाग होय.
----- सुरेश भट
मराठी भाषा दिन १
" मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती "
मराठी भाषा दिवस , जागतिक मराठी भाषा दिन याच्या दिवशी , मी सर्व मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती करीत आहे .
" मराठी संभाषणात ( अव्यावसायिक ) , लिखाणात इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये , इंग्रजी वाक् प्रचार यांचा वापर करणे टाळावे . शक्यतो शुद्ध मराठीत संभाषण करावं . मराठीवर इंग्रजीचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण रोखणे अत्यंत निकडीचे आहे .
मराठी भाषा स्वतःचे अस्तित्व गमावत चालली आहे . मराठी भाषेत शब्द , वाक्ये , म्हणी , वाक् प्रचार यांची अजिबात वानवा नाही .
बाकी व्यक्ती साजरा करतात म्हणून " मराठी भाषा दिवस , जागतिक मराठी भाषा दिन " इंग्रजीत शुभेच्छा देऊन साजरा करू नकात .
उठा , तुम्ही मराठी भाषिक आहात . मराठीत बोला , मराठीत लिहा , मराठीला " मराठी भाषा " म्हणून मानाने जगू द्या .
जर तुम्हाला मराठी शब्द माहित नसतील तर मला संपर्क करा , माझ्याकडे अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द तयार आहेत .
हे मी फक्त लोका सांगे ब्रम्ह ज्ञान , स्वतः मात्र कोरडे पाषाण .... या म्हणीप्रमाणे वागत नाही . मी स्वतः गेली अंदाजे २ वर्षे , अव्यावसायिक मराठी संभाषणादरम्यान इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये , इंग्रजी म्हणी , इंग्रजी वाक् प्रचार यांचा वापर कटाक्षाने टाळतो .
सत्यजित अ शाह - ठाणे - ०९८२११५०८५८
satyajitshah64@gmail.com
http://fightofacommonman.blogspot.in/
