Monday, March 21, 2022

post 2

नटसम्राट मधील अप्पा आणि कावेरीचा 
खुप प्रेमळ आणि भावस्पर्शी संवाद.... 
वाचण्यासारखं काहीतरी खास मेसेज... 

अप्पा — कावेरी, गेल्या पन्नाससाठ वर्षात एक 
गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, 
आता सांगणार आहे ती . 
कावेरी — कोणती ती? 
अप्पा — तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम 
करतो तुझ्यावर. 
कावेरी — इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?
आणि हे काय मला माहीत नव्हतं ? 
अप्पा — तरीही एकदा सांगावंसं वाटतं. 
कावेरी — एक विचारु का ? रागवायचं नाही हं. 
अप्पा — विचार. 
कावेरी — मला सवती किती होत्या! 
अप्पा — बापरे! आठवणीच्या मावळतीवर 
हे जुने जमाखर्च आता कसे लक्षात येणार? 
पण तुला एक सांगतो, कावेरी, 
तुला सवत कुणीही नव्हती. 
होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. 
कावेरी — मी मैत्रिण नव्हते ? 
अप्पा — तू बायको होतीस. 
कावेरी — बायको मैत्रिण असू शकत नाही ? 
अप्पा — असू शकते, असतेही; पण 
मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. 
दिवाणखाना कमी असतो, 
पण देऊळ जास्त असते. 
आकाश कमी असते, 
पण पृथ्वी अधिक असते. 
थोडक्यात, 
बायको हे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी. गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी करायला बाहेर पडतं.हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी. जगणं असं असावं की पावला-पावलांवर मरणाशी मुलाखत व्हावी. परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत होतं. गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं... 
अशी आहे बंदराची महती.... 
म्हणजे बायकोची!!!! 

लेखक : वि. वा. शिरवाडकर

Sunday, March 20, 2022

तुकाराम जी अभंग

वृक्ष वल्ली आह्मा सोयरी वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु॥३॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवू रुची ॥४॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥५॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥




Saturday, March 19, 2022

post 3

माझी सुखाची कल्पना एकच आहे...

आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत
गाण्याची मैफल रंगलेली असावी...सकाळी दहा वाजता उठून दोन
वेळा चहा झालेला असावा...हवा बेताची गार
असावी...हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून
टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी...
ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे...
आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद
घातल्यासारखा स्वाद घालावा...

दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी...आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे...यथेच्छ भोजन व्हावे...मस्त पान जमावे...इब्राहिमी जर्द्याचा तोंडात
गिलावा व्हावा...गार पाणी प्यावे...आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
कुणीही झोपेतून उठवू नये!

कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही.
त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की,
संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस
नवर्यासारखा फिरायलादेखील जातो; विश्वास
ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणीदेखील घेऊन देतो!

-पु.ल.
(माझे खाद्यजीवन : हसवणूक)

post 2

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही. पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची थोडीशी घडी मोडावी या पलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी आपलं येणं जाणं होतं, बोलणं चालणं होत, पण भेटी झाल्या म्हणून मनाच्या गाठी काही पडत नाहीत. तर काही माणसं क्षणभरात अनेक वर्षांचा दुवा साधून जातात. अगदी आपलीशी होतात. हवी हवीशी वाटतात. तिथे स्थलभेद, लिंगभेद, आवडी निवडी काही काही आडव येत नाही, सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. आयुष्यात काही मनसुबे असे पटकन जुळतात आणि आनंद देतात. ही नाती खासगी असतात, नाजूक असतात. जेवढ्या लवकर ती जुळतात तेवढया लवकर ती नासण्याचाही संभव असतो. मला वाटत अशा नात्यांनाच मैत्री हे नाव दिलं गेलं असावं. तसे परिचयाचे पन्नास असतात हो आयुष्यात पण मैत्री सार्थ करणारे मित्र कमी सापडतात बहुधा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे..

'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.'

अशी सोपी सरळ पण घट्ट मैत्री टिकवणं निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपही नाही.

मनाचा एवढा हळवेपणा नवरा - बायकोच्या नात्यामध्ये नाही हो येत. तिथे मित्रच असावा लागतो. कारण इतर कुठल्यही नात्याला आपण नाव देतो आणि नाव दिलं की त्या बरोबर मानसिक, शारिरीक, कौटुंबीक आणि सामाजीक बंधन पण येतात. ह्या नात्याला मात्र नाव नाही आणि त्यामुळे कसली बंधनही नाहीत. आणि किंबहूना ती तशी नसावीतही. वाट्टेल त्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो मोकळे होउ शकतो. तिथे स्त्री - पुरूष, जात - पात काही नाही आडवे येत. मनसूबा बनून जातो आणि मन आनंदी होतं.

शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं अस मी समजतो. अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. आनंद आनंद म्हणजे काय हो, अहो अशी नाती जोडणं असे मनसुबे जुळवणं हाच आनंद.
लक्षात ठेवा तोडणं सोप आहे पण जुळवणं आणि टिकवणं कठीण.
- पु. ल


post 1

*प्रगल्भता म्हणजे काय ?*

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारण्याची प्रवृत्ती जोपासता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. 
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेणं ( स्वार्थ  ) सोडून देणं ( परमार्थ ) महत्वाचं हे समजू लागता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यानां जपण्याचा प्रयत्न करता. 
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं. 
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.   
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता. 
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमच्यात जाणीव निर्माण होते.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं कोणाला तरी आदर्श मानता आणि त्या आदर्शा प्रमाणेच आपले विचार आणि आचरण करता.

Friday, March 18, 2022

post 2

रंगच तो...

गालावर पसरला की..
लाजलेला समजतो....

जमिनीवर सांडला की...
रागवायला लावतो.

चेहऱ्यावरचा उडाला
तर
अपमान कळवतो...

फिकट झाला तर..
मनावर खिन्नता पसरवतो...

आकाशी उडाला तर .
आनंद पसरवतो..

विखुरला तर..
नाराजी पसरवतो

निसर्गात खुलला तर..
हिरवाई पसरवतो

उधळला तर..
उन्मत्तता पसरवतो

रंगात रंगला तर..
मिलन करवतो..

रंगच तो....

सर्व माणसांचं
आयुष्य रंगवतो...

सुख दुःखाच्या भावना खुलवतो..

म्हणूनच

धुलिवंदनाच्या रंगीत शुभेच्छा !

सगळ्या सुंदर रंगांनी तुमचं आयुष्य रंगुन जावो अश्या शुभेच्छा.....
🙏🏻🙏🏻🙏🏻

अनामिक




post 1

#esahity 

भारतीय शास्त्रीय संगीत हा एक प्रचंड मोठा खजिना आहे. सध्या जसं योगशास्त्र जगभर मान्यता पावत आहे तसंच लवकरच भारतीय संगीतशास्त्र जगात त्याची योग्य जागा मिळवेल. माधुर्य आणि शास्त्र यांचा मिलाप म्हणजे भारतीय संगीतशास्त्र. प्रत्येकजण काही गायक किंवा वादक होऊ शकेल असे नाही. पण प्रत्येकाने एक चांगला श्रोता व्हायला काय हरकत आहे? आता इंटरनेटच्या युगात किती मोठी संधी आहे. अगदी मनात येईल त्या गायकाचा हवा तो राग आणि हव्या त्या प्रकारात ऐकायची मुभा आहे आता.  याचा लाभ घ्या. मजा करा.
संगीत कानसेन भाग १ :  

