Saturday, April 18, 2026

मी माझा ३

आधी दिवस महिने मोजायचो
मग वर्ष मोजायला सुरुवात झाली 
आता मी म्हणतो जाऊ दे!
ती घडून गेलेली बात झाली...खरच या ओळी माझ्याच आहेत आणि माझ्या वयाचं झालं की घडून गेलेल्या भल्या बुऱ्या गोष्टींबाबत आपण असेच उदासीन नाही, निर्विकार होत जातो. गुंतण्याची क्षमता क्षीण होत असावी किंवा आंतरीक वाटचाल मंदावत असावी पण मी माझा चा प्रकाशन सोहळा याला अपवाद आहे .मी माझा हे पहिलं पुस्तक असेल जे छापायचं ठरायच्या आधी त्याची प्रकाशन तारीख नक्की ठरली होती 
अठरा एप्रिल एकोणीस शे नव्वद गुरूवारी मी माझा चं प्रकाशन माई च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर विजय तेंडुलकरांच्या हस्ते अनिरुद्ध च्या गच्चीवर, साधेपणाने पार पडलं.ओळखीत पाच पन्नास कॉपीज संपतील, कशाला उगाच प्रकाशन सोहळा वगैरे म्हणणारे भोवती होते माझे वडील तर समारंभासाठी गच्चीत ही यायला तयार नव्हते.गच्चीत समारंभ करायचा तर सेक्रेटरी ला रीतसर पत्र द्यावं लागायचं वडील त्या करीता ही तयार नव्हते शेवटी संध्याकाळी मीच वेणू गोपाळ कडे गेलो आणि तोंडी निवेदन दिलं माझे वडील अशा समारंभासाठी तयार नाहीत हे ही सांगितलं पण वेणू गोपाळांनी पुस्तकाचं प्रकाशन म्हंटल्यावर उत्साहात परवानगी देऊन प्रोत्साहन च दिलं आणि पांडू ला गच्ची झाडायची सुचना दिली 
नीला ताई नी पुढाकार घेत सगळी सुत्र हातात घेतली आणि दृष्ट लागेल असा कार्यक्रम झाला.
झाली पस्तीस वर्ष,मी माझा ने इतिहास घडवला पण त्या प्रसिध्दीची झलक मला फेसबुकवर आल्यावर जाणवली तो पर्यंत मला एवढी कल्पना नव्हती.ती होऊन गेलेली बात दिपस्तंभा सारखी ठाम ठळक होत गेली आवळकाठी चघळत रहावी तशी त्याची गोडी वाढतेच आहे.आणि ती गोडी रसीक हो तुम्ही वाढवताय गेली दोन तीन वर्ष अठरा एप्रिल च्या आधी मी माझा, पून्हा मी माझा,माझे शब्द चा खप अचानक वाढतो या वर्षी तर शंभर च्या घरात मी माझा ची मागणी गेली आणि गहिवरून यावं अशी पेहेल संभाजी नगर च्या जयंत चतूर, दीपक भालेकर,वामन मेस्त्री, आणि पुष्कर गडकरी या मुलांनी घेतली.आज फोन करून त्यांनी आमची तारीख घेऊन टाकली.कधीची??
दोन हजार चाळीस बुधवारची.का?तर चाळीस साली 'मी माझा' ला पन्नास वर्ष पूर्ण होतायत.सहा प्रकाशकांनी नाकारलेल्या पुस्तकाचा लेखाजोखा रसीक असा उराशी जपून आहेत मग मी कसा काय या दिवसापासून या घटनेपासून त्या आठवणी पासून अलीप्त राहू शकेन?
चंगो 
(मी माझा १८ एप्रिल १९९०)

0 comments: