Thursday, September 26, 2024

मी नेमकं काय काय करतो ?????डॉ धनंजय देशपांडे

मी नेमकं काय काय करतो ?????
डॉ धनंजय देशपांडे 

***
१) जाहिरात एजन्सी चालवतो
२) सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन करतो (केसेस सोडवणे)
३) सायबर क्राईम बद्दल जागृती करण्यासाठी व्याख्यान देतो
४) पुण्यात आता तीन हॉटेल्स झालेत आपले (पार्टनर) ते पाहतो
५) सोशल मीडिया कसा वापरायचा आणि धंदा वाढवायचा याचे ट्रेनिंग देतो
६)  अनाथ मुले सांभाळतो
७) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची लहान मुले सांभाळतो
८) फॅमिली काउन्सेलिंग करतो
९) फेसबुक लाईव्ह करून त्यातून विविध प्रेरणादायी व्यक्तीच्या मुलाखती घेतो
१०) संगीत क्षेत्रात मराठी / हिंदी गाण्याचे शो करतो
११) तीन विविध कंपन्यांचा तीन वेगळ्या गोष्टीसाठी मी ब्रँड अँबेसेडर आहे. त्यांच्यासाठी मॉडेलिंग करतो
१२) रेड लाईट एरियातील महिलांच्या उन्नतीसाठी काम करतो
१३) गुणी मात्र गरीब अशा गायक मुलांसाठी गुरुकुल चालवतो
१४) विकेंड टूर संकल्पनेवर आधारित टुरिजम कंपनी चालवतो 
१५) वेळ असेल तसे लेखनही करतो. आजवर चौदा पुस्तके प्रकाशित ! आणि त्याच्या सर्व आवृत्या संपल्यात 
हि थोडक्यात झलक
जितकं आठवलं तितकं पाठवलं 😃
*
मी हे यासाठी सांगितलं की 
ठरवलं तर अशक्य काहीच नाही ! फक्त डेरिंग करण्याची आणि रिस्क घेण्याची गरज आहे

Tuesday, September 24, 2024

फेसबुक कट्टा १

फेसबुक वर बायका का फसतात ह्यावर वर्षा आणि माझे एकदा गॉसिपिंग चालू होते. फार फार पूर्वीची गोष्ट आहे ही तेव्हा नवीन असल्याने उत्सुकता होती. आता कुणी फसत नाहीत.
" Don't be so harsh. अनेकदा घरात काहीही प्रेम वाट्याला येत नाही ग मग माणसे गोड बोलण्याला भुलतात " माझा कळवळा .

" तुझा आवाज किती मधुर आहे म्हणून त्याला गायला सांगून, त्याच्या चोचीतला मांसाचा तुकडा पळवणारा कोल्हा पंचतंत्र मध्ये वाचत नाही का?" वर्षा. 

" Actually एक आयडिया आहे. अशी कोणी स्तुती केली ना की, आधी मांसाचा तुकडा खाऊन टाकायचा आणि मग भसाडा आवाज उघडायचा. थांबला तर बंदे में दम आहे नाही? " मी.

" असा फक्त नवरा करतो. पर्याय नाही. आता या वयात कुठे जाणार तो पण मला असे बाटलीत घालायचा प्रयत्न केला तरी मी काय करेन माहीत आहे तुला?
तुकडा तर खाईनच पण कान किटून, बहिरा होई पर्यंत काव काव करत त्याच्या मागे लागेन.. परत हिंमत करणार नाही" वर्षा.

अक्च्युअली हे बोलून आम्ही खो खो हसत होतो. 
आज गौरीचा लेख वाचून आठवले.

लेख सुंदर आहे . Breadcrumbs टाकणाऱ्या कोल्ह्याला अशी कावळीण मिळू शकते का? विचार करायला हरकत नाहीं!😁

लेख उत्तम आणि गंभीर आहे.  जरूर वाचा. 

By Gauri Salvekar 

#breadcruming

मित्र आशिष चासकर यांची कृष्णमूर्ती यांच्या वरची पोस्ट वाचून  एक मानसशास्त्रीय संज्ञा आठवली. त्यात त्यांनी multiple पार्टनर्स वर थोडं भाष्य केलं आहे.त्यामुळे हा एक शब्द आठवला.
त्याला म्हणतात ब्रेडक्रमिंग! हा अनुभव साधारणपणे आकर्षण किंवा प्रेम यांमध्ये असणाऱ्या 30-40% लोकांना कोणत्याही वयात येतो. यामध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला असे clues पाठवते, तुमच्याशी असं फ्लर्ट करते ज्यामुळे तुम्हाला वाटेल ही व्यक्ती आपल्यात गुंतली आहे. पण त्या व्यक्तीचा तुमच्यात खरोखरच गुंतण्याचा दुरुनदुरुन हेतू नसतो. फक्त असं दाखवून 'फ्रेंड्स विथ बेनेफिट' होता येतंय का? याची चाचपणी समोरची व्यक्ती करत असते.फ्रेंड्स विथ बेनेफीट म्हणजे एक स्त्री व पुरुष मित्र असताना संमतीने झालेले शरीरसंबंध. इथे आधी चांगली मैत्री असू शकते (निदान तसं दाखवलं जातं) किंवा थोड्याफार ओळखीवर देखील असे सिग्नल्स पाठवायला सुरुवात केली जाते,अर्थात समोरच्या व्यक्तीचा कल बघून! मग पुढे गेल्यावर शारीरिक संबंध सोपे होतात.

यात कुणी कुणावर दोषारोप करण्याचा प्रश्न किंवा संबंधांनंतर आलेला गिल्ट देखील नसतं कारण सगळंच concensual असतं.
खरी गंमत होते इथेच. गुंतायचं नसतं मग ती व्यक्ती पुढे जायला का बघते? याचं एक कारण हे की आपण या व्यक्तीला आवडतोय याचे काही व्हाईब्ज त्याला मिळू शकतात. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीला कोणतेही डीप कनेक्शन्स नकोच असतात कारण मग answerable राहावं लागतं.समोरची व्यक्ती आपल्यात शरीरसंबंधांनंतर गुंतणार आहे हे माहिती असतं (culprit : oxytocin) म्हणून मग दुसरीकडे जाता येत नाही किंवा त्या व्यक्तीची आपल्याला  अडचण होऊ नये म्हणून पटकन संबंध संपवले जातात. त्यासाठी कोणतंही फुटकळ कारण पुरतं. मग 'आपण असेच आहोत,असेच डिझाईन झालोत 'म्हणून आभाळ हाणता येतं, आणि एकाच वेळी कितीही लोकांसोबत हे ब्रेडक्रमिंग करता येतं.कोणत्याही नात्यात इतकी inconsistancy असेल तर ती व्यक्ती मानसिकदृष्टीने कायमच अस्थिर असते ,फक्त दाखवत नसते इतकंच.
डीप कनेक्शन्सचा अर्थ 'मै दुनियासे नही डरता' टाइप हिरोगीरी करणं नव्हे;तर  त्या व्यक्तीपाशी आपला सुखाचा शोध थांबलाय हे मान्य करून तिच्याशी कमिटेड राहणं आणि नवे पार्टनर्स न शोधणं. त्या व्यक्तीच्या सुखदुःखाशी, त्या नात्याशी आणि मुख्य म्हणजे आपण त्या व्यक्तीची निवड केली आहे आणि का केली आहे, या विचाराशी बांधील राहणं.

 सोशल मीडियावर असलेल्या विशेषतः 35-55 मधल्या लोकांनी हा एक घोळ इथे घालून ठेवलाय. मग त्यातून कृष्णसखा, राधासखी, सोलमेट इत्यादी आयटम निपजलेत.भर घालायला सिनेमे आहेतच.
 Soulmate is a pure myth.हॉस्पिटलमध्ये तुमच्या उशाशी बसून जो पैशाची जुळवाजुळव करतो, निव्वळ चहावर दिवस काढत डॉक्टरांकडे आशाळभूत नजरेने बघत थांबतो किंवा थांबते तो माणूस आपला आहे याचा विसर इथे बहुतेक अशा लोकांना पडलेला असतो.
पूर्वी हे नव्हतं का? तर होतं. पण माणसांच्या हातातील या साधनांमुळे आलेली accessibility तेव्हा इतकी नव्हती. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीसोबत स्थिरावणे हेही एकवेळ समजून घेता येईल पण हे ब्रेडक्रमिंग म्हणजे आपली बुद्धी आणि integrity यांचा नावाप्रमाणेच झालेला भुगा आहे! 
Integrity फक्त शरीराची असते का? अजिबात नाही. ज्या क्षणी मनात 'हा' हवा किंवा 'ही' हवी हा विचार शिरतो त्याक्षणी integrity संपलेलीच असते.त्यादृष्टीने आपण सगळेच कसे आहोत ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे.पण कुठे थांबायला हवं हे ज्याला समजतं त्याला ब्रेडक्रमिंग का करू नये हेही समजतं. 

पुन्हा सांगते की Soulmate is a pure myth!
 ज्यांना या ब्रेडक्रमिंगचा अनुभव आला असेल त्यांना फार हेल्पलेस आणि cheated वाटतं हे उघड आहे. पुन्हा सगळंच concensual असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार. त्यामुळे जर आपण अशा कोणत्याही नात्यात असू जिथे समोरच्या व्यक्तीला कोणतेही डीप कनेक्शन्स नको आहेत आणि हेतू फक्त फ्रेंडझ विथ बेनेफिट आहे तिथे प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा किंवा त्या बेगडी नात्याची किंमत मोजावी. थोडे थोडे ब्रेडक्रमस् टाकत राहणं आणि त्या व्यक्तीला आपल्याकडून आशा राहील अशी व्यवस्था करणे हे या व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं. ही लोक कधीही काहीही स्पष्ट सांगत नाहीत. 

अशा व्यक्तींमध्ये विवाहसंस्था नाकारण्याची किंवा अशी नाती निभावण्याची देखील उघड हिम्मत नसते. त्यामुळे यांना ब्रेडक्रमिंग हा पर्याय सुरक्षित वाटतो.हे एक प्रकारचं इमोशनल अब्युजच असतं पण समोरच्याच्या संमतीने घडलेलं! अनेकांना वाटेल की हे कसं शक्य आहे? तर ,दुसऱ्याला जराही शंका न येऊ देता, नातं ठेवताना लॉयल्टी या शब्दाचा दुरानव्याने संबंध न येऊ देणं, फक्त वेगळी चव चाखायला मिळते म्हणून दुसऱ्याला वापरून घेणं याला काय म्हणता येईल? 
इथे मी कोणत्याही मूल्यव्यवस्था इत्यादींवर बोलत नाहीये ,मी फक्त अशा नात्यातून येणारं मानसिक नैराश्य आणि जी व्यक्ती हे ब्रेडक्रमिंग  खरं मानून चाललीय तिचं नुकसान याबद्दल बोलतेय. या ब्रेडच्या चुऱ्यात स्वतःला घोळवून घ्यायचं का हे आपापलं ठरवा.
ब्रेड इथे एक संकल्पना म्हणून वापरला आहे. ब्रेडची एकूण किंमत आणि त्याची उपयुक्तता (पोट व्यवस्थित भरणे) ,करायला लागणारे कष्ट, वेळ आणि संयम यांच्या तुलनेत ब्रेडच्या चुऱ्याचं मूल्य आणि उपयोग ते काय? असा विचार या शब्दमागे असावा ,असं वाटतं.

-गौरी


Fb @ Priya Prabhudesai

Thursday, September 19, 2024

एका घराचं विसर्जन


एका घराचं विसर्जन

ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.

- डॉ. आनंद नाडकर्णी

सकाळ वृत्तसेवा

Updated on: 08 September 2024, 12:23 am IST

गेली बेचाळीस वर्षे, पुणे शहरातला माझा पत्ता म्हणजे 'कृष्णा बिल्डिंग, पत्रकारनगर, ऑफ सेनापती बापट रोड.' हे घर अनिल आणि सुनंदा अवचटांचं. मी ह्या पत्त्यावर दाखल झालो तो सुनंदाचा 'व्यवसाय-मित्र' म्हणजेच सायकिअॅट्रिस्ट म्हणून. त्या वेळी माझं आणि अनिलचे समीकरण जुळलं नव्हतं. ते यथावकाश जुळून आले.

ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.

आमची मैत्री घट्ट होत गेली आणि त्या घरातली माझी झोपायची जागाही पक्की झाली ती पुढच्या चार दशकांसाठी. माझे वडील एकोणीसशे नव्वद सालच्या जानेवारी महिन्यामध्ये गेले आणि त्या टप्प्यावर अनिल हा मित्राच्या रूपातून माझ्यासाठी सुद्धा 'बाबा' झाला.

हळूहळू बाब्या, बाबडू आणि 'Babs by The Bay' अशी अनेक नामकरणे झाली त्याची. सुनंदा पुढे निघून गेल्यावर, बाबाची आई इंदुताई त्या घरात आली. बाबाच्या एकटेपणावर तिनं वीस वर्षे मायेची गोधडी घातली.

ह्या घरातल्या माझ्या पहिल्या दहा-पंधरा वर्षांच्या मैत्रीवर मी लेख लिहिला होता. तो 'लेखकाचे घर' ह्या पुस्तकात मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळेंनी प्रसिद्ध केला आहे. तर ह्या घरातल्या मजेदार मायेच्या क्षणांची मला सवय होत गेली. मी पहाटेच्या साखरझोपेत असताना बाबाची जाग सुरू व्हायची.

तो डेस्कटॉप कॉम्प्युटरवर जाऊन बसायचा. सकाळी उठवायची जी वेळ मी सांगितली असेल त्या वेळी बासरी वाजवून, गाणे म्हणून मला उठवायचा. मग चहासोबत गप्पा. बाबासाठी ब्रेकफास्ट म्हणजे दिवसातली महत्त्वाची इव्हेंट.

आजीने ट्रेनिंग दिलेली ज्योती ही मुलगी आजीनंतरची आठ वर्षे त्याच निगुतीने बाबाची काळजी घ्यायची. मस्त नाश्ता करून तयार झालो आणि घरातून बाहेर पडणार तर नैसर्गिक सूर्यप्रकाशामध्ये बाबाला फोटो काढायची हुक्की यायची. अनेक व्यक्ती आणि घरांचा एकमेव, अधिकृत फोटोग्राफर होता तो.

संध्याकाळी कामे आटोपली की वेध लागायचे पुन्हा त्या घरी यायचे. रात्रीचे चारीठाव जेवण; साधे पण रुचकर. त्यानंतर ताजे ताक, मौसमी फळे आणि त्यानंतर चॉकलेट किंवा आइस्क्रीम किंवा केळी, पेरू अशा फळांचे मजेदार फ्रूट सॅलड. आम्हाला गप्पांना कोणतेही विषय पुरायचे. तत्त्वज्ञान ते गॉसिप, इतिहास ते राजकारणातील सद्य:स्थिती, साहित्य ते संगीत...

काहीही. बाबा जोक्स सांगायचा. किस्से आणि गाणी. एकमेकांचे लिहिलेले मजकूर एकमेकांना वाचायला देणे. रात्रीचे दहा-साडेदहा झाले की तो म्हणायचा, "चला, झोपण्याआधी आनंदला फोन करायची वेळ झाली." गेली पंचवीस-तीस वर्षे, दिवसातला शेवटचा फोन तो मला (किंवा मी त्याला) करायचो. प्रत्यक्ष समोर असलो की हा त्याचा आवडता डायलॉग,

आनंददायी क्षणांनी भरलेले दिवस. बाहेरचे तणाव, दुखे तिथेच ठेवून इथे विसाव्याला यायचे. माझी पत्नी सविता ह्या घराला म्हणायची, 'हे तुझे माहेर'. तर माहेरच्या सवयी सुटत नाहीत. फोटो, पेंटिंग, रेषाचित्र रसिकतेने नेमके कसे पाहायचे त्याची सवय इथे लागली.

