मी माझा लोकंप्रिय होत असल्याची पावती तेंव्हा मला किती प्रकाराने मिळत होती, त्याची एक आठवण सांगतो. तेंव्हा आम्ही नुकते गोरेगावला गोकुळधामच्या वसाहतीत डेरेदाखल झालो होतो
भोवती कामगार वस्ती अधीक त्यामुळे हिरवळीत सदाफुलीचं रोप उठून दिसतं तसे आम्ही दोघे दिसत होतो त्यात आम्ही दोघे कायम एकत्र...साधी साखर संपली तरी साखर आणायला जोडीने बाहेर पडायचो.. कोणी आपणहून बोलायला यायचं नाही..पण एकदा वडाळकर नावाच्या इसमाने हिम्मत केली ..तेंव्हा मी एका वर्तमान पत्राच्या पुरवणीत दर रविवारी एक गोष्ट द्यायचो सोबत घरचा नंबर...गोष्ट वाचून खूप फोन यायचे त्यात याने फोन केला नंबरवरून याने ओळखलं याच एरियातला नंबर आहे.. मग त्याने फोनवर बोलून आमची ओळख करून घेतली एका हाँटेल वर तो ड्रायव्हर होता तुकाराम वडाळकर.. शिक्षण नाही अजिबात.. पण मिळेल ते वाचायचा, खूप वाचायचा... पहिल्या भेटीत मी त्याला ’मी माझा’ दिलं
त्याने ते चाळल्या सारखं करून खिषात ठेवलं...चार चार ओळी बघून त्याची थोडी निराषाच झाली असावी..
आणि दोन दिवसानी सकाळी तो आला आणि सांगितलं तर खोटं वाटेल पण असा रांगडा गडी उंबरठ्यात बसून ढसा ढसा रडायला लागला.. आम्ही नवे होतो त्या परिसरात पण तो तिथलाच रहिवासी होता त्यात आमचं घर तळमजल्यावर होतं... आम्ही गोंधळलो..कोणी बघितलं तर काय म्हणेल?.. बरं ! तो ढोंगही करत नव्हता.. त्याचा टाहो अगदी प्रामाणीक होता...
जरा शांत झाल्यावर तो म्हणाला माहीत नाही साहेब पण हे पुस्तक नेल्या पासनं धा दा हे पुस्तक वाचलं आणि असच उमाळा येऊन रडायला येतय बघा....आवरतच नाही.. पुस्तक खिशात नसल तर चुकल्या चुकल्या सारखं होतय बघा... मग आमची ओळख वाढली ,भेटी वाढल्या.एकदा त्याच्या आग्रहाखातर आम्ही त्याच्या अंधार्या घरी गेलो, त्यानी एकजात सगळ्याना आमच्या पाया पडायला लावलं...
खरी कमाल त्याने नंतर केली.. त्याला दिलेली प्रत त्याने आळंदीला माऊलींच्या चरणाशी ठेवली.. हे मलाही सुचलं नाही.आणि हे आपणहून तो सांगायलाही आला नाही त्याच्या लेकीने सांगितलं म्हणून कळलं.
आणि खरी कमाल तर पुढेच आहे
एकदा तो हाँटेलची माणसं घेऊन खोपोलीला गेला होता तिथे एका ढाब्यावर त्याने पाहिलं एका ट्रकच्या मागे पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे... ही कविता लिहिलेली होती.. तो हरखून गेला. नक्की त्याला त्यात काय अलौकीक वाटलं कोणजाणे पण तो जाम खुष झाला....खरं तर तिथे तो फक्त त्या लोकांसोबत जेवणापुरता थांबला होता पण तेव्हढ्या वेळात त्याने सगळं जमवून आणलं...
तेंव्हा फोटो काढणं अत्ता सारखं इतकं सोपं नव्हतं जिकरीचंच होतं ...पण तरी त्या ट्रक वाल्याला थांबवून त्याने गावातून फोटोग्राफर आणला आणि त्याचा फोटो काढून घेतला... त्याची प्रत मिळवण्याची तजवीज केली.....कशासाठी हा खटाटोप? ही तळमळ मला खरच उमगत नाही... कधी कधी वाटतं आपण या निर्व्याज प्रेमाला लायकच नाही...
अत्ता अत्ता पर्यंत तो फोटॊ डोळ्यासमोर होता...असेलही नीट ठेवलेला पण सध्या जरा दिसेनासा झालाय....
तुकाराम वडाळकर सुद्धा दोन वर्षापुर्वी कर्क रोगाने निधन पावला...कित्येक वर्षात आमची गाठ भेट नव्हती तो आजारी असल्याचं कळल्यावर आम्ही भेटायला गेलो होतो पण त्याने भेट नाकारली.. त्याचा मुलगा म्हणाला पप्पानी इथूनच नमस्कार सांगितलाय...संपला संवाद !....... पण काही माणसं हरवत नाहीत त्यातला तुकाराम वडाळकर होता....आहे...
#चंगो

0 comments:
Post a Comment