Showing posts with label राजापूरकर fb. Show all posts
Showing posts with label राजापूरकर fb. Show all posts

Saturday, July 4, 2026

मृदुंग मसाला भजी..

मृदुंग मसाला भजी....❤️
हे काय प्रकरण ऐकून काहीतरी वेगळे वाटलेच असणार. माझेही तसेच झाले. तसा मी काही खवय्या नव्हे. साईटवर असताना बहुतांशी वेळेला आपल्याला काहीतरी खायचे असते हे विसरून जाणारा. असा मी काहीतरी खाण्याच्या पदार्थावर पहिल्यांदाच लिहित आहे. 
जरा वेळ मिळाला की थोडे आडवाटेवर फिरणे हे नित्याचेच. आणि कोणी त्याच आवडीने फिरणारी मंडळी सोबत मिळाली की मग मजाच. यावेळी अजिंक्य प्रभुदेसाई, सुप्रिया गोडबोले आणि तिची मुलगी रिया यांचे सोबत राजापूर परिसरात फिरायला गेलो. भ्रमंती करून नाही म्हटले तरी पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण जेवण करायच्या ऐवजी काहीतरी अडमतडम खाऊया या रियाच्या आग्रहाखातर राजापूर शहरातील कृष्णा उर्फ पांडू करंबेळकरांच्या गणेश टी स्टॉल कडे वळलो. इथला वडापाव आणि बटाट्याची भजी फेमस.
राजापूर शहराच्या दिशेने गेलो की शिवाजी चौकातील गणेश टी स्टॉल वर चहा घेणे असा जणू आमचा नियमच. अर्थात त्यामुळे एकमेकांशी उत्तम आणि जवळचा परिचय. सोबत्यांना भूक लागली आहे. काय देतो आहेस म्हणत गणेश टी स्टॉल वर आलो. 
भाई आज तुम्हाला नवीन स्पेशल डिश देतो. ' मृदुंग मसाला भजी '. पावसाचे आणि भजीचे नाते एकदम जवळकीचे. पण मृदुंग मसाला भजी हा काय प्रकार? नाव ऐकूनच उत्सुकता वाढली. 
दोन एक मिनिटात मृदुंग मसाला भजीची प्लेट समोर आली. 
गरमागरम बटाटा भजी त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव वरून लिंबू, लसणीचे तिखट आणि सोबत स्पेशल मेड दोन प्रकारच्या चटण्या अशी छान सजवलेली डिश. डिश बघूनच ती खावीशी वाटली. करंबेळकरांची बटाटा भजी ही उत्तम चवीचीच त्यात आता सोबत असलेले पदार्थ. एकदम वेगळी चव. अहाहा... माझ्या सारख्या खाण्याच्या बाबतीत अरसिक माणसाला सुद्धा ही मृदुंग मसाला भजी खाताना खूप मजा आली. ही भजी खाता खाता थोड्या वेगळ्या पद्धतीने आस्वाद घेतला आणि अधिक मजा आली. सोबत असलेले खवय्ये देखील खुश झाले. 
प्रत्येक गोष्टीला एक स्थान महात्म्य असते. करंबेळकरांचा गणेश टी स्टॉल हे मृदुंग मसाला भजीचे स्थान. ती तिथेच जाऊन खावी. 
राजापूर शहरात कधी गेलात तर या टी स्टॉल ला अवश्य भेट द्या आणि मृदुंग मसाला भजी आवर्जून खा. 
आणि हो ह्या मृदुंग भजीचा वेगळ्या पद्धतीने आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या सोबत या. पण एक अट आहे तुम्हाला आमच्या सोबत फिरायला लागेल. 

सुधीर( भाई) रिसबूड, 9422372020