Sunday, April 2, 2017

आयुष्याला द्यावे उत्तर

आयुष्याला द्यावे उत्तर
असे जगावे दुनियेमध्ये,आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना…
संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सार्‍या, निरोप शेवटचा देताना…
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
कवी : विं दा करंदीकर

Saturday, April 1, 2017

माझी ओंजळ भरलेली ~ चंद्रशेखर गोखले



माझी ओंजळ भरलेली
युनिट म्हणजे बहुतेकजण झपाटल्यासारखे काम करत असतात.
चंद्रशेखर गोखले | Updated: April 1, 2017 12:16 AM



चित्रपटाच्या झगमगत्या क्षेत्रात वावरायला मिळाल्यामुळे स्त्रीकडे बघण्याची दृष्टी जास्त निरोगी बनली, चित्रीकरणाचं एक युनिट असतं आणि युनिट म्हणजे बहुतेकजण झपाटल्यासारखे काम करत असतात. अशा वेळी स्त्री-पुरुष हा भेद पुसट होतो. वाद झाले तरी समान पातळीवर होतात, तसेच इतर गोष्टीही.. अशा वेळी ‘हा ऽऽऽ ती बघ मावा खातेय’ किंवा ‘ती बघ झुरके मारतेय’ असले बाळबोध विचार मनात येत नाहीत.. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी’ ही असली विधानं कालबाह्य़ वाटायला लागतात..
‘कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ म्हणत कोणत्या दोन स्त्रियांनी सजवलेल्या पाळण्याच्या वरून- खालून मला एकमेकींकडे सोपवलं आता आठवत नाही; पण तेव्हापासूनच तिच्याशी माझा संवाद घडायला लागला, चार बहिणींच्या पाठीवर अनपेक्षितपणे म्हणजे अपेक्षा नसताना माझा जन्म झाला त्यामुळे माझ्याभोवती गराडा पडला तो या नानाविध रूपं घेऊन कौतुकाने आलेल्या स्त्रियांचाच. पण त्यात पहिली ओळख दृढ झाली ती आईशी!
मी खूप भाग्यवान आहे! भाग्यवान अशासाठी की वयाच्या पाचव्या वर्षीही मी आईच्या अंगावर पीत होतो हे मला लख्ख आठवतंय.. दुधाची चव नाही सांगता येणार; पण जुन्या घरी स्वयंपाक घराच्या दाराशी देव्हाऱ्याकडे तोंड करून आई पदराआड मला घेऊन बसायची ते चित्र अजूनही डोळ्यासमोर आहे.. आमची जुनी शेजारीण ठक्करबा आईला सारखं समजवायची छाया आता सोडव त्याला नाहीतर हे सुटणारच नाही. तेव्हा मायेनं आई मला अधिकच कवटाळायची तो मायेचा स्पर्श म्हणजे त्या अकृत्रिम मायेची खरी ओळख. म्हणूनच नंतर आईशी पटलं नाही, वाद झाले, मी वेगळा झालो तरी ही नाळ तुटलीच नाही..
‘मातृ देवो भव’ असं सरधोपटपणे म्हणून मी मोकळा झालो नाही कारण असे फसवे संस्कार आईने दिलेच नाहीत, तिच्यात स्त्री म्हणून, पत्नी म्हणून आणि व्यक्ती म्हणून व्यक्त होण्याचं घटनांचं विश्लेषण करण्याचं प्रचंड सामथ्र्य होतं. ती सगळ्या भूमिका मनापासून जगली आणि मलाही ही देणगी दिली. आणि जस जसा माझ्या परिसराचा परीघ वाढत गेला तस तशी ती विविध रूपात भेटतच गेली, शिकवत गेली.
चित्रपटातून प्रगल्भ स्त्रीचं खरं रूप दाखवलं ते ऋशीकेष मुखर्जी, शक्ती सामंता, बासू चटर्जी यांनी. लहानपणापासून चित्रपट माध्यम मला अगदी जवळचं वाटायचं. मी स्वत:ला इंडस्ट्रीचाच समजायचो त्यामुळे चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा मी कायम अभ्यासपूर्ण नजरेने पाहिल्या. अगदी ‘सत्यकाम’, ‘बंदिनी’, ‘मंजली बहू’ ते अगदी राजेश-शर्मिलाच्या ‘आविष्कार’पर्यंत. बंगाली चित्रपटांमुळे भाभी म्हणजे वहिनी हे नातं माझ्या दृष्टीने कायम सामथ्र्यवान, उत्कट आणि आदर्श ठरलं. आणि वहिनीही कधी वाईट असूच शकत नाही अशी माझ्या मनाची धारणा झाली. मला सख्खी वहिनी नाही, पण ज्या दोन वहिनी मला जोडलेल्या नात्यांमुळे मिळाल्या त्या म्हणजे चित्रा वहिनी आणि सुवर्णा वहिनी या दोघींचे स्वत:चे संसार टिकले नाहीत, पण जगण्यातली सकारात्मकता त्यांनी जी दाखवली ती माझ्या मनात कायम ठसली.
