माधुरी पुरंदरेंचा सांगावा आणि ‘अशी ही बनवाबनवी’!
संपादकीय - संपादकीय संपादक अक्षरनामा
प्रसारमाध्यमांपासून कटाक्षाने दूर राहणाऱ्या, पुरस्कार-सत्कार सोहळे यांच्यापासून अलिप्त असलेल्या आणि कुठल्याही साहित्यिक गटातटात न वावरणाऱ्या प्रसिद्ध बालसाहित्यिका म्हणजे माधुरी पुरंदरे. याचे एक कारण बहुधा हे असावे की, त्या केवळ बालसाहित्यिका नाहीत. चित्रकार, गायक, अभिनेत्या, चरित्रकार, अनुवादक, सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांना कुठल्याही एका साच्यात बसवता येत नाही. त्यांनीही सुरुवातीपासूनच हे साचे आपल्यापुरते मोडून काढण्याचा प्रयत्न केला. जे काही करायचे ते मनापासून करायचे, त्यात तनमनधन झोकून द्यायचे, हा त्यांचा बाणा असल्याने त्यांचे साहित्य, संगीत, अभिनय, चरित्रलेखन अशा प्रत्येक क्षेत्रातले काम वाखाणण्याजोगे आहे. आपल्या ‘टर्म्स अँड कंडिशन्स’वर जगणारी माधुरीताईंसारखी माणसे आपल्या समाजात असणे, हे आजच्या अराजकसदृश काळात मोठा दिलासा ठरतो. साहित्यापासून अभिनयापर्यंत प्रसिद्धीच्या क्षेत्रात राहूनही त्या कधी प्रसारमाध्यमांना फारसे आपल्या जवळ फिरकू देत नाहीत. आपले काम आपल्या मस्तीत करणे, हा पं. सत्यदेव दुबे स्टाइल बाणा त्यांच्याकडेही आहे.
वयाच्या साठीनंतर मात्र माधुरीताई थोड्याशा ‘सामाजिक’ होऊ लागल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनात ज्योत्स्ना प्रकाशनाने केवळ माधुरीताईंच्या साहित्याचे स्वतंत्र ग्रंथदालन करण्याची कल्पना त्यांच्यापुढे मांडली, तेव्हा त्याला त्या होकार देतील की नाही हा सर्वांत कळीचा मुद्दा होता. पण माधुरीताईंनी त्याला होकार दिला एवढेच नव्हे तर एक दिवस त्या ग्रंथदालनात रसिकवाचकांच्या भेटीसाठीही थांबल्या. त्याआधी त्यांनी टाटा लिट फेस्टच्या वतीने दिला जाणारा बालसाहित्यासाठीचा पुरस्कार मुंबईमध्ये येऊन स्वीकारला होता. आणि परवा मुंबईच्याच भाऊ दाजी लाड संग्रहालयात त्यांनी आपला शब्द-चित्र प्रवास उलगडून सांगताना मराठी भाषेविषयी काही मौलिक निरीक्षणे परखडपणे मांडली. ‘बनवणे’ या क्रियापदाने मराठीमध्ये सध्या जो काही धुमाकूळ घातला आहे, त्याविषयी त्यांनी तीव्र खंत व्यक्त करत भाषाशिक्षण, बालसाहित्य याविषयीही तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांची खंत अतिशय रास्त आहे. त्यांनी उदाहरणे देत मराठी भाषेच्या सौष्ठवाचा ऱ्हास आणि अध:पात याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने शंखनाद करणाऱ्या आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत कसा नाही, यासाठी ओचेकोचे सरसावून चर्चा करणाऱ्यांच्या मनापर्यंत, काळजापर्यंत आणि संवेदनेपर्यंत ते पोहचेल का? कदाचित नाही. कारण मराठी भाषेच्या नावाने गळा काढत राहिल्याने आपल्या पोटापाण्याची सोय होत असेल तर कोण कशाला आपल्या जिवाला घोर लावून घेईल? केवळ महाराष्ट्र सरकारच मराठी भाषेविषयी उदासीन आहे अशातला प्रकार नाही. मराठी समाज, मराठी साहित्यिक, मराठीचे प्राध्यापक-शिक्षक, पत्रकार सारेच मराठी भाषेविषयी कमालीचे उदासीन आणि बेफिकीर आहेत. वरवर पाहता असे दिसते की, सरकार मराठी भाषेविषयी किती काय काय करत असते. पण मराठी विश्वकोशासारखा एक प्रकल्प पूर्ण करायला या सरकारच्या एका विभागाला ३०-४० वर्षे लागतात, यातूनच या सरकारच्या आणि विश्वकोशासाठी काम करणाऱ्यांच्या वकुबाचा अंदाज येतो. गेल्या पंचवीस वर्षांत जागतिकीकरणाने जी काही सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आव्हाने उभी केली आहेत, त्यात मराठी भाषेसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण त्याविषयी कुणीही गंभीर नाही. या पंचवीस वर्षांच्या काळात एकच गोष्ट झाली आहे. मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने गळा काढण्याची फॅशन सरकारपासून साहित्यिकांपर्यंत आणि प्रकाशकांपासून प्राध्यापकांपर्यंत सर्वत्र बोकाळली आहे. हल्ली जो तो मराठी भाषेच्या नावाने गळा काढत असतो. पण गेल्या पंचवीस वर्षांत संगणकामुळे, मोबाईलमुळे, सोशल मीडियामुळे जे नवीन शब्द तयार झाले आहेत, त्यांना समर्पक मराठी प्रतिशब्द तयार करण्याचे काम प्रसारमाध्यमे, प्राध्यापक, साहित्यिक, कोशकार यांच्यापैकी कुणी केले आहे का? फार जुने सोडून द्या, पण गेल्या पंचवीस वर्षांत मराठीमध्ये कुठले नवीन शब्द आले, रुळले याविषयी तरी कुणी तपशीलवार सांगू शकेल का? सरसकट इंग्रजी, हिंदी या भाषेतून शब्दांची जी उचलेगिरी मराठीमध्ये चालू आहे, त्यावर काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न कुणी केला आहे का?
