Showing posts with label मी माझा. Show all posts
Showing posts with label मी माझा. Show all posts

Saturday, April 18, 2026

मी माझा ६


मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा... ही कविता खरं तर मी माझा च्या कृष्ण धवल मुखपृष्टावर असणार होती, म्हणजे तसच ठरलं होतं 
यातून मी माझाची भूमिका स्पष्ट होते असं माझ्या एका मित्राचं म्हणणं होतं 
मित्र म्हणायचं  , नाहीतर आम्ही पार्ल्यातले एका शाळेतले म्हणून एकमेकाला माहीत होतो पण तेंडुलकर परीवार या पुस्तकात रस घेतोय म्हंटल्यावर तो कसा येऊन चिकटला मला समजलच नाही 
पण असं होतं कधी कधी , आपल्या लक्षात येत असतं पण आपण झटकू शकत नाही, एकतर कुणाचा उगाच अपमान करायचा आपला  स्वभाव नसतो
आणि आपण मान्य करत राहतो
मग अगदी पुस्तक छपाईला गेलं,  माईच्या मते फक्त चार ओळींची  एक कविता एका पानावर म्हणजे पान रिकामं दिसण्याचा धोका होता म्हणून माई म्हणाली प्रत्येक कवितेला एक चित्र काढ पण मग प्रिंटींगचा खर्च वाढत होता म्हणून सगळ्या कविताना एकच चित्र काढायचं ठरलं जे सगळ्या मूडना सूट होईल असं , म्हणून समुद्राकाठी खडकावर एकटी बसलेली व्यक्ती मी रेखाटली आणि ती प्रचंड जमून आली 
म्हणजे प्रिया दिदि म्हणाली की अरे हे चित्र नाही ही सुद्धा एक कविताच आहे 
असं सगळं जमून आलेलं असताना रात्री साधारण अकरा वाजता सुषमा तेंडुलकरचा माईला फोन गेला कारण  गोखल्यांचा फोन बंद होता 
माई घाबरली , इतक्या रात्री कुणाचा फोन 
सुषमा म्हणाली महत्वाचं सुचवायचं होतं म्हणून फोन केला 
ती म्हणाली मुखपृष्ठावरची कविता बदलुया 
का? माई चकीत होत म्हणाली 
सुषमा म्हणाली एक मास्टरपीस कविता आहे ज्या कडे आपलं लक्षच गेलं नाही 
कव्हर वर अशी कविता हवी जी सर्वाना अपील होईल, 
माई म्हणाली कुठली कविता ? सगळ्याच कविता छानच आहेत
सुषमा म्हणाली माई लगेच अगदी शेखरची बहीण होऊन बोलू नकोस, मी काय सांगते ऐक, मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा ही शेखरची भूमिका झाली 
पण त्या आधी पुस्तक हातात पडल्या पडल्या वाचकाची एक भूमिका तयार होणं गरजेचं आहे 
आणि मला वाटतं पुसणारं कोणी असेल
                        तर डोळे भरून यायला अर्थ आहे
ही कविता अल्टिमेट आहे, शेवटी साहित्यिकाची मुलगी होती ती, आणि माझ्या बद्दल किती आस्था होती बघा की तिच्या डोक्यात नाही मनात ते घोळत राहिलं  होतं , माईलाही ते पटलं 
तेंव्हा माई विजया बँकेत नोकरी करत होती सकाळी सात साडेसातला ती घर सोडायची , ती घरून निघाली ती सकाळी घरीच आली 
डोळे उघडल्या उघडल्या समोर माई आणि कानावर आलेलं पहिलं वाक्य शक्या आपण मुखपृष्टावरची  कविता बदलूया 
हादारायला होणं म्हणतात तसं झालं 
ती म्हणाली आवर लवकर आपण अत्ताच जाऊन सांगुया नाहीतर नेमकं तो कव्हरचं काम अत्ताच करायला घेईल
दात घासत अंघोळ केली आणि केस पुसत अंगावर कपडे चढवले 
आई दादा तसे उदासीन होते म्हणून त्यानी फार प्रश्न विचारले नाहीत
टेंशन ते नव्हतच , प्रींटर आमचा जरा तिरकस होता तो काय बोलेल ते ऐकावं लागणार होतं आम्ही प्रिंटरलाच प्रकाशक समजत होतो इतकं आमचं अगाध द्न्यान होतं 
आम्ही अगदी नऊ सव्वा नऊलाच त्याच्या प्रेसवर पोहोचलो
आणि कविता बदलायची सांगितलं  आणि गम्मत म्हणजे पुसणारं कोणी असेल तर ... ही कविता त्याने ऐकली आणि आपला तिरकस पणा बाजुला ठेवत त्याने मनापासून मान्य केलं  वा वा आता पुस्तकाला वजन येईल असं तो म्हणाला, त्या दिवशी लंचटाईम नंतर तो कव्हर करायला घेणारच होता 
मग तिथून बाहेर पडे पर्यंत माईच्या बँकेची वेळ टळून गेली 
मग आम्ही तिथेच सन्मान मधे काहीतरी पोटात ढकलायला गेलो तिथे नेमका माईचा चुलत दीर आला 
माईचा नोकरीला जाण्याचा एकूण उत्साह सगळ्याना माहीत होता
तो अगदी उलट तपासणी घ्यायच्या थाटात म्हणाला तू अत्ता इथे कशी ?
माई अगदी सहज म्हणाली लंच टाईम आहे
तो  घड्याळात बघत म्हणाला इतक्या लवकर?
माईकडे उत्तर तयार होतं ती म्हणाली मी आज रिक्वेस्ट करून मागून घेतला
त्यावर त्याने जे तोंड केलं ते मी काय माई काय तो दीर पण विसरला नसेल
लंच टाईम मागून घेतला हे काय उत्तर झालं ? तो गेल्यावर आम्ही खूप हसलो
पण एकूण त्या दिवशी केलेल्या धावपळीचं सार्थक झालं 
                   पुसणारं कोणी असेल तर 
                   डोळे भरून यायला अर्थ आहे
                   कुणाचे डोळे भरणार नसतील तर
                   मरण सुद्धा व्यर्थ आहे
ही कविता मुखपृष्ठावर आली आणि तिने इतिहास घडवला, कित्येकांच्या पत्रामधे हा उल्लेख  आवर्जून असायचा की मुखपृष्ठा वरची कविता वाचली आणि पुस्तक घेऊनच टाकलं , किंवा वाचतच राहिलो...
अगदी ट्रकच्या मागे सुद्धा या ओळी उमटल्या , कित्येक स्मशान भुमींच्या भिंतीवर त्या लिहिल्या गेल्या , किती रंगावली प्रदर्शनात मी माझाचं कव्हर चित्तरलं गेलं तिथे रसीक मोठ्याने या ओळी वाचत असल्याचं मी ऐकलय
आता बाबा नाहीत , सुषमालाही जाऊन आठ वर्ष झाली 
आई , प्रिया दिदि, राजू त्या आधीच गेले
पण मी माझा चा वाढदिवस जवळ आला की हे सगळे आपापली जागा घेऊन परत उभे राहतात आणि मी आठव्णींच्या पसार्‍यात बसून राहतो.

#चंगो

मी माझा ५

आज अठरा एप्रिल गुरूवार 
मी माझा प्रकाशित झालं तेव्हा ही अठरा एप्रिल ला गुरुवारच आला होता.
माईच्या वाढदिवसाला मी माझा प्रकाशित करायचं म्हणून खूप मोठी जंग लढावी लागली असं आता वाटतंय.
३४ वर्ष झाली, म्हणून मी माझा ची गोष्ट ३४वर्षांपूर्वी सुरू झाली असं नाही त्या आधी दोन वर्ष जेव्हा मी माई कडे रहात असून तेंडुलकरांकडे जास्त असायचो तिथून आहे.योग असतात तशा गोष्टी घडतात.तेव्हा प्रिया तेंडूलकर रजनी म्हणून फेमस होती.आणि मी तिच्या परिवारातला होतो म्हणून मला जरा वाव होता.तेव्हा दीदी खरच मला हर तर्हेने मदत करायला धडपडायची.तेंव्हा मॉडेल कोआर्डीनेशन हे माझं तग धरून रहायचं मुख्य साधन होतं, खूप पायपीट करावी लागायची हेलपाटे घालावे लागायचे तर वरळी नाका हा माझा तेव्हा चा पाया खालचा एरीया होता कारण बऱ्याचश्या ऍड एजन्सी त्या एरीयात होत्या.मग दिदी चं शुटींग जवळपास असलं तर दिदी मला शुटींग ला जाताना गाडीने तिथे सोडायची, यातायात वाचवायची तर मला भल्या सकाळी दीदी निघायच्या वेळी बद्रीधाम मधे दीदी समोर हजर व्हावं लागायचं आता जाणवतं किती चिडली रागावली तरी दीदी अर्धा पाऊण तास माझी वाट बघत थांबली आहे.तर तेव्हा एकदा माझ्या आयुष्यातील ती अमृत घटीका आली.मी वेळेवर बद्रीधाम मधे पोहोचलो पण दीदीचा मेकअप मन उशीरा आला होता म्हणून दीदीचा मेकअप सुरू होता.सगळं सगळ्याला जोडलेलं असतं फक्त आपल्याला त्याची कल्पना नसते तसं झालं अचानक दीदी ने माझी समोर ठेवलेली बॅग स्वतः कडे खेचून घेतली. तशी ती अधे मधे माझी बॅग चेक करायचीच आई म्हणायची सिगरेट लायटर एखादी पूडी तर बॅगेत नाही ना?हे ती चेक करते कारण राजू फार लवकर स्मोक करायला लागला होता.तिला त्या झडतीत तसं काहीच मिळालं नाही पण अशक्यातली गोष्ट माझी कवितांची बंद वही मिळाली जी मी कधीच कधीच घरा बाहेर काढत नव्हतो.कवितेची वही इतर ठिकाणी थट्टेचा विषय ठरू शकतो पण तेंडुलकरांच्या घरचं वातावरण च वेगळं होतं दूनियाभर चे होतकरू तरुण बाबांना नाहीतर दीदीला त्यांच बाढ दाखवायला घेऊन यायचे आणि दोघांकडे पेशंस दांडगा होता दोघं मन लावून ऐकायचे चर्चा करायचे आई मुळे माझ्या दोन चार कथा बाबां पर्यंत पोहोचल्या होत्या पण माझं स्वतः चं धाडस कधी झालं नाही.त्या दिवशी सुध्दा ती बंद वही कशी बॅगेत बसून तिथपर्यंत आली आश्चर्य आहे 
पण तो योग होता ती घटीका ठरली होती त्या नुसार दीदी ने माझी झोळी उपडी केली आणि माझी बंद वही तिच्या समोर उघडी पडली.आणि माझं नशिब च उघडलं अनेक मार्ग उघडले 
भर दुपारी 
सावली 
वडा खाली 
धावली,

मी बुडताना गाव माझा
ओझरता पाहिला होता 
मला पहायला गाव माझा 
काठावर उभा राहिला होता 

उमलणं आणि फुलणं 
दोघात खूप अंतर आहे 
उमलणं अगदी स्वाभाविक आहे 
फुलणं त्या नंतर आहे 
दीदी एका मागे एक कविता झर झर वाचत गेली.एक इशारा करून तिने मेकअप कधीच थांबवला होता.तिने एक कटाक्ष माझ्या कडे टाकला तो कटाक्ष म्हणजे नव्या पर्वाची नांदी होती 
माझ्याशी बोलायच्या आधी तिने फोन जवळ ओढला आणि माझ्या आठवणी प्रमाणे आठ दहा फोन करून माझ्या कविता ऐकवल्या.लोकप्रभेच्या कार्यालयात ही मी दीदी ने पाठवलेला युवक म्हणून पोहोचलो.नाहीतर अशा साप्ताहिकाच्या कार्यालयात नवोदित कवीला कोण उभं करतंय 
पण मग लोकप्रभेने मला खऱ्या अर्थाने लोकांसमोर आणला 
सातत्याने माझ्या कविता ना लोकप्रभेच्या अंकात दोन दोन तीन तीन पानं दिली.लोकप्रभा मधे कविता वाचून च सीमाताई देव गोखल्यांच घर शोधत विलेपार्ल्याला मला भेटायला आल्या ही माझ्या आयुष्यातील  दखल घ्यायला लावणारी पहिली घटना होती.मग दीदी ने माझी झोळी समोर उपडी केली ही माझा च्या गोष्टी ची सुरुवात धरायची का?
ती सुरुवात धरली तर त्या आधीची ही एक सुरूवात खुणावते आहे.तारीख साल वार काही आठवत नाही पण 
पाण्याचं वागणं 
किती विसंगत 
पोहोणाऱ्याला बुडवून 
प्रेताला ठेवतं तरंगत या ओळी सुचल्या त्या वेळी माझ्या कडे कवितेसाठी वही देखील नव्हती.ओळी चमकून गेल्या आणि मी त्या कशावर तरी उतरवून ठेवल्या 
पण त्याला नजाकत प्राप्त झाली ती माईच्या उस्फुर्त हरखून जाण्याने,तिने कसं आणि किती कौतुक केलं हे तपशीलवार आठवलं तरी मी शब्दात मांडू शकत नाही.मला आधी ही सुचत होतं आणि मी लिहीत ही होतो पण पाण्याचं वागणं मी अधोरेखीत केल्याने चार ओळींची कविता हा साचा तयार झाला
अडकलेला पतंग 
आधी काढायला बघतात 
आणि निघत नाही म्हंटल्यावर 
फाडायला निघतात 

देवळात जाऊन माणसं 
दुकानात गेल्यासारखी वागतात 
चार आठ आणे टाकून 
काही ना काही मागतात 

मरण दाराशी आल्यावर 
मी म्हटलं तुला शंभर वर्षं आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं म्हणालं
काय हा मनुष्य आहे 
अशा कविता सुचत होत्या आणि माई ने वही आणून दिल्यामुळे त्या एका सोबत एक जमत होत्या.मग ही सुरुवात धरायची तर मला अजून एक सुरूवात ठळकपणे आठवते 
तेंव्हा तर मी साडेतीन चार वर्षांचा होता.ढ मुलगा अशी माझी ओळख अजून ठरायची होती.चित्तरंजन रोड वरच्या जून्या घराच्या रम्य परीसरात मी निर्धास्त बागडत होतो 
आणि अकल्पित एक घटना बघून मी हबकून गेलो.
अंगणात आपली गोजिरवाणी चार पाच पिल्लं घेऊन एक कोंबडी पायाने माती हलवत दाणे टिपण्यात मग्न होती आणि ते मनोहरी दृश्य बघण्यात मी रमलो असताना अचानक एक अघटीत घडलं 
घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिल्लांपाशी असं आपण म्हणतो पण या घारीचं लक्ष या कोंबडीच्या पिल्लांकडे होतं 
ती आली आणि झडप घालून एक पिल्लू तिने आकाशात नेलं 
माझा थरकाप उडाला माझ्या आयुष्यातील पहिला थरार.पण त्याची दखल माझ्या आईनेही घेतली क्षणात मला कडेवर घेत पोटाशी धरत ती म्हणाली हे असच असतं राजूल्या.यालाच जगरहाटी म्हणतात 
त्या क्षणी आईने मला उचलून घेतलं नसतं तर?माझी समजूत काढली नसती तर?माझा कोवळेपणा करपून गेला असता.जिवनातली विसंगती वेचण्याची कला दडपून गेली असती तर मला वाटतं ती खरी सुरुवात आहे 
नव्वद साली माई च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर ती सुरुवात व्यापक बनली
आता त्या प्रवासातले बरेच जण गहाळ झाले कोणी हयात नाहीत कोणी जवळ नाहीत तर कोणी माझे राहिले नाहीत 
पण अठरा एप्रिल म्हंटलं की हे सगळं आठवतं आठवत राहणार.

#चंगो 
मी माझा चा वाढदिवस

मी माझा ४

मी माझा लोकंप्रिय होत असल्याची पावती तेंव्हा मला किती प्रकाराने मिळत होती, त्याची एक आठवण सांगतो. तेंव्हा आम्ही नुकते गोरेगावला गोकुळधामच्या वसाहतीत डेरेदाखल झालो होतो
भोवती कामगार वस्ती अधीक त्यामुळे हिरवळीत सदाफुलीचं रोप उठून दिसतं तसे आम्ही दोघे दिसत होतो त्यात आम्ही दोघे कायम एकत्र...साधी साखर संपली तरी साखर आणायला जोडीने बाहेर पडायचो.. कोणी आपणहून बोलायला यायचं नाही..पण एकदा वडाळकर नावाच्या इसमाने हिम्मत केली ..तेंव्हा मी एका वर्तमान पत्राच्या पुरवणीत दर रविवारी एक गोष्ट द्यायचो सोबत घरचा नंबर...गोष्ट वाचून खूप फोन यायचे त्यात याने फोन केला नंबरवरून याने ओळखलं याच एरियातला नंबर आहे.. मग त्याने फोनवर बोलून आमची ओळख करून घेतली एका हाँटेल वर तो ड्रायव्हर होता तुकाराम वडाळकर.. शिक्षण नाही अजिबात.. पण मिळेल ते वाचायचा, खूप वाचायचा... पहिल्या भेटीत मी त्याला ’मी माझा’ दिलं
त्याने ते चाळल्या सारखं करून खिषात ठेवलं...चार चार ओळी बघून त्याची थोडी निराषाच झाली असावी..
आणि दोन दिवसानी सकाळी तो आला आणि सांगितलं तर खोटं वाटेल पण असा रांगडा गडी उंबरठ्यात बसून ढसा ढसा रडायला लागला.. आम्ही नवे होतो त्या परिसरात पण तो तिथलाच रहिवासी होता त्यात आमचं घर तळमजल्यावर होतं... आम्ही गोंधळलो..कोणी बघितलं तर काय म्हणेल?.. बरं ! तो ढोंगही करत नव्हता.. त्याचा टाहो अगदी प्रामाणीक होता...
जरा शांत झाल्यावर तो म्हणाला माहीत नाही साहेब पण हे पुस्तक नेल्या पासनं धा दा हे पुस्तक वाचलं आणि असच उमाळा येऊन रडायला येतय बघा....आवरतच नाही.. पुस्तक खिशात नसल तर चुकल्या चुकल्या सारखं होतय बघा... मग आमची ओळख वाढली ,भेटी वाढल्या.एकदा त्याच्या आग्रहाखातर आम्ही त्याच्या अंधार्‍या घरी गेलो, त्यानी एकजात सगळ्याना आमच्या पाया पडायला लावलं...
खरी कमाल त्याने नंतर केली.. त्याला दिलेली प्रत त्याने आळंदीला माऊलींच्या चरणाशी ठेवली.. हे मलाही सुचलं नाही.आणि हे आपणहून तो सांगायलाही आला नाही त्याच्या लेकीने सांगितलं म्हणून कळलं.
आणि खरी कमाल तर पुढेच आहे
एकदा तो हाँटेलची माणसं घेऊन खोपोलीला गेला होता तिथे एका ढाब्यावर त्याने पाहिलं एका ट्रकच्या मागे पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे... ही कविता लिहिलेली होती.. तो हरखून गेला. नक्की त्याला त्यात काय अलौकीक वाटलं कोणजाणे पण तो जाम खुष झाला....खरं तर तिथे तो फक्त त्या लोकांसोबत जेवणापुरता थांबला होता पण तेव्हढ्या वेळात त्याने सगळं जमवून आणलं...
तेंव्हा फोटो काढणं अत्ता सारखं इतकं सोपं नव्हतं जिकरीचंच होतं ...पण तरी त्या ट्रक वाल्याला थांबवून त्याने गावातून फोटोग्राफर आणला आणि त्याचा फोटो काढून घेतला... त्याची प्रत मिळवण्याची तजवीज केली.....कशासाठी हा खटाटोप? ही तळमळ मला खरच उमगत नाही... कधी कधी वाटतं आपण या निर्व्याज प्रेमाला लायकच नाही...
अत्ता अत्ता पर्यंत तो फोटॊ डोळ्यासमोर होता...असेलही नीट ठेवलेला पण सध्या जरा दिसेनासा झालाय....
 तुकाराम वडाळकर सुद्धा दोन वर्षापुर्वी कर्क रोगाने निधन पावला...कित्येक वर्षात आमची गाठ भेट नव्हती तो आजारी असल्याचं कळल्यावर आम्ही भेटायला गेलो होतो पण त्याने भेट नाकारली.. त्याचा मुलगा म्हणाला पप्पानी इथूनच नमस्कार सांगितलाय...संपला संवाद !....... पण  काही माणसं हरवत नाहीत त्यातला तुकाराम वडाळकर होता....आहे...
#चंगो

मी माझा २

अठरा तारखेला मी माझा या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होतायत त्या प्रित्यर्थ मी माझाचे काही किस्से