संगीत कानसेन भाग २ :  ताना, आलाप, गमक

संगीत कानसेन भाग ३ :   राग

संगीत कानसेन भाग ४ :   लय, ताल, ठेका

संगीत कानसेन भाग ५ :  ख्याल, धृपद, ठुमरी वगैरे

रागांच्या माहितीचा चार्ट

सिनेमा संगीत आणि राग

Tuesday, March 15, 2022

Monday, March 14, 2022

post 1

माझ्या फार लहानपणी पन्हाळ्याच्या पायथ्याशी अेका मराठी चित्रपटाचं चित्रिकरण पाहिल्याचं आठवतय
तमासगिरांच्या चार पाच बैल गाड्या लागलेल्या होत्या
दादा साळवी चंद्रकांत मांढरे,सुलोचना बाअी गणपत पाटील वसंत शिंदे त्यांच्या बरोबर खाष्ट बाअीच्या भूमिकेत मला वाटतं गुलाब कोरगावकर होत्या
पण मुख्य आकर्षण होतं जयश्री बाअी
त्या खूप दूरून पाण्याच्या घागरी आणि खांद्यावर धुण्याचे पिळे घेअून येताना दाखवल्या होत्या 
त्या ठरलेल्या स्पाँटवर आल्या तशा दात ओठ खात त्यांच्या अंगावर जायला गुलाब बाअी तयार होत्या आणि आपली तारांबळ लपवत शिंदे काकाना त्याना अडवायला गुलाब बाअींच्या मागे भित भित धावायचं होतं असं अेकूण द्रुष्य होतं
अेक दोन रीटेक नंतर शाँट ओ के झाला आणि लंच ब्रेक साँरी जेवणाची वेळ झाली
सगळे बाप्ये लोक जागा मिळेल तिथे पण अेकमेकाजवळ बसले,पितळी चकचकीत थाळे सगळ्याना दिले गेले आणि अेक बाअी होत्या त्यानी थाळा भरून जाअील अशा गरम गरम भाकर्या मधे मोडून वाढायला सुरूवात केली त्या पाठोपाठ गुलाब बाअी वांग्याची तिखट जाळ भाजी घेअून आल्या आणि पंगतीत वाढावं तसं पदर खोचून सगळ्याना वाढायला लागल्या,त्या भाजीला ढकल वांग म्हणतात असं तेंव्हा मामा म्हणाला कारण ढकल वांग्यात प्रत्यक्ष वांग्याला हात घालायची वेळ फार अुशीरा येते त्या आधी दोन तीन भाकर्‍या ते मसालेदार वांग बाजूला ढकलत त्या तेल तिखटा बरोबरच संपवल्या जातात 
मग लक्षात राहीलं ते जयश्री बाअी झुणका वाढायला आल्या तेंव्हा शुटींग बघायला जमलेल्यानी त्यांच्या नावानी केलेला गलका
,जयश्री बाअींची लोकप्रियता होतीच तशी
त्यानी पण हसून त्या जमलेल्या माँंबकडे पाहीलं आणि कंपनीची माणसं जेवाया बसल्येत मग या शुटींग बघायला
असं हुकमी स्वरात तरी हासून सांगितलं
आणि आश्चर्य म्हणजे अर्ध्याहून अधिक माँब पांगला, मामाची त्या युनीट बरोबर चांगलीच दोस्ती होती त्यामुळे आम्ही शुटींग बघायला आलो असलो तरी नुसते बघे नव्हतो त्यांचे पाहुणे होतो