शब्दकोश, विश्वकोश, ज्ञानकोश यांची एकेकाळी मराठीमध्ये समृद्ध परंपरा होती. श्री. व्यं. केतकर यांनी तर एकट्याच्या बळावर ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’सारखे अवाढव्य काम केवळ बारा वर्षांत पूर्ण करून दाखवले. त्या तोडीचे काम पैसा, साधनसंपत्ती, मनुष्यबळ, सुविधा असूनही राज्य सरकारच्या विश्वकोशमंडळालाही करता आले नाही. हा विश्वकोश अलीकडेच पूर्ण झाला आहे. त्यावरून या मंडळाने आणि सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेतली खरी, पण हा विश्वकोश इतका आउटडेटेड आणि निरुपयोगी झाला आहे की, तो शालेय विद्यार्थ्यांच्याही कामाचा नाही, याविषयी महाराष्ट्रात कुणीही ब्र उच्चारण्याचे धाडस दाखवलेले नाही.
असाच प्रकार मराठी प्राध्यापकांच्या लेखनाचा. त्यातही समीक्षा लेखनाचा. हीच बहुतांश मंडळी मराठीमधील साहित्यिक म्हणून गणली जातात. पण यांचे लेखन वाचले तर कुणाच्याही लक्षात येईल की, यांनी मराठी भाषेला ‘फोले पाखडितो आम्ही’ या स्थितीला नेऊन ठेवले आहे. निरुपयोगी, कुचकामी, आशयहीन परिभाषेचा उपयोग करून आपण काहीतरी मौलिक सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत, या अभिनिवेषापलीकडे त्यांच्या लेखनात दुसरे काहीही फारसे सापडत नाही. यूजीसीच्या नियमामुळे शोधनिबंध, पुस्तके यावर वेतनवाढ, पदश्रेणी अवलंबून असल्याने ही मंडळी वारेमाप लेखन करतात, पण त्याचे वर्णन ‘सुमार’ या शब्दाच्या पलीकडे जाऊन करता येणे शक्य नाही. कविता, कादंबऱ्या, कथा या ललितवाङ्मयप्रकाराने तर केवळ ‘आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा’ तयार करण्याचेच काम चालवले आहे. पण हेच लोक मराठी भाषेच्या नावाने मोठ्या प्रमाणात गळे काढताना दिसतात. कारण त्यांनी स्वत:च्या नावाने छापलेली रद्दी इतरांनी वाचावी, यासाठी मराठी भाषेचे भवितव्य हे गळा काढण्याचे नामी अस्र आहे.
प्रसारमाध्यमांनी एकेकाळी नवनवीन शब्द घडवण्याचे काम केले. केसरी, नवाकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशा वर्तमानपत्रांनी कितीतरी नवीन शब्द घडवले. ‘नोकरशाही’, ‘मध्यमवर्ग’, ‘कात्रजचा घाट’ असे कितीतरी शब्द ‘केसरी’ने मराठीमध्ये रूढ केले क्रिकेटमधील ‘कॅच’, ‘एलपीडब्ल्यू’, ‘आऊट’ यांसारख्या इंग्रजी शब्दांसाठी ‘झेल’, ‘पायचित’, ‘बाद’ हे मराठी प्रतिशब्द रूढ करण्याचे श्रेयही एका मराठी वर्तमानपत्रालाच जाते. पण गेल्या पंचवीस वर्षांत मराठी वर्तमानपत्रांनी मराठी भाषा घडवण्याऐवजी ती उत्तरोत्तर बिघडवण्याचेच काम चालवले आहे. अनावश्यक भाषिक कोट्या, निरुपयोगी भाषिक खेळ, अर्थहीन शाब्दिक कसरती याच्यापलीकडे मराठी वर्तमानपत्रांची भाषिक इयत्ता जायला तयार नाही.
हाच प्रकार बालसाहित्याबद्दल आहे. माधुरीताई आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, “विंदा, पाडगावकर, बापट आदी १९६० च्या दशकातील पिढीनंतरच्या मराठी साहित्यिकांनी मुलांसाठी खास म्हणून काही लिहिले नाही. याच काळात बालसाहित्य म्हणून आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अनेक पुस्तके येत राहिली; पण आदली पिढी बालपणीच विंदा- बापट- पाडगावकरांचा ‘कसदार’ संस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञ राहाते; तर त्याच कवितांमधले अनुभवविश्व पुढल्या पिढ्यांतल्या मुलांना परके वाटते.” अगदी योग्य निरीक्षण नोंदवले आहे त्यांनी. कारण मुलांसाठी लिहिणे हे सर्वाधिक जोखमीचे काम असते, याचे भानच नंतरच्या मुलांसाठी लेखन करणाऱ्या बहुतेकांकडे नव्हते, नाही. त्यांना मुलांसाठी लिहिणे म्हणजे शाब्दिक गमतीजमती, नीतीमत्तेचे डोस आणि प्राणीकथा असेच वाटत राहिले. थोडक्यात त्यांचा मुलांसाठी लेखन करण्यामागचा दृष्टिकोन अतिशय सामान्य राहिला. ज्यांना मोठ्यांसाठी लिहिता येत नाही अशीच बरीचशी मंडळी केवळ लेखनाच्या हौसेखातर मुलांसाठी लिहू लागली. त्यांच्याकडे ना कल्पनांचे नावीन्य दिसते, ना काही सांगण्यासारखे. असे लोक वाईटच लेखन करू शकतात.
माधुरीताईंनी मुलांसाठी लिहिलेली पुस्तके हा मराठीतल्या बालसाहित्याचा सर्वोच्च मानदंड ठरायला हवा होता. ‘वाचू आनंदे’, ‘लिहावे नेटके’, ‘चित्रवाचन’, ‘आमची शाळा’, ‘राधाचं घर’ यांसारखी पुस्तके मुलांसाठी कसे लिहावे याचा वस्तुपाठ आहेत. पण ते लक्षात कोण घेतो?
‘‘‘वाचू आनंदे’चा पुढला भाग काढू या असं म्हटलं तर कोणाचं लिखाण त्यात असेल, असा प्रश्नच पडतो मला’’ किंवा ‘‘आठ-नऊ वर्षांच्या पुढल्या वयातल्या मुलांसाठी मराठीत काही लिहिलं जात नाही’’ ही माधुरीताईंची वाक्ये अतिशय जळजळीत आहेत. पण बहुधा त्याकडे मराठी सारस्वतनामक जमात अहंता, आत्मप्रौढी एवढ्याच दृष्टिकोनातून पाहण्यापलीकडे काही करणार नाही. या मंडळींना हा प्रश्नही पडणार नाही की, माधुरीताई आत्मसमर्थन वा आत्मप्रौढी या शब्दांच्या वाऱ्यालाही कधी उभ्या राहिलेल्या नाहीत.
‘आपण केवळ मराठी भाषेचा अभिमान बाळगतो, कारण अभिमान बाळगण्यासाठी काही करावं लागत नाही’ हे माधुरीताईंचे शब्दही अनेकांना कळणार नाहीत. त्यावर ही मंडळी असा प्रतिवाद करतील की, ‘म्हणजे काय? आम्ही मराठी बोलतो, मराठी लिहितो, मराठीमध्येच विचार करतो आणि मराठीमध्येच जगतो. आणखी काय करायला हवं आम्ही?’ कुठलीही भाषा केवळ एवढे केल्याने जगत, तगत नसते, हे उमगायला भाषाशास्र नीट समजून घ्यायला लागेल. दोन डॉक्टर किंवा दोन वकिल किंवा दोन शास्त्रज्ञ आपल्या कामाविषयी पूर्णपणे मराठीमध्ये संवाद करू शकतात का? एकही इंग्रजी शब्द न वापरता ते बोलू शकतात का? मग कुठल्या तोंडाने मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी आम्ही कांगावा करावा? दोन डॉक्टर किंवा दोन वकिल किंवा दोन शास्त्रज्ञ यांना अस्सखलित मराठीमध्ये बोलता यावे, यासाठी या क्षेत्रातील परिभाषा मराठीमध्ये रूढ व्हायला हवी. त्यासाठी मराठी प्रतिशब्द तयार केले जायला हवेत. पण ते कोण करणार?
वेगवेगळ्या शब्दांचे कोश त्या भाषेत नव-नव्या शब्दांची भर घालण्याचे काम करत असतात. त्यामुळे शब्दकोशांची संख्या जास्त असायला हवी. भाषा समृद्ध करण्यासाठी ते आवश्यक असतात. पण चांगले शब्दकोशच नसतील तर ते होणार कसे? सध्या बाजारात उपलब्ध असलेला कुठला ‘इंग्रजी-मराठी शब्दकोश’ उत्तम म्हणावा असा आहे, या प्रश्नांचे उत्तम फारसे समाधानकारक नाही. कारण या कोशांच्या नव्या सुधारित आवृत्त्या, पुरवण्या ज्या सातत्याने प्रकाशित व्हायला हव्यात, त्यांच्या अद्ययावतीकरणाचे जे प्रयत्न व्हायला हवेत, तेच होताना दिसत नाहीत. त्यामुळे सोवनी, नवनीत आणि ऑक्सफर्ड मराठी हेच तीन कोश वापरावे लागतात. पण हे तीनही कोश फारच अपुरे आहेत, मात्र त्यांच्याशिवाय पर्यायही नाही! अशीच इंग्रजी-मराठी आणि मराठी-मराठी या शब्दकोशांचीही अवस्था आहे. मराठी-मराठी शब्दकोशामध्ये प्र. न. जोशी यांचा ‘आदर्श मराठी शब्दकोश’ हाच काय, तो त्यातल्या त्यात चांगला म्हणावा असा कोश. पण तोही बहुतेकांना माहीत नसतो.
शब्दकोश, वाक्यसंप्रदाय कोश, संज्ञा-संकल्पना कोश अशा चढत्या क्रमांच्या कोशांची सतत निर्मिती होणे आणि त्यांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित होणे, हा भाषेच्या समृद्धीचा आणि वाढीचा उत्तम पर्याय असतो. पण तेही होताना दिसत नाही. मग भाषिक वृद्धी व समृद्धी होणार तरी कशी?
भाषा ही सतत प्रवाही असते. त्या प्रवाहाला तुम्ही कसे वळण देता, यावर तिची वृद्धी आणि समृद्धी होत जाते. नुसत्या साहित्याने भाषेची वाढ आणि समृद्धी होत नाही. दर्जेदार साहित्य फक्त भाषेला स्थिरत्व देते, असे ‘मराठी भाषा - उद्गम आणि विकास’कर्ते कृ. पां. कुलकर्णी यांनी म्हटले आहे ते खरेच आहे.
भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा प्रवाह सतत सशक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. काळाच्या गतीनुसार भाषा बदलत असते आणि समाजही. त्यामुळे त्या गतीने भाषेमध्ये नव्या नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची निर्मिती होणे गरजेचे असते.
इंग्रज अधिकारी भारतीय कनिष्ठ अधिकाऱ्यांना ‘You damned rat!’ आणि ‘You damned beast!’ अशा शिव्या देत असत. त्यावरून मराठीत ‘डांबरट’ आणि ‘डँबीस’ हे शब्द आले असल्याचे भाषावैज्ञानिक डॉ. अशोक केळकर यांनी म्हटले आहे. ‘कँडल’वरून ‘कंदिल’, ‘रँक’वरून ‘रांग’, ‘फ्लॉवर’वरून ‘फुलवर’, ‘रॉक आईल’वरून ‘रॉकेल’ असे मराठी प्रतिशब्द रूढ झाले.
गेल्या पंचवीस वर्षांत असे किती शब्द मराठीमध्ये रूढ झाले आहेत? याचा कुणी अभ्यास केला आहे? त्याविषयी कुणाला काही माहीत आहे? असे शब्द तयार करण्याचे काम मराठी पत्रकार, साहित्यिक, प्राध्यापक यांच्यापैकी कुणी किती प्रमाणात केले आहे? ज्यांनी केले आहे त्यांना कुणी पाठबळ दिले आहे?
आम्ही फक्त मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने गळा काढणार आणि भाषिक प्रेमाच्या नावाखाली इतरांना ‘बनवत’ राहणार! इंग्रजी माध्यमाच्या शाळा, टीव्ही यांच्यावर खापर फोडत राहणार! या पलीकडे आपण दुसरे काहीच करू शकत नाही. त्यामुळेच तर हिंदीतील ‘बनाना’ हा शब्द मराठीमध्ये अवतरून मराठीमधील त्याच्यापेक्षा उत्तम, सरस आणि अनेक सूक्ष्म अर्थछटा असणारी कितीतरी क्रियापदे सहजपणे फस्त करून टाकतो! ही इतकी साधी गोष्टही माधुरीताईंनी सांगितल्यावर तरी आमच्या लक्षात येईल की नाही, हाही प्रश्नच आहे.
editor@aksharnama.com