मी माझाचे किस्से सांगतो
त्या दिवसात म्हणजे मी माझा नवा असताना निशिगंधा वाडचा पण एक काव्यसंग्रह येऊ घातला होता त्यासाठी तिने शांताबाई शेळक्यांवर प्रस्तावनेची जबाबदारी टाकली होती.. ठरल्याप्रमाणे शांताबाईनी प्रस्तावना लिहून दिली
निशिगंधाने ती प्रस्तावना वाचली तर तिची पंचायीत झाली.. कारण निशिगंधाच्या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताना शांताबाईनी पूर्ण मी माझाचंच कौतूक केलं होतं ... निशिगंधाने नम्रपणे ही गफलत बाईंच्या लक्षात आणून दिल्यावर बाई मनमोकळं हासत म्हणाल्या अगं काय करू, या पुस्तकानी मला झपाटूनच टाकलय.(शांताबाईंकडून मी माझा साठी हे उद्गार म्हणजे मी माझा बहुमानच समजतो)
.हा किस्सा मला स्वत: निशिगंधानेच सांगितला
विजय केंकरे जेंव्हा पु लंचा असा मी असा मी नाट्यस्वरूपात बसवत होता तेंव्हाकाही नव्या कलाकरांच्या निवडीसाठी त्याने मुलाखती ठेवल्या होत्या तेंव्हा एकदोघे महाभाग असे होते की असा मी असा मी ला ते मी माझा समजले.. एकज्ण तर विजयला म्हणाला असा मी असा मी तर माझं तोंडपाठ आहे विजयला आष्चर्य वाटलं असा मी असा मी तोंडपाठ आहे?काही म्हणून दाखव.. तो घडा घडा मी माझा मधल्या कविता म्हणायला लागला...
एक किस्सा तर भारीच आहे. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी पर्यंत मुलगी बघण्याचे कार्यक्रम साग्रसंगीत व्हायचे कांदेपोहे विणकाम भरतकाम या बरोबरीनेच मुली गाणं येतं का विचारणारे कोणीतरी असायचेच तर शैलजा कान्हेरे नावाची मुलगी होती तिने पत्राद्वारे हा किस्सा कळवला
तिला दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेंव्हा तिला गाण्यासाठी विचारलं गेलं ती उत्साहात म्हणाली मला गाता येत नाही पण मी तुम्हाला काही कविता म्हणून दाखवते..
आणि तिने मी माझाचं पारायण सुरू केलं सगळ्यानी एंजाय केलं...
दोनच दिवसा नंतर तो मुलगा एका पुस्तक प्रदर्शनाला गेला तिथे त्याला मी माझा सापडलं ... त्याने होकार कळवताना मी माझाची मदत घेतली.."हो"'असं मोठ्या अक्षरात मी माझाच्या पहिल्या पानावर लिहून प्रत तिच्या घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था केली...किती छान नाsss..
गेल्या पंचवीस वर्षात असे कितीतरी किस्से जमा होत गेलेत...

#चंगो

मी माझा

#मीमाझा
सहा प्रकाशकानी नाकारलेलं माझं कवितांच बाड
या दिवशी पुस्तक रूपाने प्रकाशित झालं 
आजी सोनियाचा दिनू म्हणावा तसाच तो दिवस होता अठरा अेप्रील अेकोणीसशे नव्वद, गुरूवार होता 
बाबांच्या शुभहस्ते प्रकाशन झालं होतं
बाबा पुस्तकाला प्रस्तावनाही द्यायला तयार होते 
मिच अगाअूपणा केला प्रस्तावना नको म्हणालो 
कुणाचा राग कुणावर काढला 
तेंव्हा बाबानी कलती मान करत अुंचावलेल्या भुवया अजून आठवतात ,बाबा म्हणजे 'विजय तेंडुलकर '
आठवताना काही 
वगळून चालत नाही 
आणि सांगताना  सगळं
अुगाळून चालत नाही 
असं मिच म्हणालो असलो तरी अठरा अेप्रील म्हंटलं की माझा सगळा दिवस अुगाळण्यातच जातो 
३० वर्षां पूर्वीचा हा दिवस मी पून्हा अुद्या चोवीस तास जगेन
डोळ्या समोर सगळं लख्ख आहे 
आणि जवळ तेंव्हाचं कोणी नाही 
असा विरोधाभास आहे 
'विरोधाभास 'हा गोखल्यांच्या कवितेचा स्थायीभाव  आहे असं समिक्षक तेंव्हा म्हणायचे
जे त्याना तेंव्हा जाणवलं ते मला अत्ता जाणवतय 
तसही सगळं मला अुशीराच समजतं 
काही काही गोष्टी तर समजतच नाहीत 
म्हणूनच असेल...
माझ्याकडे प्रश्नाचं अुत्तर नसतं 
तेंव्हा मी फक्त हसतो 
पण त्या मुळे कायम 
मी हसतानाच दिसतो 
ही माझी व्यथा नाही 'मी माझ्या'ची कथा आहे.
#चंगो