सध्या स्वामी विवेकानंद यांचे भारतीय व्याख्याने वाचनात आहे. मद्रास येथील "भारताचा भावी काळ" हे व्याख्यान वाचले. खरंतर स्वामीजींचे प्रत्येक व्याख्यान सकारात्मक विचार प्रदान करणारे आहे. भारताचा भावी काळ यात स्वामीजी म्हणतात,
" जेव्हा अशी एखादी प्रभावी व्यक्ती निर्माण होते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे तिचे विचार आपल्यापैकी पुष्कळांच्या मनात उत्पन्न होतात व अशाप्रकारे आपण सामर्थ्यसंपन्न होतो. संघटना ह्या एवढ्या शक्तिशाली, कशामुळे होत असतात ? संघटना ही काही जड वस्तू नव्हे. उदाहरणच द्यावयाचे तर, चार कोटी इंग्रज लोक येथील तीस कोटी लोकांवर राज्य कसे करू शकतात ? याचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण कसे कराल ? हे चार कोटी लोक आपली इच्छाशक्ती एकत्र करतात व त्यामुळे अपार सामर्थ्य निर्माण होते, आणि तुम्हा तीस कोटी लोकांपैकी प्रत्येकाची इच्छाशक्ती वेगवेगळ्या रीतीने कार्य करीत असते. म्हणून, भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे रहस्य संघटना, शक्तिसंचय व इच्छाशक्तीचे परस्पर सहकार्य यांतच साठलेले आहे.
याच वेळी ऋग्वेदातील पुढील अपूर्व मंत्र माझ्या मनात येत आहे:
सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्वे ..." (१०-१९१-२)
हा मंत्र आपल्याला सांगतो, "तुम्ही सर्वजण मनाने एक व्हा, तुमचे विचार एक असोत, कारण विचाराने एक असल्यामुळेच पूर्वी देव यज्ञातील हविर्भाग घेऊ शकत असत. मनुष्याकडून उपासना ग्रहण करण्यास देव योग्य होते, कारण ते एका विचाराचे होते". मनाने एक होणे यात समाजाच्या स्थैर्याचे रहस्य आहे. आणि जर तुम्ही आर्य-द्रविड, ब्राह्मण- अब्राह्मण यांसारख्या क्षुल्लक प्रश्नांवरून कलह माजवीत बसाल, तर भारताचे भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तिसंचयास तुम्ही मुकाल. कारण, लक्षात ठेवा की, भारताचे भविष्य सर्वस्वी ह्या गोष्टीवरच अवलंबून आहे. इच्छाशक्तींचे संमीलन, त्यांचे परस्पर सहकार्य व त्यांचे केंद्रीकरण हेच रहस्य होय."
बहुत काय लिहीणे..४ मे ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी असल्याचा दिवस आहे. गंगा - गंगासागर- माँ काली-अनन्य भक्त ठाकूर- माँ शारदा, स्वामीजी, या साऱ्या आणि सार्धशती वर्ष असणाऱ्या वंदे मातरम् या महामंत्राची संपूर्ण शक्ती एकवटली आणि क्रांतिभूमीतून परिवर्तन अद्भुत अविस्मरणीय ठरले आहे.. जय माँ..🚩🙌
- सर्वेश फडणवीस

0 comments:
Post a Comment