सुरांना समजून कसे घ्यायचे ते समजले. स्वादाला निर्भयपणे उपभोगायला मिळाले आणि सवयीच्या बिछान्याचा स्पर्श... सकाळच्या सालंकृत पोहे-खिचडीचा सुवास. माझी ज्ञानेंद्रिये तेजतर्रार केली ह्या घरानं.

ह्या घरात बाबामुळे भेटलेल्या अनेक जणांमुळे माझी नात्यांची रेंज इतकी वाढली. बाबाचे काही मित्र पुढच्या काळात माझेही 'स्वतंत्रपणे' मित्र झाले. सदाशिव अमरापूरकर, आर्किटेक्ट शिरीष बेरी, कार्यकर्ता अरुण ठाकूर, सतारमय विदुर महाजन, लेखक उमाताई आणि निरुपाक्ष कुलकर्णी... किती नावे घेऊ.

ह्या घराने विचाराचा परीघ विस्तारायला केवढी मदत केली. सुमित्रा (भावे) मिळाली, सुनील (सुखटणकर) आला

आणि सिनेमामाध्यमाची द्वारे खुली झाली. ह्या सगळ्यामध्ये भर मुक्तांगण परिवारामधल्या आमच्या असंख्य पेशंट, कार्यकर्त्या मित्रांची.

सततचे जागते-खेळते घर. ऐतिहासिक दृष्टीने ह्या घराच्या दरवाजाला कधीही रात्रीची कडी लावली जात नसे. गेली अडीच वर्षे ह्या घरामध्ये महिन्याचे काही दिवस मी एकटाच असतो वसतीला. मीही घराची सवय मोडत नाही. ह्या घरातल्या बाबाच्या खोलीमध्ये मात्र मी आता जात नाही. मी त्या खोलीच्या दरवाजाबाहेरूनच कधी बाबाला साद घालतो.

अनेक घरांमध्ये असते तसे बाहेरच्या खोलीत एक कालनिर्णय टांगलेले असायचे. त्या कॅलेंडरवर माझ्या राहण्याचे दिवस 'मार्क' केलेले असत. ह्या काळात बाबा बाहेरचे कार्यक्रम घेत नसे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्हा दोघांची नवी नवी रेस्टॉरंट्स शोधायची सवय मागे पडली होती. घरगुती अन्नाशी असलेली बांधिलकी वाढलेली होती.

बाबाला हुक्की यायची पिझ्झा खायची. मग आम्ही ती ऑर्डर देण्याचाही उत्सव करायचो. खाणारी तोंडे वाढली की अशी ऑर्डर करायला मजा यायची. मुक्ता, यशो ह्या मुली आणि त्यांची कुटुंबे आली की जोरदार अंगतपंगत व्हायची.

माझ्या गळ्यात घालायची स्लिंग बॅग असते चामड्याची. त्याचे डिझाइन आणि ती ऑर्डर करून घेणे हे बाबाचे काम. अनेक वर्षे तो मला अनेक गोष्टी पुरवायचा. त्याची रुपयातली किंमत त्याला विचारणे हा गुन्हाच असायचा.

माझा मुलगा कबीर छोटा असताना दर भेटीमध्ये त्याच्यासाठी विशिष्ट चिवडा आणि श्रुजबेरी बिस्किटे ह्यांची भेटपाकिटे हजर असणारच. आजी होती तेव्हापर्यंत घरी केलेल्या खाऊचे डबे सवितासाठी म्हणून घेऊन यायचो. पुण्याला येण्यासाठी मी सकाळी सहाच्या सुमारास ठाण्याच्या घरातून निघतो. साडेसात ते पावणेआठ ह्या दरम्यान बाबाचा पहिला फोन... "कुठपर्यंत?"

