Monday, April 13, 2026

आठवण

आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकूणच मंगेशकर कुटुंबाशी दुर्गमहर्षी गो.नी.दाण्डेकरांचे अतिशय स्नेहाचे नाते होते. गोनीदांनी आशाताईंविषयी आणि आशाताईंनी त्यांच्याविषयी फार सुंदर लेखन केलेलं आहे. 'आप्पांनी मला जाणलं होतं' या वडीलकीच्या भावनेनं आशाताई गोनीदांविषयी भारावून, कृतज्ञतेने सांगत राहतात. त्यांच्या पहिल्या भेटीविषयी त्या 'निरपेक्ष स्नेही' या गोनीदांवरील लेखात लिहितात, 

आमच्या मीनाताईच्या लग्नात आप्पांची-माझी पहिली भेट झाली. तसे आप्पा बाळ- म्हणजे हृदयनाथकडं यायचे. पण त्यांना लांबूनच बघायची मी. त्यांच्याशी बोलले नव्हते कधी. मग एक दिवस मी हृदयनाथला विचारलं,
 "बाळ, कोण रे ते?"
त्यावर तो म्हणाला,
 "आप्पा दांडेकर..."
 "ज्यांची कादंबरी मी वाचते आहे, तेच का हे?"
तर त्यानं 'हो' असं सांगितलं.

तर मीनाताईचा रुखवत बघण्यासाठी मी जयप्रभा स्टुडिओच्या ऑफिसात गेले होते. तिथे आप्पा बसले होते. मग माझी ओळख मीच करून दिली. त्यांना म्हटलं,
 "माझं नाव आशा भोसले. मला तुमचं लिखाण फार आवडतं."
त्यांनी नमस्कार केला आणि ते हसले.
 त्यांच्या हसण्याची एक विशिष्ट पद्धत होती. उंच हसायचे. प्रसन्न वाटायचं. मी त्यांना म्हणाले,
 "तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मला सांगा, 'कुणा एकाची भ्रमणगाथा'मधली यशोदा खरी, की खोटी? ती आहे का अजून?"
आप्पा पुन्हा एकदा त्यांच्या पद्धतीनं जोरात हसले. 
ही आमची पहिली ओळख.
 - आशा भोसले.

गोनीदा आशाताईंबद्दल लिहितात - 
"ती ज्वालामुखीसारखी आहे. वर हिरवळ बहरलेली. आंत असह आग. दिसतं, ऐकूं येतं, तें काही तिचं खरं रूप नव्हे. तिच्या हलक्या फुलक्या गीतांवरून कुणी तिची परीक्षा करू नये. 

...ही अशी मनस्वी उदार, अतिशय सरळ स्वभावाची, मनीं उभं राहिलं, तें कुणाच्याही विरोधाला न जुमानता करून टाकणारी, बहुधा नेहमीच कशात तरी हरवलेली. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी, सुखानं सुखी--
   परवा मला म्हणाली,
   "आप्पा, हें काही खरं नाही. पत्रांत धडपणी सगळं लिहितां येत नाहीं. लिहायला बसावं, तर मनांत असलेलं मागंच रेंगाळतं."
   "आता त्याला उपाय काय?"
   "दोन टेपरेकॉर्डर ठेवायचे. एक तळेगांवी. जें मनांत आलं, ते सगळं इथं बोलायचं. टेप तळेगांवी धाडायचा. मग तुम्ही तिथं बोलायचं. ती इथं आणून वाजवायची."
   या वेड्या मुलीचं कांहीं सांगता येत नाही.
   एखादे दिवशी गाडी घेऊन तळेगांवी यायची. म्हणायची,
  "टेपरेकॉर्डर आणलाय्, आप्पा!"
   म्हणजे मधुकऱ्याला भेट दिलेला हत्ती!

 - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर. ('मर्मबन्धांतली ठेव')

0 comments: