Tuesday, July 14, 2026

पन्नाशीच्या उंबरठयावर

अल्लडपणा पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन थांबतो तेव्हा समजतं आपण पन्नाशीला आलो!! तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय आहे ' पन्नाशी पार करताना.." हे वय म्हणजे अनेक अनुभवांची शिदोरी तुमच्या गाठीशी असते. व.पु. म्हणतात तसं, " सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.." हे देखील समजलेले असते. पुरुष असो किंवा स्त्री, नोकरीची जेमतेम आठ ते दहा वर्ष फक्त राहिलेली असतात. वयाच्या पंचवीसाव्या वर्षा पासून नोकरीला लागलेला तो जेव्हा पन्नाशीत स्थिरावतो तेव्हा तो अख्खा प्रवास किती कठीण होता, त्या वेळी किती स्थित्यंतरे अनुभवावी लागली हे त्याने जवळून पाहिलेलं असतं. स्त्रियांना देखील कष्ट चुकलेले नाही. नववधू म्हणून पाऊल टाकणारी ती खरं तर तितकी परिपक्व नसते. पण, व.पु. म्हणतात तसं, संसाराचा धूर डोळ्यात जाऊन तिला संसारातली मजा कळते. हे वय तसं म्हटलं तर कष्ट करण्याचं नाही. जरी पन्नाशी असली तरी, तरुण वयात जी धावपळ तुम्ही करता ती पन्नाशीत नाही करता येत. एक उदाहरण देते, समजा सकाळी ७.५० ची ट्रेन तुमच्या डोळ्यासमोर जात असेल तर तुम्ही ती धावत जाऊन पकडू शकता, कारण त्या वयात रक्त हे सळसळते असते,हेच पन्नाशीत आल्यावर काही ना काही प्रकृतीच्या तक्रारी सतावतात..
 सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माणूस ओळखायला शिकलेले असता. स्त्रियांना तर एक गोष्ट चांगलीच माहित असते ती म्हणजे, नाती जपणं हे त्यांनी आत्मसात केलेलं असतं. व.पु. जसं म्हणतात, " कोणतीही चूक ही नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते.." हे त्यांनी जाणलेले असते. हिच शिकवण त्या आपल्या मुलीला देतात. अहो आयुष्याची पन्नास वर्षे काढणं म्हणजे सोपं आहे का?? जे केस पांढरे होतात ते असेच होत नाही ना. त्या मागे अनेक उपेक्षेचे हुंदके असतात, नाईलाजास्तव कराव्या लागणाऱ्या तडजोडी असतात. न सांगता येणाऱ्या व्यथा असतात. मुला मुलींच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणं याचा देखील विचार करावा लागतो. काही प्रमाणात तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. शरीराला काहीसं जडत्व येतं. आपण सर्व मध्यमवर्गीय माणसं आहोत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारी, सुख शोधणारी. या वयात सुखद धक्के आनंद देतात पण वेदनांचा हुंकार नेहमीच मांडता येत नाही. हे वय म्हणजे मुला मुलींचे मित्र मैत्रिण व्हायचे वय असते. नव्याने संसार सुरू करणाऱ्या मुलीला तिची आई हीच एक चालती बोलती मैत्रीण असते. कारण, आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. सगळ्यात महत्वाचं इथे लिहायचं म्हणजे, या वयात एकमेकांचा सहवास हा फार महत्वाचा असतो. ' प्रथम तुज पाहता जीव वेडावला.' हे तरुणपणी म्हणून झालेलं असतं परंतु, आता ' तु अशी जवळी रहा..' हे म्हणावं लागतं. कारण, एकदा का मुलं मुलींची लग्न झाली की तेच दोघं एकमेकांसाठी असतात. आयुष्याची पुढची वर्ष ही जपणूकीसाठी असतात. कधीतरी त्याने चहा करणं, कधीतरी तिने स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं असतं. ती देखील तारुण्यात म्हणतेच की, ' बनात ये ना जवळ घे ना..' पण जशी तिची पन्नाशी उलटते तेव्हा ती देखील म्हणते,' घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे..' 
 हे वय म्हणजे आरामाची खऱ्या अर्थाने गरज असणारे वय. कुठेतरी थकलेल्या जीवाला विसाव्याची गरज असतेच ना!! पन्नास वर्षे जेव्हा तुम्ही आयुष्य जगता म्हणजे ते निव्वळ जगणे नसते तर कितीतरी वेळा स्वतःचं मन मारुन समोरच्याचं मन दत्तक घ्यावं लागतं. पुरुषांना देखील हे चुकलेलं नसतं. स्वतःच्या लग्नात आनंदात असणारी ती दोघं मुलीच्या लग्नात मात्र सनईचे सुर ऐकून हळवे होतात. खरंच, ही पन्नाशी म्हणजे आयुष्यातलं एक सोनेरी पान,तसंच अनेक आठवणींचे आणि अनुभवांचे नजराणे देतं हे मात्र खरे.. कारण, नेत्र हे पैलतीरावर पोहोचण्या आधी आयुष्याचा महोत्सव साजरा जर केला नाही तर काय उपयोग..
                                   .. मानसी देशपांडे 
                                                  विरार.

0 comments: