मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा... ही कविता खरं तर मी माझा च्या कृष्ण धवल मुखपृष्टावर असणार होती, म्हणजे तसच ठरलं होतं
यातून मी माझाची भूमिका स्पष्ट होते असं माझ्या एका मित्राचं म्हणणं होतं
मित्र म्हणायचं , नाहीतर आम्ही पार्ल्यातले एका शाळेतले म्हणून एकमेकाला माहीत होतो पण तेंडुलकर परीवार या पुस्तकात रस घेतोय म्हंटल्यावर तो कसा येऊन चिकटला मला समजलच नाही
पण असं होतं कधी कधी , आपल्या लक्षात येत असतं पण आपण झटकू शकत नाही, एकतर कुणाचा उगाच अपमान करायचा आपला स्वभाव नसतो
आणि आपण मान्य करत राहतो
मग अगदी पुस्तक छपाईला गेलं, माईच्या मते फक्त चार ओळींची एक कविता एका पानावर म्हणजे पान रिकामं दिसण्याचा धोका होता म्हणून माई म्हणाली प्रत्येक कवितेला एक चित्र काढ पण मग प्रिंटींगचा खर्च वाढत होता म्हणून सगळ्या कविताना एकच चित्र काढायचं ठरलं जे सगळ्या मूडना सूट होईल असं , म्हणून समुद्राकाठी खडकावर एकटी बसलेली व्यक्ती मी रेखाटली आणि ती प्रचंड जमून आली
म्हणजे प्रिया दिदि म्हणाली की अरे हे चित्र नाही ही सुद्धा एक कविताच आहे
असं सगळं जमून आलेलं असताना रात्री साधारण अकरा वाजता सुषमा तेंडुलकरचा माईला फोन गेला कारण गोखल्यांचा फोन बंद होता
माई घाबरली , इतक्या रात्री कुणाचा फोन
सुषमा म्हणाली महत्वाचं सुचवायचं होतं म्हणून फोन केला
ती म्हणाली मुखपृष्ठावरची कविता बदलुया
का? माई चकीत होत म्हणाली
सुषमा म्हणाली एक मास्टरपीस कविता आहे ज्या कडे आपलं लक्षच गेलं नाही
कव्हर वर अशी कविता हवी जी सर्वाना अपील होईल,
माई म्हणाली कुठली कविता ? सगळ्याच कविता छानच आहेत
सुषमा म्हणाली माई लगेच अगदी शेखरची बहीण होऊन बोलू नकोस, मी काय सांगते ऐक, मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा ही शेखरची भूमिका झाली
पण त्या आधी पुस्तक हातात पडल्या पडल्या वाचकाची एक भूमिका तयार होणं गरजेचं आहे
आणि मला वाटतं पुसणारं कोणी असेल
तर डोळे भरून यायला अर्थ आहे
ही कविता अल्टिमेट आहे, शेवटी साहित्यिकाची मुलगी होती ती, आणि माझ्या बद्दल किती आस्था होती बघा की तिच्या डोक्यात नाही मनात ते घोळत राहिलं होतं , माईलाही ते पटलं
तेंव्हा माई विजया बँकेत नोकरी करत होती सकाळी सात साडेसातला ती घर सोडायची , ती घरून निघाली ती सकाळी घरीच आली
डोळे उघडल्या उघडल्या समोर माई आणि कानावर आलेलं पहिलं वाक्य शक्या आपण मुखपृष्टावरची कविता बदलूया
हादारायला होणं म्हणतात तसं झालं
ती म्हणाली आवर लवकर आपण अत्ताच जाऊन सांगुया नाहीतर नेमकं तो कव्हरचं काम अत्ताच करायला घेईल
दात घासत अंघोळ केली आणि केस पुसत अंगावर कपडे चढवले
आई दादा तसे उदासीन होते म्हणून त्यानी फार प्रश्न विचारले नाहीत
टेंशन ते नव्हतच , प्रींटर आमचा जरा तिरकस होता तो काय बोलेल ते ऐकावं लागणार होतं आम्ही प्रिंटरलाच प्रकाशक समजत होतो इतकं आमचं अगाध द्न्यान होतं
आम्ही अगदी नऊ सव्वा नऊलाच त्याच्या प्रेसवर पोहोचलो
आणि कविता बदलायची सांगितलं आणि गम्मत म्हणजे पुसणारं कोणी असेल तर ... ही कविता त्याने ऐकली आणि आपला तिरकस पणा बाजुला ठेवत त्याने मनापासून मान्य केलं वा वा आता पुस्तकाला वजन येईल असं तो म्हणाला, त्या दिवशी लंचटाईम नंतर तो कव्हर करायला घेणारच होता
मग तिथून बाहेर पडे पर्यंत माईच्या बँकेची वेळ टळून गेली
मग आम्ही तिथेच सन्मान मधे काहीतरी पोटात ढकलायला गेलो तिथे नेमका माईचा चुलत दीर आला
माईचा नोकरीला जाण्याचा एकूण उत्साह सगळ्याना माहीत होता
तो अगदी उलट तपासणी घ्यायच्या थाटात म्हणाला तू अत्ता इथे कशी ?
माई अगदी सहज म्हणाली लंच टाईम आहे
तो घड्याळात बघत म्हणाला इतक्या लवकर?
माईकडे उत्तर तयार होतं ती म्हणाली मी आज रिक्वेस्ट करून मागून घेतला
त्यावर त्याने जे तोंड केलं ते मी काय माई काय तो दीर पण विसरला नसेल
लंच टाईम मागून घेतला हे काय उत्तर झालं ? तो गेल्यावर आम्ही खूप हसलो
पण एकूण त्या दिवशी केलेल्या धावपळीचं सार्थक झालं
पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे
ही कविता मुखपृष्ठावर आली आणि तिने इतिहास घडवला, कित्येकांच्या पत्रामधे हा उल्लेख आवर्जून असायचा की मुखपृष्ठा वरची कविता वाचली आणि पुस्तक घेऊनच टाकलं , किंवा वाचतच राहिलो...
अगदी ट्रकच्या मागे सुद्धा या ओळी उमटल्या , कित्येक स्मशान भुमींच्या भिंतीवर त्या लिहिल्या गेल्या , किती रंगावली प्रदर्शनात मी माझाचं कव्हर चित्तरलं गेलं तिथे रसीक मोठ्याने या ओळी वाचत असल्याचं मी ऐकलय
आता बाबा नाहीत , सुषमालाही जाऊन आठ वर्ष झाली
आई , प्रिया दिदि, राजू त्या आधीच गेले
पण मी माझा चा वाढदिवस जवळ आला की हे सगळे आपापली जागा घेऊन परत उभे राहतात आणि मी आठव्णींच्या पसार्यात बसून राहतो.
#चंगो

0 comments:
Post a Comment