माझा जन्म जसा काही अपेक्षा नसताना झाला तसंच माझं लग्नसुद्धा कोणाची काय माझीही अपेक्षा नसताना झालं. वाटतं, पण या नात्याला सामोरं जाणं येडय़ागबाळ्याचं काम नाही. लग्न ठरलं तेव्हा उमाला खूप बोलायचं असायचं आणि मला काही बोलणं सुचायचं नाही, काय बोलू? हा माझा तक्रार मिश्रित प्रश्न असायचा, म्हणजे तशा मला रग्गड मैत्रिणी होत्या, पण हे नातं वेगळंच पडतं. मी बोलायचो नाही म्हणून उमा नव्‍‌र्हस व्हायची. चित्रा वहिनीने सांगितलं, बोलायची सवय कर, जितकी सवय करशील तितका संवाद मोकळा राहील, अगदी कुठला शर्ट घालून बाहेर गेलो ते, वाटेत खारे दाणे घेतले हेही सांग, मग बघ.. आणि खरंच गेली तेवीस वर्षे अव्याहत आम्ही दोघे बोलतोय.
उमा माझ्या आयुष्यात आली आणि स्त्रीविषयीचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आणि स्पष्ट झाला, आमच्या आईसारखीच उमालाही सतत व्यक्त होण्याची सवय आहे किंवा ती तिची गरज आहे, त्यात तिचं वाचन दांडगं, वैचारिक बैठक पक्की त्यामुळे अभिनय क्षेत्रासारख्या अस्थिर क्षेत्रात वावरत असूनही ती वास्तवाचं भान सोडत नाही.
आपण आपल्या आयुष्यातलं स्त्रीचं स्थान आणि स्त्रीचा मान अबाधित ठेवत असू, बिनशर्त मान्य करत असू तर आपलं वास्तवतेचं भान कधी सुटत नाही, त्या सुटू देत नाहीत.
तुम्ही असाल मोठे टिकोजीराव, पण तुम्हाला तुमची खरी ओळख तुमची मैत्रीणच करून देते. आपल्यातले गुण, आपल्यातली कमतरता जितकी ती समजून घेते तितकं इतर कोणी समजून घेत नाही. आणि या बाबतीत तर मी भाग्यवानच ठरलो. माझ्या असंख्य मैत्रिणींनी ना मला कोलमडू दिलं ना तरंगू दिलं. जयाताई, मनीषा, वीणा, स्वाती, तिलू, शुभी, स्नेहल, नीलिमा, मधू अशी किती नावं घेऊ  ज्या कायम परखड आणि निखळच वागल्या. त्या काळात कवीने जरा तऱ्हेवाईक वागायची प्रथा होती. त्या कवींचे तऱ्हेवाईकपणाचे अनेक किस्से रंगवून सांगितले जायचे, पण मला कधी असं वागायला मिळालंच नाही कारण मी जरा असा वागतोय असं यांना वाटलं, तशी शंका जरी आली तरी टपली मारायला या तत्पर असायच्या. मी लग्नाचा निर्णय घेतानाही या मैत्रिणीच जास्त ठाम होत्या. तेव्हा माझी ओळख म्हणजे गूड फॉर नथिंग अशीच होती, पण तेव्हा उमाने मैत्रिणीची भूमिका पूर्णपणे निभावली.
स्त्री ही प्रेम व्यक्त करत असते आणि पुरुष प्रेम सिद्ध करत असतो.. हा दोघातला मूलभूत फरक आहे, पण सिद्ध करण्यापेक्षा व्यक्त करण्यात जास्त रसिकता आहे, हे आपण लक्षातच घेत नाही. सिद्ध करून झालं की प्रवास संपला, याउलट व्यक्त होण्यातलं सातत्य आपल्याला जास्त समृद्ध करत असतं.
मला माझी हार मान्य आहे
म्हणजे तू जिंकलास असं होत नाही
डाव तुझ्या हाती देऊनही
जिंकता तुला येत नाही.. या ओळी मला या माझ्या निरीक्षणातूनच सुचल्या.
एक प्रथित यश कलाकार होता. तो एका लेखिकेवर मनापासून भाळला.. ती मात्र खरंच त्याच्या प्रेमात पडली. मग चोरून गाठीभेटी सुरू झाल्या याचा सुगावा घरच्यांना लागला. प्रतिष्ठेपेक्षाही सुरक्षितता महत्त्वाची ठरली. त्याने पूर्णविराम दिला. तिने तो मान्य केला, पण तिने खरं प्रेम केलं होतं, कायमचा देश सोडून जायचा निर्णय तिने घेतला तेव्हा ती शेवटचं त्याला भेटायचं म्हणत होती. त्याचं भाळलेपण कमी झालं होतं तो भानावर आला होता. तो तिला टाळत होता.. शेवटी एका पार्टीत दोघे समोर आले, पण त्याच्या सोबत त्याची पत्नी सुद्धा होती, तो अभिनेता होता हुकमी अभिनय हा त्याच्या व्यवसायचा तसेच व्यक्तिमत्त्वाचाही भाग होता त्याने काय केलं? सहानभूती मिळवायला आणि वेळ मारून न्यायला छातीत कळ आल्याचा अभिनय केला. गोंधळ उडाला. धावपळ झाली. पण या दोघी त्याला पूर्ण ओळखून होत्या. परिणाम काय? तो दोघींच्या मनातून उतरला आणि त्या दोघी खूप छान मैत्रिणी झाल्या.
चित्रपटाच्या झगमगत्या क्षेत्रात वावरायला मिळाल्यामुळे स्त्रीकडे बघण्याची दृष्टी जास्त निरोगी बनली, चित्रीकरणाचं एक युनिट असतं आणि युनिट म्हणजे बहुतेकजण झपाटल्यासारखे काम करत असतात. अशा वेळी स्त्री-पुरुष हा भेद पुसट होतो. वाद झाले तरी समान पातळीवर होतात, तसेच इतर गोष्टीही.. अशा वेळी ‘हा ऽऽऽ ती बघ मावा खातेय’ किंवा ‘ती बघ झुरके मारतेय’ असले बाळबोध विचार मनात येत नाहीत.. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी’ ही असली विधानं कालबाह्य़ वाटायला लागतात.. मुळात असली उदात्त विधानं स्त्रीवर लादायचीच गरज भासत नाही. कारण मुळात या सगळ्या भावना स्त्रीमध्ये असतातच.. विषय निघाला म्हणून सांगतो प्रियादीदी (तेंडुलकर) खूप वेगळी, खूप वेगळा विचार करणारी मुलगी होती. एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर हुकमी बाजी मारण्याची तिची क्षमता होती. कपडय़ांचं दुकान, टाँकशोचं शूटिंग, मराठी, गुजराती, हिंदी रंगभूमी, मालिका, चित्रपट, त्यात तिचं लिखाण आणि दौरे दिवसाचे चोवीस तास तिला पुरायचे नाहीत, पण मातृत्वाचा विषय निघाला की कासावीस व्हायची.. त्यामुळे तिला एक छंद जडला होता. कोणी हात पाहणारा समोर आला की ती आपला हात दाखवायची करियरचं तिला इतकं पडलेलं नव्हतं, पण मी आई होईन का? हा प्रश्न ती मनात, डोळ्यात, उरात घेऊन बसायची..
आपल्याकडे स्त्रीच्या हळव्या भावनांचा वापर करून घेण्यात अनेकजण तरबेज आहेत, जसं हल्ली अनेक जाहिरातीत आईची ममता विनाकारण पणाला लावतात.. दीदीच्या एका प्रोडय़ुसरनेही प्रियादीदीची ही कमजोरी बरोबर ओळखली होती. छोटय़ा बजेटचा चित्रपट होता. दीदीच्या एका गुजराती मित्राने गळ घातली म्हणून तिने तो स्वीकारला होता. पहिल्याच शेडय़ुलला दीदीला चित्रपट स्वीकारल्याचा पश्चात्ताप होत होता त्यामुळे चित्रीकरणात तिला रस राहिला नव्हता. त्यावर त्या निर्मात्याने एक क्लृप्ती योजली. असा हात बघून भविष्य सांगणारा भामटा सेटवर आणून ठेवला तो दीदीला सांगायचा, ‘मेरी जबान है आपको बिटिया होगी.. देखना चांदसी सूंदर.. दीदी मग त्याच मूडमधे असायची. मला वाटतं, सतीश शहा का सतीश कौशिकच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्याने प्रोडय़ुसरला झापला. तो चित्रपट आला की नाही हेही धड आठवत नाही आता.
‘त्याच्या नजरेतून ती’ म्हणजे माझ्या मते शेजारी शेजारी ठेवलेले डाळ-तांदुळाचे डबे.. नजरेतून बघायला उसंतच नाही. एकत्र झाले की असे एकरूप होतात.. म्हणून तर मेतकूट जमलं म्हणतात.. खिचडी पक रही है म्हणतात. अर्धागिनी ही उपाधी म्हणूनच अतिशयोक्ती वाटत नाही.
अपवाद ही असतात, पण अपवादला उदाहरण म्हणून सादर नाही करता येत.
नवरा-बायकोचे विनोद इतके लोकप्रिय का होतात? कारण नव्वद टक्के स्त्री-पुरुष ही पती-पत्नीची भूमिका मनापासून एन्जॉय करत असतात. तिची शिस्त मनातल्या मनात त्याला पटत असते आणि त्याचं तिच्यावर विसंबून असणं तिला सुखावह असतं.
माझ्या अनुभवाचे बोल सांगू का?
सगळं तुला देऊन पुन्हा
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तू तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली..

