Showing posts with label व्याकरण. Show all posts
Showing posts with label व्याकरण. Show all posts

Tuesday, March 3, 2020

व्याकरण १.८

व्याकरण.... भाग (८)......जोडाक्षर
----------------------------------------------
   कधीकधी उच्चारांतला सारखेपणा लेखनात दोष निर्माण करतो. आता हेच बघा ना....श व श्य आणि ज व ज्य यांच्या उच्चारात थोडा सारखेपणा आहे. इथेच बरेच जण घोटाळा करताना दिसतात. ते जास्त ऐवजी ज्यास्त आणि राजाला ऐवजी राज्याला असे चुकीचे लिहितात. हं.... पण प्रदेश या अर्थाने लिहिताना  मात्र  राज्याला असेच लिहावे..... 
    दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे मूळ शब्द आहे 'कसे'...'कसा '  पण या शब्दाला जेव्हा  विभक्ती प्रत्यय ( ला, स, ने, शी, तून, हून, चा,ची,चे, आत ) लागतात तेव्हा मात्र  लिहिताना हीच गडबड होते. आणि लिहिले जाते -कश्याला, कश्याने, कश्यात, कश्याचे/ची/चा..वगैरे...तसेच असे..असा या शब्दाचेही...इथेही अश्याने, अश्याचा, अश्यांना असे लिहिले जाते..... आणि हे सर्रास चूक आहे. लेखन सदोष  होते अशाने...कसे /असे/तसे , कसा /असा/तसा ..या शब्दांना जेव्हा  विभक्ती प्रत्यय लावायचे असतात तेव्हा  तिथे श्य हे जोडाक्षर नसते..मूळ शब्दांत नाही तर आपण बळेच का आणायचे ? फक्त  स चा श करायचा नि प्रत्यय लावायचा. म्हणजे कशाला, कशाने, कशातून, कशाचे,कशात , अशाने, अशांचे, तशांचे वगैरे लिहावे. तसेच मासा ,ससा, घसा, यांनाही हाच नियम लागू होतो. ...पण हं, मुळात माशी /मिशी असेल तर मात्र  माश्यांनी, माश्यांचे, मिश्यांचे, मिश्यांना असे श्य लिहावे..... 
कसे/असे / या शब्दांत स आहे .म्हणून  स चा श होताना त्याला आपण य हा आगाऊचा जोडू नये.. आणि श्य असे लिहूच नये..... 
आता  जे जे कश्याला वगैरे लिहित असतील ते ते आपले लेखन बदलतील असे समजू या...
कारण शुद्धलेखन  हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे....

डॉ वसुधा वैद्य

व्याकरण १.७

व्याकरण भाग  ( ७)....जोडाक्षर 

      अनेक शब्दांत स्र हे जोडाक्षर येत असल्याने विद्यार्थी असो वा मराठीचे अनेक शिक्षक /प्राध्यापक /कवी/लेखकसुद्धा स्र आणि  स्त्र दोन्हीही शब्द सारखेच उच्चारतात आणि  तसेच सारखे लिहितातही. दिसण्यात जरासे साम्य असल्याने व दोन्हीचे उच्चार सारखेच केल्या जात असल्याने हे दोन्हीही शब्द सारखेच लिहिले जातात आणि  इथेच शुद्धलेखन चुकते.
     स्र आणि  स्त्र यातला वेगळेपणा समजून घेणे महत्त्वाचे ..जरी दिसण्यात सारखे भासत असले तरी ते सारखे नाहीत.
पहिल्या स्र मध्ये स्+र् (=स्र)  असे दोनच वर्ण आहेत. म्हणून  उच्चारातही केवळ स् र् हे दोनच वर्ण घ्यावे. स्र असलेले पुढील शब्द लक्षात ठेवले तर अधिक स्पष्ट होईल,,
सहस्र...दशसहस्र...सहस्रावधी...सहस्रबुद्धे...सहस्ररश्मी...अजस्र....हिंस्र...,रक्तस्राव..स्रोत वगैरे..यात स्+र् असाच उच्चार करून  स् च्या पोटात पूर्ण र लिहावा...
      दुसऱ्या स्त्र मध्ये स्+त्+र (=स्त्र)  असे तीन वर्ण आहेत. याचा उच्चार स् त् आणि  र मिळून स्त्र असा करावा आणि  तसाच लिहावाही.
अस्त्र..शस्त्र..निःशस्त्र...स्त्री  या शब्दांत अर्धा स्  .,अर्धा  त्   आणि  पूर्ण र आहे....
पहिल्या ठिकाणी  स् आणि  र् असे दोनच वर्ण आहेत तर दुसऱ्या ठिकाणी  स् त् आणि  र असे तीन वर्ण आहेत..तर असे उच्चार करून त्याचे वर दिलेले शब्द लक्षात ठेवले तर स्र आणि  स्त्र चुकणार  नाही. फक्त  लिहिताना मनात जाणीवपूर्वक उच्चार करावा...
मला वाटते आता हिंस्र..अजस्र..सहस्र...स्रोत आणि  
अस्त्र..स्त्री  या शब्दात गोंधळ उडणार नाही..हो ना ?
कारण #शुद्धलेखन_हा_आग्रह_न_राहता_ती
#सवय_झाली_पाहिजे.

डॉ वसुधा वैद्य

व्याकरण १.६

व्याकरण भाग ६-----जोडाक्षरे 

     
आज आणखी दोन शब्दांबद्दल विचार करू या.
द्वितीय आणि  उद्धार  असे दोन शब्द आहेत की ज्यांचे जोडाक्षर लिहताना भल्याभल्यांचा गोंधळ उडतो, यात नेमका अर्धा ( हलंत)कोण ? द्वितीय मध्ये द् की व् ? आणि  उद्धारमध्ये द् की ध् ? या गफलतीमुळे मग लेखन चुकत जाते बघा. परंतु  थोडे मूळ समजून घेतले तर या चुका होणार नाहीत. 
द् आणि  ध जेव्हा एकत्र येतात तेव्हा द हलंत म्हणजे अर्धा 'द्' आणि  ध हा पूर्ण असतो. मराठीत पोटातील अक्षर  हे पूर्ण समजायचे असते. म्हणून  द् च्या पोटात ध लिहावे.जसे की- द्ध... इथे दिसताना आपल्याला  अर्धा ध् दिसतो व द् हा पूर्ण दिसतो. पण द चे खालील शेपूट हे द चे नसून पूर्ण  ध चे आहे व वर अर्धा द आहे. म्हणून  हे द्ध असे दिसते. ते तसेच लिहावे. नाहीतर 'द् ध' असे सुटे वर्ण लिहावे.
     म्हणून  उद्धार हा शब्द  उ+द्+धा+र असा क्रम लक्षात ठेवून लिहावा म्हणजे चुकणार नाही. 
दुसरे उदा.-- आम्र...यात  र साठी दिलेली तिरपी रेघ हा अर्धा र दर्शवतो. व म हा पूर्ण दिसतो. पण तसे नाहीय. इथे आ+म्+र म्हणजे  म हा अर्धा व र हा पूर्ण आहे. म्हणून  म च्या पोटात र  लिहलेला आहे . 
तसाच आग्रह..आ+ग्+र+ह..
प्रथम.,आक्रीत वगैरे असेच लिहावे..अनुक्रमे प्+र......
                                                             क्+री
पोटातले अक्षर हे पूर्ण असते हे फक्त ध्यानात ठेवावे.
अजून काही उदा.--- 
शु+द्+ध=शुद्ध  
बु+द्+ध= बुद्ध
उ+द्+ध+व=उद्धव
इथे द्ध यायला हवे. ध्द असे नको.इथे ध च्या लेखनाच्या जागेत फरक दिसतो..पण तो क्रमानुसार आहे. ध्द असे लिहिले तर ध अर्धा व द पूर्ण  होईल. आपल्याला  द् अर्धा व ध हा पूर्ण पाहिजे. म्हणून  द्ध असाच लिहावा. ध हा द च्या पोटात(द्ध) लिहावा. ध्द असे लिहू नये.
तसेच द्वितीय मधला द्व..इथेही आपल्याला  द् अर्धा आणि  व पूर्ण  पाहिजे. म्हणून द च्या पोटात व लिहावा.उदा.--द्विज, द्वापार,द्वंद्व वगैरे...आधी द् लिहावा मग व . तेव्हा द्व असे दिसेल. व्द असे लिहू नये. असे लिहिले तर व् अर्धा आणि  द हा पूर्ण  होईल. जे पूर्ण  अक्षर  लिहायचे ते खालच्या भागाला "द्ध / द्व " असे दिसेल. "ध्द /व्द"  असे वरच्या भागाला नाही.
एकतर द्ध / द्व  असे जोडाक्षर लिहावे ..नाहीतर , द् ध/  द् व असे सुटे वर्ण लिहावे..हल्ली असेच सुटे लिहतात. पण ध्द /व्द असे अजिबात लिहू नये. शुद्धलेखन चुकेल.
  लिहून बघा. कारण शुद्धलेखन  हा आग्रह न राहता ती सवय व्हायला पाहिजे.
आणि  काही जोडाक्षरे आहेत..ते पुढील भागात........

....डाॕ. वसुधा वैद्य

व्याकरण १.५

भाग (५)   #व्याकरण-जोडाक्षरे
    
    ऱ्हस्व दीर्घानंतर आज आपण जोडाक्षरांकडे वळतोय,.बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही की 'महत्त्व' हा शब्द नेमका कसा लिहावा..यातला त् हा एकदा की दोनदा असा प्रश्न नेहमीच पडत असतो. उच्चारताना तर एकदाच ' त् ' येतो मग लेखनात दोनदा का?
  याचे उत्तर अगदी सोपे आहे. 
 मुळात महत् असा शब्द आहे . यात शेवटी 'त्' आहे. याचा अर्थ होतो 'मोठे'. आणि  त्याला 'त्व' हा शब्द जोडला जातो. त्याचा अर्थ होतो 'पणा'. म्हणून मोठेपणा या अर्थाने लिहायचे असते 'महत्त्व'. इथे महत् मधील 'त्' आणि  त्व मधील 'त्' मिळून दोनदा 'त्' लिहावा.म्हणून  'महत्त्व' असे लिहावे.
  असेच आणखी काही उदाहरणे देता येतील.
सत् म्हणजे चांगले आणि  त्व म्हणजे पणा. म्हणून  सत्त्व म्हणजे चांगुलपणा. 
तत् म्हणजे  ते (विचार या अर्थाने) आणि  त्व म्हणजे पणा. म्हणून  तत्त्व 
व्यक्तिमत् म्हणजे  मानव आणि  त्व म्हणजे पणा..म्हणून  व्यक्तिमत्त्व .
तत् म्हणजे ते (तो विचार) आणि  ज्ञ म्हणजे जाणणारा.म्हणून  तज्ज्ञ  असा शब्द लिहावा. येथे संधीनियमानुसार  त् चा ज् झालेला आहे. म्हणून तज्ज्ञ  म्हणजे  ते जाणणारा . 
हे झाले दोनदा त् येणारे शब्द..कारण त्यांच्या मूळ शब्दाच्या शेवटी त् असतो ..पण असेही शब्द आहेत की ज्यात आपल्याला एकदाच त् दिसतो वा लिहिला जातो.जसे अस्तित्व , पालकत्व, मातृत्व, शत्रुत्व, कर्तृत्व ...वगैरे.
मग पुन्हा प्रश्न असा की इथे का एकदाच त् ????
याचेही उत्तर सोप्पे म्हणजे  मुळात अस्तित्व वगैरे या शब्दांत शेवटी त् नसतो.जसे अस्तित्व मध्ये अस्ति (असणे) आणि  त्व(पणा).  इथे त्व मधलाच त् येतो म्हणून  इथे एकदाच त् लिहावा..म्हणून अस्तित्व .
याप्रमाणेच 
पालक+त्व=पालकत्व
मातृ+त्व   = मातृत्व
कर्तृ +त्व  = कर्तृत्व ..तसेच
शत्रुत्व, व्यक्तित्व..वगैरे..
  म्हणून  एकच लक्षात ठेवायचे की मूळ शब्दांत शेवटी 'त्' आणि  त्व मधला 'त्' मिळून शब्द बनत असेल तर दोनदा 'त्' लिहावा आणि  ज्या मूळ शब्दांत शेवटी त् नसेल तर फक्त  त्व मधलाच 'त्' मिळून शब्द बनत असेल तर एकदाच 'त्' लिहावा.म्हणून 
 महत्+त्व        =महत्त्व 
व्यक्तिमत् +त्व  =व्यक्तिमत्त्व 
आस्ति+त्व       =अस्तित्व 
व्यक्ती +त्व       = व्यक्तित्व 
   आता आपण योग्य  'त्'  लिहू शकू असे मला वाटते..हो ना!
 कारण शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे.
       ----- डाॕ. वसुधा वैद्य

व्याकरण १.४

व्याकरण भाग (४)     ऱ्हस्वदीर्घ

      ऱ्हस्वदीर्घाच्या पुढील नियमाचा विचार करण्यापूर्वी 'अकारान्त' ही संकल्पना समजून घेऊ या. ज्या शब्दाचा उच्चार करताना वा लिहताना शेवटी 'अ' हा स्वर येतो, म्हणजेच ज्या शब्दाच्या शेवटी (अंती) 'अ' स्वर असतो तो 'अकारान्त' शब्द होय, उदा.-'नियम' या शब्दात शेवटी म्+अ असा वर्ण आहे . म्हणून  तो अकारान्त....तर आता अकारान्त समजले.
       मराठीत  अशा अकारान्त शब्दांच्या आधी जो इकार (वेलांटी) आणि  जो उकार असतो तो कायम दीर्घच लिहावा. मग तो शब्द कितीही अक्षरी असो.
उदा.-  कठीण   या शब्दात ण हे अक्षर अकारान्त (ण्+अ) आहे. म्हणून  त्या आधीची ठ ची वेलांटी (ठी) ही दीर्घ झालेली आहे. याप्रमाणेच...
उदा.--  पुढील, नीट, रतीब, विहीर, ऊस, पाऊस, तूप, फूल, पीठ, अनूप, खडूस, अवीट वगैरे. वगैरे..
परंतु हा नियम फक्त  मराठीतील शब्दांसाठीच लागू होतो. पण संस्कृतमधून मराठीत  जसेच्या तसे स्वीकारलेले जे तत्सम शब्द असतात ते त्याच्या मुळाप्रमाणे ऱ्हस्व /दीर्घ  लिहावेत. 
उदा.-  विष, गुण, समुह,अकल्पित, अवचित,  पिक(कोकीळ) [ हं...इथे पिक हा तत्सम शब्द असल्यामुळे तो तसाच म्हणजे ऱ्हस्व  लिहिलाय..पण कोकीळ हा मराठीतला शब्द म्हणून  नियमाप्रमाणे  दीर्घ  'की' लिहिलीय]    ., न्यायाधीश, व्यूह, रूप, गणित वगैरे..वगैरे
           म्हणून  कोणते शब्द मराठीतले आणि  कोणते संस्कृतमधून आलेले ते एकदा  माहीत असले की हे नियम आणि  त्यानुसार लेखन करणे अतिशय सोपे काम असते..त्याविषयी म्हणजे  तत्सम आणि  तद्भव , मराठी आणि  पारभाषिक शब्दांविषयी स्वतंत्र पोस्ट देईलच.
  तोपर्यंत  या नियमानुसार लिहायचं..कारण..
  शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे.
            होय ना .!

डॉ वसुधा वैद्य 

व्याकरण १.३

व्याकरण भाग (३)        -हस्व दीर्घ
                     ..............
                  बरेचदा मला अशी विचारणा होत असते की, अमुक अमुक शब्द नेमका काय..तो -हस्वही दिसतो नि दीर्घही..जसा ' कवि' हा शब्द -हस्वही असतो नि कवी असा दीर्घही..सामान्यपणे शब्दांच्या शेवटची इ-कार उ-काराची मात्रा ही दीर्घच लिहिली जाते. पण काही शब्द -हस्वही असतात .
उदा. -तथापि वगैरे..
आज मला तेच स्पष्ट करावेसे वाटतेय..
   वास्तविक कवि, बुद्धि, गति, मति हे सारे तत्सम म्हणजेच संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द आहेत.पण हेच तत्सम शब्द जेव्हा मराठीत येतात तेव्हा ते कायम दीर्घ लिहायचे असतात. 
उदा. 'कवि' हा तत्सम शब्द  मराठीत 
         'कवी' असा लिहतात.
तसेच बुद्धि-बुद्धी, गति-गती, वगैरे.
तत्सम/तद्भव जाऊ द्या... तो नंतरचा विषय.. फक्त एकच लक्षात ठेवायचे ते म्हणजे  मराठीत लिहिताना शब्दाच्या शेवटी येणारा उ-कार व इ-कार हा कायमच दीर्घ लिहावा.उदा.---पाटी, जादू, पैलू, कडू, पिशवी, माती, दिल्ली, वाहिली, अंजली, शेवंती, झाडी, सारू, लक्ष्मी , कधी, पूर्वी, बिंदू, लिहू, कुलगुरू, दिली,इत्यादी वगैरे सर्वच शब्द दीर्घ लिहावे.
पण हां, एक लक्षात असू द्यावे की, 'परंतु', 'यथामति', व 'तथापि ' ही संस्कृतमधून जशीच्या तशी ( तत्सम ) मराठीतील अव्यये -हस्व लिहावे आणि  बाकी सारे दीर्घ.
   दुसरे असे की, काही एकाक्षरी शब्द असतात...जसे--------मी, तू, ती, ही, की, पी, जी,यासारखे अन्य एकाक्षरी शब्द कायमच दीर्घ लिहावे.फक्त ..फक्त  'आणि'  व  'नि' ही मराठीतील दोन्ही अव्यये मात्र  -हस्वच लिहावीत. 
     थोडक्यात सांगायचे झाले तर संस्कृतमधून मराठीत आलेली परंतु, यथामति, आणि  तथापि  तसेच मराठीतील 'आणि ' व  'नि' ही पाचही अव्यये ( परंतु, यथामति, तथापि, आणि , नि) -हस्व  (पहिली वेलांटी व पहिला उकार) आणि  बाकी इतर तत्सम व तद्भव शब्द कायम दीर्घच लिहावे. (दुसरी वेलांटी व दुसरा ऊकार) 
  चला तर मग... शोधा ते शब्द जे तुम्ही आधी -हस्व लिहायचे..ते आता दीर्घ लिहायचेय ..पण वरील पाच अव्यये सोडून....
  पुढील भागात आणखी बघू या -हस्वदीर्घाचे नियम....
कारण
" शुद्धलेखन हा आग्रह नाही तर सवय झाली पाहिजे..."


डॉ वसुधा वैद्य

व्याकरण १.२

व्याकरण भाग (२)

-हस्वदीर्घाची गंमत...

शुद्धलेखन म्हटले की सर्वात मोठी समस्या असते की अमुकअमुक शब्द  -हस्व लिहावा की दीर्घ ..ब-याचदा मग कागदावर लिहून पाहिल्या जाते ..डोळ्यांना जे योग्य वाटेल ते मग आपण स्वीकारतो. -हस्वच्या ठिकाणी दीर्घ आणि दीर्घाच्या ठिकाणी  -हस्व लिहले तर गोंधळ तर उडतोच, पण त्या शब्दाचा मूळ अर्थही बदलतो..फार गंमतीजमती होतात..खरं म्हणजे कधीकधी संदर्भानुसार तो शब्द -हस्व लिहावा की दीर्घ  हे ठरवावे लागते. आणि  आपला हा गोंधळ का उडतो माहीत आहे का? कारण मराठीत तोच शब्द -हस्वही असतो..आणि  दीर्घही असतो. पण दोन्ही शब्दांचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात बरं का!
  आता हेच बघा ना..अनेक लेखक /कवी लेखन करीत असतात..कवींच्या कवितेत तर एक शब्द हमखास येतोच..तो म्हणजे  ' मिलन' . पण मिलन हा शब्द जसा -हस्व आहे तसा तो दीर्घ म्हणजे  ' मीलन ' असाही आहे..
उदा.- ' तुझे नि माझे व्हावे --- ' इथे नेमके कुठले मिलन लिहावे असा प्रश्न नक्कीच पडला असेल. 'मिलन' म्हणजे ' भेट' . तेव्हा  'तुझे नि माझे व्हावे मिलन असेच योग्य  राहील..
 आता दीर्घ  शब्द 'मीलन' याचा अर्थ होतो ' मिटणे' उदा.- 'तुझ्या पापण्यांचे मीलन माझ्या हृदयाचा ठोका चुकवतो' किंवा 'तुझ्या पापण्यांचे मीलन, घायाळ होई माझे मन' इथे पापण्यांचे मिटणे हा अर्थ येतो. जर आपण तुझे नि माझे व्हावे मीलन असे लिहिले तर तू आणि  मी मिटावे असा अर्थ होईल..आहे ना गंमत? ( मीलन यापासून उन्मिलीत हा शब्द आपल्याला परिचित आहे.याचा अर्थ अर्धवट मिटलेले.)
असाच दुसरा शब्द बघा ..हा 'सुशीला' ./ 'सुशिला'  असाही लिहतात. तेव्हा नेमका कोणता योग्य  असेल..पडलाच ना प्रश्न ? जर शिला असा -हस्व शब्द असेल तर  त्याचा अर्थ होतो 'दगड ' आणि  शीला असा दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ होतो चारित्र्यवान. 'सु' या उपसर्गाचा अर्थ होतो चांगला/चांगली. तेव्हा  सुशिला म्हणजे चांगली दगड आणि  सुशीला म्हणजे  चांगली चारित्र्यवान.आता तुम्हीच ठरवायचं की सुशिला लिहावे की सुशीला ..
  उदाहरणदाखल आणखी बरेच शब्द आहेत..ते असे..
पाणि-हात.........पाणी- जल 
पिक-कोकीळ.....पीक-धान्य
सलिल-पाणी.......सलील-लीलेने
शीर-नस/धमनी.....शिर- डोके
दिन- दिवस ........दीन- गरीब
सुर - देव ...........सूर- स्वर /आवाज 
सुत-मुलगा...........सूत- धागा

असे मराठीत बरेच शब्द आहेत. संदर्भानुसार -हस्व दीर्घाचे भान ठेवून आपले लेखन केले तर अधिक चांगले..शब्दकोश जवळ बाळगावा..म्हणजे शंका आलीच तर अर्थ शोधता येईल. कालांतराने ही सवय झाली की आपले लेखन आपोआप शुद्ध होऊ लागते. तेव्हा करा प्रयत्न ..कारण,
शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. बरोबर ना ?
आणि  हो..जरा काही नियम लक्षात ठेवले तर...ते पुढील भागात....

डॉ वसुधा वैद्य

व्याकरण १.१

व्याकरण भाग(१)
चला शुद्धलेखन जाणू या.........

परवा एका fb मित्राने मला विचारले की, 'देऊन लिहावे देवून?' मी म्हटले 'देऊन' ..तो परत म्हणाला 'कसं काय..देवून कां नाही? मला तर कळतच नाही कुठे देऊन लिहावे आणि कुठे  देवून..' याच्यासारख्या ब-याच जणांचा हा संभ्रम असतो..म्हणून  हा पोस्टप्रपंच..,
   याचं असं आहे ..मराठीत मूळ क्रियापदाला (धातूला ) ऊ/ऊन प्रत्यय  लावून ही रूपे /शब्द तयार झालेले असतात.उदा.-मूळ धातू 'देणे' ..याला जर ऊ /ऊन प्रत्यय लावला तर देऊ/देऊन असे रूप तयार होईल.यासारखेच 
खा+ऊ=खाऊ.....खा+ऊन=खाऊन ...असे होईल..आणखी  जाणे,येणे, घेणे,पिणे, धुणे या सर्वांना ऊ/ऊन प्रत्यय लावला तर त्यांचे 
जाऊ/जाऊन,
येऊ/येऊन, 
घेऊ/घेऊन,
,पिऊ/पिऊन,
 धुऊ/ धुऊन  
असे रूप तयार होतात..
म्ह्णून ही रूपे जावून,घेवून, येवून, पिवून, धुवून असे लिहू नये.कारण या मूळ क्रियापदात म्हणजेच धातूंत 'व ' नाहीच आहे तर आपण हा कां लिहावा..???

  पण हं..ज्या मूळ धातूत ..क्रियापदांत 'व ' आहे तिथे 
ऊ/ऊन प्रत्यय लावून कसे रूप तयार होतात ते पाहू या....
उदा.-- जेवणे, धावणे,लावणे, समजावणे, धमकावणे,...वगैरे क्रियापदे घेऊ या.
मूळ धातू..... जेव+ ऊ = जेवू
जेव+ ऊन= जेवून..
इथे ' व ' ची 'ऊ'  या स्वरासोबत संधी होते म्हणून  वू आणि  वून असे झालेय..
व+ ऊ =वू, 
व+ ऊन = वून असे....
म्हणून हे धातू जेऊ/जेऊन..धाऊ/धाऊन...समजाऊ/समजाऊन...असे लिहू नये..

आता उरलेले जे इतर क्रियापद..धातू आहेत..जसे,
राहणे, करणे, मोडणे, हसणे, काढणे..वगैरे..
राह +ऊ = राहू..राह+ ऊन = राहून
कर + ऊ =करू...कर + ऊन =करून
मोड+ऊ =मोडू..मोड+ ऊन =मोडून
अशाप्रकारे  हसू...हसून..काढू..काढून होईल..
इथे ऊ/ ऊन हे प्रत्यय दीर्घ आहेत म्हणून  हे प्रत्यय लागलेले सर्व रूपे दीर्घ उकारातच लिहावे..

कळलं ना?  हुशार आहात..

डॉ .वसुधा वैद्य

व्याकरण २.१

#व्याकरण

वर्गात मराठीचे अध्यापन करताना नं हे विद्यार्थीसुद्धा आपल्याला कोंडीत पकडतात बरं का !  आता परवाचीच गोष्ट , मी नेहमीप्रमाणे इ. ७ वी वर श्रुतलेखन घेत असताना मुलांना  'अनुस्वार नीट द्या रे.'  'शीर्षबिंदू द्यायला विसरू नका बरं ' अशा सूचना देत होते. तेवढ्यात स्मार्ट तेजसने मला मध्येच थांबवून विचारले की मॕम, म्हणजे टिंबच द्यायचा नं?  मी मान हलवून "हो " म्हणाले तर त्याचा पुढील प्रश्न "मग हा अनुस्वार व शीर्षबिंदू असे दोन शब्द का वापरताय तुम्ही ? दोन्हीसाठी टिंबच तर द्यायचाय. मग हे दोन्ही  शब्द सारख्या अर्थाचे की वेगवेगळे ? यांचे नेमके अर्थ काय ? "
अस्मादिकांनी क्षणभर विचार केला. स्वतःशीच म्हटले point to be noted mam,," आणि दिले समजावून..ते असे. 
अनुस्वार आणि शीर्षबिंदू यांचे चिन्ह (ं) जरी एकच असले तरी यात फार मोठा फरक आहे. 
अनुस्वार म्हणजे  अक्षरामागून येणारा उच्चार . व्याकरणाच्या भाषेत सांगायचे झाले तर  अक्षरानंतरचा येणारा 'अनुनासिकांचा' उच्चार म्हणजे  'अनुस्वार' होय. ङ्, ञ्, ण्,न् आणि म् ही  मराठी  वर्णमालेतील अनुनासिके आहेत. उदा. गङ्गा/गंगा पञ्चम/पंचम, षण्ढ/ षंढ, मन्दिर/मंदिर, अम्बर/अंबर. प्रस्तुत उदा.त अक्षरांवर  दिलेला अनुस्वार आहे.
शीर्षबिंदू याचा अर्थ ज्या अक्षरावर ं हा दिलेला असतो त्या वर्णाचा पूर्ण  उच्चार करायचा असतो. उदा. 
मी सांगितलं ,कसं ? ,भलं, पावसाचं गीत, राहिलेलं, 
यामध्ये ल, स, च वर शीर्षबिंदू दिलेला आहे तेव्हा  त्या ल,स, च चा पूर्ण  उच्चार करायचा असतो.

थोडक्यात , 
अनुनासिके -अनुस्वार 
आणि
 पूर्ण उच्चार - शीर्षबिंदू.

आणि हो, यापुढे ं याला टिंब नाही हं म्हणायचं..अनुस्वार अथवा शीर्षबिंदू असाच शब्दप्रयोग करायचा,

काय ? झाला ना संभ्रम दूर ?

डॉ .वसुधा वैद्य