Wednesday, May 6, 2026

शब्दरंग

सकाळी वॉकला गेले असता वॉकिंग  ट्रॅकवर एक आजी दिसल्या. समोरुन येताना दिसल्या त्याच क्षणी मला यांच्या बद्दल कुतूहल वाटले. वयाच्या मानाने लहान वगैरे काही दिसत नव्हत्या पण वयाला लाजवेल एवढा उत्साह मात्र नक्की होता.
 वेशभूषा नक्कीच तरुणांसारखी होती. सर्वप्रथम त्यांना पाहिल्यावर या वॉकिंगला आल्या आहेत की ट्रीपला हेच लक्षात येईना.
     ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट, गॉगल आणि कॅप.. तयारी तर सगळी ट्रीपला निघाल्यासारखीच होती. त्यांचा फोटो काढण्याची मनोमन इच्छा झाली. पण त्यांना हे आवडेल की नाही? फोटो साठी कसे विचारावे .... असा विचार करत मी पुढे चालू लागले. थोड्यावेळाने गणपती मंदिराजवळ थोडावेळ बसून परत एखादा राऊंड मारावा असा विचार करून मी गणपतीच्या मंदिराजवळ आले तर समोरच आजी उभ्या. स्वतःहून माझ्याशी काहीतरी बोलल्या. संवादाचा हाच धागा पकडत मी त्यांना विचारले, " आजी, वय काय हो 
तुमचे? "
      खरे तर त्यांच्याकडे बघून त्यांना आजी म्हणावं की नाही हाच प्रश्न होता. " सांगा बर किती असेल? "..... आजींनी मलाच प्रतिप्रश्न केला. "तुमचा उत्साह बघून नक्की तुमचे वय कळत नाहीये म्हणूनच विचारते आहे ".... असे मी म्हणताच...." 81 "... आजी उत्तरल्या.
      वयाच्या 81 व्या वर्षी इतका उत्साह! 
 "आजी, तुमचा एक फोटो काढायचा होता. काढू का?".... मी विचारले.
 तसे खुश होत आजी म्हणाल्या," अरे वा... काढा की. कुठे उभी राहू सांगा. "
 मी म्हणाले... " वॉकिंग  ट्रॅकवर उभ्या रहा." 
 तर आजी म्हणतात कशा.... " अहो, थांबा.. थांबा. जरा केस नीट करते आणि घाम पुसते. "
 बोलता बोलता आजींनी रुमालाने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि केस व्यवस्थित केले.
 डोळ्यावर पुन्हा गॉगल चढवला आणि डोक्यावर कॅप. त्यादिवशी मी नेमकी चष्मा घरी विसरले होते. त्यामुळे फोटो काढताना मलाच थोडी सर्कस करावी लागली. मी म्हणाले... "आजी, माझे मिस्टर फोटो छान काढतात. इथेच कुठेतरी ट्रॅक वर फिरत आहेत. " तर म्हणतात कशा...  "अहो,मग शिट्टी मारा की... येतील ते लगेच."
 असे म्हणून त्या स्वतःचा हसू  लागल्या. आजींच्या आतले खट्याळ लहान मूल अजूनही जागे होते.
     फोटो काढून झाल्यावर मला म्हणाल्या,  "आता हा फोटो मला कसा मिळणार? "
 मी तुमचा फोन नंबर द्या म्हणाल्यावर लगेच माझे नाव आशा शहा आहे म्हणाल्या व मोबाईल नंबर सांगितला. मी काढलेला त्यांचा फोटो बघून तो कसा क्रॉप केला पाहिजे वगैरे सूचना द्यायला आजी विसरल्या नाहीत.
 पाच-दहा मिनिटांच्या भेटीमध्ये आजींनी स्वतःबद्दल बरीच माहिती सांगितली. तरुणपणी प्राध्यापक असणाऱ्या आजी पंधरा-वीस  वर्षे अमेरिकेत राहून आल्या होत्या. 
" आयुष्यात मी बराच स्ट्रगल केला आहे ".... हे सांगायला आजी विसरल्या नाहीत. 
 म्हणजे आजींचं आयुष्य अगदी सरळ साधं नव्हतं तर. पण तरीही आजींनी स्वतः मधलं लहान मूल जपलं होतं हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून कळत होते.
 तरी मला आता पहिल्यासारखे काम जमत नाही म्हणाल्या. 
 मी काही म्हणण्यापूर्वीच " तुम्हाला भेटून छान वाटले. नवीन ओळख झाली. ".... असे आजींनी मलाच सांगितले.
 खरे तर आजींना भेटून माझी दिवसाची सुरुवात छान झाली होती. 
 पुन्हा भेटण्याचे आणि आजींविषयी मी लिहिलेली पोस्ट त्यांना पाठवण्याचे आश्वासन देऊन मी त्यांचा निरोप घेतला.
 आजींकडे बघून... Age is just a number... याचा  प्रत्यय आला. 
 म्हातारपण असावं तर आजींसारखं असं मनातल्या मनात म्हणत मी घरी आले.
 त्या दिवशी दिवसभर राहून राहून सारख्या आजी डोळ्यासमोर येत होत्या. 
 आपल्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस आपल्याला नक्कीच काहीतरी देऊन जातो हे नक्की.

©️®️स्मिता मुंगळे.

0 comments: