Friday, May 15, 2026

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत...

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत... 
'नाडकर्णी गेले' या मित्राच्या मेसेज नं दिवसाची सुरुवात झाली आणि एखादा दोर कापून आपल्याला अंधारात कुणीतरी अधांतरी केल्यागत झालं. 
आपापल्या डबक्यात रमलेल्या माणसांना आरोग्य आयुधांनी प्रवाही करणारा, मनावर ओझी असणाऱ्या माणसांनां नुसत्या गप्पांनी पिसागत हलकं वाटवणारा, आपल्या कोवळ्या आणि सैल मनानं कागदावर सुंदर 'आनंदरेषा' काढणारा, आणि महाराष्ट्राचं मानसिक आरोग्य जागेवर ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारा, अतिशय मोलाचा माणूस आपण आज गमावला.  
  
'शहरी लोकांची थेरं' वाटणाऱ्या सायकोलॉजी ला त्यांनी भाषा, प्रांत, परिस्थिती यांच्या सीमारेषा तोडून 'मानसिक आरोग्य' करून मराठी समाजाच्या रोजच्या जगण्यात आणलं. ज्या काळात मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे 'वेड लागलंय' असा समज होता त्या काळात 'शहाण्यांचे डॉक्टर' म्हणून उपचार आणि समुपदेशन प्रत्येकापर्यंत पोचेल यासाठी ते दिवसरात्र झटले.

काकांनी अस्थिर मनांना स्थिर केलं, गैरसमजात गुरफ़टलेल्याना डोळस केलं, कधी लोकांना बोलू दिलं, कधी फक्त वाहू दिलं, मोकळं होऊ दिलं, अनेक जीवांची परवड थांबवली तर अनेकांची अनेक वर्षांची खदखद संपवली. त्यांच्यामुळे उभ्या राहिलेल्या माणसांची आणि घरांची संख्या काढली तर ती सहज काही हजारात भरेल. यावरून त्यांच्या कामाची महती सहज लक्षात येईल.
 
संबंध महाराष्ट्रात जिथं आज खरात सारख्या बाबा बुवांनी समाजाला आंधळं करून अक्षरशः पाहिजे तसं नासवलंय तिथे डॉकटर नाडकर्णीं सारख्या 'डोळस' करणाऱ्या माणसाचं जाणं खरोखर जिव्हारी लागणारं. 

"कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती" हि ओळ ज्यांच्याबाबतीत मी पाहिली, ज्यांच्याबरोबर अप्रतिम गप्पा, चर्चा करायची संधी मिळाली, ज्यांच्या सहवासानं,आपुलकीनं कायम अदृश्य आधार मिळाला, आणि ज्यांच्या मिश्किल उत्तरानी आयुष्यभराची वाट सापडली ते डॉक्टर नाडकर्णी आता नसणार आहेत, त्यांनी महाराष्ट्र्राच्या मनावर उमटवलेल्या 'आनंदरेषा' पुसू न देणं ही आपल्या सगळ्यांची फार मोठी जबाबदारी असणार आहे.
अलविदा काका. तुम्ही जिथे असाल, वाऱ्यावर बसून तिथलं सुंदर स्केच काढत असाल हे नक्की!

♥️♥️🙏🙏🌼🌼

क्षितिज  पटवर्धन

0 comments: