Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts
Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts

Sunday, May 24, 2026

पुस्तक परिचय

आजच्या तरुण भारत, जळगाव आवृत्तीत समीक्षक, लेखक श्री किशोर कुलकर्णी यांनी माझ्या मर्दानी राणी लक्ष्मीबाई ( अनघा प्रकाशन, ठाणे ) या पुस्तकावर लिहिलेलं पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. कुलकर्णी सरांचे मनापासून आभार. सोबत परीक्षण टेक्स्ट स्वरूपात खाली दिले आहे. 

*झाशीची राणी : पराक्रमाची अमर ज्योत* 
राणी लक्ष्मीबाई पराक्रम, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम यांचे तेजस्वी प्रतीक. कवीश्रेष्ठ भा.रा. तांबे यांच्या अमर ओळी “ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली” आजही भारतीयांच्या मनात जाज्वल्यतेने घुमतात. झाशीच्या राणीचे अदम्य धैर्य, तिचा स्वाभिमानी स्वभाव आणि मातृभूमीवरील निष्ठा हीच तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरते. लेखक रामदास खरे यांनी या तेजस्वी जीवनपटाला ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकातून प्रभावी, ओघवत्या आणि सुबोध शैलीत शब्दबद्ध केले आहे. अनघा प्रकाशन यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित केलेले हे पुस्तक वाचकांना इतिहासाच्या एका ज्वलंत पर्वात घेऊन जाते. झाशीच्या रणांगणावर घुमणाऱ्या तलवारीच्या झंकारासारखीच या पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचकांच्या मनात धैर्याची साक्ष जागविते.
सुमारे चाळीस वर्षे मनात जपलेली राणी लक्ष्मीबाईंच्या कर्तृत्वाची प्रेरणा लेखकांनी ४० छोट्या पण आशयघन प्रकरणांत मांडली आहे. काशी नगरीतील चंचल ‘मनू’पासून झाशीच्या सिंहासनापर्यंतचा प्रवास, वैवाहिक जीवन, पुत्रशोक, पतीवियोग, इंग्रजांचा कपटी डाव, लॉर्ड डलहौसी यांचे दत्तकविरोधी धोरण, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची धग, मंगल पांडे यांची ठिणगी, तात्या टोपे यांची साथ आणि रणांगणातील निर्णायक संघर्ष, प्रत्येक प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. “मेरी झाशी नहीं दूंगी” ही घोषणा केवळ शब्द नव्हते, ती एका कणखर स्त्रीच्या अदम्य राष्ट्रनिष्ठेची जाज्वल्य शपथ होती, याची प्रकर्षाने जाणीव हे पुस्तक करून देते.
झाशीचे वैभव एका क्षणात उद्ध्वस्त झाले, नियतीने कठोर वळण घेतले; पण संकटांसमोर झुकणे हा राणींच्या स्वभावातच नव्हता. लहानग्या दामोदरराव यांना पाठीशी बांधून रणभूमीत उतरलेली ही रणरागिणी भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक ठरली. इंग्रज सैन्याशी दोन हात करताना त्यांनी दिलेले बलिदान म्हणजे इतिहासातील तेजस्वी केशरी ज्वाला होय. अल्पायुष्यातही त्यांनी निर्माण केलेले तेज आजही भारतीय अस्मितेला प्रेरणा देत राहते.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राणींच्या बलिदानानंतर दामोदररावांच्या आयुष्यात आलेल्या दारुण वास्तवाचे केलेले हृदयस्पर्शी चित्रण. एकेकाळी झाशीच्या वैभवाचा वारस असलेला हा मुलगा इंग्रजांच्या दडपशाहीमुळे गावोगावी आश्रय शोधत फिरला, उपासमारी, भीती, अपमान आणि तुटपुंज्या पेन्शनवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. इतिहासातील हा कमी परिचित पण अंतर्मुख करणारा अध्याय लेखकांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे.

 जळगाव जिल्ह्यातील पारोळा भुईकोट किल्ला आणि राणी लक्ष्मीबाई यांचा संबंध अत्यंत ऐतिहासिक, भावनिक आणि अभिमानास्पद आहे.
लक्ष्मीबाईंचे आणि आपल्या कान्हदेशाचे अत्यंत भावनीक नाते आहे. पारोळा हे गाव केवळ ऐतिहासिक किल्ल्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर झाशीच्या राणीच्या कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळेही विशेष ओळखले जाते. पारोळा येथील किल्ला नेवाळकर घराण्याचा होता. झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे नातेवाईक असलेल्या नेवाळकरांनी हा किल्ला उभारला होता. स्थानिक इतिहासानुसार राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे तांबे कुटुंबही पारोळा परिसराशी जोडले गेले होते. त्यामुळे पारोळ्याला “झाशीच्या राणीचे मूळ गाव” अशीही ओळख मिळाली. संबंधातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राणींचे दत्तक पुत्र दामोदरराव (जन्मनाव आनंदराव) यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ रोजी पारोळ्यात झाल्याची नोंद आढळते. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. पुढे हाच आनंदराव झाशीच्या गादीचा दत्तक वारस बनला. 
आज राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदानाला दीडशेहून अधिक वर्षे उलटली, तरी त्यांचे शौर्य काळाच्या पडद्याआड गेलेले नाही. साहित्य, संगीत, चित्रकला, नाट्य, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्राला प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व आजही तितकेच तेजस्वी आहे. ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ हे पुस्तक केवळ चरित्र नाही; तो भारतीय स्वाभिमान, स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्याच्या अखंड ज्योतीचा दस्तऐवज आहे. इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पिढीने वाचावे, जपावे आणि पुढे न्यावे असे हे प्रेरणादायी पुस्तक ठरते.

पुस्तक परिचय - किशोर कुळकर्णी, जळगाव. मो. ९४२०६०७०५९


Sunday, April 19, 2026

पुस्तक परिचय

नमस्कार,
आजच्या महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणीत राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या #जगणं_होईल_हिरवंगार या माझ्या कवितासंग्रहावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी लिहिलेले परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. सावंत सरांचे आणि म.टा. संपादकांचे मनःपूर्वक आभार. 🙏🌿

जगणं सुंदर करणारी कविता 
...........................................

एखाद्या साहित्यिकाचे एखाद्या वाङ्मयप्रकारांतील कार्य अधोरेखित झाले, की इतर वाङ्मयप्रकारांतील त्याचे लेखनकर्तृत्व झाकोळले जाते किंवा नजरेआड केले जाते. बालसाहित्यकारांच्या बाबतीत तर हे हमखास घडते. एकदा का तुमच्यावर 'बालसाहित्यकार' असा शिक्का बसला, की मग तुमच्या उर्वरित वाङ्मयप्रकारांतील लेखनाकडे दुर्लक्ष होऊ शकते. एकनाथ आव्हाड यांच्या बाबतीत हे विधान अगदी खरे आहे. खरं तर सोपं लिहिणं ही अवघड गोष्ट आहे, पण एकनाथ आव्हाड यांना ती साध्य झाली आहे. एकनाथ आव्हाड हे अव्वल दर्जाचे बालसाहित्यकार आहेत. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या बालसाहित्याच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेल्या कवितेकडे म्हणावे तसे लक्ष वेधले गेले नाही. एकनाथ आव्हाड यांच्या सहज सुंदर कवितेकडे साहित्यविश्वाचे लक्ष वेधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

एकनाथ आव्हाड हे गेली ३०-३५ वर्षे साहित्यसाधना करत आहेत, म्हणजे ते केवळ बालसाहित्यच लिहीत आहेत, असे नव्हे. त्यांनी इतर वाङ्मयप्रकारांतही लक्षणीय लेखन केले आहे. त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेली कविता आता 'जगणं होईल हिरवंगार' ह्या संग्रहरूपात येत असली, तरी ते काही नवोदित कवी नाहीत. त्यांचा कवितेचा व्यासंग जुनाच आहे. त्यांना चांगली 'कविता' लिहिता येते, म्हणूनच त्यांची 'बालकविता' साहित्य अकादमीकडून सन्मानित झाली आहे. कवीला शब्दांचे सामर्थ्य समजलेले आहे. म्हणूनच कवीने
'कसं सांगू शब्दांनी
मला काय दिलं?
सच्चेपणा, निर्मळ मैत्री
माझं मन जागं केलं'.
ह्या शब्दांत शब्दांचे ऋण व्यक्त केले आहे.
हा कवी शब्दांचा ऋणाईत आहे. ही कविता अभिव्यक्तीच्या स्तरावर फारच प्रांजळ आहे. 'जगणं होईल हिरवंगार' ह्या शीर्षकातही एक अटळ विश्वास आणि दुर्दम्य आशावाद व्यक्त झाला आहे. 

ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्र बिघडले आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेकांच्या घागरी उताण्या पडल्या आहेत. घोटभर पाण्यासाठी सर्वत्र वणवण चालली आहे. दुष्काळाच्या झळा ठाण मांडून बसल्या आहेत. गावाला आणि आयुष्याला विळखा घालून. राज्यकर्त्यांची संवेदनशून्यता ह्या दु:खात आणखी भर घालते आहे. त्यामुळे अस्वस्थता, अस्थिरता आणि अशांतता व्यापून उरली आहे, घरात आणि मनातही! प्रत्येकाचे
'दोन्ही हात अडकलेत
वांझोट्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी
निराशेचा काळोख
अधिकच गडद झालाय'.
असं भोवतालाचं गडद चित्र ही कविता उभे करते.

संगणकयुगात मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावत चालल्याची खंत ही कविता व्यक्त करते.
'इथे काहींच्या पायाला
भिंगरीसारखी चाकं
आणि काही फुटलीत अहंकाराची टोकं.'
अशा शब्दांत ही कविता समकाळावर अचूक भाष्य करते. आभासी दुनियेतली कुचंबणा ही कविता शब्दांत बांधते.
'ऑनलाईन' ह्या कवितेत कवीने आभासी जगाची मनोवस्था नेमकेपणाने पकडली आहे.
'फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली म्हणजे नातं सुरू
आणि अनफॉलो केलं म्हणजे शेवट
इतका सहज आणि भावनाशून्य झालाय
नात्यांचा व्यापार.
आजच्या डिजिटल जगात चमकणारी नाती
फॉलोअर्स वाढले की आनंद देतात
प्रतिसाद कमी होताच अस्वस्थता वाढवतात.
इथे अट एकच
ही आभासी नाती टिकवण्यासाठी
मनात ओलावा नसला तरी चालेल,
पण सतत ऑनलाईन मात्र असलं पाहिजे'.
ह्या कवितेत उपहास आहे आणि उपरोधही आहे. वास्तवाला भिडणारी ह्या कवितेची ताकद वाखाणण्यासारखी आहे.

कवीच्या भावविश्वात आईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. डोक्यावरील पाटीतून भाजीपाला विकून मुलाला घडविणाऱ्या मातेबद्दल कवीला नितांत आदर आणि कृतज्ञता वाटणे स्वाभाविकच आहे. प्रस्तुत संग्रहातील आईविषयक १३ कविता म्हणजे कवीची आणि आईची नाळबंधाची कहाणीच आहे. यांतील काही कविता आईचे स्वभावचित्र रेखाटतात. 
'तिचे घरात पाऊल पडताच
सूर्यप्रकाशाची तिरीप आली घरात
आणि काळवंडलेला घराचा 
हळूहळू प्रकाशमान व्हायला लागला'
हा कवीचा अनुभव आहे. असे वळण घेत ही कविता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. 
कुठल्याही विद्यापीठात न गेलेली कवीची आई कवीला सोप्या सोप्या गोष्टींतून जगणं सोपं करून सांगत असते. आईने साध्यासुध्या गोष्टींतून कवीच्या मनावर कृतज्ञता हे मूल्य जाणीवपूर्वक बिंबवले आहे. त्यामुळे कवी कृतज्ञता हे जीवनमूल्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतो. 

वठलेल्या झाडालाही पालवी फुटते. आंतरिक धडपडीतून नदीला तिचा स्वतंत्र मार्ग सापडतो. प्रतिकूल परिस्थितीतही पक्षी आपले घरटे घडवतात. धरतीची व्याकूळता पाहून आभाळालाही पान्हा फुटतो. हे सगळे दाखले देऊन आई म्हणते
'आपल्यालाही असंच 
झाडासारखं रुजून येता आलं, 
नदीसारखं पुढे जाता आलं, 
आभाळासारखं विशाल होता आलं
अन् पाखरासारखं 
चिवटपणे जगण्याला तोंड देता आलं की
जगणंही आपल्याकडं हरखून पाहतं
अशा वेळी अंगावर धावणाऱ्या अंधारालाही
निक्षून परतवून लावता येतं' 
अशा प्रकारे जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारी आणि प्रकाशाची वाट दाखविणारी श्रममूर्ती आई हे कवीच्या आयुष्यातील प्रकाशाचे बेट आहे. ह्या कवितेतली मातृप्रतिमा ही अतिशय उच्च कोटीतली आहे. 

हल्ली माणसा-माणसांतला संवाद हरवला आहे. अशा परिस्थितीत कवीची अशिक्षित आई कवीला म्हणते
'जगाशी बोलायला धावताना 
आधी स्वतःशी बोल, थोडा वेळ काढून 
आतला आवाज ऐक, अधीर होऊन. 
मग संवाद फुलून येईल आपसूक फुलासारखा'. 
इतका छान, आत्मसंवाद साधण्याचा सल्ला देणा-या आईला अशिक्षित कसे म्हणता येईल? 
जेव्हा कवी आपला पहिला पगार आईच्या हाती सोपवतो, तेव्हा हीच आई म्हणते, 
'कष्टाला अहंपणा चिकटू देऊ नकोस 
यश तेव्हाच शोभून दिसेल'. 
अहंपणाचा आणि कर्मफळाचा त्याग करायला शिकवणारी आई स्थितप्रज्ञ खरी! 
लेकरांची झोपमोड होऊ नये, त्यांची पहाटस्वप्नं कोमेजू नयेत, म्हणून घरात हळुवार काम करणारी आई दिवसरात्र कुटुंबासाठी राबत असते. म्हणून कवीला आपल्या आईची सावली डेरेदार झाडासारखी वाटते. एकनाथ आव्हाड यांची कविता सोप्या शब्दांत जगण्याचे मर्म सांगून जाते. 

ही आई एकदा म्हणते, 
'आयुष्याची वाट तुडवताना 
माणसानं जर वाटेत सौख्याच्या बिया पेरल्या ना
तर जगण्याचं समाधान लाभतं त्याला'. 
इतरांच्या वाटेवर सौख्याच्या बिया पेरण्याची शिकवण देणारी आई आभाळासारखी थोर असणार यात शंकाच नाही. आईच्या शिकवणीची उजळणी करताना कवीने लिहिले आहे :
'माझ्या प्रकृतीत तिची संस्कृती रुजवून
माझ्या बेढब मनाला ती आकार देत असते'. 
ह्या श्रमवंत आईची कथाच निराळी आहे. ती कष्टाचं रान तुडवत आशेची फुलं वेचायची. अंगात हत्तीचं बळ घेऊन पडेल त्या कामाला जुंपून घ्यायची. तिने चांदणं बरसणारा चंद्र दूर लोटून प्रकृतीला साद घालणारा सूर्य जाणीवपूर्वक पदरात बांधून घेतला होता. एकनाथ आव्हाड यांची कविता त्यांच्या स्वभावासारखीच शांत आणि संयत आहे. ती कधीही आक्रमक आणि आक्रस्ताळी होत नाही, तर वाचकमनाशी सहजसंवादी अशी ही कविता आहे. 

