Monday, February 1, 2021

स्वामी विवेकानंद जयंती

जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही

स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) निमित्त अभ्यास करता-करता एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी व स्वामी विवेकानंद ह्या दोन व्यक्तिमत्त्वांमधील समानता.   कागदावर उतरविल्याशिवाय राहवत नाही इतकं साम्य अभ्यास करताना  दिसू लागलं  म्हणून हा लेखनप्रपंच.
समर्थांना लहानपणीच मारुतीरायाच्या भक्तीचे वेड लागले.  एकदा आठ-नऊ वर्षांचा ‘नारायण’ (समर्थांचे मूळ नाव) काही केल्या कुठे सापडेना.  सर्वत्र शोधाशोध झाली; पण नारायण काही मिळेना.  थोड्या वेळाने नारायण फडताळातून बाहेर आला आणि आईचा जीव भांड्यात पडला.  “कुठे होतास इतका वेळ?” ह्या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण म्हणाला, “चिंता करितो विश्वाची.” लहान नरेंद्रनाथाचे वेडही काहीसे असेच होते.  माडीवर ध्यानस्थ बसण्याचे प्रयोग, त्याने अगदी लहान वयात सुरू केले.  एकदा नरेंद्राने रामायणाची कथा ऐकली व त्यातील हनुमानाच्या शक्तीचे वर्णन ऐकून तो भारावून गेला. कीर्तनकाराने उल्लेख केला की हनुमान वनात राहतो त्याला भेटण्याच्या उद्दीष्टाने छोटा नरेंद्र केळीच्या बनांत बराच काळ बसला; पण हनुमानाचे दर्शन झाले नाही म्हणून खटटू मनाने घरी आला. घडलेली कथा त्याने आईला सांगितली तेव्हा तिने त्याची समजूत घातली की हनुमान रामाचे काही काम करावयास गेला असेल म्हणून तुझी भेट झाली नाही.  हे स्पष्टीकरण छोट्या नरेंद्रला पटले.
ह्या दोन संन्याशांमध्ये ठाशीव साधर्म्य सापडते.  बालपणापासूनचे वैराग्य ही त्यातील सगळ्यात मोठी व पायाभूत समानता.  दोघांना घोड्यावर बसून रपेट करण्याची आवड होती.  समर्थ दासबोधात असे म्हणतात- ‘तुरंग (घोडा) शस्त्र दमून पाहिले’ म्हणजे घोडा घेण्यापूर्वी चालवून पहावा. छोट्या नरेंद्रचा किस्सा सांगतात, त्याला कुणीतरी विचारले, ” बाळ तू मोठेपणी काय करणार? ” त्यावर त्याचे उत्तर होते, ” मी घोडागाडी चालवणार.” हे उत्तर ऐकून सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाच्या तसबीरीसमोर वडिलांनी नरेंद्रला उभे केले आणि सांगितले, “काही हरकत नाही, पण श्रीकृष्णास मान घोडागाडी चालव.”  आणि काय कौतुक वर्णावे, ह्या मुलाने पुढे अनेकांसाठी अध्यात्माचा रथ हाकला, मार्गदर्शन केले.
खेळांची आवड, त्यातील प्राविण्य, सळसळता उत्साह याच्या मूर्ती म्हणजे समर्थ व विवेकानंद होत. विवेकानंदांना फुटबॉल, मुष्ठीयुद्ध अत्यंत प्रिय होते. काही प्रसंगी दुबळ्या शरीरयष्टीच्या मित्रांकडे पाहून किंवा नुसत्या पुस्तकी किडे बनणाऱ्यांकडे पाहून ते म्हणत, “ती पुस्तके फेकून द्या आणि मैदानात उतरा.  उत्तम व्यायाम करा, धडधडीत शरीरसंपदा कमवा.”  हे दोन्ही संन्यासी संगीतात उत्तम गती असणारे होते.  जाणकार होते.  विवेकानंद सतार, तबला, पखावज वाजवित असत.  त्यांनी गाण्याचे बा-कायदा शिक्षण ‘वेणीमाधव अधिकारी’ व ‘दुसरे उस्ताद अहमदखाँ’ ह्यांच्याकडे घेतले.  ‘संगीत कल्पतरु’ नावाचा ग्रंथ त्यांनी वयाच्या बावीस­तेवीसाव्या वर्षी लिहिला होता. पुढे तो १८७८ वर्षी ‘श्रीचंडीशरण बसाक’ यांनी आपल्या ‘आर्यपुस्तकालय’ या प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित केला. समर्थ संगीत कुठे शिकले हे माहीत नाही; पण त्यांचे संगीत विषयावरील भाष्य थक्क करून सोडणारे आहे.  जसे –
१. अजि कोई ‘काफी’ (हा एक राग आहे) गाओ रेऽ
राग में राग तो सारा केदार, मोहन तान कल्याण चलावे
ऐसा हे सारंग भाई ऽ पाहा कैसा शंकराभरणऽ भरण नव्हें इतरा मरण
आसावरी रागऽ आसावरी रागऽ आसावरी रंग माजे
२. ताळ मृदंग, उपांग यंत्र वीणे
धिगीकट धीगीकट तान तानें मानें धींग होतो,
असे रागांवर, तालांवर भाष्य केले आहे.
आता आपण ह्या दोन संन्याशांच्या इतर काही पैलूंवर नजर टाकूया. समर्थांच्या काही ओव्या आणि त्या संदर्भात विवेकानंदांच्या आयुष्यातील प्रसंग अशा क्रमाने हे पाहूया.
दुसऱ्याच्या दु:खाबद्दलची संवेदनशीलता
समर्थ म्हणतात,
दुसऱ्याच्या दु:खे दु:खावेऽ दुसऱ्याच्या सुखे सुखावेऽऽ
आवघेचि सुखी असावेऽ ऐसी वासना ऽऽ (अशी इच्छा)
अकरा सप्टेंबर १८९३ साली शिकागोत भरलेल्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी जगद्विख्यात शब्द उच्चारले, “अमेरिकेतील माझ्या बंधू­भगिनींनो” त्यादिवशी त्यांचा उदोउदो झाला.  भाषणाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या रात्री विवेकानंद घरी आले आणि बराच काळ त्यांना झोप येईना. झालेल्या कौतुकामुळे नव्हे, तर त्यांच्या मनातले विचार होते, ­’हे जगन्माते मला माझ्या देशबांधवांचे दु:ख दूर करण्याची शक्ती दे.  तसे काहीतरी कार्य माझे हातून घडू दे.  असे काही घडणार नसेल, तर असला मान­सन्मान, हार­तुरे, कौतुकसुमनें मला नकोत.’ ह्या विचारांची तीव्रता इतकी होती की डोळ्यातून घळघळा वाहणाऱ्या अश्रुंनी उशी भिजली.  यानंतर भारतात कार्य करीत असताना अनेकदा भारतीय जनतेचे दारिद्र्य, दु:ख पाहून त्यांचे अंत:करण पिळवटून निघे.  एका प्रसंगी त्यांनी असे उद्गार काढले आहेत की समाजसुधारणेसाठी, पीडितांची पीडा दूर करण्यासाठी हृदयातील रक्त शिंपडण्याइतकी तयारी हवी, त्यागवृत्ती हवी.
उपासना आणि संघटना बांधणी
उपासनेबाबत समर्थ अतिशय प्रभावी भाष्य करतात, दासबोधात म्हणतात,
अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग
लोक, समजोन मग आज्ञा इच्छिती
तसेच,
काही गल्बला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ
जेणेकरिता विश्रांती वेळ आपणांसी फावे
विवेकानंदांनी अनेकदा सखोल ध्यानमग्न स्थितीचा अनुभव घेतला. परदेशात वास्तव्य करीत असतां ‘थाऊजण्ड पार्क’ इथल्या वास्तव्यात त्यांनी खूप ध्यानधारणा केली. कन्याकुमारीच्या खडकावर तीन दिवस ध्यान व चिंतनात घालविले.  ‘कॅल्व्हे’ नावाच्या स्त्रीला मानसिक अस्थैर्याने ग्रासले होते. विवेकानंदांकडे ती आली तेव्हा त्यांनी स्वत:च्या बाजूला ध्यानास बसावयास सांगितले. त्यातून तिला अपूर्व शांतता लाभली. इतकी की नंतरचे कित्येक दिवस तो अनुभव ती इतरांना सांगत होती. कार्यव्याप सांभाळताना त्यांनी वैयक्तिक साधनेकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.
समर्थांच्या भाषेत मांडावयाचे झाले तर
जितुके होईल तितुके करावे
भगवत्कीर्तीने भरावे भूमंडळ
संघटना बांधणीचे अपूर्व कसब ह्या दोघांनी समाजाला स्वत:च्या कार्यातून दाखविले
समर्थ म्हणतात,
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे
समर्थांनी भारतभर हजारहून अधिक (जवळजवळ अठराशे) मठ उभे केले. महाराष्ट्रात त्यांनी स्थापलेले ११ मारुती अर्थात् मारुतीमंदिरे आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहेत. असंख्य रामदासी, संन्यासी निर्माण केले.  रामदासी संप्रदायाची ही परंपरा आजही टिकून आहे. इतर अनेक देवालयांची पुनर्बांधणी, नवनिर्माण त्यांनी केले.  समर्थांच्या मठाबद्दल परकीय प्रवासी ‘कॉस्मा दी ग्वार्द’ म्हणतो, “रामदासी संप्रदायाचे मठ स्वयंपूर्ण, स्वावलंबी व संपन्न होते.”
ख्रिस्ती मिशनरी चळवळ पाहूनच विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मिशन’ ह्या नावाने चळवळ उभी केली. संन्याशांची संघटना बांधली. रामकृष्णांनी विवेकानंदांवर जबाबदारी दिली होती, ह्या तरुण संन्याशांपैकी एकही पुन्हा घराकडे, संसारी इच्छांकडे वळता कामा नये. विवेकानंदांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. अमेरिकेत त्यांनी वेदांताचे वर्ग चालविले. अनेकांना ध्यान-धारणा शिकविली. पत्रं लिहून प्रेरणा दिली, मार्गदर्शन. रामकृष्ण मिशनच्या बोधचिन्हामागे विवेकानंदांची आध्यात्मिक संकल्पना अशी होती – ‘पाण्याच्या लाटा म्हणजे कर्म, उमललेले कमलपुष्प म्हणजे भक्ती, हंस म्हणजे परमेश्वर, उगवता सूर्य म्हणजे ज्ञान. ह्या सर्वांना वेटोळे घालणारा नाग म्हणजे कुंडलीनी योग.’ विवेकानंदांच्या पश्चात अनेकांनी पुस्तके लिहिली. त्यातून विवेकानंदांचे संघटना बांधणीचे कौशल्य उमजून येते.
संन्याशाची निर्भीडता व अनेकांचा आधारस्तंभ
पवित्रतेच्या धारणेतून निर्भीडतेचा जन्म होतो.  भयाची भावना जवळपास फिरकतही नाही.
समर्थांचा एक शिष्य उद्धव गोसावी हा एका मठाचा मठाधिपती होता.  तेथील मुसलमान सुभेदार गोसावीबाबांना फार त्रास देऊ लागला.  समर्थांना हे कळल्यावर ते त्वरेने तेथे गेले व त्या सुभेदारास वेताच्या छडीने फोडून काढले.  ह्याबाबतचे समर्थांचे भाष्य मोठे मनोरंजक आहे.
म्हणोनि येके करा रे पाजी ताडिता उभ्याने मुततो काजी
तोबा तोबा हम नहीं जानो जी या अल्ला या खुदा म्हणतसेऽ
असाच तडफदार स्वभाव विवेकानंदांचा होता. कॉलेजात शिकत असताना, परीक्षेची फी भरण्याचीही आर्थिक स्थिती ‘हरिदास’ नावाच्या मित्राची नव्हती. राजकुमार नावाच्या कॉलेजच्या ज्येष्ठ लेखनिकाने त्यांची विनवणी धुडकावून लावली. ह्या राजकुमारला विवेकानंदांनी अफूच्या अड्डयावर धरले व सांगितले की ‘मी ह्याचा बोभाटा करेन.’ तेव्हा तो राजी झाला व हरिदासाचा मार्ग सुकर झाला. वराहनगरच्या मठात विवेकानंदांबरोबर काही संन्यासी राहत होते. एका सरकारी अधिकाऱ्याला हे संन्यासी इंग्रजविरोधी कारवाया करताहेत असा समज (गैरसमज) झाला. तो चौकशीसाठी मठात आला. विवेकानंदांनी आपल्या कार्याची ग्वाही देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला; पण अधिकारी काही बधेना. शेवटी विवेकानंदांनी खोलीचे दार लावून घेतले आणि अशा काही आवाजात सज्जड दम दिला की तो काय समजायचे ते समजून गेला.
अशाच एका प्रसंगात विवेकानंदांचे गुणविशेष प्रकर्षाने उल्लेखावेसे वाटतात. बोटीने परदेशी जात असतां, एका माणसाबरोबर हिंदुत्वाबद्दल होणाऱ्या चर्चेचे वादात रूपांतर झाले. समोरचा माणूस भारतीय देवी – देवतांबद्दल अपशब्द बोलू लागला, हे पाहता विवेकानंदांनी त्याची कॉलर पकडली व म्हणाले, “भल्या माणसा तू आता गप्प बसावंस ह्यातच तुझी भलाई आहे. अन्यथा तुला खाली पाण्यात फेकून देईन,” हे ऐकल्यावर तो गप्प झाला हे सांगणे न लागे.
समर्थांच्या भाषेत विवेकानंदांची कृती वर्णन करावयाची झाली तर ­
आधी गाजवावे तडाखे तरीच भूमंडळ धाके
किंवा
नीतीन्याये वाट रोधावी पाषांडांची
क्रांतिकारी संन्यस्त जीवन
दोघे क्रांतिकारी होते.  वेणाबार्इ नावाच्या तरुण स्त्रीच्या नशीबी विधवेचे जिणे आले. ती समर्थांची शिष्या बनली.  समर्थांनी तिचे नामकरण ‘वेणास्वामी’ केले आणि एका मठाची अधिकारी बनविले. इतकेच नव्हे तर तिला कीर्तन करावयास शिकविले. त्याकाळी कुठल्याही स्त्रीला संन्यास घेणे, मठाधिपती बनणे किंवा समाजप्रबोधन करणे असले अधिकार नव्हते. समर्थांनी स्वत:च्या अधिकारात हे सर्व जाणीवपूर्वक घडवून आणले.  विवेकानंदांनी ‘सिस्टर निवेदिता’सारख्या परदेशी स्त्रीला भारतीय पद्धतीने संन्यास देऊ केला. तिने भारतात शाळा उघडल्या, समाजसेवा केली.
समर्थांचा दासबोध वाचताना जाणवते की त्यांचे भाष्य नाही असा जगातला एकही विषय नाही – राजकारण, महंतलक्षण, मूर्खाची लक्षणे, शहाण्याची लक्षणे, भक्तीचे प्रकार, अद्वैतवाद असे असंख्य विषय दासबोधात विस्तॄतरुपाने मांडले आहेत.
१९ डिसेंबर १९१५साली तुरीयानंदांनी लिहिलेले एक पत्र उपलब्ध झाले आहे.  त्यात ते उल्लेख करतात, विवेकानंदांनी चप्पल शिवण्यापासून ते चण्डीपाठ कसा करावा अशा अनेक विषयांवर अनेकांना मार्गदर्शन केले. ह्या दोन महान व्यक्तींना कुठल्याही विषयाचा आवाका घेणे सहज जमत असे, मग ते विटा भाजण्याचे तंत्र असो, कागद बनविणे असो किंवा अजून काही इंग्लंडमधे फिरत असताना विवेकानंदांनी एका औद्योगिक प्रदर्शनाला देखील भेट दिली. ‘मी संन्यासी आहे, मला काय त्याचे’ अशी विचारधारा बिलकुल नव्हती. थोड्याशा अनवट वाटेने जाणारे हे महंत होते. समर्थ विडा खात असत तर विवेकानंदांनी काही काळ हुक्का किंवा पाईपचा आस्वादही घेतला.

विरक्तांचे परिव्राजक व्रत
संन्यासी हा प्रवासी असावा-‘नदी बहती भली, साधु चलता भला’ ह्या उक्तीप्रमाणे समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. विवेकानंदांनी तर देश आणि विदेश दोन्ही पालथे घातले.
समर्थ म्हणतात,
विरक्ते येकदेसी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे
विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्या परी
तसेच,
वैराग्याची बहु आवडी उदास वृत्तीची गोडी
विवेकानंदांनी दक्षिणेपासून उत्तरेकडे, पूर्वेपासून पश्चिमेकडे संपूर्ण भारतभर भ्रमण केले. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांत भ्रमण केले. व्याख्याने दिली’श्रीयुत गुडविन’सारखा शिष्य त्यांना या दरम्यान लाभला. पुढे तो त्यांचा लेखनिक बनला म्हणून विवेकानंद लिहू शकले. वेदांतावर ‘टीका’ करू शकले.
विवेकानंद परदेशी असताना भारतातील काही द्वेष्ट्यांनी त्यांच्याविषयी अपप्रचार केला.  इतकेच नव्हे तर त्यांच्याबद्दल खोटे­नाटे लिहून वर्तमानपत्रात छापून आणले. इतके करूनही समाधान झाले नाही म्हणून ते विदेशापर्यंत पोहोचविले. चारित्र्यावर शिंतोडे उडविले. ह्यामागील मुख्य व्यक्ती त्यांच्या वंग प्रांतातीलच ‘मुजुमदार’ नावाची होती. विवेकानंदांनी हे टीकेचे आसूड हृदयावर दगड ठेवून झेलले. ‘नीळकंठ’ बनून ते कडू विष प्राशन केले.  समर्थांच्या भाषेत व्यक्त करावयाचे तर,
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावें
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावें
परिव्राजक व्रत घेतलेल्या विवेकानंदांनी आपल्या भ्रमणकाळात एक कठोर व्रत घेऊन स्वत:ची परीक्षा घेतली होती.  व्रत असे होते – स्वत:हून कुणालाही अन्न मागावयाचे नाही. अगदीच आग्रह केला तर थोडेसे अन्न घ्यावयाचे; पण भुकेविषयी उल्लेखही करावयाचा नाही.
समर्थांनी पाण्यात उभे राहून साधना केली तेव्हा, मिळालेली भिक्षा पाण्यातून काढावी म्हणजे त्यातील रस, गंध, चव सगळे नष्ट होते, मग त्यातील एक भाग गायीला, एक भाग पाण्यातील जीवांना द्यावा व एक भाग (मुष्ठीभर) आपण घ्यावा. अशी बारा वर्षे साधना केली.  धन्य ते विरक्त लोक आणि धन्य ती तपश्चर्या!
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी
समर्थांनी मृत्युचे भय घालविण्यासाठी एक स्वतंत्र प्रकरणच दासबोधात लिहिले आहे.  मृत्युच्या पुढे कुणाचे काही चालत नाही.  मृत्यू न म्हणे हा राजा हा रंक, हा संन्यासी हा गृहस्थी असे विस्तॄत प्रबोधन केले आहे. जीवनातले शाश्वत तत्त्व अथवा सत्य म्हणजे मृत्यू हे समजवताना ते म्हणतात,
मरे येक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात राहे
तसेच,
मना सांग पा रावणां काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वें बुडाले
मृत्युसंबंधी विवेकानंदांचे विचार आपल्याला अंतर्मुख करतात. एकदा जमलेल्या लोकांनी मृत्यु- बद्दलचा विषय छेडला तेव्हा विवेकानंद म्हणाले, “जेव्हा जेव्हा मृत्युचा विचार येतो तेव्हा माझ्या मनांतदुर्बलतेचा अंशही उरत नाही.” असे म्हणून विवेकानंदांनी दोन दगड उचलले व एकमेकांवर जोरात आपटले. पुढे ते म्हणाले,”माझं मन असं टणक होऊन जातं, जेव्हा मी मृत्यूबद्दल विचार करतो, याचं कारण मी परमेश्वराचं दर्शन घेतलं आहे.”
किती घनगंभीर विचार आहेत नाही!
अशा या दोन प्रकाशताऱ्यांच्या शिष्यांना आपल्या गुरुबद्दल जे काही वाटलं ते त्यांनी शब्दबद्ध केलं. त्याचा अल्पसा उल्लेख करून हा प्रपंच इथेच थांबवितो.
रामदासांचा शिष्य उद्धव गोसावी ह्याने एका ओवीबद्ध काव्याची रचना केली. त्यात तो म्हणतो की बरें झाले मी लग्न नाही केले, ह्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली संन्यासी झालो आणि अनेक व्यापांतून मुक्त झालो. त्यातल्या शेवटच्या ओळीच फक्त इथे देतो,
धन्य धन्य महापुरुष तेचि ईश्वराचे अंश
शुकासारिखे उदास म्हणती त्यांसी
शिवरामाला तारिले ( उद्धवालाच शिवरामही म्हणत ) जन्मापासूनि मुक्त केले
भक्त लोक मुक्त झाले रामराजें
भगिनी निवेदिताने ‘दी मास्टर अ‍ॅज आय सॉ हिम्’ ह्या पुस्तकांत विवेकानंदांविषयी लिहून ठेवलंय, त्यांच्याकडून काय काय घेतलं, काय अनुभवलं, किती काय शिकली हे वाचनीय आहे.  शिष्याच्या दृष्टीतून दिसणारा गुरु बराच वेगळा जाणवतो.
अशा लोकांचे अनुभव, त्यांचे जीवन म्हणजे हीरे, माणिक, मोती आहेत. आपण त्यातले किती वेचावे, धारण करावे तेवढे थोडे आहे.
आयुष्य हेचि रत्नपेटी माझी भजनरत्ने गोमटीं
ईश्वरी अर्पूनिया लुटी आनंदाची करावीं
इतकेच काय ते म्हणू शकतो

– ©️ सचिन वि. उपाध्ये 



blog

sachinupadhye26@gmail.com

राऊळ महाराज

॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
II श्री परमपूज्य सद्‌गुरू समर्थ राऊळमहाराज II
कोकण ही संतरत्नांची खाण म्हटले जाते.वैविध्यपुर्ण सौंदर्य संपन्न कोकणात बरेच संतमहात्मे होऊन गेले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव तसे कळसुत्री बाहुल्या, आणि ठाकर समाजाने जतन केलेल्या बर्याच लोककला मुळे प्रसिद्ध आहे.हेच गाव पिंगुळीतील थोर अवलिया संत राऊळ महाराजांमुळे प्रकाशझोतात आले.

सिंधुदूर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या लहानशा खेडेगावात जन्माला आलेले हे पिंगुळीचे ब्रम्हयोगी असा हा दत्ताचा अवतार म्हणजे परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज. लहानपणापासून परमार्थाकडे ओढा असलेले हे सद्‌गुरू नामस्मरणात रंगून जात. ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्‌गत होती. ते १९४५ ते १९७२ अशी २७ वर्ष कठोर ध्यानसाधना एका छोट्‌याशा खोलीत, एकावेळी २ ते ३ महिने काहीही प्राशन न करता करत असत. त्या काळात जगात ‘आई श्रेष्ठ’ याचेच प्रबोधन ते जास्त करत आणि तीच शिकवण परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज आज भक्तजनांना देतात.

पिंगुळी क्षेत्री परमपूज्य श्री समर्थ महाराजांनी जांनी ज्या छोटया खोलीत ध्यानधारणा केली, तेथेच परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज समाधिस्त झाले आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी राऊळबाबांचे समाधीमंदिर तेथेच उभारले आहे. या समाधीमंदिर व श्रीदेवी माउली मंदिर या दोघांच्या मध्ये उभा असलेला औदुंबर वॄक्ष परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या ध्यानसाधनेचा आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांच्या आजपपर्यंतच्या ५८ वर्षांचा आध्यात्मिक प्रवासाचा साक्षी आहे.

सर्वसामान्य माणसासारखे एका गरिब शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कृष्णा उर्फ आबा राऊळ पिंगुळी ग्रामदेवता रवळनाथ देवस्थानचे मानकरी होते.घरच्या गरबीमुळे ते नोकरीसाठी मुंबईला आले.त्याना भजन गाण्याचा छंद होता.ज्ञानेश्वर तुकारामादी संताचे अभंग मुखोद्गत होते.काम करताना आपल्या पहाडी आवाजात सतत मुखांने  अभंग गात असत.संसारात विरक्ती आली आणि ते विश्वात्मक वृत्तीतुन संसारी लोकांना भक्तीमार्गाकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन करु लागले. शिक्षण कमी असले तरी त्यांचे पाठांतर चांगले असे.त्यानां ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती.त्यांनी भक्तांसाठी बरेच चमत्कार केले.भक्तांची संकटे दुर केली.

भक्तासाठी पंढरीच्या विठ्ठलाचे आपल्यात दर्शन घडवले.कित्येक भक्तांना ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचे करवी पारायणे करवुन घेतली.त्या़नी लावलेले औंदुबर वृक्षाचे रोप आज मोठ्या वृक्षात रुपांतरीत झाले.त्यांचा भक्त संप्रदाय खुप मोठा आहे.मुंबई महाराष्ट्र,गोवा कर्नाटक या राज्यातुन आजही पिंगुळी गावी समाधी स्थानी भक्त मंडळी येतात.समाधीस्थानी नतमस्तक होतात.अशा या सद्गुरू राऊळ महाराजांनी इंचगिरीच्या गिरीमल्लेश्वर संप्रदायाच्या बाळकृष्ण महाराजांकडून शिष्यत्व पत्करले होते.

भजन त्यांच्या आवडीचे असल्याने ते स्वत:भजन गात आणि इतरांकडुनही भजन करवुन घेत.ते तपसाधनेसाठी कुठेही गेले नाही घरातच तासन् तास ध्यानाला बसत.असे हे सिद्ध अवलिया जरी आज आपल्यात नसले तरी पिंगुळी गावी समाधी स्थानी नतमस्तक झाल्यावर त्यांचे चिरंतन अस्तित्व जाणवते.त्यांच्या पश्र्चात त्यांचे पुतणे अण्णा महाराज त्यांचे कार्य सांभाळतात.

॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
@गणेश उर्फ ​​अभिजित कदम