Showing posts with label FESTIVALS. Show all posts
Showing posts with label FESTIVALS. Show all posts
Wednesday, October 28, 2015
Monday, July 27, 2015
Saturday, September 11, 2010
गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी
आपल्या भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गणरायाची जन्म कथा अशी आहे. एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आत मध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.
काही वेळाने भगवान शंकर तिथे आले. व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.
पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेंव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नांव ठेवले. हा दिवस चतुर्थी चा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे.
या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या महाराष्ट्नत फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. ह्या गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली
Tuesday, August 24, 2010
रक्षाबंधन
स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.
रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.
बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.
भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.
बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.
देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सांगितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.
रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.
''स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील.
समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.
SOURCE:RAKSHA BANDHAN
Sunday, August 15, 2010
स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्टीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.
कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातन्त्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने सम्पूर्ण भारताचे शासन काबीज केले.
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.
१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.
Monday, July 26, 2010
आषाढी एकादशी
हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.
पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून ''तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल'' असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला.
परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.
सर्वेपि सुखिन: सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया ।
सर्वे म्रदाणि पश्यन्तु ।
मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।