आयुष्यभर इतके भटकलेला बाबा. पण त्याला घराचे वेड होते. त्याच्या त्या राज्यात तो सुखी असायचा. भिंतीवर लावलेले त्याचे फोटो, त्याची आणि इतरांची पेंटिंग्ज, सहजच नजर वेधून घेणारी त्याची काष्ठशिल्पे, दिवाळी ते दिवाळी बदलला जाणारा दिवाणखान्यातला कंदील (अर्थात नाइटलॅम्प) अशा वस्तू घराला जिवंत करायच्या.

आजी आणि ज्योतीच्या व्यवस्थितपणाला न जुमानता स्वतःची 'पसारा' हौस बाबा पूर्ण करायचा तो त्याच्या खोलीत. हा अगदी केंद्रशासित प्रदेश. आमच्या नजरेला न दिसणाऱ्या अनेक वस्तू त्या 'पिसाऱ्या'तून त्याच्या हाताला अलगद लागायच्या. त्याच्या कपड्याच्या कपाटातल्या एका फळीचा अर्धा हिस्सा त्याने माझ्यासाठी ठेवलेला. माझे कपडे,

टॉवेल मात्र अगदी घडी घालून ठेवलेले. बाहेर घालायच्या कपड्यांचा सेट ठेवला तर तोही कडक इस्त्री करून सज्ज.

कोरोना महासाथीच्या काळातही मी नियमितपणे पुण्याला यायचो. मुक्तांगणचे काम, पुण्याच्या आय.पी.एच. संस्थेतली रुग्णसेवा असे काम चालायचे. ह्या कालावधीमध्ये बाबाकडे राहायला येणारा मीच असायचो, त्या पत्रकारनगर वसाहतीमध्ये,

त्या काळात त्या सोसायटीच्या समिती सदस्यांनीही मला 'रहिवासी' असा दर्जा दिल्याने माझे येणे-जाणे सोपे झाले होते. ह्या काळात आम्हाला गप्पांसाठी वेळही खूप मिळायचा, घरात बसूनच मैफील जमवायची. जुने हिंदी-इंग्रजी

चित्रपट पुन्हा पुन्हा चवीने पाहायचे. गॉडफादर तर बाबाला 'फ्रेम बाय फ्रेम' पाठ होता.

हिंदी मथले जॉली एलएलबी, रुस्तुम, पिंक असे चित्रपटही तो तुकड्यातुकड्यात पाहायचा. जेम्स बॉण्ड आणि

हिचकॉक ही आमची अगदी कॉमन प्रेमप्रकरणे. ह्या शिवाय बाबा ज्या लेखन विषयाने पछाडला जायचा त्यावरच्या गप्पा. दर जूनमध्ये असायची ती दिवाळी अंकांमध्ये तो लिहिणार त्या लेखांची चर्चा. लेखाचा खर्डा लिहून झाला की वाचन.

कोणता लेख कोणत्या दिवशी अंकाला द्यायचा ह्यावर पुन्हा चर्चा. ह्या तीन महिन्यांत त्याचे लेखन अगदी 'पीक'ला असायचे. खरिपाचा हा हंगाम संपला की स्वारी स्वतःच्या मनमौजी अभ्यासाला तयार. एखाद्या विषयाची त्याला भूल पडली की तो पूर्ण नादावून जायचा. अशा प्रत्येक विषयाचे रूपांतर लेखनात व्हायचेच असे नाही.

कोरोना मावळतीला लागला आणि जीवन गती घेऊ लागले तसे त्याचे प्लॅन सुरू झाले होते नव्या प्रवासाचे. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी असे झटकेही त्याला यायचे. वेगवेगळ्या क्षेत्रातील 'दुरुस्ती' करणाऱ्यांचा त्याचा गटच होता. पुढेपुढे

हे सारे फोनही ज्योतीच करायची. बाबाच्या सकाळच्या मित्रांच्या भेटीसाठीच्या दैनंदिन प्रभातफेऱ्या पुन्हा चालू झाल्या आणि बावीस सालच्या

जानेवारीमध्ये घरातच पडण्याचे निमित्त झाले. त्यानंतर महिनाभरामध्ये ते घर रिकामे झाले ते कायमचेच. माझे वडील मला प्रत्यक्ष सहवासातून मिळाले बत्तीस वर्षे. ते गेले आणि त्यांची जागा घेणारा बाबा मिळाला तोही पुढची बत्तीस वर्षे.

