व्याकरण भाग (३) -हस्व दीर्घ
..............
बरेचदा मला अशी विचारणा होत असते की, अमुक अमुक शब्द नेमका काय..तो -हस्वही दिसतो नि दीर्घही..जसा ' कवि' हा शब्द -हस्वही असतो नि कवी असा दीर्घही..सामान्यपणे शब्दांच्या शेवटची इ-कार उ-काराची मात्रा ही दीर्घच लिहिली जाते. पण काही शब्द -हस्वही असतात .
उदा. -तथापि वगैरे..
आज मला तेच स्पष्ट करावेसे वाटतेय..
वास्तविक कवि, बुद्धि, गति, मति हे सारे तत्सम म्हणजेच संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द आहेत.पण हेच तत्सम शब्द जेव्हा मराठीत येतात तेव्हा ते कायम दीर्घ लिहायचे असतात.
उदा. 'कवि' हा तत्सम शब्द मराठीत
'कवी' असा लिहतात.
तसेच बुद्धि-बुद्धी, गति-गती, वगैरे.
तत्सम/तद्भव जाऊ द्या... तो नंतरचा विषय.. फक्त एकच लक्षात ठेवायचे ते म्हणजे मराठीत लिहिताना शब्दाच्या शेवटी येणारा उ-कार व इ-कार हा कायमच दीर्घ लिहावा.उदा.---पाटी, जादू, पैलू, कडू, पिशवी, माती, दिल्ली, वाहिली, अंजली, शेवंती, झाडी, सारू, लक्ष्मी , कधी, पूर्वी, बिंदू, लिहू, कुलगुरू, दिली,इत्यादी वगैरे सर्वच शब्द दीर्घ लिहावे.
पण हां, एक लक्षात असू द्यावे की, 'परंतु', 'यथामति', व 'तथापि ' ही संस्कृतमधून जशीच्या तशी ( तत्सम ) मराठीतील अव्यये -हस्व लिहावे आणि बाकी सारे दीर्घ.
दुसरे असे की, काही एकाक्षरी शब्द असतात...जसे--------मी, तू, ती, ही, की, पी, जी,यासारखे अन्य एकाक्षरी शब्द कायमच दीर्घ लिहावे.फक्त ..फक्त 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन्ही अव्यये मात्र -हस्वच लिहावीत.
थोडक्यात सांगायचे झाले तर संस्कृतमधून मराठीत आलेली परंतु, यथामति, आणि तथापि तसेच मराठीतील 'आणि ' व 'नि' ही पाचही अव्यये ( परंतु, यथामति, तथापि, आणि , नि) -हस्व (पहिली वेलांटी व पहिला उकार) आणि बाकी इतर तत्सम व तद्भव शब्द कायम दीर्घच लिहावे. (दुसरी वेलांटी व दुसरा ऊकार)
चला तर मग... शोधा ते शब्द जे तुम्ही आधी -हस्व लिहायचे..ते आता दीर्घ लिहायचेय ..पण वरील पाच अव्यये सोडून....
पुढील भागात आणखी बघू या -हस्वदीर्घाचे नियम....
कारण
" शुद्धलेखन हा आग्रह नाही तर सवय झाली पाहिजे..."
डॉ वसुधा वैद्य
0 comments:
Post a Comment