आई ही आपला पहिला गुरू असते, म्हणून कवीला आपल्या आईची शिकवण ही शिकवणीसारखी वाटत नाही, तर ते तिच्या अनुभवाचं संचित आहे, असे कवीला वाटते. ह्या अनुभवसंपन्न आईच्या मुखातून जीवनाचं तत्त्वज्ञानच झिरपते आहे. अशा १३ कवितांमधून कवीने आपल्या आईच्या आयुष्याची परवड, तिचे दु:ख, तिचे थोरपण, तिचे समर्पण, तिचा त्याग, तिची हिंमत आणि तिची जीवनाभिमुख शिकवण सांगितली आहे. ह्या कविता वाचत असताना कवी महन्मंगल मातृस्तोत्र गुणगुणतो आहे, असेच वाटत राहते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे. कविसंमेलनांतून टाळ्या मिळवणारी ही कविता नाही, तर अतिशय चिंतनशील अशी ही कविता आहे. 

आईच्या शिकवणीतून जसे जगण्याचे तत्त्वज्ञान प्रगटले आहे, तसेच अन्य काही कवितांमधूनही ते वाचकांपर्यंत पोहोचले आहे. हल्ली 'समजूतदारपणाची गैरहजेरी' वाढली आहे. माणूस दिवसेंदिवस असमंजस आणि हिंस्र बनत चालला आहे. अशा परिस्थितीत कवीने लिहिले आहे :
'भांडणाचे रूपांतर मग वैरात
दुर्विचारांची विषवल्ली
फोफावते आयुष्यात
आणि मग
मनाचे कवाड
कुलूपबंद होऊन जाते
खरंच...
समजूतदारपणाची गैरहजेरी लागली की
सगळंच कसं भयंकर होऊन जातं'.
आणि हे भयंकर परिणाम टाळायचे असतील, तर समजूतदारपणाला पर्याय नाही, हेच कवीने यातून सूचित केले आहे.

मानवी जीवनात दु:ख सर्वव्यापी आहे, हे खरेच
पण दु:खालाही आपलंसं केलं,
दु:खातच सुख शोधलं, की
दुखावलेली, दुरावलेली,
दुभंगलेली मनं,
आयुष्याशी जुळवून घ्यायला
शिकतात हळूहळू.
तेव्हा सोपं होऊन जातं जगणं
आपण आपल्या लोभापायी, हट्टापायी
ते उगीचच अवघड करून टाकतो'.
ह्या कवितेत कवीने जणू जगणं सोपं करण्याचाच मूलमंत्र दिला आहे. ही कविता निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मुक्तीचे मार्गही सुचविते. कवीची ही सकारात्मक जीवनदृष्टी मला फार महत्त्वाची वाटते. 

मानवी हव्यासाने हल्ली परमावधी गाठली आहे. सतत यशस्वी होण्यासाठी चाललेल्या धडपडीमुळे, फसव्या सुखाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावाधाव केल्यामुळे अंतःकरणातील अंधार वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत कवी म्हणतो :
'हे दुष्टचक्र भेदण्यासाठी
आता एकच पर्याय उरलाय
प्रत्येकाने दीप व्हावे
आपल्या मनात उजेड भरून घ्यावा
अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळविण्यासाठी'.
ही कविता म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या 'अत्त दीप भव' ह्या संदेशाचा विस्तार आहे, असे मला वाटते. ही कविता मनाच्या संकुचितपणाला हादरे देते आणि सद्विचारांना सामावून घेण्यासाठी मनाचा पैस निर्माण करते. 

माणूस निसर्गापासून दुरावत गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून कवीने त्यावर एक उपाय सुचवला आहे :
'माणसं झाडासारखी वागल्याशिवाय
खरं नाही त्यांचं काही आता
आणि पाखरंही तेव्हाच परत येतील
जेव्हा माणसात एक झाड उगवून येईल'.
माणसात झाड उगवून येण्याची कल्पना काव्यमय वाटत असली, तरी ती काळाची गरज आहे, यात काही शंकाच नाही.
कधीकधी 
'बाहू पसरून झाडे
घेती कवेत आभाळ
आभाळाच्या गळ्यात
सावळ्या मेघांची माळ'
अशा तरल शब्दांत ही कविता निसर्गचित्र रेखाटते.

घर म्हणजे केवळ दगड-विटांनी बांधलेला चार भिंतींचा आडोसा नसतो, तर ऊब, शांतता आणि मोकळा श्वास असतो. घर म्हणजे उत्साह, चैतन्य आणि ओढ असते. घर म्हणजे अस्तित्व, स्वभाव आणि त्याला सहवासाची जोड असते. घर म्हणजे टापटीप, लख्ख नि स्वच्छ झगमग असते. घर म्हणजे आतुरता, आठवणी आणि थोडीशी तगमग असते. घर म्हणजे विश्वास, जिव्हाळा आणि निवांतपणाची जागा असते. घर म्हणजे ऋणानुबंधाचा हळवा, सचेतन धागा असते. घर म्हणजे थकलेल्या जीवांना आपुलकीचा आधार असते. घर म्हणजे आपल्या माणसांसाठी मनाचे सदैव उघडे द्वार असते. एकनाथ आव्हाड यांची ही कविता घराविषयीच्या सगळ्या हळव्या भावना उजागर करते आणि घराला घरपण बहाल करते. ह्या संपूर्ण कवितेत कवीच्या संवेदनशील मनोवृत्तीचे दर्शन घडते. 

एकनाथ आव्हाड यांची कविता म्हणजे कवीचा आत्मस्वर आहे. शिक्षकी पेशा हा केवळ कवीच्या उपजीविकेचे साधन नाही, तर तो कवीच्या पेशींचा अविभाज्य भाग बनला आहे. कवीचा श्वास बनला आहे. म्हणून त्यांच्या शाळा आणि शिक्षणविषयक कविता अतिशय प्रत्ययकारी उतरल्या आहेत.
'आता खूप वर्षांनंतर, 
ती शाळा पाहतो मी येता जाता
तेव्हा बाई तुमची आठवण येते
अन् क्षणात त्या शाळेचं देऊळ होऊन जातं'.
शाळेचं देऊळ होऊन जातं, ही केवळ कविकल्पना नाही तर कवीच्या श्रद्धेचा भाग आहे. 'सविता पटेकर.... सतत गैरहजर' हे कथाकाव्यही त्या श्रद्धेतूनच उत्कट उतरले आहे. शाळेच्या चिरेबंदी वातावरणात बालकांचा जीव गुदमरतो, याचे सजीव चित्र 'स्वागतशील' ह्या कवितेत उमटले आहे.

एकनाथ आव्हाड यांची कविता ही अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. ह्या कवितेला प्रतिमा- प्रतीकांचा अजिबात सोस नाही. अलंकारांच्या मोहात न पडणारी ही अनलंकृत कविता आहे. भावगर्भता हाच ह्या कवितेचा अनमोल अलंकार आहे. ह्या कवितेच्या साधेपणातही एक अम्लान सौंदर्य आहे. काही कवितांमधून कालिया, मिजासखोर कंस, शिशुपाल, जरासंध, नरकासुर, द्रौपदी यांसारखे पौराणिक संदर्भ येतात. इतकेच. ही कविता शेती आणि शेतकरी, मित्र आणि मैत्री, शब्दांचे सामर्थ्य, मौन पाळण्याचे महत्त्व, पंढरी आणि पांडुरंगाचे भक्त, पुस्तकांचे श्रेष्ठत्व या विषयांवर जीवीच्या जिव्हाळ्याने बोलते. काळोखाला धीर द्यायला एक पणतीसुद्धा पुरते, असा विश्वास ही कविता व्यक्त करते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही विचार देणारी आणि विचारप्रवृत्त करणारी कविता आहे. जगणं सोपं आणि सुंदर करणारी ही कविता म्हणूनच मला महत्त्वाची वाटते.

पुस्तकाचे नाव : जगणं होईल हिरवंगार ( कवितासंग्रह )
कवी : एकनाथ आव्हाड 
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी 
प्रकाशक : राजहंस प्रकाशन 
पृष्ठे : १०० ,  किंमत : १६० रुपये 

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
( सुप्रसिद्ध साहित्यिक)
sureshsawant2011@yahoo.com