त्या काळातच माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे डाव विस्कटले आणि फिस्कटले. नव्याने आयुष्याची मांडणी करण्याच्या प्रवासात ऊब होती ती ह्या घराची. अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी आणि सविताने लग्न करायचे ठरवले, तेव्हा तिच्या आईवडिलांची अधिकृत कुटुंबभेट घडवून आणायची होती. तेव्हा माझ्या बाजूने पालक म्हणून बाबा होता आणि मानसमाता म्हणून ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शोभा थत्ते. माझ्या आयुष्यातल्या हळव्या क्षणी, हरलेल्या काळात आणि हरखून जाण्याच्या प्रसंगांत हे घर माझ्यासोबत होते.

आता काही काळात ही कॉलनी जाणार पुनर्विकासाच्या वाटेने. गेले काही महिने आवराआवर सुरू आहे. मुक्तांगणला न्यायचे सामान, मित्रपरिवारात वाटायचे सामान अशी विभागणी सुरू आहे. बाबाचे सर्व कलासाहित्य व्यवस्थितपणे ठेवायच्या प्रकल्पात मुली यशो मुक्ता, भाची प्राजक्ता अशा साऱ्या मग्न आहेत.

दर पंधरा दिवसांनी मी आलो की एक नवा कोपरा रिकामा दिसतो, एक नवी भिंत ओकीबोकी असते. ज्या साऱ्याचे सर्जन होते त्या साऱ्याचे विसर्जन होते हा नियमच की सृष्टीचा. घरे तरी त्याला कशी अपवाद असणार.

मनाचे दरवाजे उघडे ठेवायला शिकवणारे हे घर आपली कात टाकणार आहे. टाकुनिया जीर्णजर्जर वस्त्रे... इथे नवीन वास्तूची निर्मिती होणार आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्या वास्तव्याची शेवटची रात्र त्या घरात घालवली. सकाळी डोळे भरून सारे घर न्याहाळले. दाराला कुलूप लावले. एक किल्ली खांद्यावरच्या बॅगेत टाकली आणि किल्ल्यांचा एक संपूर्ण गुच्छ मनाच्या कोनाड्यात जपून ठेवला.

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

संग्रहित

Link  : https://www.esakal.com/saptarang/psychiatrist-investigator-brown-sugar-problem-gard-book-rjs00

Sunday, September 15, 2024

post 6

सध्या तरुण पिढी मोबाईल आणि स्क्रीनच्या मागे लागली आहे, ते त्यात खूप वेळ घालवतात असे आरोप नेहमी होतात. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही आहे. त्याचे विपरीत परिणाम मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही होतात. कोरोंनाने सर्व वयोगटातील शाळकरी मुलामुलीना  हातात लवकर मोबाईल दिला असला तरी कोरोना संपल्यावर तो दूर झाला नाही. मुलांना कोणत्याही ताज्या घडामोडींची माहिती नसते असे म्हणता येणार नाही. त्यांचा माहितीचा 'सोर्स' हा वर्तमानपत्रांपेक्षा ऑनलाईन आहे हेही खरे आहे. परंतु मोबाईल, टीव्ही चॅनेल्स, यु ट्यूब यापेक्षा आपल्या सर्वांचा बातम्यांचा / माहितीचा जो मूळ सोर्स होता तो रेडिओ या मुलांपासून लांब गेला आहे. अर्थात याचा दोष त्यांना देता येणार नाही. घरचे ज्येष्ठ रेडिओ न ऐकता मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसणार असतील तर मुलांना सवय तरी कशी लागणार ? आधीपेक्षा कमी, पण आजही अनेक घरांमध्ये रेडिओ ऐकला जातो आणि त्यावर अनेक दर्जेदार कार्यक्रम इथे सादर होत असतात. तुम्ही कितीही ऑनलाईन असाल तरी घरी रेडिओ हवाच यात वाद नाही.

काल 'द हिंदू' या नावाजलेल्या दैनिकात रेडिओसंदर्भात एक बातमी वाचली आणि रेडिओच्या आठवणी जाग्या झाल्या. केरळमधील मावेलिकरा जवळ एका गावात आत्मानंद विलासम संस्कृत प्राथमिक शाळा आहे. जवळपास दीडशे वर्ष जुनी अशी ही शाळा आहे. विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर कमी करण्यासाठी या शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी २४०० रुपयांचा एक रेडिओ भेट दिला. घरी त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याने  किमान अर्धा तास कोणताही कार्यक्रम ऐकायचा, मग त्या बातम्या असतील, शैक्षणिक कार्यक्रम असेल, साहित्यिक /सांस्कृतिक कार्यक्रम असेल वा काहीही असेल. तो ऐकायचा आणि शाळेत आल्यावर आपण काय ऐकले, त्यातून काय शिकलो हे सांगायचे असा उपक्रम सुरु केला. इयत्ता पाचवी ते सातवीच्या साठ विद्यार्थ्यांना हे रेडिओ देण्यात आले.

शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी एका बैठकीत ही कल्पना मांडताना रेडिओ हा 'अदृश्य शिक्षक' आहे पण अतिशय महत्वाचा आहे, आपण सगळ्या विद्यार्थ्यांना तो देऊ या असे सांगितले. सर्वानी ही कल्पना लगेच उचलून धरली. शाळेचे माजी विद्यार्थी, पालक शिक्षक संघटना, आणि इतरांनी लगेच अर्थसाह्य दिले आणि ही कल्पना प्रत्यक्षात आली. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मुरलीधरन थझकार (Thazhakara) हे ऑल इंडिया रेडिओतून निवृत्त झाले आहेत, त्यामुळे या माध्यमाची त्यांना पुरेपूर माहिती आहे. रेडिओचा प्रसार व्हावा असे त्यांना मनापासून वाटते. .

या उपक्रमाद्वारे फक्त रेडिओचा प्रसार झाला असे नाही तर विद्यार्थ्यांना रेडिओ दिल्यापासून त्यांच्यात चांगला फरक पडला असे त्यांचे कुटुंबीय आणि शिक्षक सांगत आहेत. रेडिओवर कार्यक्रम ऐकताना विद्यार्थी अधिक लक्ष देतात, अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतात. त्यावर शाळेत बोलायचे असल्याने कार्यक्रमाचा सारांश कसा सांगायचा हेही चांगल्या पद्धतीने कळायला लागले आहे, असे शिक्षक सांगतात. हे विद्यार्थी शाळेत वर्गात अधिक लक्ष देऊन ऐकायला लागले, रेडिओमुळे मुलांची भाषा सुधारली असे त्यांचे म्हणणे आहे.  सगळ्या साठ मुलांना रेडिओवर काय ऐकले हे सांगण्याची संधी मिळत नाही, निवडक संख्येनेच मिळते. तरीही सगळ्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने ती मिळत असल्याने विद्यार्थी खुश आहेत.

दर्जेदार कार्यक्रम ऐकायचे असतील तर रेडिओ आणि (मराठी लोकांबद्दल बोलायचे तर) दूरदर्शन सह्याद्री वाहिनी याना पर्याय नाही हेच खरे ! आता Whatsapp च्या जमान्यात आकाशवाणी प्रसारण सुरु होतानाची  धून सतत फॉरवर्ड केली जाते. ती ऐकत राहण्यापेक्षा रेडिओ ऐकणे चांगलेच नाही का ? 

केरळमधील या शाळेने जो उपक्रम केला आहे तसा महाराष्ट्रात कोणी केला आहे का? माहिती असल्यास जरूर कळवा. 

© अशोक पानवलकर 

Friday, August 23, 2024

Monday, June 17, 2024

Tuesday, February 27, 2024