Sunday, July 19, 2026

मराठी शिक्षक आणि मुलांमधला अनुभव

मी बरीच वर्षे ICSE बोर्डच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे क्लास घेत होते, दोन वर्षांपूर्वी काही वैयक्तिक अडचणींमुळे मी ते क्लास घेणे बंद केले. त्यावेळी मला काही पालकांचे फोनही आले होते "मॅडम प्लीज तुम्ही पुन्हा मराठीचा क्लास सुरू करा." पण कधी कधी इतर कुणी तरी निर्माण करून दिलेल्या प्लॅटफॉर्मवर उभं राहणं नको वाटतं. त्यामुळे मी 2020 नंतर ICSE बोर्डचे ऍडमिशन घेणे बंद केले. त्यादरम्यानच 2019 च्या  मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात अरव नावाच्या एका विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेतले होते. त्यावेळी अरव नववीत गेला होता. 

तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की मी त्याची फिस परत करून अरवची ऍडमिशन कॅन्सल करू शकत नव्हते. त्यामुळे नववी आणि दहावी हे दोन्ही वर्ष मी अरवला (एकट्याला) ऑनलाइन क्लास घेऊन शिकवले.

आज अरवचा दहावीचा रिझल्ट लागलाय. त्याच्या आईचा धन्यवाद म्हणून मेसेज आलाय! अरवने फोन करून सांगितलं, "मॅडम मला सगळ्यात जास्त गुण मराठी विषयात मिळाले आहेत" ऐकून फार बरं वाटलं.  इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी कायमच खूप अवघड वाटते त्यामुळे त्याला शुभेच्छा देतांना मी हसत हसत म्हणाले "आता इथून पुढच्या आयुष्यात तुझा कधीच मराठीशी संबंध येणार नाही, सुटलास तू!" त्यावेळी अरव आनंदाने उत्तरला "मॅडम घरात तर मराठीच बोलणार ना आणि मला ज्या विषयात सर्वाधिक  गुण मिळालेत ती भाषा मी सोडणार कशी! उलट मी पुढच्या पिढीला देखील ती भाषा शिकवेल" पंधरा वर्षाच्या अरवचे हे शब्द ऐकून क्षणभर डोळ्यांत पाणी आलं. जुने दिवस आठवले. त्या मुलांचा गोंगाट, लेखनसराव करतांना शॉर्टकट्स मारून लिहिलेली त्यांची उत्तरं, त्यांचा पिज्जा पार्टीचा हट्ट, मी रागवले म्हणून कधीतरी त्यांनी मला लिहिलेली माफीची पत्रं... असं बरंच काही आठवत राहिलं. 

आज अरवच्या निमित्ताने ते सारं काही ऑफिशियली संपलं. यापुढे त्या जागेवर ICSEच्या विद्यार्थ्यांना पुन्हा कधीच मला मराठी शिकवता येणार नाही..! याची एक बोचरी जाणीवही झाली. खरंतर माणूस काही जागा नाईलाजाने सोडतो पण ती जागा सोडताना का होईना आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला...याचा आनंद खूप जास्त असतो. अर्थात याचं श्रेय त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी माझ्यातील शिक्षक अधिकाधिक प्रगल्भ बनवला!

अभिनंदन अरव 🌹🌹🌹 
खूप खूप मोठा हो बाळा

@ ज्योती भारती

0 comments: