Sunday, December 6, 2015

वारी


पाय कुठे चालले
वाट काय बोलते
एक दिशा बोलवते
अन मागे ही ओढते ।

माया की छाया ही
जोजवते सावली
पंखांना बळ देऊनिया
हाक देते माऊली।

पंथ दिला ओढ दिली
वाट तूच दाखवली
मायेतून गुंतवले
तूच पुन्हा साद दिली।

जन्माच्या चक्राची
वारी तू चालविली
पंखांशी बळ देऊनिया
हाक देते  माऊली।

नाव तुझे सुर तुझा
कंठातुन दाटला
भक्तिचा सोहळा मी
डोईवर थाटला।

माऊली।

लेकराच्या डोळी
भोळ्या विठ्ठलाची बाहुली
वारी तू चालविली
पंखांशी बळ देऊनिया
हाक देते माऊली।

~ गजर चित्रपट

Sunday, November 1, 2015

कलाविष्कार ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१५


Kalaavishkaar_E-Diwali-Magazine_November-2015


   
कलाविष्कार - ई दिवाळी अंक 
--------------- 
प्रथमश सुरेश शिरसाट 
संपादक आणि प्रकाशक 

Wednesday, October 28, 2015

Sunday, October 4, 2015

Sunday, September 27, 2015

चारोळ्यांचा स्टोरी board

चारोळ्यांचा स्टोरी board 



नुसतं दिसणं पुरेसं असतं !
बोलायची गरज नसते !!
अशी नजरभेट मग कितीवेळ !
मागल्यादारी
मी आठवत बसते !

=================
वेड्या क्षणी भास होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगाच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा


=================

आता आपण भेटलोतर
मी आधी बोलणारच नाही तुझ्य़ाशी
एरवी असं जमत नाही पण
यावेळी मी वाट पाहीन जराशी....
~चंद्रशेखर गोखले
=================
जेंव्हा डॊळ्य़ाना नजर
थोपवता येत नाही
तेंव्हा नजरेवर सगळं
सोपवता येत नाही...

=================

ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्यांकडे वळले
पापण्य़ा जरा थरथरल्या
म्हणून गूपीत तुला कळले.

=================
माझी गोष्ट मला सांगताना
मी जास्त खोलात शिरत नाही
कारण नावालाही मग मी
निर्दोष असा उरत नाही ...

=================
चंद्राला माझं घर
तुझ्यामुळे माहीत
कारण हल्ली मी त्याच्या सोबत जागतो
तुझ्या स्वप्नांसहीत........

=================
 तू सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही..
=================
एकांतात स्वता:ला आरशात पाहणं
हा अनुभव साधा नाही
तसे आपण साधे असतो
पण मनातला चोर सीधा नाही.....

=================
तिन्हिसांजेला...
तळ्याकाठी...
कोणी खोळंबतं
कुणासाठी............
===========
नसती उत्तरं द्यावी लागतात
वेड्यासारखं वागल्यावर
पण वेड्यासारखच वागायला होतं
पाऊस पडायला लागल्यावर..........
चंद्रशेखर गोखले

Posted by  : विद्या 

Monday, September 21, 2015

दुष्काळ



दुष्काळाच्या झळा संपता संपेना
कर्जाचा बोजा काय कमी होईना

ह्यातही घोटाळ्यावर खापर
नेत्यांचा नुसता दिखावा सुरु

शब्द फार आणि कामाची नुसती बोंब त्यांची फक्त
दुष्काळात होरपळून शेतकऱ्यांचे  जीव गेले किती

नेत्याचं नुसतं जखमेवर मीठ चोळणं उरलं
आश्वासनांचा नुसता पाऊस

येथे खेळ खंडोबा चाले
पाणी मात्र उद्योग धंद्यान साठी मिळे
चारा छावणी नाव फक्त
जिथे आसरा घेतात गुरं आणि माणसं

तरीही त्यातही घोटाळे तोंड वर करून बोले
दुष्काळाच्या झळा संपता संपेना


~ विद्या पालकर 

Friday, August 21, 2015

वय

वय हे मनाला असतं. शरीराला वय असतं असं मला वाटत नाही.
.
.

मी आपल्याला एक उदाहरण सांगतो.

पंडित सातवळेकर होते - ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं. 
.
त्यांना जेंव्हा शंभरावं वर्ष लागलं तेंव्हा मला असंच मनात आल की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे तर आपण त्यांच्या पायावर नमस्कार करुन यावं. म्हणून मी पारडीला गेलो. 
.
.

शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. आजारी असतील, आपण दोन मिनिटात नमस्कार करावा,बरं वाटतंय ना, काळजी घ्या वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला गेलो त्या वेळेला बघतो तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं तपासत बसले होते.
.
.
तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते. 
.
.

मी नमस्कार वगैरे केला. मला म्हणाले "मी वाचलं आहे तुमचं साहित्य".
.
मी घाबरलोच एकदम. "असलं काही लिहिण्यापेक्षा बरं लिहा" असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पं. सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे - म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.
.
.
ते म्हणाले "आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या तरुण पोरांना माहित नाहीत ते मी निवडून काढणार आहे आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात पुढली आठ-दहा वर्ष जातील". 
.
.

शंभराव्या वर्षी पुढल्या आठ-दहा वर्षांचा कार्यक्रम त्यांच्या हातात होता. पुष्कळ वेळेला आपण म्हातारे अशासाठी होतो की तुम्ही जगताय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. फक्त आर्थिक उत्पादनासाठी, महिना पगारासाठी हे उत्तर काही आपलं आपल्यालाच समाधान देत नाही. कशासाठी जगतो त्याला एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन जीवनाला लागतं...
.
.

-(पं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीसमारंभात पुलंनी केलेल्या भाषणातुन)

Wednesday, July 22, 2015

'कान' सेन

'कान' सेन

आपल्या सगळ्यांना सहानुभूती हा प्रकार परिचयाचा आहे. अनेक गोष्टींचा आपण सहानुभूतीने विचार करतोच; पण समानुभूती म्हणजे सहानुभूती नव्हे. सहानुभूतीमध्ये एक त्रयस्थपणा आहे. थोडं अंतर आहे. समानुभूतीमध्ये 'दुसऱ्याच्या जागी जाऊन विचार करणे' अंतर्भूत आहे.

"नात्यांमधला सगळ्यात मोठा, सगळ्यात गंभीर प्रश्न कोणता आहे?" मी आमच्या एका मुला-मुलींच्या गटचर्चेत प्रश्न विचारला. एकजण म्हणाला "अविश्वास", "निष्ठा नसणे", एकीने सांगितलं, तर दुसरी एक मुलगी म्हणाली "अहंकार". वेगवेगळी उत्तरं आली. मोठी यादीच बनली. त्यातलं एक उत्तर होतं 'संवादाचा अभाव'. हळूहळू गटचर्चेत सगळ्यांनीच एक निष्कर्ष काढला. तो म्हणजे संवादाचा अभाव असल्यानेच अविश्वास तयार होतो, एकमेकांशी संवाद नसणं हे अहंकार फुलवतं. अनेक प्रश्नांच्या मूळाशी संवाद नसणं हाच मुद्दा असल्याचं त्या चर्चेत सहभागी झाल्याचं सगळ्यांनी मांडलं.

नात्यांमधला संवाद हरवला आहे असं म्हणणारी जोडपी अगदी रोजच भेटतात. प्रगतीच्या टप्प्यात कधीकाळी माणसाला भाषा नामक गोष्टीचा शोध लागला. भाषाही वस्तूंना, भावनांना, अनुभवांना शब्द शोधत संपन्न होत गेल्या आणि माणसाने माणसाशी संवाद साधणे ही व्यवहारासोबतच भावनिक गरजही बनत गेली. नव्हे, आपण त्यावर अधिकाधिक अवलंबून होत गेलो आणि अर्थातच व्यक्ती म्हणून अधिक समृद्धही झालो. या सगळ्या प्रवासात कधीतरी शहरं वसली, मोठी झाली, महानगरं बनली, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या विश्वात अवतरलं, अर्थकारण बदललं तसा समाजही बदलला. त्याबरोबर आपल्या जगण्याने एक गती पकडली. ही गती हळूहळू वाढत जाऊ लागली. रस्त्याने वेगानं जाताना आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टी बघायच्या राहून जातात तसंच काहीसं संवादाचं होत गेलं. संवाद हरवत गेला आणि मग पुढच्या समस्या मोठ्या होत गेल्या.

खरं तर इथपर्यंतचं सगळं मी आजवर अनेकदा लिहिलं आहे. अनेक भाषणांत, चर्चांमध्ये मांडलं आहे; पण तरीही आज पुन्हा या विषयावर मी का आले? याचं कारण म्हणजे नुकतीच माझ्या पाहण्यात आलेली एक वेबसाइट. 'सेव्हन कप्स ऑफ टी' की, असंच काहीतरी नाव आहे त्या वेबसाइटचं. इथे तुम्हाला तुमची ओळख न सांगता कोणाशीही बोलता येतं. अगदी हव्या त्या विषयावर. बोलायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला कशाविषयी बोलायचं आहेत हे विचारलं जातं. म्हणजे मग त्या विषयानुसार तुम्हाला 'ऐकणारा' मिळू शकतो. आता हे ऐकणारे कोण आहेत? तर तुमच्या माझ्यासारखेच लोक. याच वेबसाइटवर तुम्ही 'ऐकणारे' म्हणूनही काम करू शकता. हे सगळं मोफत आहे. यावर कोणती नोंदणीही करावी लागत नाही, ना तुमची माहिती कुठे द्यावी लागते. तुम्ही अगदी निश्चिंतपणे मनातलं सगळं इथे बोलू शकता. मनातलं सगळं काही बोलायची कुठे सोयच नाही, असं वाटल्यानं इथे हजारो लोक रोज भडाभडा बोलतात. मोकळे होतात. ही वेबसाइट बघून माझ्या मनात अनेक विचार आले. "काय ही आपली अवस्था," असा एक साहजिक विचार डोक्यात आला. त्याचबरोबर असाही विचार आला, की आपलं बोलणं 'ऐकण्यासाठी' आपल्या जवळ कोणीही नाही, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हा मोठा आधार ठरत असेल का? पण खरंच आधार मिळत असेल, की उलट लोक अधिकच नैराश्यात जात असतील? मागे एकदा एका चर्चेत 'सोशल मिडिया हा एकटेपणा दूर करण्यासाठी उपयोगी पडतो का' हा विषय आला होता. वेळ घालवण्यासाठी सोशल मिडिया उपयोगी पडत असेल कदाचित; पण त्या आभासी दुनियेतही सदैव स्वतःला प्रेझेंट करण्याची, 'दाखवण्याची' धडपड आपण करत राहतो. आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न. यातूनच मग सोशल मिडियावर एक मुखवटा धारण करून वावरणाऱ्या लोकांना मुखवटा सोडून स्वतःच्या खऱ्या भावना, स्वतःचे खरे विचार मांडायची संधीच मिळत नाही. मात्र, जर आभासी जगाच्या बाहेर, प्रत्यक्षातील जगात व्यक्ती-व्यक्तीमधलं नातं तितकं खुलं आणि प्रामाणिक असेल. आपलीच जवळची म्हटली जाणारी व्यक्ती आपल्या बोलण्याला, आपल्या विचारांना आणि शेवटी यातून आपल्यालाच एक व्यक्ती म्हणून जोखणार असेल, त्यावर आधारित आपलं मूल्यांकन करणार असेल, तर मला त्या व्यक्तीबरोबर मोकळेपणाने बोलता येईल का? की मी सदैव अमुक अमुक बोलले, तर आता याला/हिला काय वाटेल असेच विचार माझ्या मनात येतील? दुसऱ्याचीच शक्यता जास्त आहे, माझ्या मते.

"मी जे सांगते आहे त्याचं अॅनालिसिस न करता नुसतं ऐकून घेऊ शकतच नाही हा," अशी नवऱ्याची तक्रार तरुण मुली आणि मोठ्या बायकांनाही करताना ऐकलं आहे. त्याचबरोबर "बघ, तरी मी सांगत होतेच की नै...," अशी सुरुवात करून बायका नवऱ्यांशी बोलतात. अनेकदा हेही आपण बघितलं असेलच. अशा वेळी मग हिला/याला सांगण्यात काही अर्थच नाही, असं म्हणत संवाद कमी व्हायला सुरुवात होते. इथेच समानुभूती हा भाग येतो. आपल्या सगळ्यांना सहानुभूती हा प्रकार परिचयाचा आहे. अनेक गोष्टींचा आपण सहानुभूतीने विचार करतोच; पण समानुभूती म्हणजे सहानुभूती नव्हे. सहानुभूतीमध्ये एक त्रयस्थपणा आहे. थोडं अंतर आहे. समानुभूतीमध्ये 'दुसऱ्याच्या जागी जाऊन विचार करणे' अंतर्भूत आहे. इंग्रजीमध्ये ज्याला "getting in to one's shoes" असं म्हणतात. माणसाला आपल्या जवळच्या माणसांकडून जोडीदाराकडून सहानुभूतीची नव्हे; तर समानुभूतीची आवश्यकता असते. समान भावनेने, समजून घेत आपलेपणाने ऐकणाऱ्या 'कानाची' आवश्यकता असते. हा कान जिथे मिळाला तिथे तो भडाभडा बोलू लागतो. ज्याच्याशी बोलतो, ज्याच्याशी आपण मनातल्या गोष्टी शेअर करतो त्या माणसाशी आपलं नातं घट्ट होत जातं.

नाती समृद्ध करायची असतील, तर समानुभूतीने ऐकणाऱ्या कानांची उणीव राहू न देण्याची जबाबदारी आपलीच आहे. नाहीतर कानांच्या शोधात आपली माणसं या 'सेव्हन कप्स'सारख्या वेबसाइट्स शोधतील. उत्तम संवाद म्हणजे नुसते बोलणे नव्हे; तर ऐकणंसुद्धा! हे आपण विसरता कामा नये. 'कान'सेन नसतील, तर तानसेनाची कदर कोणाला असणार ! नात्यांच्या गरजेनुसार कधी कानसेन, कधी तानसेन अशी भूमिका आपण घेत गेल्यास नात्याचे सूर जुळतील आणि आयुष्याची मैफल रंगायला लागेल यात शंका नाही !

~ गौरी कानिटकर (महाराष्ट्र टाईम्स, १२ जुलै २०१५)