चंद्रशेखर गोखले
chandrashekhargokhale18@gmail.com

चौकट मोडून बघेण म्हणतो

चौकट मोडून बघेण म्हणतो
मनासारखे जगेण म्हणतो
परी नेमका येउन छळतो
प्रश्न एक कातील
"पण लोक काय म्हणतील?"
झेलीत पाऊस चिँब भिजावे
सुचेल गाणे तिथेच गावे
वाटे शिँगे मोडून व्हावे वासरात सामील
"पण लोक काय म्हणतील?"
भिडभाड हुसकावीन म्हणतो
जगास हिम्मत दावीन म्हणतो
फाडीन म्हणतो सर्व मुखवटे
जीथे जसे दिसतील
"पण लोक काय म्हणतील"?
- गुरू ठाकूर

Friday, March 31, 2017

पिवळ्या कोरड्या नदीपात्रात

पिवळ्या कोरड्या नदीपात्रात
खड्डे खणून
पाणी काढाणारे लोक
जसे
सुरकुतल्या ओघळत्या
लोंबत्या स्तनातून
जीव खाउन
पाणी शोषणारे तान्हे पोर
आपली आई मरून गेलीये
हे पोराला कळत नाही
तसंच
त्या पाणी उकरणार्‍या
माणसांनाही
– अनिल अवचट

Thursday, March 30, 2017

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला
पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी
रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतू
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहीला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहीला मी
गीतकार :अनिल कांबळे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके

Wednesday, March 29, 2017

बालपण

कुठे गेले ते बालपण ?

ते अंगणात धुडूधुडू धावणे |
देवघरासाठी फूले गोळा करणे |

शाळेत न जाण्यासाठी नको ती नाटके |
आणि गेल्यावर बाईँच्या छडीचा मार खाणे |

शाळेतल्या मित्रांबरोबर खेळायला जाणे |
लवकर आलो नाही म्हणून आईचे रागावणे |

बाबांचा खांद्यावरून फेरफटका मारणे |
रस्त्यावरील खेळण्यासाठी नुसता हट्ट धरणे |

रात्रीत रंग भरणाऱ्या त्या आजीचा गोष्टी ऐकणे |
गोष्टींतल्या शंका न राहून विचारणे |

सायंकाळी ताईबरोबर अभ्यासाला बसणे |
नाही केला म्हणून तीचे ते ओरडणे |

दमल्यावर आईच्या मांडीवरच झोपणे |
नाही येत म्हणून तीचे ते बोबडे गुणगुणने |

खरचं कुठे गेले ना ते बालपण ?
***

ओळखलत क सर माला

‘ओळखलत क सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !
– कुसुमाग्रज

Tuesday, March 28, 2017

आई म्हणोनी कोणी,

आई म्हणोनी कोणी,
आईस हाक मारी
ती हाक येई कानी,
मज होय शोककारी

नोहेच हाक माते,
मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी?
आई घरी न दारी
चारा मुखी पिलांच्या
चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना
ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी
व्याकूळ जीव होई
येशील तू घराला
परतून केधवा गे?
रुसणार मी न आता
जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी,
आई घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
यशवंत दिनकर पेंढरकर

Monday, March 27, 2017

त्या व्याकुळ संध्यासमयी

त्या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो,
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो
तू आठवणींतुन माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी
पदराला बांधुन स्वप्‍ने
तू एकट संध्यासमयी,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई
तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा,
संन्यस्त सुखाच्या काठी
वळिवाचा पाऊस यावा
_ ग्रेस

Sunday, March 26, 2017

Clapping therapy, टाळ्या वाजवणे आणि आरोग्य

देवाची आरती करतांना आपण सहजपणे टाळ्या वाजवतो. पण आता आपण त्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून आरोग्य दृष्टीने महत्त्व समजून घेउया..
👏  👏  👏  👏
"क्लँपिंग थेरपी"
देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात.
मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात.
त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
अनेक वेदना कमी करण्यास मदत होते.
क्लॅपिंग थेरपी – :
खोबरेल तेल किंवा तीळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यासमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरते.
सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टीव्ह रहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो.
रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉ. देतात.
टाळी वाजवल्यानंतर कोणत्या 5 अँक्युपंचर पॉईंटला चालना मिळते :
1. Hand valley point
2. Base of thumb point
3. Wrist point
4. Inner gate point
5. Thumb nail point
या ’5′ पॉईन्ट्सला चालना दिल्यास खालील फायदे होतात-
1. हृद्याच्या आणि फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.
2. पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.
3. गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.
4. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.
5. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.
6. क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.
7. क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.
8. क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
9. मधूमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश,केसगळती, डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.
10. सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणार्‍यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

देवळा बाहेरचा माणूस ~ व पु

देवळाबाहेरचा माणूस

मन आनंदानं वाहू लागलं, म्हणजे मला देवळात जावंसं वाटतं. कोणत्याही गरजेसाठी, याचनेसाठी, कुणासमोर तरी उभं राहावं लागणं, यासारखी मानहानी नाही.  निरपेक्ष  भेटीची शान वेगळीच असते. किंबहुना तीच खरी भेट.  आयुष्यातल्या मागण्या संपणं ही आनंदपर्वणी. मी देवळात  जातो. सरळसरळ मान वर करून आराध्यदैवताचा चेहरा पाहतो. याचना नाही, मग खाली मान कशासाठी?

म्हणूनच देवळातून बाहेर पडताना, मी जास्त हलका होतो. मागण्या नाहीत म्हणून नवस बोलल्याची खंत नाही. फेडायची धास्ती नाही. माझी देऊळ- भेट म्हणजे, न मागता जे जे मिळालं, त्याची ती ACKNOWLEDGEMENT सारखी पावती असते.  देवळाच्या समोर तो बसलेला असायचा. जेमतेम आठ बाय दहाच बैठं कौलारू घर. समोर एक कट्टा. म्हणजे वाढवलेला PLINTH. तिथं एक कापडी फळा. त्यावर कोणतं ना कोणतं संतवचन. संतवचनं फार परिचयाची झाली की रक्तात मुरत नाहीत. “हरी मुखे म्हणा । हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी । । ” अशा वचनांकडे मी चित्र बघावं, तसं बघतो.

एक दिवस मात्र थबकलो.

“ हम खोज रहे है उसे, जो आसपास है!

यह जिंदगी अपने लिये घर की तलाश है! ”

ते वाचलं आणि फकिरासमोर जाऊन बसलो.

नमस्कार केला.

“ काय सेवा करू?” त्यानं विचारलं

“ या ओळींचा अर्थ हवाय. ”

“ तो अर्थ अनेकजण शोधताहेत. ”

“ अनेक? म्हणजे कोण कोण?”

“ एअरकण्डिशण्ड गाड्यांतून कैक भिकारी वर्षभर येतात. मला साधू समजतात. न मागता काही ना काही देतात. न मागताच भरपूर मिळतं. उरलेलं वाटून टाकतो. ”

“ भिकारी का म्हणता?”

“ तुमचं भिक्षापात्र मोठं आहे, रत्नजडित आहे, म्हणून तुम्ही सम्राट नव्हेत, सिकंदर पण भिकारी होता. जेवढी मोठी मागणी तेवढा मोठा भिकारी. घर हरवलेला भिकारी, सगळा जन्म घर शोधण्यात जातो. सिकंदराचाही. ”

“ माझ्या लक्षात आलं नाही. ”

“ खूप सोपं आहे, म्हणून समजलं नाही. सगळं जग जिंकलं म्हणजे काय? – दगड, माती, विटा. कारण घराचा अर्थ समजला नाही. माणसाला हवं असतं प्रेम, त्याऐवजी तो घर बांधतो. तीन तीन गाड्या घेतो. कमिशनरपासून मंत्र्यांना खिशात ठेवतो. ती चटावलेली माणसं करोडो रुपये खिशात घालतात, जमिनी तोडून देतात, पण त्या माणसाला आपलं मन देत नाहीत. सत्ता बदलली की नवे उंबरे. आजूबाजूला वावरणारी जिवंत मनं, खळाळणारे प्रेमाचे झरे त्यांना दिसत नाहीत. तुफान प्रेम करणारी जितकी माणसं जोडाल, तेवढी घरं तुमची झाली. भक्तीच्या अलीकडची प्रेमाची पायरी जिंका, पुढच्या पायरीवर परमात्मा आहे. ”

“ परमात्मा म्हणजे नेमकं कोण?”

“ परमात्मा हा माझ्याही प्रचीतीचा भाग नाही. पण शांत मन म्हणजे परमात्मा. शांत मन म्हणजेच देऊळ. ”

“ माणूस शांत आयुष्य का जगू शकत नाही?”

“ त्याला स्वतःचं आयुष्य नसतंच. ”

“ म्हणजे?”

“ जो भी मिला वो एक उस टुकडा ले गया ।

जुडता नहीं किसीसे भी, यह मन उदास है । ”

“ आता याचा अर्थ सांगतो. आपल्या आयुष्याचे सातत्यानं तुकडे होतात. आई, बाप, भावंडं, पुढे पती किंवा पत्नी, मुलं आणि शिवाय तुम्ही जोडाल तेवढी माणसं. अखंड मन शांत असतं. तुम्ही जोडलेली माणसं एकेक तुकडा घेऊन जातात. खंडित मन शांत कसं राहील सांग?”

“ नातेवाईक, समाज यांच्यात राहून मन शांत ठेवायचा उपाय आहे?”

“ प्रत्येक माणूस म्हणजे एकेक अपेक्षा. स्टेशनवरच्या हमालाशी नातं किती मिनिटांचं असतं? पण तेवढ्या मिनिटांतही तो मनस्ताप देतो. मग आयुष्याच्या शेवटी माणसं जोडूनही मन अशांत राहतं. ”

“ उपाय सांगता ना?”

“ दुसऱ्यानं कसं वागायचं, हे तुम्ही ठरवायला गेलात की तेवढा तुकडा गेला. आयुष्य खंडित, उदास झालं. तुम्ही देणारे व्हा. घेणारे झालात की प्रवाह खंडित झाला. न मागता, देणारे व्हा. मग आयुष्य वाढत राहतं. पात्र मोठं होता होता, किनारे नसलेला सागर होतो. समुद्राला कधी उदास पाह्यलंत? मागणारे देवळात येतात. न मागणारे स्वतःच्याच गाभाऱ्यात कृपा असतात. ”

जेवढ्या माणसांना संसारात विसंवादी साथीदार मिळाले, त्या सगळ्यांचं होमकुंड आठवून मी विचारलं,

“ माणूस खरंच कुणासाठी जीव टाकत नाही?”

प्रेम आणि भक्तीच्या वर नेणाऱ्या ओळी फकिरानं ऐकवल्या.

“ जितने भी उज्वल ख्याब थे, रात बन गये । ”

फिर भी न जाने, कौनसे सुबह की आस है । ”

“ किती उज्वल भविष्याची स्वप्न पाह्यलीस?”

“ अगणित. ”

“ त्यांचं काय झालं?”

“ पुन्हा रात्रीच्या अंधारात त्यांचं रूपांतर झालं. ”

“ तुमचं सुप्त मन, एक दैवीशक्ती, तू कोण होऊ शकशील, त्याची झलक दाखवतं. सूर्यप्रकाशात ती स्वप्न साकार करायची जिगर हवी. आणि ही जिगर देवळांच्या रांगेत मिळत नाही.”

“ तुम्ही देवळासमोर राहता. याच परिसरात. कधी देवळात जाता?”

“ एकदाही नाही, पण त्या कृष्णाच्या मूर्तीची मी खडान्‌खडा माहिती सांगू शकेन. ”

“ आपलं नाव?”

“ सम्राट शहेनशहा – म्हणशील ते. ”

“ खरं नाव?”

“ हीच खरी नावं. ज्याच्या जीवनातल्या मागण्या संपल्या तो सम्राटच. ”

आणि त्यानंतर खरोखरच त्या सम्राटानं माझ्यासमोर शब्दातून शिल्प उभं केलं. मूर्तीची उंची, मुकुट, दागदागिने, भावमुद्रा, हातातली बासरी, त्यावरची बोटं त्यानं प्रत्यक्ष पोज घेऊन दाखवली.

“ इतकं अचूक सांगताहात, प्रत्यक्ष देवळात का नाही गेलात?”

“ मला मूर्तीकडे पाह्यलं की चैतन्यशून्य संगमरवरी दगड दिसतो. त्या मूर्तीपेक्षा, समोरचं तळं, कारंजी, मासे, बदक, फुलं, वाऱ्यानं  हलणारी झाडं आणि मघाशी मी ज्यांना एअरकण्डिशण्ड भिकारी म्हणालो ना तिथंच तो चैतन्यानं दिसतो. ”

“देवळात येणाऱ्यांना आपण भिकारी का म्हणता?”

“ त्याच्याजवळ देण्यासारखं प्रचंड आहे. यांच्या – मागण्या क्षुद्र आहेत, म्हणून न मागता किती मिळालंय, हे त्यांना दिसत नाही. ”

“ वर्णन कसं केलंत मूर्तीचं?”

“ मीच त्या मूर्तीचा शिल्पकार आहे. ”

मी उडालोच.

“तरी तुम्ही असे, इथे?”

“ मी ही मूर्ती घडवली. पण ती विकली जाईना. माझं सगळं चैतन्य मूर्तीत ओतून मी रिकामा झालो होतो. मग ती मूर्ती मी एके ठिकाणी पुरली. फकीर झालो. एका साखरसम्राटाला भेटलो. तुला साक्षात्कार होईल, म्हणून सांगितलं. त्यानंतर हे देवस्थान त्या साखरसम्राटानं बाधलं. तो दानशूर झाला.” ‘ साखरेच खाणार तोच देव घडवणार ‘ असं मी म्हणतो. मला त्या मूर्तीत दगडच दिसतो आणि इथं रांगा लावणाऱ्यांत चैतन्य दिसतं. आता शेवटचं सांगतो.

“ पूजा के वख्त देवता पत्थर बना रहा ।

वैसे तो जर्रेजर्रेमें उसका निवास है । ”

“ तुम्हाला साक्षात्काराचा खोटा आधार का घ्यावासा वाटला?”

“ उरलेल्या दगडात, म्हणजे मूर्ती साकार झाल्यावर, उरलेल्या तुकडे करून फेकलेल्या संगमरवरातही मला देवच दिसला. त्याचा हा चौथरा, साखरसम्राटानंच बांधून दिला. निर्मितीलाही साक्षात्काराचा शेंदूर फासल्याशिवाय, परंपरेचा, धर्माचा चिखल फासल्याविना, मूर्तीचं देवस्थान होत नाही. ”

आता मी अॅकनोलेजमेंट रिसीट फाडण्यासाठीही देवळात जात नाही. रिसीट कुणाला देऊ? – माझी मलाच?

मी आता जातो. सम्राटाला भेटतो. जिथं प्रेम दिसतं तिथं चैतन्य दिसतं. मन अपार करुणेनं वाहू लागलं, वाऱ्याची झुळूक जरी आली तरी त्याचं दर्शन घडलं, की माझ्याच शरीराचं देऊळ होतं.

कृष्णाची बासरी ऐकू येते.

 –  व.पु. काळे  (कालनिर्णय, फेब्रुवारी १९९६)

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती


इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी

जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती
सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे

मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे

तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी

गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

_ मंगेश पाडगांवकर
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती


इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी

जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती
सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे

मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे

तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी

गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

_ मंगेश पाडगांवकर

Saturday, March 25, 2017

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?


वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला?
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला?
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी

अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा?
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा?
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा?
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

_ संदीप खरे [by Sandeep Khare]

Friday, March 24, 2017

आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही

आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई


तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई

गीत: ग. दि. माडगूळकर

Thursday, March 23, 2017

Marathi Digital Library


'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांसाठी प्रथम प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचा एक महत्वकांक्षी प्रकल्प मंडळाने हाती घेतला आहे. यानुसार सदर प्रकल्पांतर्गत मंडळाच्या पुस्तकाचे ई-बुक मध्ये रूपांतर करून त्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम चालू असून ते साधारणतः एक वर्षभर चालणार आहे, त्याबरोबरोबरच मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-पुस्तकांमधील शुध्दलेखनाच्या चुकांच्या दुरूस्त्यांचे कामदेखील समांतररित्या चालू असणार आहे तरी कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.'


मराठी पुस्तके

मोफत पुस्तके

Marathi Digital Library

esahity

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर


अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर ॥ १ ॥



अरे संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले
लोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥

अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येड्या गयांतला हार
म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एका तोंडामधी कडू
बाकी अवघा लागे गोड ॥ ४ ॥

अरे संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गॊडंब्याचा ठेवा ॥ ५ ॥

देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे
मधी चिकने सागरगोटे ॥ ६ ॥

ऐका संसार संसार
दोन जीवांचा विचार
देतो दु:खाले होकार
अन सुखाले नकार ॥ ७ ॥

देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखादु:खाचा बेपार ॥ ८ ॥

अरे संसार संसार
असा मोठा जादूगर
माझ्या जीवाचा मैतर
त्याच्यावरती मदार ॥ ९ ॥

अरे संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार ॥ १० ॥
__ बहीणाबाई चौधरी

Wednesday, March 22, 2017

झोपली गं खुळी बाळे

झोपली गं खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी ह्या रित्या वेळी
चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वाऱयाच्या धमन्या
धुकल्या गं अंतराळी
शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणें
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे
चैत्र चालला चाटून
वेड्या सपाट पृथ्वीला
आणि कोठेतरी दूर
खुजा तारा काळा झाला
आता भ्यांवे कोणी कोणा
भले होवो होणाऱ्याचे
तिरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे
चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली
वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती
चाळणीत चाळणी अन
विचारांत तरी माती
चैत्रबाप्पा उद्या या हो
घेऊनीया वैशाखाला
आंबोणीच्या मागे का गं
तुझा माझा चंद्र गेला?
आंबोणीच्या मागे का गं
अवेळी का चंद्र गेला?
__बा.सी.मर्ढेकर