तेव्हढ्यात झुणक्यावर तेलाची फर्माअीश झाली आणि जयश्रीबाअीनी मुक्त हस्तानं झुणक्यावर धरलेली तेलाची धारही मला अजून आठवते
बापे लोकांच होअीपर्यंत सुलोचना बाअीनी त्या दुसर्‍या बाअीं बरोबर बायकांची ताटं घेतली सुलोचना बाअीनी डब्यातून  खास फक्त बायकांसाठी काहीतरी आणलं होतं पण शिंदे काकांच्या नजरेतून काही ते सुटलं नाही,मग काय हल्ला बोल झालं
खूप हसी मजाक झाली
नशीबाने मला अत्ताही काही तकलादू मराठी चित्रपटांचे स्टायलीश लंच ब्रेक पहायला मिळतात
मी त्याना पूर्णपणे दोश देत  नाही
ज्याच्याशी स्पर्धा त्याचं अनुकरण हा तर अलिखित नियम आहे
आणि मराठी चित्रपट सृष्टीची हिंदी चित्रपट सृष्टीशी हल्ली ट्क्कर असली तरी स्पर्धा सुद्धा आहे त्यामुळे स्ट्यालीश वागणं आणि वावरणं ही तर पहिली अट ठरली असेल.

#चंगो

Fb @ ChandrashekharGokhale.fans

Saturday, March 12, 2022

Sunday, March 6, 2022

वपु


स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसा-या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते.
Vapu


Tuesday, March 1, 2022

बाराखडी

*आज के छात्रों को भी नहीं पता होगा कि भारतीय भाषाओं की वर्णमाला विज्ञान से भरी है। वर्णमाला का प्रत्येक अक्षर तार्किक है और सटीक गणना के साथ क्रमिक रूप से रखा गया है। इस तरह का वैज्ञानिक दृष्टिकोण अन्य विदेशी भाषाओं की वर्णमाला में शामिल नहीं है। जैसे देखे*

 *क ख ग घ ड़* - पांच के इस समूह को "कण्ठव्य" *कंठवय* कहा जाता है क्योंकि इस का उच्चारण करते समय कंठ से ध्वनि निकलती है। उच्चारण का प्रयास करें।

 *च छ ज झ ञ* - इन पाँचों को "तालव्य" *तालु* कहा जाता है क्योंकि इसका उच्चारण करते समय जीभ तालू महसूस करेगी। उच्चारण का प्रयास करें।

 *ट ठ ड ढ ण*  - इन पांचों को "मूर्धन्य" *मुर्धन्य* कहा जाता है क्योंकि इसका उच्चारण करते समय जीभ मुर्धन्य (ऊपर उठी हुई) महसूस करेगी। उच्चारण का प्रयास करें।

 *त थ द ध न* - पांच के इस समूह को *दन्तवय* कहा जाता है क्योंकि यह उच्चारण करते समय जीभ दांतों को छूती है। उच्चारण का प्रयास करें।

 *प फ ब भ म* - पांच के इस समूह को कहा जाता है *ओष्ठव्य* क्योंकि दोनों होठ इस उच्चारण के लिए मिलते हैं। उच्चारण का प्रयास करें।

 दुनिया की किसी भी अन्य भाषा में ऐसा वैज्ञानिक दृष्टिकोण है? हमें अपनी भारतीय भाषा के लिए गर्व की आवश्यकता है, लेकिन साथ ही हमें यह भी बताना चाहिए कि दुनिया को क्यों और कैसे बताएं।

 *दूसरों को भेजे और हमारी भाषा का गौरव बढ़ाएँ* ... 
      
सबका मंगल हो।
#Hariom #hirayogi #yoga



Saturday, February 26, 2022

स्वा सावरकर

 तात्या गेले !

अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की, 
                               
 की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
 लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने|
 जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे
 बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे||

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला, त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, " देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !" वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची  स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची ज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की ,”१० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल.! “ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते. 

अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ' मोरिया ' बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच 'भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी' असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ‘आझाद हिंद’ चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे 'पाया’ आणि सुभाषचंद्र हे 'कळस' आहेत! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें ,पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले. 

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत “हे कृष्ण, हे श्याम” असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली. तुकोबा "आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा!" असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नाही.

धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम । 
कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम 

✍🏻आचार्य अत्रे.
 'दैनिक मराठा'
दिनांक २७ मार्च १९६६

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

#स्वातंत्र्यवीर_सावरकर #आत्मार्पण_दिन