अठरा तारखेला मी माझा या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होतायत त्या प्रित्यर्थ मी माझाचे काही किस्से
मी माझाचे किस्से सांगतो
त्या दिवसात म्हणजे मी माझा नवा असताना निशिगंधा वाडचा पण एक काव्यसंग्रह येऊ घातला होता त्यासाठी तिने शांताबाई शेळक्यांवर प्रस्तावनेची जबाबदारी टाकली होती.. ठरल्याप्रमाणे शांताबाईनी प्रस्तावना लिहून दिली
निशिगंधाने ती प्रस्तावना वाचली तर तिची पंचायीत झाली.. कारण निशिगंधाच्या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताना शांताबाईनी पूर्ण मी माझाचंच कौतूक केलं होतं ... निशिगंधाने नम्रपणे ही गफलत बाईंच्या लक्षात आणून दिल्यावर बाई मनमोकळं हासत म्हणाल्या अगं काय करू, या पुस्तकानी मला झपाटूनच टाकलय.(शांताबाईंकडून मी माझा साठी हे उद्गार म्हणजे मी माझा बहुमानच समजतो)
.हा किस्सा मला स्वत: निशिगंधानेच सांगितला
विजय केंकरे जेंव्हा पु लंचा असा मी असा मी नाट्यस्वरूपात बसवत होता तेंव्हाकाही नव्या कलाकरांच्या निवडीसाठी त्याने मुलाखती ठेवल्या होत्या तेंव्हा एकदोघे महाभाग असे होते की असा मी असा मी ला ते मी माझा समजले.. एकज्ण तर विजयला म्हणाला असा मी असा मी तर माझं तोंडपाठ आहे विजयला आष्चर्य वाटलं असा मी असा मी तोंडपाठ आहे?काही म्हणून दाखव.. तो घडा घडा मी माझा मधल्या कविता म्हणायला लागला...
एक किस्सा तर भारीच आहे. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी पर्यंत मुलगी बघण्याचे कार्यक्रम साग्रसंगीत व्हायचे कांदेपोहे विणकाम भरतकाम या बरोबरीनेच मुली गाणं येतं का विचारणारे कोणीतरी असायचेच तर शैलजा कान्हेरे नावाची मुलगी होती तिने पत्राद्वारे हा किस्सा कळवला
तिला दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेंव्हा तिला गाण्यासाठी विचारलं गेलं ती उत्साहात म्हणाली मला गाता येत नाही पण मी तुम्हाला काही कविता म्हणून दाखवते..
आणि तिने मी माझाचं पारायण सुरू केलं सगळ्यानी एंजाय केलं...
दोनच दिवसा नंतर तो मुलगा एका पुस्तक प्रदर्शनाला गेला तिथे त्याला मी माझा सापडलं ... त्याने होकार कळवताना मी माझाची मदत घेतली.."हो"'असं मोठ्या अक्षरात मी माझाच्या पहिल्या पानावर लिहून प्रत तिच्या घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था केली...किती छान नाsss..
गेल्या पंचवीस वर्षात असे कितीतरी किस्से जमा होत गेलेत...
#चंगो

0 comments:
Post a Comment