भाग (५) #व्याकरण-जोडाक्षरे
ऱ्हस्व दीर्घानंतर आज आपण जोडाक्षरांकडे वळतोय,.बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही की 'महत्त्व' हा शब्द नेमका कसा लिहावा..यातला त् हा एकदा की दोनदा असा प्रश्न नेहमीच पडत असतो. उच्चारताना तर एकदाच ' त् ' येतो मग लेखनात दोनदा का?
याचे उत्तर अगदी सोपे आहे.
मुळात महत् असा शब्द आहे . यात शेवटी 'त्' आहे. याचा अर्थ होतो 'मोठे'. आणि त्याला 'त्व' हा शब्द जोडला जातो. त्याचा अर्थ होतो 'पणा'. म्हणून मोठेपणा या अर्थाने लिहायचे असते 'महत्त्व'. इथे महत् मधील 'त्' आणि त्व मधील 'त्' मिळून दोनदा 'त्' लिहावा.म्हणून 'महत्त्व' असे लिहावे.
असेच आणखी काही उदाहरणे देता येतील.
सत् म्हणजे चांगले आणि त्व म्हणजे पणा. म्हणून सत्त्व म्हणजे चांगुलपणा.
तत् म्हणजे ते (विचार या अर्थाने) आणि त्व म्हणजे पणा. म्हणून तत्त्व
व्यक्तिमत् म्हणजे मानव आणि त्व म्हणजे पणा..म्हणून व्यक्तिमत्त्व .
तत् म्हणजे ते (तो विचार) आणि ज्ञ म्हणजे जाणणारा.म्हणून तज्ज्ञ असा शब्द लिहावा. येथे संधीनियमानुसार त् चा ज् झालेला आहे. म्हणून तज्ज्ञ म्हणजे ते जाणणारा .
हे झाले दोनदा त् येणारे शब्द..कारण त्यांच्या मूळ शब्दाच्या शेवटी त् असतो ..पण असेही शब्द आहेत की ज्यात आपल्याला एकदाच त् दिसतो वा लिहिला जातो.जसे अस्तित्व , पालकत्व, मातृत्व, शत्रुत्व, कर्तृत्व ...वगैरे.
मग पुन्हा प्रश्न असा की इथे का एकदाच त् ????
याचेही उत्तर सोप्पे म्हणजे मुळात अस्तित्व वगैरे या शब्दांत शेवटी त् नसतो.जसे अस्तित्व मध्ये अस्ति (असणे) आणि त्व(पणा). इथे त्व मधलाच त् येतो म्हणून इथे एकदाच त् लिहावा..म्हणून अस्तित्व .
याप्रमाणेच
पालक+त्व=पालकत्व
मातृ+त्व = मातृत्व
कर्तृ +त्व = कर्तृत्व ..तसेच
शत्रुत्व, व्यक्तित्व..वगैरे..
म्हणून एकच लक्षात ठेवायचे की मूळ शब्दांत शेवटी 'त्' आणि त्व मधला 'त्' मिळून शब्द बनत असेल तर दोनदा 'त्' लिहावा आणि ज्या मूळ शब्दांत शेवटी त् नसेल तर फक्त त्व मधलाच 'त्' मिळून शब्द बनत असेल तर एकदाच 'त्' लिहावा.म्हणून
महत्+त्व =महत्त्व
व्यक्तिमत् +त्व =व्यक्तिमत्त्व
आस्ति+त्व =अस्तित्व
व्यक्ती +त्व = व्यक्तित्व
आता आपण योग्य 'त्' लिहू शकू असे मला वाटते..हो ना!
कारण शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे.
----- डाॕ. वसुधा वैद्य
0 comments:
Post a Comment