आज २५ ऑगस्ट. नवकथेचे प्रणेते ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिवस. काही वर्षांपूर्वी लोकमत मध्ये लिहिलेल्या त्या लेखाचे आज स्मरण. संपूर्ण लेख खाली दिला आहेच.
"सूर्य मावळल्यावर आकाश रिकाम्या शिंपल्यासारखं दिसू लागलं, की कसं रिकामंरिकामं वाटायचं. सगळं काही हरवल्यासारखं वाटायचं.
माड डुलले की आपली मनंही डुलायची. एखादा मेघ एकाकीपणे आकाशातून तरंगत गेला, की आपणही दूर कुठेतरी निघून जायचो.
वाळूत उमटलेली पावलं आणि त्यात उमळलेला ओलावा ह्यांना केवढा गूढ अर्थ प्राप्त झाला होता तेव्हा ! तू वाळूत रेघोट्या ओढत असताना,
मी टक लावून त्यात कुठचा अर्थ शोधत होतो बरं ? आणि तेव्हा तू मला इतकी विलोभनीय वाटायचीस की, तुला स्पर्श करायची मला
भीती वाटायची.!"
१९५४ साली प्रकाशित झालेल्या "तलावातलं चांदणं" ह्या गाजलेल्या कथासंग्रहातील हा अंश. साठवर्षांपुर्वीचे हे लिखाण आपल्याला
आजही किती विलोभनीय, प्रसन्न आणि वेगळ्या अनुभूतीचे भासत आहे. मराठी नवकथेच्या क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव
श्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ. प्रयोगशीलतेला एक वेगळं, समर्थ अवकाश देणारं एक प्रसन्न व्यक्तिमत्व. मराठी साहित्य विश्वात
'नवकथेचे एक प्रणेते' म्हणून गाडगीळांचे स्थान महत्वाचे आहे. महानगरातील कल्लोळाचे यथार्थ दर्शन, यंत्रयुगीन वास्तवाची प्रखर जाण,
त्याचबरोबर मानवी मनोव्यापाराचे सूक्ष्म दर्शन आपल्या अनेक कथांमधून वाचकांना घडवणाऱ्या गाडगीळांनी मराठी वाचकाला समृद्ध केले,
एक वेगळी दिशा दिली, नवी दृष्टी दिली. कथालेखनाव्यतिरिक्त गाडगीळांनी प्रवासवर्णने, समीक्षालेखन.,ललितलेखन, एकांकिका, किशोरकथा
असे चौफेर लेखन केले आहे. काही पुस्तकांचा अनुवाद हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये झाला आहे.
गाडगीळांनी आपली कथा 'प्रिया आणि मांजर' ही १९४१ मध्ये लिहिली व वाङ्मयशोभा मध्ये प्रकाशित झाली. १९४६ साली प्रकाशित झालेला 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह.बा. सी. मर्ढेकर यांच्यासारख्या प्रतिभाशाली कवीने १९४७ सालीच आपल्या रसपूर्ण समीक्षेद्वारे गाडगीळांच्या कथालेखनाला प्रोत्साहन दिले. पुढे प्रख्यात समीक्षक वा. ल. कुलकर्णी, रा. भि. जोशी. पु. भा. भावे यांनी गाडगीळांच्या साहित्याची यथोचित दखल घेतली. नव्या वळणाची, नव्या विचारांची,वेगळेपणाचं मर्म उलगडून सांगणारी कथा तसेच कथेच्या क्षेत्रात नव्या पायवाट ढुंढाळणारे एक प्रयोगशील लेखक म्हणून गाडगीळ लोकप्रिय झाले.
मुंबईमधील शहरी जीवनसंस्कृतीचं चित्रण गाडगीळांनी आपल्या अनेक कथांमध्ये केले. मुंबईला त्यांनी आपलेसे केले, मुंबईपण त्यांच्या सर्वांगामध्ये
जणू भिनलं. गाडगीळ हे खऱ्याअर्थाने मुंबईकर लेखक आहेत. सामाजिक परिस्थितीचे टोकदार भान, मध्यमवर्गीय माणसाची मनोवृत्ती, त्याच्या
वास्तव जीवनाचे अनेक कंगोरे, त्याच्या इच्छाआकांक्षाचं , मानवी जीवनातील विसंगती, सुखदुःखाची चित्रं, गाडगीळांनी आपल्या कथेत रेखाटली आहेत.
त्याचप्रमाणे पुरुषकेंद्री व्यवस्थेमुळे कौटुंबिक, सामाजिक जीवनात जे वादळ निर्माण होते आणि त्याचबरोबर स्त्रीचे शोषण देखील होते त्या शोषणाचं
चित्रण गाडगीळांनी मार्मिकपणे आपल्या कथांमध्ये केले आहे. गाडगीळांनी लेखनाला जेव्हा सुरवात केली तेव्हा प्रेमकथांचं अधिराज्य होते,
मात्र गाडगीळांनी जाणीवपूर्वक प्रेमकथा खूप कमी लिहिल्या. एकीकडे गंभीर कथालेखनाबरोबरच त्यांनी विनोदी कथाही लिहिल्या. मध्यमवर्गीय
माणूस हा त्यांच्या विनोदी कथांचा गाभा होता. गाडगीळांच्या कथेचा ओढा व्यक्तींच्या स्वभावधर्मापेक्षा त्यांच्या मनाच्या घडणीवर होता. लहान मुलं
ते जक्खड म्हतारा माणूस यांच्या अनोख्या मनोव्यापाराचे चित्रण गाडगीळांनी ताकदीने रेखाटले. अगदी थोड्यात सांगायचे म्हणजे गाडगीळांची
कथा आपल्या घराघरांमधून, मनामनामधून घडणारी आहे. कथांमधून संवादांचा अतिशय संयत, असा समतोल त्यांनी सांभाळला. प्रख्यात समीक्षक
श्रीमती सुधा जोशी म्हणतात, " गाडगीळांच्या कथेचे महत्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच
मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे."
२५ ऑगस्ट १९२३. जन्म मुंबईतला. प्रारंभीचे शालेय शिक्षण गिरगावातून होऊन १९३८ ला मॅट्रिक झाल्यावर १९४४ मध्ये चर्नीरोड येथील
विल्सन कॉलेजमधून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयामधून त्यांनी एम. ए केले. पुढे प्राध्यापकीचा श्रीगणेशा सुरतच्या
महाविद्यालयात सुरू करून नंतर मुंबईतील नावाजलेल्या पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल प्राध्यापक म्हणून काम पाहिले. एकीकडे सकस
कथालेखन करता करता दुसरीकडे 'अर्थतज्ज्ञ' म्हणून गाडगीळ नावाजत होते. किती विरुद्ध टोकाच्या दोन गोष्टी? एकूण आठ वर्षे मुंबईच्या नरसी
मोनजी कॉलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्राचार्य म्हणून होते.! १९७१ ते १९७६ कालावधीत आपटे समूहाचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.
१९८८ ते १९९३ या कालावधीत गाडगीळ साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष होते . एकीकडे प्राध्यापकी करीत असताना त्यांची अनेक पुस्तके ठराविक अंतराने प्रकाशित होऊ लागली. जवळजवळ ८५ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.त्यापैकी उध्वस्त विश्व, कबुतरे, तलावातले चांदणं, उन्हं, नव्या वाटा, कडू आणि गोड, खरं सांगायचं म्हणजे, वेगळं जग,रत्ने, ही पुस्तके उल्लेखनीय. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर अतिशय ताकदीने लिहिलेली 'दुर्दम्य' ही कादंबरी प्रचंड गाजली. 'आठवणींच्या गंधरेखा हे आत्मकथन. 'एका मुंगीचे महाभारत' या आत्मचरित्र पुस्तकाला १९९६ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अनेक
पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. १९८० मध्ये न.चि. केळकर आणि १९८२ मध्ये रा. श्री. जोग या पुरस्कारांनी सन्मानित. कुसुमाग्रज
प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार. अमेरिकेची प्रतिष्ठित अशी रॉकफेलर फौंडेशनची फेलोशिप त्यांना लाभली. १९८१ मध्ये रायपूर येथे संपन्न झालेल्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गाडगीळांच्या काही निवडक कथांवर आधारित 'कथागंगेच्या धारा' ही दूरदर्शन मालिका
प्रसारित झालेली रसिकांना स्मरत असेलच.
गाडगीळांचे कथाकथनाचे कार्यक्रम मी पाहिले नाहीत, स्मरतंही नाहीत. मात्र अर्थसंकल्पावर, अर्थशास्त्रावर आधारित असे दोन जाहीर
कार्यक्रम पाहिल्याचे मला स्मरते. तेदेखील ठाण्यात.! गाडगीळ वृत्तपत्रांमधून जागतिक घडामोडींवर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनेकवेळा लिहीत असत.
१९९५ च्या सुमारास कुठल्याशा वृत्तपत्रात " मराठी माणसाने आता बदलले पाहिजे" हा अभ्यासपूर्ण लेख वाचनात आला. तेव्हा नोकरीबरोबरच
एखादा छोटासा जोडउद्योग सुरू करावा असा मनात होते. त्याचवेळी नेमका तो लेख समोर.! अगदी सहजपणे त्यांना पत्र पाठवले. ११ डिसेंबर १९९५.
इतका मोठा अर्थतज्ज्ञ, लेखक, समीक्षक. एखाद्या मित्राला सल्ला देतात तसे प्रांजळपणे, स्पष्टपणे त्यांनी पत्रामधून मला उत्तर पाठवले. ते असे.
"तुम्ही अगत्यपूर्वक पत्र पाठवून 'मराठी माणसाने आता बदलले पाहिजे' हा माझा लेख आवडल्याचे कळविलत, त्याबद्दल मी मन:पूर्वक आभारी आहे.
उद्योजक होण्याच्या मार्गात किती अडचणी असतात त्याची तुम्ही दिलेली माहिती अगदी खरी आहे. परंतु त्यातूनच मार्ग काढून उद्योजक
म्हणून अनेकांनी यश मिळवले आहे. तुम्हीही याबाबतीत घाईगर्दी न करता व अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन विचारपूर्वक पावले टाकाल
व यश मिळवलं अशी मला अशा आहे. शुभेच्छा." मी उद्द्योजक न होता नोकरदारच राहिलो हा गमतीचा भाग सोडा.
गाडगीळांचे ते पत्र अजूनही पाहिल्यावर मनाला उभारी येते. प्रत्येक धडपड्या मराठी तरुणाने ह्या पत्राचा गंभीरपणे विचार करावा आणि
यशस्वी उद्योजक बनावे.
१५ सप्टेंबर २००८. एकाचवेळी साहित्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांवर प्रचंड हुकूमत असणारे नवकथेचे हे प्रणेते, प्रसन्न व्यक्तिमत्वाचे
अभिजात चांदणे कुठल्याशा तलावामधील कंपित लाटांमध्ये विखरून गेले, कायमचे.!!
(रामदास खरे, ठाणे)

0 comments:
Post a Comment