Thursday, March 12, 2020

इजरायल चे राजदूत रॉन मालका यांची भेट

इजरायल चे राजदूत रॉन मालका यांनी माझ्या दिल्ली येथील घरी भेट दिली. यावेळी मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे पुस्तक भेट दिले. तसेच त्यांना छत्रपती घराण्याचा इतिहास  समजावून सांगितला. 19 फेब्रुवारी ला दिल्ली शिवजयंती मध्ये ते इतर 11 राजदूतांमध्ये उपस्थित होते. त्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट झाली झाली.माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलर च्या विरोधात लढा दिला होता. हा एक समान आणि भावनिक धागा आमच्यात तयार  झाला आहे. या मैत्रीचा सदुपयोग महाराष्ट्रासाठी, देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे, असा माझा उद्देश आहे. 

गडकिल्ले संवर्धनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महाराष्ट्रातील शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळमुक्तीवर उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ कसा घेता येईल?  यावर सखोल चर्चा झाली. ग्राम विकासाबाबतही त्यांचा दृष्टिकोन समजून घेता आला.

देशाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याकरिता त्यांनी केलेली उपाययोजना ऐकून थक्क व्हायला होतं. आपल्याला याबाबतही खूप काही शिकावं लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर पद्धत आणि इजरायल च्या मोसाद सारख्या गुप्तहेर व्यवस्थेमध्ये साम्य दिसून आल्याचे मी त्यांना नमूद केले. त्यांनी त्यास होकारार्थी उत्तर दिले. 

औरंगजेबाच्या तुलनेत शिवाजी महाराजांचे राज्य अत्यंत छोटे होते. चहू बाजूंनी दुश्मनांचा वेढा होता. अगदी तीच परिस्थिती आज इजरायल ची आहे. स्वराज्याचा विकास करण्यात त्याकाळी महाराज यशस्वी झाले आणि आज इजरायल सुद्धा सर्वार्थाने यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे, विकास हा सर्वसमावेशक विचार करून, त्यावर व्यापक उपाययोजना करून साधता येतो.  सुटा सुटा विचार करून साधता येत नाही. 
जसे, इजरायल च्या सरकारांनी, त्या देशाचा दक्षिण भाग जो, वाळवंटी आहे, त्यावर वेगळ्या पद्धतीने मात केली, आणि उत्तर भाग जो निम्न वाळवंटी आहे त्यावर वेगळ्या उपाययोजना केल्या. त्या दोन्ही मध्ये एकप्रकारे सुसूत्रता ठेवली गेली. व्यापक दृष्टिकोन ठेवण्यात आला.

आपल्या राज्यात सहसा असे दिसून येते, की ज्या भागातील शक्तिशाली नेता सत्तेत त्याच्या मतदारसंघात किंवा विभागात पैसा जास्त वळवला जातो. केवळ पैसा वळवला म्हणजे विकास साधला असा समज आपण करून घेतो. त्या पैश्यांच पुढे नेमकं काय झालं? याच उत्तर सापडत नाही. म्हणून आपल्या राज्यासमोरील किंवा लोकांसमोरील मूळ प्रश्न तसेच  शिल्लक राहून जातात. 

रॉन माल्का यांचा मला आग्रह आहे, की मी त्यांच्या देशाला भेट द्यावी. काही गोष्टी पहाव्यात. मी म्हणालो की, मी केवळ भेट देणार नाही, तर अभ्यास दौरा करेन. मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्या शिकलेल्या गोष्टीचा फायदा माझ्या महाराष्ट्राला कसा करून देता येईल यावर कामही करायचे आहे. 

एवढासा देश पण तो एवढा शक्तिशाली कसा? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यांच्या राजदूतांच्या सहवासातून मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सापडून गेली. अजूनही खूप काही शिकायला मिळालं. माझ्या महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या दृष्टिकोनात सुद्धा बराच सुधार झाला.

यावेळी आमच्या सौ. संयोगीताराजे, चिरंजीव शहाजी राजे, कल्याण चे खासदार श्रीकांत शिंदे, पंजाब चे खासदार प्रतापसिंह बाजवा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार रोहित गांधी, व तसेच दिल्ली मधील माझे दोन मित्र उपस्थित होते.
छत्रपती संभाजीराजे 

0 comments: