Wednesday, April 29, 2026

लवकर ये

- लवकर ये -
लहानपणी, वाढत्या वयात 
घराबाहेर पडताना 
खेळायला, शाळेत जाताना 
आईला ओरडूनच सांगायचो,
"आई मी गेलो गं" 
बाहेर पळताना सुद्धा 
आईचा आवाज हलकेच कानावर यायचा,
"गेलो म्हणू नये, येतो, म्हणावं".
तेव्हा अर्थाची अथांगता 
आकलनात आली नाही, 
पण आई सांगतेय नं, 
तर मी घराबाहेर पडताना म्हणू लागलो 
"आई मी येतो गं". 
आईचा आवाज हलकेच कानावर यायचा, 
"लवकर ये". 
मग महाविद्यालय, 
भारतमातेचा कार्यकर्ता असणं वगैरे 
संघटना, संगीत, सिनेमे, प्रवास, लेखन, समाजकार्य, खेळ 
सर्वच काही सहज समर्पणपूर्वक करताना 
"आई मी येतो गं" 
आणि 
"लवकर ये" 
रोजचंच झालं. नेहमीच झालं. 
रोज घरी परतेपर्यंत 
मध्यरात्री उलटून गेलेली असणं 
रोजचंच झालं, नेहमीच झालं. 
पण "आई मी येतो गं" आणि "लवकर ये"ची 
लय जरा सुद्धा हलली नाही. 
असाच एकदिवशी निघालो, 
"आई मी येतो गं". 
आई म्हणालीच, "लवकर ये". 
उंबरठ्यापलीकडे पडलेलं पाऊल 
मागे घेऊन आईला विचारलं, 
"आई, काय हे रोजचंच? माहितीय मला उशीर होणार आहे,
तरी तुझं आपलं, "लवकर ये". 
आई हसून म्हणाली, "लवकर ये". 
मी निघालो. 
वाटेवर वर्षानुवर्षं 
अखंड अंधार दाटलेला भेटत गेला. 
भविष्याच्या अनाकलनीय आकारांमध्ये 
जीव घुसमटत गेला, तेव्हा 
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात घुमणाऱ्या 
घंटेचा मंद घनगंभीर नाद
कानावर येत राहायचा,
"लवकर ये".
जगणंच झालं विश्वजननीच्या
वाटेवरची प्रार्थना,
"आई, मी येतो गं".
आणि जगदंबाही सांगत राहिली,
"लवकर ये!"

अविनाश धर्माधिकारी 

0 comments: