Saturday, September 24, 2016

शोपीस... प्रेमाचं!

शोपीस... प्रेमाचं!

सुजाता हिंगे

खुलेआम व्यक्त होण्याच्या नादात 'प्रेम' ही अत्यंत वैयक्तिक असलेली गोष्टसुद्धा हल्ली सोशल मीडियावर अधिकृतरित्या जाहीर केली जाते. दोघांमधील हे (खरं?) प्रेमाचं नातं ( खोट्या) प्रतिष्ठेसाठी 'रिलेशनशिप' नावाच्या चौकटीत मग संकुचित होत जातं. प्रेम या भावनेपेक्षाही तो दिखाव्याचा भाग अधिक बनल्याचं आजच्या अनेक नात्यांकडे पाहिलं की लक्षात येतं. त्यामुळेच आपण कोणाच्यातरी प्रेमात आहोत, हे जगाला दाखवणं आजच्या पिढीतील बहुतांश जणांना महत्त्वाचं वाटतं. सोशल मीडियाचा आपल्याला हवा तसा उपयोग यासाठी केला जातो. लोकांच्या साक्षीने प्रेमाच्या जाहीर प्रवासाला सुरुवात होते खरी, पण नकळत होणारं हे प्रेम ठरवून केल्यामुळे ते हळूवार संवेदनांच्या पलीकडे जात कालांतराने बंधनांचा फक्त एक भाग बनून राहतं. प्रेमात किती आकंठ बुडालो आहोत हे स्वतःपेक्षा जगाला दाखवण्याच्या नादात एकमेकांना एकमेकांशी इतकं बांधून घेतलं जातं की त्यांच्यासाठी दुसरं कुठलं विश्वच उरत नाही. असं असतानाही एकमेकांना समजून घेणं, एकमेकांपाशी व्यक्त होणं, एकमेकांच्या भावनांचा आदर करणं, एकमेकांसाठी तडजोड करणं हे या नात्यात कुठेही होताना दिसत नाही.

नात्यातील वीण वाढत जाण्यापेक्षा 'तुझ्या श्वासावरही माझा हक्क'च्या मालकी वर्चस्वामुळे एकमेकांची पर्सनल स्पेस संपते आणि नाद वाढायला लागतो. शरीरापेक्षा मनाला स्पर्श करणं, हे सुदृढ नात्याचं गमकच त्यांच्या लेखी नसतं. अशातच अती जवळीकतेमुळे एकमेकांमधली हुरहूर संपते अन् प्रेमाचं नातं बहरण्याऐवजी खुरटत जातं. 'विश्वास' हाच पाया असणाऱ्या या मूल्याला रिलेशनशिपमध्ये थारा नसतो. कधीकाळी सोलमेट म्हणवले जाणारे हे दोन जीव, नंतर एकमेकांना अगदी नकोनकोसे होतात. एकमेकांच्या हृदयात न रुजलेलं हे नातं वरकरणी घट्ट दिसावं यासाठी त्यांची धडपड सुरू असते अन् 'शोपीस' झालेलं हे नातं लोकांसाठी कोरड्या भावनेने तुटेल इतपत ताणलं जातं. मूळात चिमुकला जीव असलेल्या या नात्याचा श्वास सगळ्या कोंडमाऱ्यामुळे अखेर संपुष्टात येतो. बंधमुक्त आयुष्य जगायला सोकावलेले हे जीव आधी 'इट्स कॉम्प्लिकेटेड' आणि मग 'सिंगल' असे स्टॅटस अपलोड करतात आणि ब्रेक्रअपची हाळी देतात. 'नाही पटलं तर होऊ वेगळे', या दुबळ्या पायावर उभ्या असलेल्या नात्याला लोकांच्याच सहानुभूतीने विराम दिला जातो. शिवाय 'सिंगल' असल्याचं आवाहनही सहजपणे 'वेटिंग'मध्ये असलेल्यांपर्यंत पोहोचवलं जातं. नसानसांमध्ये न भिनता हे प्रेम फक्त रिलेशनशिपच्या वस्त्रापुरतं मर्यादित राहिल्याने, ते सहज बाजूला उतरवून तर ठेवलं जातंच. शिवाय लगेचच दुसऱ्या रिलेशनशिपच्या वस्त्रात शिरण्यासाठी ते सज्जही होतं. कालांतराने नव्या नावाची घोषणा करीत रिलेशनशिपची कार्यकारिणी पुन्हा एकदा लोकांसाठी जाहीर केली जाते. या सगळ्यात व्हर्च्युअल प्रेमाच्या बोकाळलेल्या प्रतिमेमुळे खऱ्या मॅच्युअर्ड प्रेमालाही उपेक्षेचे धनी होऊन राहावं लागतं.

Source : http://m.maharashtratimes.com/lifestyle/gents-/-ladies/love-life-on-social-media/articleshow/54401000.cms

0 comments: