आज अठरा एप्रिल गुरूवार
मी माझा प्रकाशित झालं तेव्हा ही अठरा एप्रिल ला गुरुवारच आला होता.
माईच्या वाढदिवसाला मी माझा प्रकाशित करायचं म्हणून खूप मोठी जंग लढावी लागली असं आता वाटतंय.
३४ वर्ष झाली, म्हणून मी माझा ची गोष्ट ३४वर्षांपूर्वी सुरू झाली असं नाही त्या आधी दोन वर्ष जेव्हा मी माई कडे रहात असून तेंडुलकरांकडे जास्त असायचो तिथून आहे.योग असतात तशा गोष्टी घडतात.तेव्हा प्रिया तेंडूलकर रजनी म्हणून फेमस होती.आणि मी तिच्या परिवारातला होतो म्हणून मला जरा वाव होता.तेव्हा दीदी खरच मला हर तर्हेने मदत करायला धडपडायची.तेंव्हा मॉडेल कोआर्डीनेशन हे माझं तग धरून रहायचं मुख्य साधन होतं, खूप पायपीट करावी लागायची हेलपाटे घालावे लागायचे तर वरळी नाका हा माझा तेव्हा चा पाया खालचा एरीया होता कारण बऱ्याचश्या ऍड एजन्सी त्या एरीयात होत्या.मग दिदी चं शुटींग जवळपास असलं तर दिदी मला शुटींग ला जाताना गाडीने तिथे सोडायची, यातायात वाचवायची तर मला भल्या सकाळी दीदी निघायच्या वेळी बद्रीधाम मधे दीदी समोर हजर व्हावं लागायचं आता जाणवतं किती चिडली रागावली तरी दीदी अर्धा पाऊण तास माझी वाट बघत थांबली आहे.तर तेव्हा एकदा माझ्या आयुष्यातील ती अमृत घटीका आली.मी वेळेवर बद्रीधाम मधे पोहोचलो पण दीदीचा मेकअप मन उशीरा आला होता म्हणून दीदीचा मेकअप सुरू होता.सगळं सगळ्याला जोडलेलं असतं फक्त आपल्याला त्याची कल्पना नसते तसं झालं अचानक दीदी ने माझी समोर ठेवलेली बॅग स्वतः कडे खेचून घेतली. तशी ती अधे मधे माझी बॅग चेक करायचीच आई म्हणायची सिगरेट लायटर एखादी पूडी तर बॅगेत नाही ना?हे ती चेक करते कारण राजू फार लवकर स्मोक करायला लागला होता.तिला त्या झडतीत तसं काहीच मिळालं नाही पण अशक्यातली गोष्ट माझी कवितांची बंद वही मिळाली जी मी कधीच कधीच घरा बाहेर काढत नव्हतो.कवितेची वही इतर ठिकाणी थट्टेचा विषय ठरू शकतो पण तेंडुलकरांच्या घरचं वातावरण च वेगळं होतं दूनियाभर चे होतकरू तरुण बाबांना नाहीतर दीदीला त्यांच बाढ दाखवायला घेऊन यायचे आणि दोघांकडे पेशंस दांडगा होता दोघं मन लावून ऐकायचे चर्चा करायचे आई मुळे माझ्या दोन चार कथा बाबां पर्यंत पोहोचल्या होत्या पण माझं स्वतः चं धाडस कधी झालं नाही.त्या दिवशी सुध्दा ती बंद वही कशी बॅगेत बसून तिथपर्यंत आली आश्चर्य आहे
पण तो योग होता ती घटीका ठरली होती त्या नुसार दीदी ने माझी झोळी उपडी केली आणि माझी बंद वही तिच्या समोर उघडी पडली.आणि माझं नशिब च उघडलं अनेक मार्ग उघडले
भर दुपारी
सावली
वडा खाली
धावली,
मी बुडताना गाव माझा
ओझरता पाहिला होता
मला पहायला गाव माझा
काठावर उभा राहिला होता
उमलणं आणि फुलणं
दोघात खूप अंतर आहे
उमलणं अगदी स्वाभाविक आहे
फुलणं त्या नंतर आहे
दीदी एका मागे एक कविता झर झर वाचत गेली.एक इशारा करून तिने मेकअप कधीच थांबवला होता.तिने एक कटाक्ष माझ्या कडे टाकला तो कटाक्ष म्हणजे नव्या पर्वाची नांदी होती
माझ्याशी बोलायच्या आधी तिने फोन जवळ ओढला आणि माझ्या आठवणी प्रमाणे आठ दहा फोन करून माझ्या कविता ऐकवल्या.लोकप्रभेच्या कार्यालयात ही मी दीदी ने पाठवलेला युवक म्हणून पोहोचलो.नाहीतर अशा साप्ताहिकाच्या कार्यालयात नवोदित कवीला कोण उभं करतंय
पण मग लोकप्रभेने मला खऱ्या अर्थाने लोकांसमोर आणला
सातत्याने माझ्या कविता ना लोकप्रभेच्या अंकात दोन दोन तीन तीन पानं दिली.लोकप्रभा मधे कविता वाचून च सीमाताई देव गोखल्यांच घर शोधत विलेपार्ल्याला मला भेटायला आल्या ही माझ्या आयुष्यातील दखल घ्यायला लावणारी पहिली घटना होती.मग दीदी ने माझी झोळी समोर उपडी केली ही माझा च्या गोष्टी ची सुरुवात धरायची का?
ती सुरुवात धरली तर त्या आधीची ही एक सुरूवात खुणावते आहे.तारीख साल वार काही आठवत नाही पण
पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहोणाऱ्याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत या ओळी सुचल्या त्या वेळी माझ्या कडे कवितेसाठी वही देखील नव्हती.ओळी चमकून गेल्या आणि मी त्या कशावर तरी उतरवून ठेवल्या
पण त्याला नजाकत प्राप्त झाली ती माईच्या उस्फुर्त हरखून जाण्याने,तिने कसं आणि किती कौतुक केलं हे तपशीलवार आठवलं तरी मी शब्दात मांडू शकत नाही.मला आधी ही सुचत होतं आणि मी लिहीत ही होतो पण पाण्याचं वागणं मी अधोरेखीत केल्याने चार ओळींची कविता हा साचा तयार झाला
अडकलेला पतंग
आधी काढायला बघतात
आणि निघत नाही म्हंटल्यावर
फाडायला निघतात
देवळात जाऊन माणसं
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार आठ आणे टाकून
काही ना काही मागतात
मरण दाराशी आल्यावर
मी म्हटलं तुला शंभर वर्षं आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं म्हणालं
काय हा मनुष्य आहे
अशा कविता सुचत होत्या आणि माई ने वही आणून दिल्यामुळे त्या एका सोबत एक जमत होत्या.मग ही सुरुवात धरायची तर मला अजून एक सुरूवात ठळकपणे आठवते
तेंव्हा तर मी साडेतीन चार वर्षांचा होता.ढ मुलगा अशी माझी ओळख अजून ठरायची होती.चित्तरंजन रोड वरच्या जून्या घराच्या रम्य परीसरात मी निर्धास्त बागडत होतो
आणि अकल्पित एक घटना बघून मी हबकून गेलो.
अंगणात आपली गोजिरवाणी चार पाच पिल्लं घेऊन एक कोंबडी पायाने माती हलवत दाणे टिपण्यात मग्न होती आणि ते मनोहरी दृश्य बघण्यात मी रमलो असताना अचानक एक अघटीत घडलं
घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिल्लांपाशी असं आपण म्हणतो पण या घारीचं लक्ष या कोंबडीच्या पिल्लांकडे होतं
ती आली आणि झडप घालून एक पिल्लू तिने आकाशात नेलं
माझा थरकाप उडाला माझ्या आयुष्यातील पहिला थरार.पण त्याची दखल माझ्या आईनेही घेतली क्षणात मला कडेवर घेत पोटाशी धरत ती म्हणाली हे असच असतं राजूल्या.यालाच जगरहाटी म्हणतात
त्या क्षणी आईने मला उचलून घेतलं नसतं तर?माझी समजूत काढली नसती तर?माझा कोवळेपणा करपून गेला असता.जिवनातली विसंगती वेचण्याची कला दडपून गेली असती तर मला वाटतं ती खरी सुरुवात आहे
नव्वद साली माई च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर ती सुरुवात व्यापक बनली
आता त्या प्रवासातले बरेच जण गहाळ झाले कोणी हयात नाहीत कोणी जवळ नाहीत तर कोणी माझे राहिले नाहीत
पण अठरा एप्रिल म्हंटलं की हे सगळं आठवतं आठवत राहणार.
#चंगो
मी माझा चा वाढदिवस

0 comments:
Post a Comment