हर्षखेद ते मावळले
हास्य निमाले,
अश्रु पळाले;
कंटकशल्ये बोथटली,
मखमालीची लव वठली;
काही न दिसे दृष्टीला
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावे या स्थितिला ?
-झपूर्झा ! गडे झपूर्झा !
हर्षशोक हे ज्या सगळे,
त्या काय कळे?
त्या काय वळे?
हसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरू हे वदण्यालाः -
व्यर्थी अधिकचि अर्थ वसे
तो त्यास दिसे
ज्या म्हणति पिसे;
त्या अर्थाचे बोल कसे?
-झपूर्झा। गडे झपूर्झा !
ज्ञाताच्या कुंपणावरून,
धीरत्व धरून,
उड्डाण करून,
चिद्घनचपला ही जाते,
नाचत तेथे चकचकते;
अंधुक आकृति तिस दिसती,
त्या गाताती निगूढ गीती;
त्या गीतीचे ध्वनि निघती-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
नांगरल्याविण भुई बरी
असे किति तरी;
पण शेतकरी
सनदी तेथे कोण वदा? -
'हजारांतुनी एखादा !
तरी न तेथुनि वनमाला
आणायाला,
अटक तुम्हांला,
मात्र गात हा मंत्र चला -
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
केशवसूत

0 comments:
Post a Comment