Friday, May 15, 2026

डॉ आनंद नाडकर्णी

डॉ. आनंद नाडकर्णी गेल्याची बातमी सकाळीच येऊन थडकली आणि मन सैरभैर झालं. त्यांच्याशी काही नियमित बोलणं किंवा भेटणं होत नसे, पण जेव्हा केव्हा बोलणं-भेट व्हायची तेव्हा ते आत्मीयतेने बोलत. नवं काय चाललंय विचारत, स्वत:च्या कामाबद्दल, उपक्रमांबद्दल, लिखाणाबद्दल भरभरून सांगत.
डॉ. नाडकर्णींचा आमच्या युनिक फीचर्स परिवाराशी जुना संबंध. १९९०पासूनचा. त्यांनी युनिक फीचर्ससाठी लिहिलं, ‘अनुभव’साठी लिहिलं, दिवाळी अंकांसाठी लिहिलं. ‌‘शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट’ हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारं पुस्तकही ‌‘समकालीन’तर्फे प्रकाशित झालं.
त्यांचे-माझे संबंध लेखक-संपादक, लेखक-प्रकाशक इतके व्यावहारिक नव्हते. प्रेमाचे होते. त्याचा एक घट्ट धागा अनिल अवचट यांच्याशी जुळलेला होता. डॉ. नाडकर्णी अवचटांचे जवळचे मित्र. मित्र शब्दही अपुरा पडेल इतके जवळचे. मुलासारखेच. अवचटांना ते बाब्या म्हणणार आणि अवचट त्यांना आनंदा म्हणणार. एकमेकांबद्दल बोलताना प्रेम, जिव्हाळा, आदर ओसंडून वाहणार. या दोघांचं हे प्रेमप्रकरण मी जवळून अनुभवलं.
नाडकर्णींच्या तब्येतीचे अनेक प्रश्न होते; पण माणूस सतत कामात गुंतलेला. प्रचंड. अवचटांना त्यांच्या या कामाची भीती वाटायची. मला म्हणायचे, ‌‘मला आनंदाच्या तब्येतीची फार काळजी वाटते, रे! कधीतरी फाटकन बल्ब उडावा तसा तो जाईल असं वाटतं राहतं. मी ते दु:ख सहन करू शकणार नाही’. मी काहीबाही बोलून त्यांची समजूत घालत असे. आज नाडकर्णी गेले तेव्हा अवचट हयात नाहीत हे एक बरंच म्हणायचं.
अवचट गेल्यानंतर नाडकर्णींसोबतचा दुवा निखळल्यासारखं झालं. बोलणं-भेटणं कमी झालं. पण त्यांचा मनाला आधार असे. स्वत:सह अन्य कुणालाही मानसिक सल्ल्याची गरज पडली तर या क्षेत्रातला एक्का माणूस मदतीला धावून येईल, याची खात्री असे. अशी मदत त्यांनी वेळोवेळी केलीही. आज त्यांच्या जाण्याने याबाबतीत निराधार झाल्यासारखं वाटतंय.
डॉ. आनंद नाडकर्णी हा एक आयुष्यभर अफाट काम केलेला माणूस होता. एक ना अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी घुसून घुसून काम केलं. मनोविकासतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेलं काम तर मोठं आहेच. ते काम करता करता त्यांनी आयुष्यभर भरपूर लिहिलं, मुलाखती घेतल्या, भाषणं दिली, उपक्रम राबवले, महाराष्ट्रभर लोकांशी जोडून घेतलं. त्यातून त्यांचा प्रचंड जनसंपर्क तयार झाला. त्यांनी मानसोपचाराने हजारो लोकांना जगण्याची उमेद दिली. शेकडो छोट्या-मोठ्या संस्थांशी ते जैवरीत्या जोडलेले होते. आयपीएच, मुक्तांगण या तर त्यांच्याच संस्था. त्यांच्यासह शेकडो संस्थांना जवळचा माणूस गमावल्याचं दु:ख होणं स्वाभाविक आहे.

सुहास कुलकर्णी
https://www.facebook.com/profile.php?id=100094061612024

0 comments: